इक्‌बाल : (२२ फेब्रुवारी १८७३–२१ एप्रिल १९३८). सर मुहंमद इक्‌बाल हे उर्दूचे व फार्सीचे एक थोर कवी व विचारवंत होते. ‘इक्‌बाल’ हे त्यांचे कविनाम. त्यांचे पूर्वज काश्मीरी ब्राह्मण होते. इक्‌बाल यांचा जन्म सियालकोट येथे झाला. सिलायलकोट येथील मरे कॉलेजमध्ये त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले व लाहोर येथून त्यांनी तत्त्वज्ञानात एम्.ए.ची पदवी घेतली. नंतर जर्मनीतील म्यूनिक येथे जाऊन त्यांनी तत्त्वज्ञानात डॉक्टरेट मिळविली. इंग्रजी, जर्मन, फार्सी आणि उर्दू या चार भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इंग्‍लंडहून बॅरिस्टर होऊन ते स्वदेशी परतले (१९०८). सुरुवातीस त्यांनी लाहोर कॉजेलातील प्राध्यापकाची नोकरी पतकरली पण थोड्याच दिवसांत ती सोडून दिली व शेवटपर्यंत वकिलीव्यवसाय केला. लहानपणापासून ते कविता करीत होते. त्यांच्यावर सुरुवातीस सूफी विचारांचाही प्रभाव होता. ‘हिदायतु-उल् इस्लाम’ ह्या संस्थेच्या सभांमधूनही ते आपल्या कवितांचे वाचन करीत. ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ यासारखी आपली ओजस्वी आणि राष्ट्रीय कविता त्यांनी सुरुवातीच्या काळातच लिहिली.

इक्‌बाल

यूरोपातील तीन वर्षांच्या वास्तव्याने त्यांचा आरंभीचा राष्ट्रीय दृष्टिकोन सर्वस्वी बदलला आणि ते सर्व इस्लामवादाकडे वळले. त्यावेळी तुर्कस्तानची स्थिती आणि सत्ता डळमळीत झालेली होती, इराणवर रशियाचा डोळा होता आणि ट्रिपोलीवरील (उत्तर आफ्रिका) मुसलमानी सत्ता संपुष्टात आली होती. इस्लामच्या ह्या अवनतीच्या काळातच इक्‌बाल यांनी आपली प्रसिद्ध व हृदयस्पर्शी कविता लिहिली. सर्व इस्लामवादाचा गहिरा प्रभाव त्यांच्या विचारसरणीवर असल्यामुळे ते नंतर उर्दूऐवजी फार्सीत लेखन करू लागले. फार्सीचा आश्रय घेतल्याने आपल्या लेखनाचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रसार सर्व इस्लामी राष्ट्रांत होऊ शकेल, अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या तात्त्विक विचारसरणीवर आंरी बेर्गसाँ आणि फ्रीड्रिख नीत्शे यांच्या विचारांचा पगडा होता, हे त्यांच्या असरारे खुदी (१९१५) आणि रूमूजे बे खुदी (१९१८) ह्या दोन फार्सी ‘मस्‍नवीं’वरून (खंडकाव्य) स्पष्ट दिसते. ह्या दोन्ही मस्‍नवींचा इंग्रजी अनुवाद केंब्रिजचे प्राध्यापक निकल्सन यांनी केला (१९२०). इक्‌बाल यांना ‘सर’ हा किताबही ह्या ग्रंथांमुळेच बहाल करण्यात आला (१९२२). त्यांच्या लेखनाला जागतिक कीर्ती लाभली. दान्तेकृत डिव्हाइन कॉमेडीच्या धर्तीवर त्यांच्या फार्सी काव्यांचे पयामे मशरिक  आणि जावेदनामा  हे संग्रह निघाले (१९२०). १९३५ पासून ते पुन्हा उर्दूत लेखन करू लागले. बाले जिब्‍रैल आणि जर्बे-कलीम (१९३५) हे दोन उर्दू काव्यसंग्रह त्यांनी आयुष्याच्या अखेरीअखेरीस लिहिले. त्यांच्या प्रगत विचारांचे दर्शन ह्या संग्रहांतून आहेत घडते. त्यांच्या आरंभीच्या उर्दू कविता बाँगे दरा (१९२३) या संग्रहात आहेत. हैदराबाद, म्हैसूर, मद्रास व अलीगढ येथे त्यांनी इंग्रजीत जी व्याख्याने दिली, त्यांचा संग्रह लेक्चर्स ऑन द रिकन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजस थॉट इन इस्लाम (१९३८) या नावाने प्रसिद्ध झाला. इस्लाम धर्मावरील त्यांचे महत्त्वाचे तात्त्विक विचार त्यात आलेले आहेत. त्यात त्यांनी आपले सूफीविरोधी आणि कर्मयोगाची शिकवण देणारे तत्त्वज्ञान मांडले आहे. जगातील सर्व मुसलमानांनी संघटित व्हावे व कुराणप्रणीत आचरण ठेवावे. राष्ट्रीयतेची भावना इस्लामला मारक आहे. पाश्चत्त्य संस्कृती निसर्गरहस्ये उलगडण्याची धडपड करीत असली, तरी तिला परमेश्वरी निष्ठेचे अधिष्ठान नाही. लोकसत्ताक पद्धती निरर्थक आहे कारण तीत केवळ माणसे मोजली जातात, त्यांचे मूल्यामापन होत नाही. अशी मते त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादिली. ‘सारे जहाँसे अच्छा…’ यासारख्या ओळी सुरुवातीस लिहिणारे इक्‌बाल-

“चिनो अरब हमारा, हिंदोसितां हमारा

मुस्लीम हैं हम, वतन हैं सारा जहाँ हमारा”

अशा ओळी लिहू लागले. १९३० मध्ये ते मुस्लिम लीगचे अध्यक्ष निवडले गेले आणि त्यांनी मुसलमानांसाठी स्वतंत्र पाकिस्तानची योजना मांडून ती कार्यान्वित होण्याची मागणी केली.

 

त्यांच्या काव्यात तात्त्विक, धार्मिक, नैतिक, राजकीय विचारांचा मिलाफ व कलात्मक आविष्कार आढळतो. कवी व तत्त्वज्ञ अशा दोन्ही भूमिकांचा त्यांच्या काव्यात आविष्कार असल्यामुळे त्यांच्या काव्याबाबत टीकाकारांत तीव्र मतभेद आहेत. त्यांच्या काव्यावर आतापर्यंत अनेक टीकाग्रंथ लिहिले गेले. मानवाच्या अमर्याद आत्मशक्तीवर त्यांच्या तत्त्वज्ञानात विशेष भर दिलेला आढळतो. स्वप्रयत्‍नाने आणि चारित्र्याने माणूस स्वत:चा विकास स्वत:च करू शकतो, अशी त्यांची धारणा होती. उर्दूपेक्षा त्यांचे फार्सी काव्यलेखन अधिक दर्जेदार व महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या काव्याला उर्दू फार्सीत महत्त्वपूर्ण स्थान आहे.

संदर्भ : Vahid, S. A. Iqbal, His Art and Thought, London, 1959.

फैजी, सुलताना (उ.); सुर्वे, भा. ग. (म.)