लतिफ, इद्रिस हसन : ( ९ जून १९२३-). भारताचे भूतपूर्व हवाई दल प्रमुख. जन्म हैदराबाद ( आंध्र प्रदेश राज्य ) येथे. शिक्षण हैदराबादच्या निजाम कॉलेजमध्ये झाले. पुढे संरक्षण सेवा महाविद्यालय, वेलिंग्ट्न ( तमिळनाडू राज्य ) येथून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना हवाई दलात कमिशन मिळाले ( १९४२). त्यानंतर काही काळ अंबाला ( हरयाना राज्य ) येथे त्यांचे वैमानिकी प्रशिक्षण झाले. १९४३ मध्ये त्यांनी इंग्‍लडमध्ये शाही विमानदलाच्या ( रॉयल एअर फोर्सच्या) हरिकेन व स्पिटफायर या लढाऊ विमानांसंबंधी अभ्यास केला.

इद्रिस हसन लतिफदुसऱ्या महायुद्धात त्यांनी भाग घेतला होता. प्रथम इंडोनेशियन वायुदल प्रमुख म्हणून व पुढे ब्रह्यदेशातील आराकान आधाडीवर त्यांनी भारतीय वायुसेनेतील चौथ्या स्क्‍वॉड्रनचे नेतृत्व केले. १९६१-६५ या काळात वॉशिंग्ट्न येथील भारतीय राजदूतावासामध्ये त्यांनी हवाई विभागात साहाय्यक म्हणून काम केले. १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी त्यांची साहाय्यक हवाई दल प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. त्यावेळी भारतीय हवाई दलाचे आधुनिकीकरण करण्यात त्यांचा महात्वाचा सहभाग होता. १९७४ मध्ये त्यांना एअर मार्शल हा हुद्दा मिळाला. सेंट्रल एअर कमांडचे ते पेरशासकीय प्रमुख व त्यानंतर एअर ऑफिसर कमांडींग इन चीफ म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली (१९७६-७७). त्यांची हवाई दलाच्या उपप्रमुखपदी ( १९७७) व त्यानंतर हवाई दल प्रमुखपदी ( १९७८-८१) नेमणूक करण्यात आली. १९७१ मध्ये त्यांना परम विशिष्ट सेवा पदक बहाल करण्यात आले. 

एअर मार्शल लतिफ १९८२-८५ या काळात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय राज्यपाल होते. या काळात त्यांनी राजभवन परिसरात विकलांग मुलांकरिता सुविधा उपलव्ध करून दिल्या. तसेच पुणे विद्यापीठाचा परिसर  वनश्रीयुक्त करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. १९८५ पासून ते फ्रान्समध्ये भारताचे राजदुत म्हणून काम पहात आहेत. लतिफ यांची हैदराबाद येथील  व्हीएसटी  इंडस्ट्रीज लि. या कंपनीच्या संचालक मंडाळावर नेमणूक करण्यात आली आहे. (१९९०) . त्यांच्या सुविधा पत्नी बिल्किस लतिफ ह्याही सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी हर इंडिया नावाचे पुस्तक लिहिले आहे. (१९८४). लतिफ यांना  दोन मुलगे व एक मुलगी अशी तीन अपत्ये आहेत.

संकपाळ, ज. बा.