डग्लस मॅक्आर्थर मॅक्आर्थर, डग्लस : (२६ जानेवरी १८८०–५ एप्रिल १९६४). अमेरिकेच्या भूसेनेचे जनरल (जनरल ऑफ द आर्मी) तसेच विसाव्या शतकातील एक नामवंत सेनापती. अमेरिकेत भूसेनेचे जनरल हे फील्ड मार्शलच्या दर्जाचे असतात. डग्लस मॅक्‌आर्थर याचा जन्म लिट्ल रॉक या गावी झाला. त्याच्या वडिलांचे नाव आर्थर व आईचे मेरी. अमेरिकेतील यादवी युद्धात त्यांच्या वडिलांनी शौर्याबद्दल सन्मानपदक मिळविले होते. १९०३ साली वेस्ट पॉइंट सैनिकी प्रबोधिनीमधून सर्व उच्चांक मोडून मॅक्‌आर्थर भूसेनेत अधिकारी म्हणून भरती झाला. हा अत्यंत देखणा असून त्याच्या व्यक्तिमत्त्वावर त्याच्या आईचा विलक्षण प्रभाव होता. एकाच वेळी कडवे समर्थक आणि विरोधक निर्माण व्हावेत, अशा प्रकारचे काहीसे जटिल व्यक्तिमत्त्व मॅक्‌आर्थरला लाभले होते.

भूसेनेतील नियुक्तीनंतर व्हेराक्रूझ (मेक्सिको) व फिलिपीन्समध्ये संघटित दरोडेखोरांच्या बंडाळ्या मोडण्यात तो यशस्वी झाला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थीओडोर रूझवेल्ट यांचा सैनिकी मदतनीस म्हणून व नंतर युद्धकार्यालयात त्याने काम केले (१९१३).

पहिल्या महायुद्धात [⟶ महायुद्ध, पहिले] बेचाळिसाव्या पायदळ ‘रेनबो’ डिव्हिजनमध्ये चढत्या श्रेणीने सैनिकी नेतृत्व करून त्या डिव्हिजनचा तो ब्रिगेड जनरल झाला. त्या वेळेपासूनच त्याचा आगळेपणा दिसू लागला. शिरस्त्राणविहीन, निःशस्त्र पण हातात चाबूक घेऊन तो अगदी सैन्याच्या आघाडीवर अगर खंदकात असावयाचा. साहसी व अकस्मात आलेली संधी न गमावणारा मॅक्‌आर्थर पुढे अद्वितीय सेनापती होणार, असे मत जनरल ⇨ जॉन जोसेफ पर्शिग याने त्यावेळी काढले होते. १९१९ मध्ये वेस्टपॉइंट प्रबोधिनीच्या परिवेक्षक पदावर त्याची नियुक्ती झाली. प्रबोधिनीच्या शिक्षणक्रमात त्याने आमूलाग्र बदल केले. त्यानुसार मानव्यविद्या, वैयक्तिक तसेच सांघिक व स्पर्धात्मक व्यायाम आणि खेळ, सामाजिक शास्त्रे, आधुनिक विज्ञान व तंत्र इ. विषय शिक्षणक्रमात समाविष्ट करण्यात आले. प्रबोधिनीतील शिक्षणाबरोबरच बाह्य जगाचा अनुभव घेण्याची संधीही स्नातकांना मिळू लागली. या आधुनिक शिक्षणामुळे वेस्ट पॉइंट ही नामवंत प्रबोधिनी म्हणून ख्यात झाली. पुढील काळातील लायमन लेमनित्झर, मॅक्सवेल टेलर, व्हॅन्डेनबर्ग इ. अमेरिकन सेनापती या प्रबोधिनीचे स्नातक व पदवीधर होते.

मॅक्‌आर्थरचा पहिला विवाह १९२२ मध्ये झाला तथापि तो अयशस्वी ठरून त्याने घटस्फोट घेतला (१९२९). प्रबोधिनी सोडल्यानंतरचा (१९२२) पुढील आठ वर्षांचा काल अगदी सामान्य व निराशाजनक परिस्थितीत त्याला व्यतीत करावा लागला. १९३० मध्ये त्याची अमेरिकेच्या भूसेनाध्यक्षपदावर नियुक्ती झाली. तत्पूर्वी ॲम्स्टरडॅम येथील ऑलिंपिक स्पर्धेत मॅक्‌आर्थरच्या निर्देशन व नेतृत्त्वामुळे अमेरिकेने सर्वांत जास्त पदके मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला (१९२८). १९३०–३५ या काळात तो सेनाध्यक्ष असताना, अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट उसळली. यूरोपमध्ये नाझी व फॅसिस्ट या आक्रमक राजवटींचा उदय झाला. चीनमध्ये यादवीयुद्ध जारी होते. साम्यवादी आचारविचारांचा पगडा अमेरिकेतील निवृत्त सैनिक व गरीब जनतेवर बसू लागला होता. मॅक्‌आर्थरचा साम्यवादास विरोध होता. १९३२ मध्ये निवृत्त सैनिकांच्या मोर्च्याचा त्याने हातात बागनट (बायोनेट) घेऊन बीमोड केला व मूळातच अमेरिकेतील साम्यवाद निपटून काढला. आगामी महायुद्धाची चाहूल लागल्याने अमेरिकेने आपले संरक्षणबळ वाढवावे, असा तगादा त्याने राष्ट्राध्यक्षांकडे लावला.

राष्ट्राध्यक्ष ⇨ फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी १९३४ सालाअखेर फिलिपीन्सची संरक्षणव्यवस्था भक्कम करण्याचे काम मॅक्‌आर्थरकडे सोपविले तथापि त्यासाठी आर्थिक साह्य किंवा शस्त्रास्त्रपुरवठा फारसा केला नाही. फिलिपीन्सचा अध्यक्ष व अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या दोघांची एकाच वेळी सेवा करणे कठीण झाल्याने १९३८ साली तो अमेरिकन सेनेतून निवृत्त झाला व फिलिपीन्सच्या संरक्षणव्यवस्थेचे काम त्याने चालू ठेवले. आशियातील राजकीय परिस्थिती तंग झाल्याने जुलै १९४१ मध्ये त्याला परत बोलावण्यात आले आणि अतिपूर्वेकडील अमेरिकन सेनांचा सरसेनापती नेमण्यात आले. फिलिपीन्समध्ये असताना १९३७ साली जीन फेअरक्लॉथ हिच्याशी त्याचा दुसरा विवाह झाला व संबंध सुखदायक ठरला.

दुसऱ्या महायुद्धात [⟶ महायुद्ध, दुसरे] जपान शरण येईपर्यंत मॅक्‌आर्थर अतिपूर्वेकडील युद्धक्षेत्राचा सरसेनापती होता. हीरोशीमा व नागासाकीवर अणुबाँब टाकण्याच्या निर्णयाबाबत त्याचा सल्ला राष्ट्राध्यक्ष ट्रूमन किंवा त्याचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांनी घेतला नव्हता. मॅक्‌आर्थरची ‘बेडूक-उडी’ (लीप फ्रॉगिंग) किंवा ‘कुंपणउडी’ (हेज डॉग) या नावांनी ओळखली जाणारी युद्धनीती व युद्धयोजना लक्षणीय होती. यूरोपातील युद्धाला, आशियातील युद्धापेक्षा अमेरिकन राज्यशासन व संरक्षणखाते अधिक महत्त्व देत आहे आणि अमेरिकेचे परराष्ट्रीय धोरण ब्रिटिश साम्राज्यवादाला पोषक व कम्युनिस्टधार्जिणे आहे, असा त्याचा ग्रह झाला होता व तो शेवटपर्यंत टिकला.


जपानचा पाडाव झाल्यांनतर दोस्त राष्ट्रांतर्फे त्याला जपानमध्ये उच्च सरसेनापती नेमण्यात आले. १९४५ ते १९५२ या सात वर्षांत त्याने जपानच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांत फार महत्त्वाच्या सुधारणा केल्या. उदा., नवे राष्ट्रीय संविधान आणणे, जपानच्या सम्राटाला परमेश्वर मानण्याचा जपानी लोकांचा पारंपरिक समज दूर करून तो राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानण्याकडे त्यांची मने अनुकूल करणे, सार्वत्रिक मतदानपद्धतीने ‘डायेट’ म्हणजे लोकसभेच्या प्रतिनिधींची निवडणूक करणे, स्त्री-मुक्ती, खुली अर्थव्यवस्था व औद्योगिक उत्पादनपद्धती अंमलात आणणे इत्यादी. या सुधारणांमुळेच जपानच्या प्रगतीचा व संपन्नतेचा पाया घातला गेला. मॅक्‌आर्थरच्या आयुष्यातील महत्त्वाचा तसेच अखेरचा कालखंड उत्तर कोरियाच्या दक्षिण कोरियावरील आक्रमणाने गाजला [⟶ कोरियन युद्ध]. सप्टेंबर १९५० पर्यंत हे युद्ध गतिमान होते. मॅक्आर्थर व त्याचे प्रतिस्पर्धी यांनी त्यात अप्रतिम युद्धकौशल्य दाखविले तथापि फाजील आत्मविश्वासामुळे या गतिमान युद्धाचे खंदकयुद्धात परिवर्तन झाले [⟶ खंदक युद्धतंत्र]. पुसानमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची सेना वेढाबंद झाली. युद्धातील कोंडी फोडण्यासाठी मॅक्‌आर्थरने उत्तर कोरियन सैन्याच्या पिछाडीस इंचॉन येथे समुद्रमार्गे सैन्य उतरविले (१३ सप्टेंबर १९५०) आणि अडतिसाव्या अक्षांशरेषेकडे त्याच्या सैन्याने आगेकूच केली. ही रेषा ओलांडावयाची की नाही, हा राजकीय स्वरूपाचा पेच निर्माण झाला. ट्रूमन व मॅक्‌आर्थर यांच्यामध्ये विचारविनिमय झाला. रेषा ओलांडल्यास रशिया व चीन यांची काय प्रतिक्रिया होईल, या राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांच्या प्रश्नास रशिया व चीन या युद्धात उतरण्यास अक्षम असल्याचे उत्तर मॅक्‌आर्थरने दिले. अडतिसावी अक्षांशरेषा संयुक्त राष्ट्रसंघसेनेने ओलांडली, तर चीन उत्तर कोरियाच्या बाजूने लढाईत उतरेल व या युद्धाची जागतिक युद्धात परिणती होईल, अशी धोक्याची सूचना पंडित नेहरूंनी (चीनमधील भारतीय राजदूत पणिक्कर यांच्या सल्ल्यावरून) ट्रूमन यांना दिली होती. जेव्हा चीन युद्धात उतरला, तेव्हा मॅक्‌अर्थारने इतरांनी आपल्या सल्ल्याचा विपर्यास केल्याचे निवेदन केले. चिनी व उत्तर कोरियन सैन्याने संयुक्त राष्ट्रसंघसेनेचा जबरदस्त पराभव केला. या पराभवाचे कारण ट्रूमनची पडखाऊ भूमिका व चीन-उत्तर कोरियाचा पराभव करण्याच्या संदर्भात घातलेले निर्बंध ही आहेत, असे मॅक्‌आर्थरने जाहीर केले. अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणाला हे एकप्रकारचे जाहील आव्हानच होते. एवढ्यावरच न थांबता, मॅक्‌आर्थरने एप्रिल १९५१ मध्ये सिनेटर जोसेफ मार्टिनतर्फे सिनेटमध्ये ट्रूमन आणि त्यांचे शासन यांविरुद्ध मत प्रदर्शित करून अमेरिकन राज्यसंस्थेलाच उघड विरोध दर्शविला त्यामुळे ट्रूमननी राज्यसंस्था हीच सर्वश्रेष्ठ मानून व राष्ट्राध्यक्ष हाच अमेरिकन अत्युच्च सरसेनापती समजून मॅक्‌आर्थरला बडतर्फ केले. मॅक्‌आर्थर अमेरिकेला परतल्यावर अमेरिकन जनतेने त्याचे अभूतपूर्व स्वागत केले. मात्र तेथील जनमत ट्रूमनच्या विरुद्ध गेले नाही. ट्रूमननंतर. मॅक्‌आर्थरला राष्ट्राध्यक्ष करण्याच्या खटपटी झाल्या तथापि १९५२ मध्ये त्याला एकेकाळी दुय्यम असलेला जनरल आयझनहौअर याची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. कोरिया युद्ध कसे थांबबावे, याबाबत मॅक्‌आर्थरचा सल्ला आयझनहौअरने घेतला तेव्हा उत्तर कोरिया व चिनी सैन्यावर अणुबाँच टाकण्याचा आणि चीनवर हल्ला चढविण्याचा सल्ला मॅक्‌आर्थरने त्याला दिला. ‘कोरियन युद्ध थांबविण्याबाबत पॅनन्जॉम (उत्तर कोरिया) येथील बोलणी उत्तर कोरिया निष्कारण लांबवीत असल्याचे पाहून आयझनहौअरने युद्धबंदीच्या खलबतात जर फलदायक प्रगती करण्याची टाळाटाळ करण्यात येत असेल, तर आतापर्यंत अमेरिकेने जे निर्बंध पाळले ते यापुढेही पाळण्यात येणार नाहीत, शिवाय आवश्यक वाटल्यास अणुबाँबचाही उपयोग करण्यास अमेरिका कचरणारा नाही’, असा इशारा उत्तर कोरिया, चीन व रशिया यांना गुप्तपणे दिला. परिणामतः पॅनन्जॉमची बोलणी त्वरेने संपविण्यात आली व युद्धबंदी जाहीर झाली. म्हणूनच मॅक्‌आर्थरच्या सल्ल्याचा आयझनहौअरवर प्रभाव पडला असावा, असे अनुमान करण्यात येते.

मॅक्‌आर्थरने उत्तर आयुष्य जनसंपर्कापासून दूर राहून आपल्या कुटुंबाच्या सहवासात घालविले. त्याने रेमिनिसेन्सेस (१९६४) हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ लिहिला आहे. अमेरिकेतील विद्यालयीन शिक्षणक्रमात ‘मॅक्‌आर्थर’ हा एक अभ्यासविषय असतो. त्याचे आदर्शपुरुष जॉर्ज वॉशिंग्टन व अब्राहम लिंकन हे होते. त्याने घेतलेल्या कम्युनिष्टविरोधी धोरणाचे (मॅकॉर्थीझम) पडसाद अजूनही ऐकू येतात. त्याचे व्यक्तिमत्व अत्यंत गुंतागुंतीचे होते. ‘सैनिक मृत्यू पावत नाही तर तो “अस्तंगत” होतो ’. या त्याच्या उक्तीप्रमाणे वॉशिंग्टन येथे त्याचा ‘अस्त’ झाला, अमेरिकेच्या सैनिकी व राजकीय तिहासात मॅक्‌आर्थरला महत्त्वाचे इतिहासिक स्थान आहे.

संदर्भ : 1. Bernstein, B. J. Matusow, A. J. The Truman Administration: A Documentary History, New York, 1966.

            2. Panikkar, K. M. In Two Chinas, London, 1955.

            3. Rees, David, Korea: The Limited War, New York, 1964.

            4. Sebald, W. J. Brines, Russell, With MacArthur in Japan, London, 1965.

            5. Whiting, Alien, China Crosses the Yalu, New York, 1960.

दीक्षित, हे. वि.