क्लीव्हलँड : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ओहायओ राज्यातील सर्वांत मोठे शहर व औद्योगिक केंद्र. लोकसंख्या उपनगरांसह ७,५०,८७९ (१९७०). कायहोगा नदी जेथे ईअरी सरोवराला मिळते, तेथे हे शहर १७९६ साली स्थापण्यात आले. लोखंड, कोळसा ह्यांनी समृद्ध असलेला परिसर तसेच न्यूयॉर्क आणि शिकागो यांना मध्यवर्ती आणि दळणवळणाला सोयीस्कर केंद्र असल्यामुळे आज हे लोकसंख्येच्या दृष्टीने संयुक्त संस्थानांत दहावे व उद्योगधंद्यांच्या गटात सहाव्या क्रमांकावर आहे. जगातील काही मोठे पोलाद कारखाने येथे आढळतात. विविध धातुउद्योगांचे अनेक कारखाने येथे असून सु. ४०० प्रयोगशाळा आहेत. तेलशुद्धीकरण, ॲल्युमिनियम वस्तू, लोखंडी माल, चिनी मातीची भांडी, यांत्रिक हत्यारे व उपकरणे, ट्रॅक्टर, मोटारी, विमानाचे भाग, विद्युत् व इलेक्ट्रॉनीय साहित्य, कपडे, रंग, रसायन, प्लॅस्टिक, विटा आणि बांधकामसाहित्य, छापखाने इत्यादींचे उद्योग येथे आहेत. विद्यापीठ, अनेक महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था, मोठी ग्रंथालये, ख्यातनाम कलावीथी, नाट्यगृहे, क्रीडांगणे व उद्याने ह्यांमुळे शहरास महत्त्व आले आहे.

शाह, र. रू.