तुर्फान : तू–लू–फान. चीनच्या सिंक्यांग–ऊईगुर प्रांतातील तारीमच्या खोऱ्यातील खोलगट प्रदेश. हा जगातील व आशियातील अत्यंत खोलगट प्रदेशांपैकी एक असून त्याचे क्षेत्रफळ १,२४,३२० चौ. किमी. आणि पातळी काही भागात समुद्रसपाटीखाली १३० मी. ते १५४ मी. पर्यंत आहे तसेच जवळपासची तारीम नदी व लॉप नॉर सरोवर ही मात्र समुद्रसपाटीपासून ६००–९०० मी. उंच आहेत. हा विभंग द्रोणीचा (पूर्वीचा लुकचुन) प्रदेश उत्तरेकडील पो–को–टो शान व दक्षिणेक़डील कुलुको श्रेणी यांच्यामध्ये आहे. ह्‌वा शान पर्वताने याचे दोन भाग केलेले आहेत. याच्या काही भागात खारी सरोवरे व दलदली आहेत. जलसिंचनासाठी या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागात साठलेल्या पाण्याचा, तर दक्षिणेकडील भागात जमिनीखालील पाणी घेण्याच्या इराणी तंत्राचा वापर करतात. येथील हवामान विषम, खंडीय प्रकारचे आहे. येथील सरासरी तपमान जानेवारीमध्ये –१०° से. व जुलैमध्ये ३२° से. असते. दैनंदिन तपमान कक्षेत फार फरक पडतो. उन्हाळ्यात ५४° से. पर्यंत तपमान वाढते. पाऊस फारच कमी आहे.

या प्रदेशात मुख्यतः द्राक्षे, खरबूज, पीच, जरदाळू व कवचीची फळे यांच्या बागा आहेत. गव्हाचे पीक मुख्य असून कापूस व रेशीम यांचेही उत्पन्न वाढत आहे. या भागात १९४९ मध्ये स्थायिक झालेल्या मुख्यतः ऊईगुर मुस्लिमांची वस्ती आहे. याच्या उत्तर भागातील रस्ते पूर्वीपासून सुस्थितीत असून कान्सू, ऊईगुर व ऊरूमची या शहरांशी जोडलेले आहेत. येथे पुष्कळ प्राचीन शहरांचे भग्नावशेष आहेत.

या प्रदेशात तुर्फान नावाचेच आधुनिक मुख्य शहर असून हे हा–मी ते कॅश्गार या मुख्य रेशीम रस्त्यावरील महत्त्वाचे व्यापार केंद्र आहे. लोकसंख्या १०,००० ते ५०,००० (१९७० अंदाज). हे समुद्रसपाटीपासून १३० मी. उंचीवर ऊरूमचीच्या आग्नेयीस सु. १४० किमी. आहे. हे दहाव्या व बाराव्या शतकांत चांगले भरभराटलेले शहर होते. याची साक्ष मध्ययुगीन बुद्ध मंदिरांतील शिल्पे व चिनी, तिबेटी, ऊईगुर, नेस्टोरियन व मॅनिकियन इ. भाषांतील हस्तलिखिते देतात.

संदर्भ : 1. Cressey, G. B. Land of the 500 Million, New York, 1955.

            2. Lyde, L. W. The Continent of Asia, London, 1933.

कांबळे, य. रा.