अलमोडा : उत्तर प्रदेश राज्याच्या अलमोडा जिल्ह्याचे ठाणे व थंड हवेचे ठिकाण. कँटोनमेंटसह शहराची लोकसंख्या २१,०२१ (१९७१). उत्तरपूर्व रेल्वेच्या बरेली प्रस्थानकाच्या उत्तरेस १०५ किमी. वरील काथगोदाम स्थानकापासून सडकेने उत्तरेस ११७ किमी.वर अलमोडा आहे. सोळाव्या शतकातील कुमाऊँच्या चंद राजाची ही राजधानी. १७४४ मध्ये रोहिल्यांनी ही जिंकली. परंतु हवामान न मानवल्यामुळे त्यांनी ती लवकरच सोडली. नंतर गुरख्यांकडून सिरोहीच्या लढाईनंतर इंग्रजांनी १८१५ मध्ये ही घेतली आणि येथे गुरखा फौजेचे ठाणे ठेवले. १८६४ पासून येथे नगरपालिका आहे. उत्तम हवामानामुळे येथे क्षयरोग्यांकरिता व इतर रोग्यांसाठीही बरीच रुग्णालये तसेच आरामगृहे आहेत. कित्येक शिक्षणसंस्था, ख्रिस्ती व हिंदू धर्म-प्रचारकेंद्रे, नृत्याचार्य उदय शंकर यांनी स्थापन केलेले अखिल भारतीय सांस्कृतिक केंद्र इ. येथे असून जिल्ह्यातील व्यापाराचे हे प्रमुख केंद्र आहे. शहराच्या आसपास हिमालयाची मनोहर दर्शनस्थाने सीहीदेवी, बंदनीदेवीसारखी गिरिशिखरे कालीभट्टी, हिराडुंगी, बिनसर अथवा झँडीधार अशा टेकड्या सिरतोली, बिकटवनी ही वनश्रीस्थाने बिनेश्वर, बाघेश्वरसारखी देवस्थाने चंपावत, कत्यूर आदी प्राचीन नगरींचे अवशेष अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.

ओक, शा. नि.