विनाशिका :  युद्धनौकेचा एक प्रकार. ही युद्धनौका एकोणिसाव्या शतकात प्रचारात आली व तिचे मूळ नाव ‘पाणतीर-बोट विनाशक’ (टॉर्पेडो-बोट डिस्ट्रॉयर) असे होते. ‘टार्पेडो’ या इंग्रजीशब्दास मराठीत ⇨पाणतीरही संज्ञा योजलेली आहे. तथापि टॉर्पेडो म्हणजे क्रँप जातीचा मासा असून तो भक्ष्याला विजेप्रमाणे धक्के देऊन हतबल करतो. त्यावरून दारुस्फोटाने जहाजांना नष्ट करणाऱ्या कोणत्याही उपकरणास टॉर्पेडो म्हणण्याचा प्रघात पडला. कालांतराने पाणतीर-बोट विनाशिक या लांबलचक नावातील पहिले दोन शब्द लुप्त होऊन ‘विनाशिका’ हे नाव दृढ झाले. नाविक दलातील लहान आकाराच्या पण संख्येने जास्त अशा पाणतीर-बोटी अनेक कोनांतून एकाच वेळी हल्ला करून मोठ्या जहाजांना पाणतीर मारून जलसमाधी देत. त्यावर उपाय म्हणून अत्यंत गतिमान, बहुउद्देशीय व शास्त्रास्त्रांनी सज्ज असलेली विनाशिका शोधण्यात आली.

ब्रिटिश नौदलात १८८२ साली पहिली विनाशिका कार्यरत झाली असे मानण्यात येते. अगदी सुरूवातीस विनाशिका २०० टन अधिभाराच्या आसपास असत व त्यांवर ४५·७२ सेंमी. (१८ इंची) पाणतीर क्षेपणांच्या तीन नळ्या (टॉर्पेडो ट्युब्ज) तसेच (२·७२ किग्रॅ. व ७·२५ किग्रॅ.) (६ व १६ पौंडी) वजनाच्या तोफा असत. विनाशकांकडून अपेक्षा जशा वाढत गेल्या, तशी त्यांच्यावर बसविली जाणारी अस्त्रे, त्यांचे आकार आणि अधिभारही उत्तरोत्तर वाढत गेले. पहिल्या महायुद्धापर्यंत विनाशिकांचा अधिभार १,५०० टनांपर्यंत, तर वेग ताशी ३० सागरी मैल एवढा होता. पहिल्या महायुद्धात जहाजांना पाणबुड्यांपासून धोका निर्माण झाला, त्यावेळी विनाशकांवरील ‘सोनार’, ‘डेप्थ चार्जेस’ यांसारख्या उपकरणांनी पाणबुड्यांचा शोध घेणे सुलभ झाले. डेप्थ चार्जेस उपकरणामुळे समुद्राच्या पाण्यात अत्यंत खोलवर स्फोट होऊ शकतील अशी यांत्रिक रचना त्यांवर करण्यात आली. परिणामतः पाणबुड्या विनाशकांच्या वाटेला जाऊ शकत नव्हत्या, हेच विनाशिकांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्या महायुद्धात ब्रिटनच्या ६७, जर्मनीच्या ६६, रशियाच्या २०, अमेरिकेच्या २ व जपानी १ एवढ्या विनाशिका समुद्रात बुडाल्या.

पहिल्या महायुद्धापेक्षा दुसऱ्या महायुद्धात विनाशिकांनी अधिक गौरवास्पद कामगिरी बजावली. ⇨रडारच्याशोधामुळे त्यांच्या परिणामकारकतेतही भर पडली. पाण्याखालील आवाज शोधण्याच्या सोनार उपकरणांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे विनाशिका या पाणबुड्यांच्या जवळजवळ कर्दनकाळच ठरल्या [⟶सोनार व सोफार]. त्यामुळे विनाशिकांना दुसऱ्या महायुद्धात प्रचंड मागणी होती. त्यांच्यावरील सोनार, डेप्थ चार्जेस, रडार आदी उपकरणांमुळे दुसऱ्या महायुद्धात व्यापारी जहाजांच्या काफिल्याला पाणबुड्यांपासून संरक्षण देण्यात त्या विलक्षण यशस्वी ठरल्या. इंग्लंडला जाणारे सर्व अन्नधान्य, इंधन व युद्धसामग्री जर्मन ‘यू’ बोटींच्या आक्रमक पावित्र्याने धोक्यात आली होती. विनाशिकांच्या कार्यपद्धतीमुळे इंग्लंडची बरीचशी जहाजे वाचली व इंग्लंडला रसद पुरवता आली. सिसिलीच्या किनाऱ्यावर तोफांचा यशस्वी भडिमार करून भूसेनेला विनाशिकांनी आधार दिला. रशियन जहाजांनाही विनाशिकांनी याच प्रकारचे साहाय्य केले. पश्चिम पॅसिफिक मधील ग्वॉदल कॅनलच्या लढाईत अमेरिकेच्या १४, तर जपानच्या ११ विनाशिकांना जलसमाधी मिळाली. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांकडे असलेल्या प्रसिद्ध विनाशिका म्हणजे ‘ट्रायबल क्लास’ या होत.

विद्यमान काळात सर्वसाधारणपणे २,०००-५,००० टन अधिभार, लांब पल्ल्यांच्या तोफा (पाणतीर बोटींच्या बाहेर जाऊन मारा करता येतील अशा तोफा), जहाजविरोधी व विमानविरोधी क्षेपणास्त्रे, जलद गती, दूरचा पल्ला आणि लवकर दिशा बदलण्याची क्षमता ही विनाशिकांची लक्षणे मानतात. ⇨फ्रिगेटपेक्षा मोठी पण ⇨क्रूझरपेक्षालहान अशा या विनाशिकांवर रडार, सोनार, इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री वगैरे उपकरणे बसविलेली असून पाणबुडीविरोधी किंवा जहाजविरोधी हेलिकॉप्टरेही त्यांवर असणे आवश्यक ठरले आहे. व्यापारी जहाजांचेतसेच ⇨विमानवाहू जहाजांसारख्या मोठया युद्धनौकांचे पाणबुड्यांपासून संरक्षण करणे हे विनाशकांचे मुख्य काम होय. ज्या पाणतीर बोटींच्या विरुद्ध विनाशिकांचा जन्म झाला, त्या बोटी आता जवळजवळ नामशेष झाल्या असून त्यांची जागा क्षेपणास्त्रे बसविलेल्या लहान व अतिजलद बोटींनी घेतली आहे. त्यांच्यापासूनही जहाजे वा युद्धनौका यांच्या संरक्षणाचे काम विनाशिका पार पाडतात. यांशिवाय गस्त घालणे, मुख्य काफिल्याच्या पुढे वा मागे राहून रडार चालविणे, प्रसंगी किनाऱ्यावर तोफांचा मारा करणे इ. कामे त्यांच्यावर सोपविली जातात.

सांप्रत अमेरिकन नौदल हे जगातील सर्वांत प्रगत नौदल मानले जाते. त्या नौदलाकडील ‘स्प्रूअन्स’ विनाशिका जगात सर्वोत्तम मानल्या जातात. त्यांचा अधिभार ५,७७० टन असून वेग ताशी ३३ सागरी मैल आहे. ‘टॉमहॉक’क्षेपणास्त्रे त्यांवर बसविलेली असून त्यांद्वारे अणुबाँबचा मारा करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. तसेच ‘ॲसरॉक’ ही पाणबुडीविरोधी १६ क्षेपणास्त्रे त्यांवर असून त्यांचा पल्ला ९ सागरी मैलांपर्यंत आहे. स्प्रूअन्स विनाशकांवर ५·८X१२·७० सेंमी.) (२X५ इंची) तोफा, ६ पाणतीर सोडण्याच्या नलिका, एक पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर असा चतुरस्त्र शस्त्रसांभार आहे. १९९१ मध्ये इराकविरुद्ध झालेल्या आखाती युद्धात या विनाशिकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. सुमारे ११ स्प्रूअन्स विनाशिकांनी त्यात भाग घेतला. ‘फाईफ’ या नौकेने ५८ टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा मारा केला. अमेरिकन नौदलाच्या सर्वात नवीन विनाशिका म्हणजे ‘आरले बर्क’ विनाशिका होत. त्यांचा अधिभार ८,४२२ टन असून इतर देशांतील क्रूझर युद्धनौकांपेक्षाही त्या बऱ्याच मोठया असून त्यांचा वेग ताशी ३२ सागरी मैल आहे. टॉमहॉक, हार्पून, ॲसरॉक, पाणतीर इत्यादी शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या या विनाशिकांवर एकच १२·७० सेंमी. (५ इंची) तोफ आहे. हेलिकॉप्टर नसणे ही या विनाशिकांमधील उणीव मानली जाते.

भारतीय नौदलाकडे सर्वप्रथम ‘‘राजपूत’,‘रणजित’आणि ‘राणा’ या तीन विनाशिका होत्या. भारताने त्या ब्रिटिश नौदलाकडून १९४९ मध्ये विकत घेतल्या. या विनाशिका हंट या प्रकारच्या असून त्यांचा अधिभार प्रत्येकी १,७०० टन तर वेग ताशी ३१ सागरी मैल होता. त्यांवर १०·१६ सेंमी. (४ इंची) तोफा व पाणतीर अशी मुख्य शस्त्रास्त्रे होती. सुमारे २०० नाविक अधिकारी व खलाशी यांची त्यांवर सोय होती. भारतीय नौदलात येण्यापूर्वी या तिन्ही विनाशिकांनी दुसऱ्या महायुद्धात विशेष कामगिरी बजावली. त्यानंतर १९५१ मध्ये ‘गोदावरी’, ‘गंगा’ आणि ‘गोमती’ या विनाशिका भारतीय नौदलात सामील झाल्या. त्याही ब्रिटिश नौदलाकडून मिळविल्या होत्या. त्यांवरील शस्त्रास्त्रे जवळजवळ राजपूतसारखीच होती आणि त्या बाष्पजनित्रावर चालत. १९७० च्या दशकात कालबाहय झाल्याने क्रमाक्रमाने या विनाशिका वापरातून नाहीशा झाल्या. भारतीय नौदलात नौकांची नावे पूर्वीचीच ठेवण्याची परंपरा आहे. त्यामुळे गंगा, गोदावरी ही नावेही पुन्हा विनाशिकांना देण्यात आली.


भारतीय नौदलाने १९८० पासून राजपूत, रणजित, ‘राणा’, ‘रणवीर’ आणि ‘रणविजय’ या विनाशिका रशियाकडून (तेव्हाचा सोव्हएट रशिया) खरेदी केल्या. या नौका रशियन ‘काशीन’प्रकारच्या विनाशकांशी तुल्यबळ आहेत. त्यांचा अधिभार ३,९६० टन आहे. त्या वायुटरबाइनवर (गॅस टरबाइन) चालतात. त्यांचा वेग ताशी ३५ सागरी मैलांपर्यंत जाऊ शकतो. या विनाशिकांवर जहाजविरोधी व विमानविरोधी क्षेपणास्त्रे, पाणबुडीविरोधी छोटया पल्ल्याची रॉकेटस, ७६·२ मिमी. तोफा इ. शस्त्रास्त्रे असून अद्ययावत रडार व सोनार सामग्री बसविलीआहे.एकपाणबुडीविरोधी‘कामोव्ह-२५ किंवा २८’ (मॉडेल) हेलिकॉप्टर या जहाजांचा अविभाज्य घटक आहे. एंकदरीत ३९ अधिकारी आणि ३०० नाविक कर्मचारी या जहजांवर असतात.

गेल्या शंभर वर्षांत विनाशिकांच्या उत्क्रांतीचा आढावा घेतला, तर असे आढळते, की ज्यावेळी ज्या तऱ्हेची विरोधी जहाजे असतील त्याला तोंड देण्यासाठी विनाशिकांना सज्ज करण्यात आले. विद्यमान काळातील फ्रिगेट्स नौका पहिल्या विनाशिकांच्या १०-१५ पट मोठ्या आहेत. याचे कारण एवढेच, की फ्रिगेट्स, विनाशिका, क्रूझर्स यांचे वर्गीकरणही वेळोवेळी बदलत गेले. विनाशिकांचे योगदान हे इतर युद्वनौकांप्रमाणेच बहुमोल आहे, यात संदेह नाही.

पहा:नविक युद्धतंत्र महायुद्ध, दुसरे महायुद्ध, पहिले युद्धनौका.

संदर्भ:1. Hodges, Peter Friedman, Norman, Destroyers Weapons of Word War II, Annapolis (U. K.), 1979.

2. Hough, Richard, Fighting Ships, London, 1969.

3. March, E. J. Birtish Destroyers: A History of Development 1892-1953, London, 1966.

4. Montgomery, Robert, A History of Warfare, London, 1968.

5. Yates Brock, Destroyers and Destroyermen, New York, 1959.

६. बेंद्रे, अ. वि. युद्धशास्त्रः यंत्र व तंत्र, मुंबई, १९६६.

पुरोहित, सुहास

यू. एस.एस. लॅबूनः आरले बर्क विनाशिका, अमेरिका आव. एन. एस. विक्रांत: आद्य भारतीय विमानवाहू जहाज अमेरिका नौदलातील पाणबुडीविरोधी स्प्रुअन्स वर्गातील यु.एस.एस.एलिऑट विनाशिका राजपूत: भारतीय विनाशिकाहर्मीझ: ब्रिटीश विमानवाहू जहाज