सैनिकी अभियांत्रिकी : (मिलिटरी एन्जिनिअरिंग). लष्कराच्या वास्तू प्रकाराचे बांधकाम व अधोदर्शन (प्लॅन) करणारे एक शास्त्र. त्याची सुरुवातच प्राय: सैनिकी गरजांमधून निर्माण झाली आणि स्थापत्य अभियांत्रिकीचे ते पूर्वचिन्ह होय. युद्धोपयोगी यंत्र निर्मिती आणि तटबंदीयुक्त इमारती बांधणे, सैन्याची हालचाल सुकर व्हावी म्हणून विमानतळ, बंदरे, रस्ते व पूल बांधणे, लष्करी छावणीतील गरजा पुरविणे, तसेच सर्वेक्षण व चित्रण (मॅपिंग) करणे आदी विविध अंगांनी सैनिकी अभियांत्रिकी शास्त्राची उत्तरोत्तर वाढ झाली आहे. आधुनिक लष्करी अभियांत्रिकी तीन प्रमुख कार्यपद्धतींत विभागता येईल. एक, युद्धप्रवण अभियांत्रिकी दोन, लष्करी व्यूहरचनेला साहाय्यक अंमलबजावणी व तीन, सर्वेक्षण, मॅपिंग आदी कृतीद्वारे मदत करणे.

पहाडी किल्ले व भुईकोट, शहराच्या सभोवतालची तटबंदी, रसद पुरविण्याच्या चोरवाटा (भुयारे), पाणी पुरवठ्याकरिता विहिरी व तलाव, दारूगोळा साठविण्याच्या जागा, टेहेळणीकरिता उभारलेले बुरूज किंवा माची ही प्राचीन व मध्ययुगीन काळातील सैनिकी अभियांत्रिकीची काही उदाहरणे होत. सैनिकी अभियांत्रिकीचा लोहयुगापासून इतिहास पाहता, त्याकाळी यूरोपात किल्ल्यांचे बांधकाम झाले असून सभोवती खंदकही खणलेले आढळले. पर्शियन राजा झर्क्सिझ (कार. इ.स.पू. ४८६-४६५) याच्या कारकिर्दीत लष्करी अभियंत्यांनी हेलेस्पाँट ( दार्दानेल्स सामुद्रधुनी) येथे सु. दीड किमी. लांबीच्या पाण्यावर दोन समांतर रांगांत नावांची साखळी करून पूल बांधला होता, असे हीरॉडोटस हा इतिहासकार म्हणतो. उत्तरेकडून रानटी टोळ्यांच्या हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी चीनची अजस्र भिंत (६४०० किमी.) बांधली. रोमन साम्राज्याची सत्ता इंग्लंडमध्ये असताना त्यांनी बांधलेले सैनिकी रस्ते व त्यांच्या बचावाकरिता ठिकठिकाणी उभारलेले कोट यांचे अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत. तत्कालीन ११७ किमी. लांबीची इंग्लंडमधील हॅड्रियनची भिंत प्रसिद्ध आहे.

कौटिलीय अर्थशास्त्रात चाणक्याने इ.स.पू. तिसऱ्या शतकात सैनिकी अभियांत्रिकीचे महत्त्व किल्ल्यांच्या बांधणीच्या संदर्भात अनेक दाखले देऊन स्वतंत्र प्रकरणात सविस्तर रीत्या सांगितले आहे. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची बांधाणी कशी करावी, सैन्याच्या आगेकूच दरम्यान अडथळे कसे दूर करावेत वगैरेंचे तपशील प्रस्तुत ग्रंथात आढळतात. मध्ययुगात छ. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज अभियंत्याच्या सल्ल्यानुसार काही जलदुर्गांची उभारणी केली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला होय. पेशवेकालीन (१७०७-१८१८) शनिवार वाड्यांची उत्तम उदाहरण होय.

आधुनिक शस्त्रांची जशी वाढ होत गेली, तसा अभियांत्रिकीमध्ये बदल होत जाऊन तिचे कार्यक्षेत्र विस्तृत झाले. अठराव्या शतकामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून स्वतंत्र विभाग मानला जाऊ लागला. त्याचप्रमाणे शांततेच्या काळात लष्करी छावण्याकरिता आवश्यक, पण नागरी स्वरूपाची अभियांत्रिकी कामे, लष्करी खात्याच्या आधिपत्याखालीच कार्यान्वित करण्याकरिता सैनिकी अभियांत्रिकी सेवादल म्हणून निराळीच शाखा उदयास आली. सैनिकी अभियांत्रिकीचे कार्य प्राय: युद्धक्षेत्रातील गरजा भागविण्या-पुरते मर्यादित असले, तरी आवश्यकतेनुसार सैनिकी अभियांत्रिकी, नागरिकीची हरतर्‍हेची नागरी कामे, नागरिकांच्या स्वास्थ्यांतर्गत लोकांच्या गरजांप्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे करण्यात ती तरबेज असते.

दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकन सैनिकी अभियांत्रिकीत आमूलाग्र व नेत्रदीपक अशी वाढ झाली. ती वाढ यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात व स्वरूपात असून तीच प्रथा आता सर्व देशांमध्ये कमीजास्त प्रमाणात उपयोगात आणली जात आहे. या यांत्रिकीकरणामध्ये बुलडोझर, ड्रॅग लाइन, डंपर वगैरे उपकरणांचा वापर करण्यात येतो. या वाढीमुळे आघाडीवर अल्पावधीत विमानाच्या धावपट्ट्या त्वरित बनविणे शक्य झाले जपानने ब्रह्मदेशात (म्यानमार) ठाण मांडल्यावर चीनला रसद पुरविण्याकरिता, हिमालयाच्या उत्तुंग उंचीवरून भारत-चीन जोडणारा लिजे मार्ग शक्य झाला इराक इराणमधून खुष्कीचा रस्ता काढून रशियाला कुमक पाठविता आली.

युद्धक्षेत्रांतील सैनिकी अभियांत्रिकीची कार्यव्याप्ति : १) सैन्याच्या मार्गात असलेले अडथळे काढून टाकणे. अ) नैसर्गिक उदाहरणे : नदी, कालवे, दलदल, नैसर्गिक खड्डे, दरड, मोठी झाडे, उंचवटे इत्यादी. आ) अनैसर्गिक : स्थायी : काँक्रिट व लोखंडाचे अडथळे, खंदक, काटेरी तारा इत्यादी. अस्थायी : स्फोटक द्रव्ये, बाँब, जंतू व रासायनिक अशुद्धीकरण इत्यादी. २) रस्ते व वाटांचे निर्माण कार्य. ३) आघाडीवरील विमानतळ आणि विमानगृहे. ४) बचाव तंत्राप्रमाणे अडथळे निर्माण करणे. ५) युद्धोपयोगी सामानांचा विध्वंस. ६) बचावतंत्राप्रमाणे करण्याची कामे. ७) मापमोजणी व नकाशे.

कार्यव्याप्ती : पाण्याने व्याप्त असलेल्या अडथळ्यांचा शत्रू सगळ्यांत अधिक फायदा घेतो. हे स्थान शत्रूच्या गोळीबाराच्या पल्ल्यात असले, म्हणजे पहिल्यांदा त्याविरुद्ध गोळीबार करून, काम पार पडेपर्यंत व सैन्य नदीपार होईपर्यंत स्वत:च्या तोफखान्याने शत्रूच्या गोळीबारीला निकामी करणे आवश्यक असते. लहान पुल शक्यतो, स्थानावरच मिळणारे साहित्य- उदा., झाड, इमारती लाकूड, जुन्या पुलाचे अवशेष इ. चा वापर करून शक्य तेवढ्या कमी वेळेत उभा करणे आवश्यक असते. पाण्याची खोली कमी असेल आणि पाण्यातूनच सुरक्षित रस्ता करणे शक्य असेल, तर तशी व्यवस्था केली जाते. याकरिता नदी पार करण्यासाठी पाण्याची उथळ पातळी असेल त्या जागेवर दोन्ही बाजूने सहजपणे उतरता-चढता येण्यासारख्या उताराची कठीण जमीन, मोटारीच्या चाकांमुळे साचलेले पाणी काढून टाकण्याकरिता लहान खोलीच्या नाल्या आणि सुरक्षित रुंदी दाखविण्याची निशाणे यांची जरूरी असते. मध्ये खड्डे असले तर ते दगड व खडीने भरून काढावे लागतील. ही सर्व कामे सैनिकी अभियांत्रिकीची असतात.

पुलाचे खांब जर सहजपणे आणि जलद गतीने उभे करणे शक्य नसेल, तर तराफ्यांचा पूल तयार करावा लागतो. बोटींवरून लांब व आडव्या तुळ्या टाकून त्यांच्यावर पोलादाचे किंवा कठीण लाकडाच्या पट्ट्या किंवा फळ्या टाकून रस्ता करणे. मध्ये खांब न देता बांधण्यासारखी रुंदी असेल, तर बऱ्याच वेळी तयार पुलांचे सामान लॉऱ्यातून आणून पूल अलीकडील तीरावर बांधून पुढे ढकलीत पलीकडच्या तीरावर स्थिर करावयाची पद्धत आपल्या अभियांत्रिकी सैनिकांनी आत्मसात केली आहे. अधिक रुंदीच्या खोल नद्यांवरून १२० मी. लांबीचे झुलते पुलसुद्धा अभियांत्रिकी सैनिकी थोड्या वेळांत तयार करू शकतात.

पाण्याशिवाय नैसर्गिक अडथळे काढून टाकण्यास बुलडोझर व तत्सम अवजारांचा उपयोग होतो. दरडीतून रस्ता कापून काढणे, माती, रेती व दगड इ. गोळा करून त्यांची भर घालून उंच रस्ता करून मार्गातील झाडेझुडपे काढून टाकणे, कडे कोसळून माती व दगडांची झालेली राशी मार्गातून काढून टाकणे इ. कामे बुलडोझर करतो.

अनैसर्गिक स्थायी असलेले अडथळे बुलडोझरने काढून टाकता आले नाहीत, तर दारूगोळ्याने ते उडवून देण्याची आवश्यकता उत्पन्न होते. स्फोट केल्यानंतर सुद्धा रस्ता ठीक करायला बुलडोझरच लागतो.


अनैसर्गिक अस्थायी अडथळे काढून टाकण्याकरिता विशिष्ट प्रशिक्षण घेतलेले सैनिक स्फोटक द्रव्ये, सुरुंग, बाँब इत्यादी निष्क्रिय करून सैन्याला रस्ता करून देतात. अशा प्रकारचे सुरुंग दुसऱ्या जागतिक महायुद्धात (१९४१) सतत ९६ तास काम करून दुय्यम लेफ्टनंट प्रेमसिंग भगत यांनी आपल्या तुकडीच्या मदतीने मोकळे केले होते व त्या अप्रतिम धाडस व शौर्याबद्दल त्यांना (या महायुद्धातील पहिला) व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला होता. असेच काम १९४७-४८ च्या पहिल्या काश्मीर युद्धात कॅप्टन राघोबा राणे यांनी केले. त्यांना भारताच्या दुसऱ्या परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. जंतुयुद्ध व रासायनिक युद्धाची शक्यता असली, तरी जिनीव्हा करारानुसार दुसऱ्या महायुद्धात त्याचा उपयोग करण्यात आला नाही. तरीसुद्धा अशा प्रकारचेे युद्ध व त्याविरुद्ध योजण्यात यावयाच्या पद्धती यांचा अभ्यास सैनिकी अभियांत्रिकांना करावा लागतो.

लढाई चालू असताना सैन्याला आगेकूच करता येण्याजोग्या युद्धक्षम वाटा, सैन्याच्या हालचालींसाठी तसेच कुमक आणण्याकरिता वाटा तयार ठेवाव्या लागतात.

युद्धोपयोगी सामान व दुरून कुमक आणण्याकरिता जे रस्ते वापरले जातात त्यांची देखभाल लष्करी अभियंत्यांकडेच असते. हे रस्ते अशा रीतीने निर्देशपटांनी स्पष्ट केले पाहिजेत की, किती वजनाच्या गाड्या जाऊ शकतात, स्फोटकपेरणी कशी आहे वगैरे.

शत्रूचा पराभव केल्यावर आणि मित्रसैन्याने आगेकूच केल्यावर पाठीमागच्या रस्त्यांची पुनर्रचना, मजबुती वगैरे करावी लागते. रस्त्याची वाहतूक कित्येकदा एकमार्गी ठेवावी लागते. अवजड गाड्यांना सोपा चढ व रिकाम्या गाड्यांना कठीण व कमी लांबीचा दुसरा रस्ता असला की जाणे-येणे सुलभ होते.

तांत्रिक व वैज्ञानिक शोधांच्या प्रगतीमुळे सैनिकी अभियांत्रिकेत आमूलाग्र बदल विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात झाले. नवीन तंत्रे, नवीन साधने आणि युद्धनीतीचे प्रशिक्षण यांमुळे यापुढे सैनिकी अभियंत्यांना फार जबाबदारीने काम करावे लागेल. आधुनिक युद्धात वायुसेना व नौसेनेच्या विमानतळांना फार महत्त्व आहे. यांची योजना सैनिकी अभियंतेदोन सेनांच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून आवश्यकतेप्रमाणे लहान-मोठे, कच्चे-पक्के, जुजबी किंवा स्थायी स्वरूपाचे विमानतळ बांधतात. अस्तित्वात असलेल्या विमानतळांची जरूरीप्रमाणे देखभाल, कार्यक्षमता इ. गोष्टींवर भर देतात. विमानतळाबरोबर आनुषंगिक हँगर, पेट्रोलचा साठा वगैरेंसह इतर तांत्रिक कामांकरिता इमारतींची व्यवस्था बघावी लागते. विमानतळाच्या कार्यक्षमतेवर युद्धातील जयापजय अवलंबून असतो. जुजबी विमानतळांना लागणारे सामान योग्य ठिकाणी पीछाडीस तयार ठेवावे लागते. साध्या पण सपाट केलेल्या जमिनीवर तारांचे जाळे, भोक पाडलेले पोलादाचे विशिष्ट प्रकारचे पत्रे, बुलडोझर, स्क्रेपर इ. अवजारे अभियंत्यांच्या हाताशी असावी लागतात.

स्वसेनेचा बचाव करीत असताना शत्रूच्या मार्गात अडथळे निर्माण करणे, हे सैन्याच्या अभियंत्यांचे महत्त्वाचे काम असते. हे अडथळे शत्रूला मागे-पुढे जाणे अशक्य व्हावे किंवा त्या अडथळ्यांमुळे असा रस्ता त्याने घ्यावा की, तो संकटात अडकेल किंवा मित्रसेनेच्या तोफखान्याला त्याला तोंड द्यावे लागावे, अशी व्यवस्था करावी लागते.

अडथळे हे निर्माण केल्याने तयार होऊ शकतात किंवा विध्वंसामुळे. रणगाड्यांच्या मार्गात खड्डे, स्फोटक पदार्थांची पेरणी इ. पहिल्या प्रकारचे अडथळे असतात तर पुलांचा विध्वंस कालवा फोडून दलदल निर्माण करणे हे दुसऱ्या प्रकारचे अडथळे आहेत. अशा दलदलीचा १९६५ च्या लढाईत पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांना किती उपद्रव झाला हे इतिहासप्रसिद्ध आहे.

युद्धोपयोगी सामानांचा व स्थलांचा विध्वंस : दूरगामी परिणाम लक्षात घेऊन जरूरीप्रमाणे उच्च स्थरावरील अधिकारी त्याचा निर्णय घेतात व सैनिकी अभियंते त्यांच्या आज्ञा कार्यवाहीत आणतात. तसेच रस्ते, विमानतळ व तत्सम वाहतूक मार्ग, तसेच पाणी (अशुद्धीकरण), तेल, दारूगोळा व इतर सामानांचे साठे, तार व टेलिफोनची साधने, वीज-पुरवठ्याची केंद्रे, विजेच्या तारा व खांब, इत्यादी कशा वाचतील हे पाहतात.

हल्ला करणाऱ्या शत्रूपासून संरक्षण करणे हे सैनिकी अभियांत्रिकांचे प्रथम कार्य आहे. लढवय्या सैन्यांबरोबर त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वत:चे अचानक हल्ल्यापासून संरक्षण करण्याची जुजबी सामुग्री उदा., काटेरी तारा, सुरुंगादि स्फोटक द्रव्ये, मायावरणाची साधने इ. असतेच. भोवतालचा प्रदेश जशा प्रकारचा असेल, त्याला अनुसरून प्रभावी अडथळे निर्माण करण्यात अभियांत्रिकांचा हातखंडा असतो.

आधुनिक लढाईचा सर्व उपक्रम बिनचूक नकाशांवर अवलंबून असतो. शहरांचे मोठे नकाशे, सैनिकी महत्त्वाच्या गोष्टी दाखविणारे नकाशे, युद्धभूमीचे विमानातून घेतलेले फोटो अशा वेळी फार उपयोगी पडतात.

युद्धभूमीच्या पीछाडीसही तत्सम विशिष्ट युद्धजन्य परिस्थितीच्या अनुरूप अशी कामे सैनिकी अभियंत्यांना करावयाची असतात. उदा., अभियंत्रणेचे साहित्य व यंत्रांचा पुरवठा, पाणी व विद्युत पुरवठा, इंधनाच्या तेलांचा घाऊक पुरवठा, परिवहन, सैन्याची गृहव्यवस्था, मायावरण इत्यादी. शिवाय बाँब निकामी वा पूर्ण नष्ट करणे आणि नागरीकीचे संरक्षण करणे होय.

पहा : किनारा संरक्षण खंदक युद्धतंत्र तटबंदी मायावरण सुरूंग.

 

टिपणीस, य. रा.