सँतेत्येन : फ्रान्समधील एक औद्योगिक शहर व ऱ्होन-आल्प्स प्रदेशातील ल्वार विभागाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १, ८३, ५२२ उपनगरांसह १, ७८, ५३० (२००७ अंदाज). फ्रान्सच्या आग्नेय भागात लीआँ शहराच्या नैर्ऋत्येस ५१ किमी. वर फ्यूरेन्स नदीकाठी ते वसले आहे. अगदी सुरुवातीला याच नावाच्या चर्चभोवती ही छोटीशी वस्ती वाढत गेली. त्यामुळे तिला सँतेत्येन हे नाव दिले गेले. इ. स. बाराव्या शतकात येथील लोहार लोक, याच्या परिसरात भूपृष्ठावर सापडणाऱ्या उच्च प्रतीच्या कोळशाचा वापर पोलादी वस्तू बनविण्यासाठी करत असत. चौदाव्या शतकात हे कोळशाच्या व्यापारासाठी प्रसिद्घीस आले. पंधराव्या शतकात येथे औद्योगिकीकरणास सुरुवात झाली. पहिल्या फ्रान्सिसच्या कारकीर्दीत (१५१५–४७) येथे बंदुका बनविण्याचा कारखाना निघाला तसेच रेशमी वस्त्रोद्योगासही चालना मिळाली. १८१५ मध्ये येथे पहिला पोलाद निर्मितीचा कारखाना निघाला. १८२७-२८ मध्ये देशातील पहिल्या लोहमार्गाचे हे अंतिम स्थानक बनले. या लोहमार्गाने कोळशाची वाहतूक होऊ लागली. कोळशाच्या समृद्घ साठ्यांमुळे १९६८ मध्ये या क्षेत्रातून २० लक्ष टन (फ्रान्सच्या एकूण उत्पादनाच्या ५%) उत्पादन घेतले गेले. लोहखनिज व कोळसा यांचे सातत्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले गेल्याने खाणी रिकाम्या झाल्या. परिणामतः येथील पोलाद उद्योगात कोळशाऐवजी वीज आणि लोहखनिजांऐवजी टाकाऊ धातू वापरण्यात येऊ लागले. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात फ्रेंच शासनाने या प्रदेशातील कोळशाच्या सर्व खाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे बेकारीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अभियांत्रिकी उद्योगाचा येथे विकास करण्यात आला.

देशातील हे महत्त्वाचे पोलाद निर्मिती व वस्त्रोद्योगाचे केंद्र आहे. पोलाद उत्पादनामुळे येथे मोटारी व त्यांचे सुटे भाग, शस्त्रास्त्रे व चिलखतांचे विलेपन, सायकली, यंत्रे, बंदुका, स्वयंचलित वाहनांचे सुटे भाग, वस्त्रोद्योगांची यंत्रसामग्री इत्यादींच्या उत्पादनांचे कारखाने निर्माण झाले. याशिवाय येथे रिबन, मफलर व टाय निर्मिती, काष्ठकाम, काच, रसायने, रंजनक्रिया इत्यादींचे कारखाने आहेत. ‘कॅसिनो’(जुगारगृह) विषयक एक मोठी फ्रेंच व्यापारी कंपनी येथे आहे. याच्या विस्तारामुळे जवळच्या लीआँ शहराशी ते जोडले गेल्यामुळे दोन्ही शहरे मिळून ऱ्होन-आल्प्स या आर्थिक विभागातील हा एक स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था असलेला महानगर समुच्चय निर्माण झाला आहे.

औद्योगिकीकरणामुळे शहरात खाणकामविषयक, तसेच औद्योगिक कला आणि अभिकल्पविषयक शिक्षण देणारी विद्यालये आहेत. मध्ययुगीन सँतेत्येन व ले ग्रां द चर्च, व्हाल-बेनॉइट ॲबी, सतराव्या शतकातील सेंट लुइस चर्च व नोत्रदाम चर्च या वास्तू प्रेक्षणीय आहेत. येथील एका भव्य राजवाड्यात शस्त्रास्त्रांचे संग्रहालय असून त्यात जगातील निवडक व वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रास्त्रे ठेवण्यात आली आहेत.

चौधरी, वसंत