घोडदळ : घोडेस्वारांच्या लष्करी संघटनेला ‘घोडदळ’ म्हणतात. प्राचीन काळापासून घोडदळाचा उपयोग करण्यात आला आहे. रथांची व हत्तींची पथके घोडदळाच्या तुलनेने हालचालीस अवघड असतात त्यामुळे घोडदळाची लष्करी कार्यक्षमता पहिल्यापासून अधिक महत्त्वाची समजली जाई. ख्रि, पू. पहिल्या शतकात भारतात रिकिबीचा शोध लागल्यामुळे घोडेस्वारांची मांड पक्की होण्यास मदत झाली. घोडदळाच्या ऐतिहासिक विकासावर या शोधाचा दूरगामी परिणाम झाला.

तिसऱ्या मुंबई हलक्या रिसाल्याचा हल्ला, खुशाब, १८ फेब्रुवारी १८५७.

साधारणपणे घोडदळाचे तीन प्रकार आढळतात : हलके, मध्यम आणि भारी. (१) हलके घोडदळ : टेहेळणी करणे, हेरगिरी करणे, धावत्या मारामाऱ्या करून शत्रूला सतावणे, शत्रूची रसद तोडणे, आपल्या सैन्याच्या आघाडीवर राहणे इ. कामे हे घोडदळ करते. पश्चिमी देशांत यास ‘शेसियर’ किंवा ‘हुस्सार’ म्हणतात. यातील घोडी चपळ व स्वार, शस्त्रास्त्रे इ. गोष्टी हलक्याफुलक्या असतात. (२) मध्यम घोडदळ : हे बहुधा राखीव असते. शत्रूचा पराभव झाल्यावर त्याचा पाठलाग करून संपूर्ण नायनाट करणे, हे याचे मुख्य काम. हे घोडदळ उतारा करून लढू शके. पाश्चात्त्य देशांत यास ‘ड्रॅगून’ म्हणतात. यात भालाईत असत. (३) भारी घोडदळ : यामधील स्वार चिलखत वापरी, मांडीला मांडी लावून भारी संख्येने शत्रूला तडाखा देणे, शत्रूच्या फळीत भगदाड पाडून पुढे घुसणे ही यांची कामे. यांची हत्यारे जड असत. पश्चिमी देशांत यांना ‘क्यूरेसियर’ किंवा ‘गार्ड्‌स’ म्हणत. या स्वारांजवळ मुख्यतः तलवारी असत.

वरील वर्गीकरण स्वार व घोड्याच्या वजनावर आणि आकारमानावर अवलंबून असे. एकोणिसाव्या शतकापासून घोडदळाच्या साहाय्याकरिता अश्वारोहित पायदळाची (माउंटेड इन्फंट्री) जरूरी भासू लागली. प्रत्येक राष्ट्राच्या घोडदळाच्या युद्धतंत्राचे स्वरूप वेगवेगळे असे. हालचालीची गती, दौड करण्याचा पल्ला, एकत्रीकरणाची किंवा विखुरण्याची सुलभता इ. वैशिष्ट्यांमुळे घोडदळाच्या हालचालीत विलक्षण सामर्थ्य निर्माण झाले.

ऐतिहासिक आढावा : ख्रि, पू. सु. १००० वर्षांपूर्वी ॲसिरियात प्रथम घोडदळ अस्तित्वात आले. यातील धनुर्धारी घोडेस्वार जोडीने लढत. हलके व भारी असे दोन्ही प्रकार त्यांच्यात होते.

भारतात वेदकाली घोडदळ नसावे, असे दिसते. इराणशी आलेल्या संबंधामुळे भारतात इ. स. पू. ६०० च्या सुमारास घोडदळ प्रचारात आले असावे. रामायणात घोडदळाचा उल्लेख नाही. महाभारतात जरी तो असला, तरी घोडदळाने काही कामगिरी केल्याचे दिसत नाही. मौर्यकाळात घोडदळ होते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात याचा उल्लेख आढळतो. घोड्यांची पारखनिवड, त्यांचे आरोग्य इ. विषयांवर प्राचीन भारतात लक्ष्मणप्रकाश, अश्वायुर्वेद, अश्वशास्त्र  इ. ग्रंथ रचले गेले. हिटाइट (पूर्व तुर्कस्तान) या प्राचीन राष्ट्रातील (इ. स. पू. १३००) उत्खननात भारतीय अश्वविद्येवर आधारभूत असे लेख सापडले आहेत. मौर्यांच्या घोडदळात तीस हजार स्वार होते.

मौर्य-गुप्तकाळात घोडदळ होतेच. कालिदासाच्या रघुवंशात अश्वयोद्ध्यांची वर्णने आढळतात. इ. स. पाचव्या शतकात वाकाटक राजवंशाजवळ घोडेस्वार होते, असे अजिंठा येथील लेण्यातील चित्रांवरून दिसते. त्या वेळी खोगीर, रिकिब इ. वापरात नव्हते.

ग्रीक सम्राट अलेक्झांडरचे घोडदळ शत्रुफळीत भगदाड पाडणे व बगला गुंडाळणे या तंत्रांकरिता प्रसिद्ध आहे. इराणी सम्राट डरायस याचा आरबीला किंवा गॉगामीला येथे (इ. स. पू. ३३१) आणि झेलमकाठी पोरसचा अलेक्झांडरने जो पराभव केला, त्याचे श्रेय त्याच्या घोडदळासच आहे.

रोमन घोडदळ विशेष प्रसिद्ध नव्हते. रोमनांचा प्रतिस्पर्धी कार्थेजचा हॅनिबाल याच्या घोडदळात हलके व भारी असे दोन प्रकार होते. बगलेवर आघात करून पिछाडी काबीज करणे, हे त्याचे वैशिष्ट्य होते. घोडदळाच्या बळावर हॅनिबालने (इ. स. पू. २४७—१८३) रोमन सेनेचा वरचेवर पराभव केला. कॅन येथील लढाई (इ. स. पू. २१६) हॅनिबालच्या घोडदळ रणतंत्राबद्दल महत्त्वाची आहे.

इराणचे घोडदळ इ. स. पू. सहाव्या-पाचव्या शतकात डरायसने प्रसिद्धीस आणले. बायझंटीन सम्राटाचे घोडदळही प्रसिद्ध आहे. त्यात हलके व भारी हे दोन्ही प्रकार होते. मध्य आशियातील तुर्क-मोगल लोकांचे घोडदळ विशेष उल्लेखनीय आहे. चंगीझखानकडे त्याचे श्रेय जाते. घोडदळाच्या जोरावर चंगीझखानाने जवळजवळ अर्धे जग जिंकण्याचा विक्रम केला. मोगली घोडदळ सु. अडीच ते तीन लाखांचे होते. त्याचे नियंत्रण ओरखान ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अकरा अधिपतींकडे असे. दहा स्वारांपासून ते दहा हजार स्वारांपर्यंत घोडदळाची पथके असत. सुबोताई व मुहुली हे दोन ओरखान प्रसिद्ध आहेत. प्रत्येक स्वाराकडे एक हलके व दुसरे भारी अशी दोन धनुष्ये असत. स्वाराचा इतर सरंजामही काटेकोरपणे निश्चित केला होता. त्यात राखीव सामानाचाही अंतर्भाव होतो. गुडघ्याला गुडघा लावून केलेला घोडदळाचा हल्ला, पहिले महायुद्ध, १९१४. मोगली भारी स्वार चिलखत वापरीत. शीघ्र हालचाली व सैन्याच्या भिन्न विभागांचे नेटके संयोजन हे मोगली घोडदळाचे वैशिष्ट्यपूर्ण तंत्र होते. प्रत्येक मोहिमेचे पूर्वनियोजन दक्षतेने करण्यात येई. शत्रूकडची माहिती टेहळणी तुकड्या मिळवीत. धनुर्धारी स्वार जासुसांचे काम करी. भारी घोडदळाच्या आघाडीला दोन रांगा ते ठेवीत व त्यामागे हलक्या घोडदळाच्या तीन रांगा असत. शत्रूच्या डाव्या बगलेवर आघात करून तसेच धावते हल्ले करून किंवा पलायनाचे सोंग करून मोगल घोडदळ शत्रूचा निःपात करी. मोगल घोडदळाला ‘सोनेरी झुंड’ म्हटले जाई. हे नाव चंगीझखानाचा नातू बाटूखान याच्या सोनेरी कलाबुतीच्या तंबूवरून पडले असावे.

भारतातील घोडदळ : भारतातील मुसलमानी राज्यकर्त्यांचे घोडदळही तुर्की-मोगली घोडदळाप्रमाणेच कार्यक्षम होते. महंमद घोरी, अलाउद्दीन खल्जी, तसेच दक्षिणेकडील बहामनी राजवटीतील व नंतरच्या निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही यांची घोडदळेही प्रसिद्ध आहेत. अलाउद्दीनचे हिजब्बुद्दीन झाफरखान, मलिक नाईक वगैरे घोडदळांचे नेते प्रसिद्ध आहेत. निजामशाहीपासून मराठ्यांना शिलेदारी मिळू लागली. विजयानगरच्या हिंदू साम्राज्याचा पाडाव होण्याचे एकमेव कारण म्हणजे खास उत्तम जातीच्या घोड्यांची कमतरता व धनुर्धारी स्वारांचा अभाव हे होय. तैमूरलंग (१३३६—१४०५) हाही चंगीझखानाप्रमाणे त्याच्या तुफानी घोडदळाबद्दल प्रसिद्ध आहे. याच्या बळावर त्याने मोगल, इराणी, पठाण, ऑटोमन तुर्क व रशियन इत्यादींचा पराभव केला. बाबर व त्यानंतरच्या मोगल सम्राटांनी तैमूरलंगचेच अनुकरण करून घोडदळ सज्ज केले आणि त्यांत तोफखान्याची व बंदुकीची (बरकंदाजांची) भरही घातली.


शिवपूर्वकाळात यादवांचे घोडदळ होते, निजामशाहीत मराठा व आदिलशाहीत कर्नाटकी आणि मराठा घोडेस्वार होते. छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदळ संघटना आदिलशाही घोडदळाच्या धर्तीवरच होती. त्यांच्यात एक श्रेणीक्रमही असे व सरनौबत हा घोडदळप्रमुख असे. महाराजांनी घोडदळाचा वापर परंपरेला सोडून म्हणजे मोगलांना अपरिचित अशा पद्धतीने केला. म्हणूनच मोगल त्या पद्धतीला ‘गनिमी कावा’ म्हणत. मोगलांच्या व्यूहरचनेत गतिशीलता नसे, अवाढव्य सैन्यामुळे व बरोबर असलेल्या बाजारबुणग्यांमुळे त्वरित हालचाल करणे त्यांना अशक्य होई व म्हणून त्यांना सैन्य विभागून कूच करावी लागे. महाराजांनी मोगली सेनेतील या उणिवा व दोष हेरले आणि पिछाडीवर व बगलांवर आकस्मिक हल्ले करून मोगलांना बचावात्मक लढाया देण्यास भाग पाडले. सेनेची गतिशीलता, शीघ्र हालचाली व आकस्मिक एकजुटीचे हल्ले या तंत्राने महाराजांनी मोगलांना हैराण केले.

पेशवाईत एक लाखावर घोडदळ असावे, विशेषतः पहिल्या बाजीरावाचे घोडदळ फार कार्यक्षम होते. तथापि उत्तर पेशवाईत अस्सल मराठी गनिमी कावा न वापरल्यामुळे व घोडदळ-पायदळ यांची उत्तम सांगड न घालता आल्यामुळे मराठी सेना निष्प्रभ ठरली. मराठी स्वार उतारा करून भाल्यांची संरक्षण-भिंत उभी करू शके. त्याचा एका रेषेतील हल्ला किंवा फळी हल्ला प्रसिद्ध आहे.

ईस्ट इंडिया कंपनीने देशी संस्थानिकांवर तैनाती फौजेची सक्ती केली. या तैनाती फौजेत व कंपनीच्या लष्करात हिंदुस्थानी स्वारच बहुसंख्येने असत. त्यात इंग्लंडमधील आधुनिक शस्त्रास्त्रे वापरीत. दुसऱ्या बाजीरावाच्या तैनाती फौजेतील घोडदळाचे नाव ‘पूना हॉर्स’ असे होते. हा रिसाला अजूनही आहे. १९१४ पर्यंत घोडदळांचे एकूण ४० रिसाले होते. त्यांपैकी ३६ शिलेदारी आणि बाकीचे बारगिरी रिसाले होते. त्यांवरील अधिकारी ब्रिटिश असत. १९२१ मध्ये शिलेदारी पद्धत बंद झाली व फक्त २१ रिसाले उरले. पहिल्या महायुद्धात ‘पूना हॉर्स’ ला फ्रेंच लोक हिंदू म्हणून ओळखत. पहिल्या महायुद्धात पॅलेस्टाइनमध्ये तुर्कांविरुद्ध हिंदुस्थानी घोडदळ लढले. १९२७ च्या सुमारास घोडदळातील भाल्यांचा उपयोग बंद झाला.

पाश्चिमात्य घोडदळ : घोडदळावर पूर्वीपासून आशियाई घोडदळाची बरीच छाप आहे. तथापि तेराव्या शतकापासून म्हणजे पश्चिमी प्रबोधनकाळापासून आणि नंतरच्या औद्योगिक क्रांतीमुळे पश्चिमेकडे घोडदळाचा प्रभाव कमी कमी होत गेला. चिलखत, शस्त्रास्त्रे वगैरेंच्या ओझ्याखाली अवघडलेल्या घोडेस्वारास खाली ओढून ठार करणे पायदळास सोपे जाई. इ. स. १२००—१६०० पर्यंत घोडेस्वाराचे भाला हेच मुख्य शस्त्र होते. अर्थांत तलवारी, कुऱ्हाडी यांचाही उपयोग केला जाई. स्वीडनचा राजा गस्टाव्हस आडॉल्फस, प्रशियाचा दुसरा फ्रीड्रिख इत्यादींनी घोडदळाला कालानुरूप नवे वळण देण्याचे यत्न केले. नेपोलियनच्या सैन्यात हलके, मध्यम व भारी असे तीनही प्रकार होते. त्याच्या घोडदळात तोफखानाही होता. तथापि घोडदळ व पायदळ यांच्या हल्ल्यात संयोजन राखण्याचे मात्र नेपोलियनला जमले नाही. अमेरिकेतील यादवी युद्धामधील अनुभवांमुळे (१८६२–६५) एकूण घोडदळाच्या आवश्यकतेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले. यांत्रिक शोधामुळे यंत्रयुगात घोडदळाचा उपयोग निष्प्रभ ठरू लागला. फ्रँको-जर्मन युद्ध (१८७०), बोअर युद्ध (१८९९-१९०२), रूसो-जपान युद्ध (१९०४-५) या लढायांतील घोडदळ कामगिरी अभ्यासनीय आहे कारण आधुनिक काळात घोडदळाची कार्यक्षमता मर्यादित होऊ लागल्याचे त्यातून दिसून येते. विमाने, मशिनगन, बाँब, प्रक्षेपणास्त्रे, रणगाडे यांसारख्या नव्या शोधांमुळे घोडदळाचा उपयोग जवळजवळ संपुष्टात आला. पहिल्या महायुद्धात १३ जुलै १९१६ रोजी झालेली सोम नदीची लढाई हीच मोठ्या प्रमाणावरील घोडदळाची शेवटची लढाई म्हणता येईल.

आता घोडदळाचे स्थान चिलखती दलाने घेतले आहे. तसेच हेलिकॉप्टरचा उपयोग करून हवाई घोडदळाचा प्रयोग अमेरिकेने दक्षिण व्हिएटनाममध्ये केला. भारतात चिलखती रिसाल्यांची नावे ब्रिटिश काळातीलच आहे. काही रिसाले १९४७ च्या फाळणीनंतर पाकिस्तानकडे गेले व आता भारतात एकच रिसाला आहे. रशियन व चीन सेनेत घोडदळे आहेत.

घोडदळाला समाजात आणि लष्करात नेहमी मानाचे स्थान मिळत राहिले, कारण घोडे ठेवणे हे श्रीमंतीचे वा प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाई. तथापि लष्करी दृष्टीने पाहता घोडदळाने रणांगणावर जे कार्य केले, त्यापेक्षाही अधिक मोठे कार्य पायदळाने केले आहे. असे असूनही शिलेदार, राऊत किंवा घोडेस्वार या संज्ञा आजही मनात मोठा दबदबा निर्माण करणाऱ्या आहेत.

पहा : छत्रीधारी सैन्य.

दीक्षित, हे. वि