गुप्तलेखनशास्त्र : (क्रिप्टॉलॉजी). महत्त्वाचा राजकीय पत्रव्यवहार, संदेश-वृत्तान्त, आज्ञा वगैरे ज्या व्यक्तीसाठी असतील तीखेरीज इतरांस त्यांतील मूळ मजकूर कळू नये, म्हणून मूळ मजकुराचे सांकेतिक किंवा गुप्त शब्दात किंवा संख्येत केलेले रूपांतर. यासाठी अक्षरे, आकडे व चिन्हे यांचा विशिष्ट पद्धतीने व गुप्त रीतीने उपयोग करतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही गुप्तलेखनाचे निर्देश आढळतात. सर्व देशांत प्राचीन काळापासून वेगवेगळ्या पद्धतींनी गुप्तलेखनाचा उपयोग रूढ आहे. जुना करार  सांकेतिक लिपीत लिहिला असल्याचे आढळले आहे. वात्स्यायन कामसूत्र  व अर्थशास्त्र  यांत संकेत, संज्ञालिपी असे उल्लेख आढळतात. गाथा सप्तशतीतील प्रेमिकांचे-दूतींचे संकेत, रेड इंडियनांचे धूम्र-संदेश, झुलू जमातीचे नगारावादनाचे संकेत ही उदाहणे काटेकोरपणे गुप्तलेखनात जमा होत नसली, तरी उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील महानुभावपंथीय ग्रंथ सकळादी सांकेतिक लिप्यांत लिहिलेले आढळतात. संत रामदासांनी शिवाजी महाराजांना पाठविलेला अफझलखानाच्या आगमनाचा पद्ययुक्त संदेश, पेशवेकालीन सांकेतिक लिपीतील काही नोंदी हीदेखील गुप्तलेखनाची उदाहरणे आहेत. इ.स.पू. चौथ्या शतकात ऐनिआस टॅक्टिकस याने गुप्तलेखनावर आणि नंतर अल्नबाती या अरबाने त्याच्या तंत्रावर पुस्तक लिहिल्याचे आढळते. इटलीतील आल्बर्टी टिथेली व पॉर्ता यांनी सु. पाचशे वर्षांपूर्वी गुप्तलेखन व गुप्तलेख निःसंकेतनावर ग्रंथरचना केली. आल्बर्टीने गुप्तलेखन-यंत्रसुद्धा बनविले होते. औद्योगिक क्रांतीमुळे व्यापारउदीम वाढला. तारायंत्राचा उपयोग प्रचारात आला. यांमुळेही गुप्तलेखनाची आवश्यकता वाढली. ⇨गुप्तवार्ता  अवघड करण्यास गुप्तलेखनाची फार आवश्यकता आहे.

गुप्तलेखनशास्त्राचे स्वरूप : प्रारंभी गुप्तलेखनशास्त्राचा उपयोग लिखित संदेशासाठी केला जात असे परंतु आता हे शास्त्र इतके प्रगत झाले आहे, की संदेशव्यवहार धरून, गुप्तदूरध्वनी (सायफोनी, सीक्राफोनी) व गुप्त-अनुचित्र प्रेषण (एनसायफर्ड फॅर्सिमाइल–ट्रान्समिशन) यांकरिताही त्याचा उपयोग होत आहे. कृत्रिम ग्रहांद्वारे आता जगाच्या सर्व भागांत सुलभतेने संदेशवहन होऊ लागल्यामुळे गुप्ततेकरिता या शास्त्राची गरज वाढली आहे.

  मुख्य घटक : गुप्तसंदेशाचे तीन घटक असतात : (१) वैयक्तिक संरक्षण, (२) प्रेषण-सुरक्षितता, (३) संकेत-सुरक्षितता. पहिल्या घटकानुसार, संकेतलिपी व गूढलेखन सामग्री जबाबदार माणसांच्या ताब्यात सुरक्षित ठिकाणी पाहिजे. दुसऱ्या घटकानुसार, संकेतप्रेषक व संकेतग्राहक हे दोघेही भरवशाचे हवेत. तिसऱ्या घटकानुसार, गुप्त संदेशाकरिता वापरावयाची यंत्रणा गुप्तता कायम ठेऊ शकणारी हवी. कुशाग्र बुद्धीच्या शत्रूला तिचे आकलन होता कामा नये. विशेषतः बिनतारी संदेशांच्या बाबतीत फार जागरूक असावे लागते व वरचेवर लिपी आणि पद्धती बदलावी लागते.

गुप्तलेखनांत संकेतपृथक्करणाला (क्रिप्टो ॲनालिसिसला) महत्त्व असते. शत्रूच्या संकेतलिपी ओळखून, साध्या किंवा निरर्थक भासणाऱ्या संदेशात, संकेतपूर्ण अर्थ काय आहे, हे ओळखणे आवश्यक असते. यालाही वेगळा विभाग असतो. सांकेतिक संदेशाकरिता वरपांगी न दिसणाऱ्या व विवक्षित रासायनिक उपचारांनीच उमटणाऱ्या शाईचा उपयोगदेखील अनेक वेळा केला जातो.

लेखन प्रकार : गुप्तलेखन दोन प्रकारांनी केले जाते : (१) सांकेतिक, (२) गूढ. केव्हा केव्हा ते या दोन्ही प्रकारांच्या मिश्रणानेही केले जाते. मजकुराचे महत्त्व, ज्यांच्यासाठी तो आहे त्यांचा अधिकार, हाती उपलब्ध असणारी वेळ इत्यादींवर कोणती लिपी वापरावयाची हे अवलंबून असते. शिवाय ज्या लिपीत लेखन केले असेल, त्या लिपीचा उलगडा करण्याचे पूर्वज्ञान संबंधितांनाच असणे आवश्यक असते. संदेशाच्या मजकुराचे गुप्तलिपीत रूपांतर केलेच पाहिजे असे नाही अदृश्य शाई किंवा रसायन यांच्याद्वारे तो संदेश अदृश्य करणे सोपे असते. सूक्ष्मबिंदू छायाचित्रणाने (मायक्रोडॉट्स) चित्रे, कागदपत्रे, नकाशे, आराखडे इत्यादींची सुईच्या डोक्याच्या आकाराची छायाचित्रे घेता येतात. प्राचीन ग्रीसमध्ये नित्य वापरातील वस्तूवर

गुप्तलेखनशास्त्र : सूक्ष्मबिंदू छायाचित्रणाचा नमुना.संदेश लिहून त्यावर मेणाचे आवरण दिले जाई व ती वस्तू हाती पडल्यावर तिच्यावरील मेणाचे पूट वितळवून संदेश वाचला जाई. हजामत केल्यावर तुळतुळीत डोक्यावर संदेश लिहिण्याची प्रथा आढळते. केस वाढल्यावर दूत ज्या व्यक्तीला संदेश द्यावयाचा त्यास भेटत असे नंतर परत हजामत करून संदेश वाचला जाई. अशा अनेक हिकमती योजून गुप्तसंदेश पाठविणे शक्य आहे परंतु यांत धोका अधिक असतो. म्हणून गुप्तलेखनाचा अवलंब करणे अधिक सुरक्षित ठरते.

गुप्तलेखन प्रक्रिया : याकरिता प्रथम सांकेतिक आणि गुप्त लिप्या तयार कराव्या लागतात. शिवाय वेळोवेळी त्यांत आमूलाग्र फेरबदल करणे आवश्यक असते. या कामी भाषातज्ञ, गणिती व गणकयंत्रांचा उपयोग केला जातो. एकच लिपी सर्वांकरिता किंवा सगळ्याच कामांकरिता वापरत नाहीत. विशिष्ट कार्यालयासाठी, व्यक्तीसाठी, भागासाठी वा कार्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लिप्या असतात. त्याचप्रमाणे त्या लिप्या, त्यांवरील पुस्तके, त्या उलगडण्याच्या पद्धती इत्यादींना सुरक्षित ठेवावे लागते. हे जबाबदारीचे काम शासकीय पातळीवर एक विभाग करीत असतो. ज्या कार्यालयांना आणि व्यक्तींना गुप्तलेखन करावे लागते, त्यांनाच पूर्वयोजनेनुसार लिप्या व त्यांसंबंधीचे वाङ्‌मय, नियम, सूचना इ. उपलब्ध करून दिले जाते. त्यांचा तारतम्याने व ठराविक नियमांप्रमाणे गुप्तलेखनाकरिता उपयोग केला जातो. शेवटी तारायंत्र वा रेडिओद्वारा मिळालेल्या गुप्तलेखाचे, ठरलेल्या पद्धतीनुसार, वाचन व उलगडा करून मूळ मजकूर मिळतो.


संकेतपद्धती : यासाठी सांकेतिक लिप्या वापरतात. लिप्या व शब्दावल्या वरचेवर बनवाव्या लागतात. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे हुद्दे व अधिकारपदे गुप्त ठेवण्यासाठी विशिष्ट संकेत वापरले जातात. तसेच लष्करी केंद्राकरिताही सांकेतिक शब्द वापरतात. शत्रू-मित्र ओळखण्यासाठी परवलीचे शब्द (पास वर्ड) युद्धकाळात प्रत्येक सैनिकी संघटनेत उपयोगात आणले जातात.

सांकेतिक लेखन : ह्याचा पाया म्हणजे एका अक्षराबद्दल दुसरे अक्षर किंवा एका शब्दाबद्दल दुसरा शब्द वापरणे हा होय. तसेच तिच्यात अक्षर व अंक यांची सांगड अशी घालण्यात येते : संकेतशब्दाखाली १ ते ९ अंक मिसळून ठेवायचे आणि मजकुरात संकेतसूत्राप्रमाणे (कोड की) बदल करावयाचा. सांकेतिक शब्दातील अक्षरसंख्या मात्र सारखीच ठेवावी लागते. अशा प्रक्रियेने अनेक संकेतलिप्या व शब्दावल्या निरनिराळ्या खात्यांकरिता बनविल्या जातात. सांकेतिक संदेशातील सर्वच शब्द संकेतलिपीतील असणे आवश्यक नाही. जे शब्द महत्त्वाचे वाटतात, त्यांचेच सांकेतिक शब्द बनविणे इष्ट असल्यामुळे शब्दावल्या आटोपशीर ठेवणे शक्य होते. शब्दावलीत असलेले प्रतिशब्द मूळ मजकुरातील शब्दाकरिता वापरावे लागतात. उदाहरणार्थ :

संकेत शब्दावली                   संदेश अडकह – हल्ला            पुणे शहरावर हल्ला आता करा.

 कडहब – शहर

डबकड – पुणे पपमर   – आता           संकेत लिपीतील रूपांतर :

मपपर – वर                डबकड कडहब मपपर अडकह पपमर खगखग – कर – रा    खगखग

अक्षर संकेत (सायफर) आणि शब्द संकेत (कोड्स) या दोहोंचा मिलाफ करून संदेश तयार करण्याची पद्धत सर्वांत अधिक रूढ आहे. यासाठी प्रथम एक सांकेतिक वाक्य तयार करण्यात येते. उदा., एक वाक्य घेऊ. ‘मी गावी जाणार होतो’. हे वाक्य क = १, ख = २ या संकेताप्रमाणे आकड्यांत लिहिता येईल. आता ‘येत्या गुरुवारी पहाटे चार वाजता लाहोर आघाडीवर युद्धास सुरुवात होईल’, हा संदेश गुप्तपणे पाठवायचा, तर तो सांकेतिक वाक्याच्या संख्यात्मक रूपात क्रमाने उभा लिहिता येईल.

पाठवावयाचा संदेश संदेशवाक्याच्या संख्यात्मक रूपाच्या क्रमाने उभा लिहिला (प्रथम ३ नंतर ७ असावा). त्यानंतर चार अक्षरांचा एक शब्द आडव्या क्रमाने तयार करून संदेश गुप्त स्वरूपात तयार करता येईल, जसे : जयेसवारवतटे तात्यासुरीआरहोचा लागुरुपघायुईर होरुवाहाडीद्धालवा या स्वरूपात मुख्य संदेश धाडला, तर ज्यांना सांकेतिक वाक्य (मी गावी जाणार होतो) आणि अक्षरांची उभी आडवी रचना ठाऊक आहे, त्यांनाच फक्त या संदेशाची फोड करता येईल. हा गुप्तसंदेश अधिक अवघड करावयाचा असेल, तर दुसरे सांकेतिक वाक्य घेऊन पुन्हा अक्षर मांडणी करता येईल.

व्यापार-उदिमाकरिता संकेतपद्धती वापरल्यामुळे संदेश सुटसुटीत बनतात. तारायंत्राने प्रक्षेपण-खर्चही कमी येतो. म्हणून खाजगी व्यापारी, कारखानदार, संकेत शब्दावल्या वगैरे बनवून घेतात. शासकीय आणि सैनिकी संकेतलिप्या या शासकीय व सैनिकी गुप्तलेखन संस्थेतर्फे बनविल्या जातात.

गूढलेखन : यात एक वेगळे अक्षर, वेगळा आकडा शब्दरहित मजकुराच्या शब्दातील प्रत्येक अक्षराऐवजी, आकड्याऐवजी किंवा शब्दांऐवजी वापरला जातो. जसे ‘द’ अथवा ‘ज’ याचे ‘अ’ किंवा दुसऱ्या अक्षरांत शब्दांतर करणे. कनिष्ठ गूढलिपीत अक्षरांचे शब्दांतर ठराविक अक्षरांत केले जाते परंतु वरिष्ठ व क्लिष्ट गूढलिपीत, ते एकच अक्षर वेगवेगळ्या अक्षरांसाठी प्रत्येक वेळी वापरले जाते. जसे ‘इ’ हे ‘ज’ ‘त’ ‘क’ वगैरे अक्षरांसाठी योजिले जाते. कित्येकदा संदेश प्रथम सांकेतिक लिपीत लिहून नंतर त्याचे गूढलिपीत रूपांतर केले जाते. संदेश अधिक क्लिष्ट व्हावा, म्हणून शब्दांचे वा संख्यांचे विभाजन करणे, त्यांचे तुकडे पाडणे, अक्षरक्रम बदलणे, त्यांत अनावश्यक अक्षरे वा आकडे घुसविणे, सांकेतिक मजकुराचे खंड पाडणे, त्या खंडांची उलटापालट करणे इ. तंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे तो संदेश गूढ व कठीण होतो.

गूढलेखनाकरिता (१) नियम, (२) लेखनपद्धती व (३) विशिष्ट सूत्र (की) यांची गरज असते. हे सूत्र कित्येक मजकुरांकरिता किंवा मजकुराच्या एखाद्या खंडांकरिता बदलणे, गूढलेखकाच्या आवाक्यात असले पाहिजे. सूत्र हे अंकाचे, शब्दाचे किंवा वाक्याचे बनविलेले असते. त्याचा वापर कसा करावयाचा, यासंबंधी नियम असतात. त्या नियमांप्रमाणे न चुकता लेखन करावे लागते. गूढलेखन चुकीचे केल्यास ते उलगडता येत नाही. जो काही किरकोळ फरक आढळतो, तो तारायंत्र व रेडिओ यांच्या प्रेषण-ग्रहणामुळे उद्‌भवतो.

गूढलेखन वर म्हटल्याप्रमाणे दोन प्रकारे करतात. (१) स्थानांतरण : यात मूळ मजकुरातील शब्दांच्या अक्षराचे स्थान किंवा अनुक्रम बदलतात. (२) पर्याययोजन : यात मूळ मजकुरातील मूळ अंकांऐवजी किंवा अक्षरांऐवजी दुसरी अक्षरे किंवा अंक वापरतात. पुष्कळदा या दोन्हीही पद्धती एकत्र करून तिसरी संमिश्र पद्धती योजण्यात येते. त्यामुळे निःसंकेतन अवघड होते. गूढलेखन वाचणाऱ्यांसाठी गूढ मजकुराचा आरंभ, त्याचा शेवट इत्यादींबद्दलच्या सूचना गूढलिपीतच दिल्या जातात.

स्थानांतरण गूढलेखन : यात चौरस अथवा चौकोनाकृती आकृत्यांचा उपयोग केला जातो. गूढलिपीलेखक (एन्सायफर्न क्रिप्टोग्राफर) या एका मार्गाने या आकृतीत मूळ मजकुराचे अंतर्लेखन करतो, नंतर दुसऱ्या मार्गाचे प्रतिलेखन (ट्रान्स्क्राइब) करवून गुप्त लेख तयार करतो.

एकस्तंभीय स्थानांतरण : या गूढलेखनात, लेखक एक शब्द घेतो व त्यातील प्रत्येक अक्षरास, मूळाक्षरातील त्या अक्षराच्या स्थानक्रमाप्रमाणे एक अंक देतो. उदा., ‘विजयनगर’ हा शब्द सूत्रशब्द योजून, डावीकडून उजवीकडे सूत्रशब्दांक जसे : ग–१, ज–२, न–३, य–४, र–५ आणि वि–६ दिले जातात. गूढलेखक आकृतीत प्रत्येक सूत्रशब्दाखाली मूळ मजकुरातील अक्षरे डावीकडून उजवीकडे लिहितो व सूत्रअंकांप्रमाणे स्तंभातील चार किंवा पाच अक्षरांचे शब्द बनवून गूढलेख तयार करतो. स्तंभाचा अनुक्रम सूत्रअंकांप्रमाणे घेण्यात येतो. ज्या चौरसात मूळ मजकुरांतील अक्षरे नसतील, तेथे इतर कोणतीही अक्षरे टाकली जातात.  


एकस्तंभीय स्थानांतरणाचे उदाहरण :

संदेश : गुप्तलेखनाची सांप्रत आवश्यकता फार वाटते.   

सूत्रशब्द – विजयनगर    

                                                       

  

लेखनस्तंभ – 

 

१ 

२ 

३ 

४ 

५ 

६ 

७ 

नाववाक्ष 

प्तप्रताअ 

खआरळ 

लेतफाह 

चीश्यटज्ञ 

गुसांकते

अ ह ळ क्ष ज्ञ ही फालतू अक्षरे आहेत. 

 

 गूढलेख : नाववाक्ष प्तप्रताअ 

               खआरळ लेतफाह 

              चीश्यटज्ञ गुसांकते 

 

गूढलेखनाचा उलगडा : गुप्तलेखक सूत्रशब्द लिहून त्याखाली सूत्रअंक मांडतो. प्रत्येक स्तंभाच्या खालील चौकटीत, स्तंभानुक्रमाने, वरून खाली गुप्तलेखांतील अक्षरे भरून अक्षराकृती पूर्ण करतो. नंतर डावीकडून उजवीकडे ओळींतील अक्षरे वाचून संदेशाचा मूळ मजकूर शोधून काढतो.

गुप्तलेखाचे निःसंकेतन करण्यास अधिक कठीण व्हावे म्हणून एकस्तंभीय पद्धतीने पुनःपुन्हा स्थानांतरण करतात.

स्थानांतरण-गूढलेखन जरी सोपे व सुरक्षित असले, तरी ही लेखनपद्धती प्रचारांत नाही. पर्यायलेखन पद्धती मात्र वापरात आहे. या लेखनात नेहमीच्या वापरातील मूळाक्षरे मूळ मजकुरातील अक्षरांच्या ऐवजी घालून गूढलेख तयार करतात. मूळाक्षरांचे मिश्रण करण्याच्या कौशल्यावर, मूळाक्षरांच्या संख्येवर आणि मूळाक्षरे वापरण्याच्या प्रकारावर या पद्धतीचा अवघडपणा अवलंबून असतो.

एकाक्षरी पर्याययोजनात एकच गूढ अक्षर वापरतात. या गूढ अक्षराचे दोन भाग – एक उघड व दुसरा गूढ – यांचा संगम करण्याकरिता सूत्रशब्द घेऊन गूढलिपी तयार करतात, जसे :

उघड : 

अ आ इ ई उ ऊ 

… … … ज्ञ 

गूढ अक्षरे : 

क म ल 

… … … ज्ञ 

 

सूत्रशब्द 

 

संदेशाच्या मूळ मजकुरातील अक्षरे उघड मूळाक्षरांच्या खाली लिहून व त्यांच्याखाली गूढ अक्षरे घेऊन गूढलेख तयार करतात. उलगडा करण्याकरिता गूढलेखनाच्या उलट क्रिया करून संदेश वाचला जातो.

दुहेरी एकाक्षरी पर्याययोजनात एका मोठ्या चौकोनाचे अनेक चौकोनी तुकडे करतात. चौकोनाच्या उत्तर बाजूस चौकोनी तुकड्यांच्या संख्येप्रमाणे व ठरलेल्या नियमांप्रमाणे, सूत्रशब्दातील अक्षरे लिहितात आणि मोठ्या चौकोनाच्या पूर्वेकडे सर्व मूळाक्षरे लिहितात. (पुढील सूत्र पहा).

सूत्र :

 

 

अ 

 संदेश : मराठीला आपली राजभाषेची जबाबदारी पार पाडता यावी. शासनव्यवहारात ती सर्वतोपरी कार्यक्षम व्हावी असे वाटते.

गुप्तलेख : अक अड अप अआ … … … ऋउ               म     रा   ठी   ला   … … … ते

यामध्ये गुप्तलेखाचा उलगडा करण्यास गुप्तलेखनाच्या उलट क्रिया करावी लागते.

गूढलेखन-पद्धतीत अनेकाक्षरी पर्याययोजन तसेच इतरही अनेक प्रकार योजिले जातात. नवेनवे प्रकार शोधून काढून त्यांचा गूढलेखनास उपयोग केल्यास गुप्तसंदेशवहन सुरक्षित राखले जाते.


संकेत यंत्रे व यांत्रिक गूढलेखन : सांकेतिक व गूढलेखनाचा उपयोग जसजसा वाढत गेला, तसतसे या प्रक्रियेत यंत्रही सामील झाले. अमेरिकेचे डीशिअस वॉड्झ्‌वर्थ यांनी १८१७ साली एक यंत्र बनविले. पुढे

जंबुपार (अल्ट्रा व्हायोलेट) किरण टाकून उलगडलेला गुप्तसंदेश

 इंग्लंडचे सर चार्ल्‌स व्हीट्स्टन यांनीही १८६७ साली यंत्र बनविले. फ्रेंचचे ब्राझिरे यांनी जेफर्सनने बनविलेल्या यंत्रात सुधारणा करून एक नवे यंत्र तयार केले. या यंत्रात धातूच्या चकत्या एकात आसावर बसविलेल्या असतात. त्या आसावर फिरू शकतात. चकत्यांच्या काठावर मूळाक्षरे खोदलेली असतात. एका चकतीवरील मूळाक्षराचा उपयोग संदेशासाठी होतो व दुसऱ्या चकतीवरील अक्षरे गूढलेखनाकरिता उपयोगात आणतात. चकत्या फिरत्या असल्यामुळे अक्षरांची अदलाबदल मोठ्या प्रमाणावर करणे शक्य होते. ही अदलाबदल स्वयंचलित असते. त्यासाठी गूढलेखन व त्याचा उलगडा होण्याकरिता योजिलेली यंत्रे एकमेंकाशी सुसंगत असावी लागतात. सूत्रशब्द, चकत्यांचे योजन, प्रारंभ-योजन इत्यादींचे नियम पूर्वनिश्चित असतात. अशा तऱ्हेचे यंत्र इंग्लंडचे चार्ल्‌स व्हीट्स्टन यांनी तयार केल्याचे वर म्हटलेच आहे. विद्युत् गूढलेखन यंत्राची रचना व कार्यपद्धती फार क्लिष्ट असते यात टंकलेखन यंत्राप्रमाणे अक्षर-सूचकफलक (की  बोर्ड) असतो. सर्व प्रक्रिया विद्युत्‌शक्तीद्वारा घडते. या यंत्राच्या वापरातही सूत्र-चकत्यांचे योजन वगैरे प्रारंभीच्या गोष्टी कराव्या लागतात. मग मूळ शब्दाप्रमाणे संदेशाचे टंकलेखन करावयाचे असते. यंत्राने उलगडा करण्यासाठी ते विशिष्ट स्थितीत सुरू करावे लागते. नंतर गूढलेखातील अक्षराप्रमाणे टंकलेखन केल्यास संदेशाचे मूळ शब्द कागदावर अगर फीत मुद्रणा (टेप) वर छापून येतात. स्थळप्रतही यंत्रच तयार करते.

गणकयंत्राच्या शोधामुळे व प्रचारामुळे सूत्रशब्द, सूत्रअंक, शब्दावल्या व गूढअक्षरे असंख्य प्रमाणात तयार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे गुप्तलेख-निःसंकेतनास गणकयंत्राची आवश्यकता भासते.

गूढलेख-निःसंकेतन : शांततेच्या काळात काय किंवा युद्धकाळात काय, महत्त्वाचे व दूरगामी परिणाम करू शकणारे शासकीय, राजकीय व लष्करी संदेश एकतर सेनावार्ताहराकडून किंवा तारायंत्र व रेडिओ यांद्वारा पाठविले जातात. रेडिओने पाठविलेल्या गूढसंदेशाचे कोणालाही अंतर्छेदन करून टिपण (मॉनिटर) करणे शक्य असते. अंतर्छेदन व टिपणाकरिता प्रत्येक राष्ट्रात स्वतंत्र संस्था असते. या अंतर्छेदन व टिपण संस्थेकडून गुप्तवार्तासंकलन व गूढलेखांचे निःसंकेतन केले जाते. त्यामुळे जर संदेशवहन व संदेशपद्धती (सिग्नल कम्युनिकेशन्स प्रोसीजर) यांच्या सुरक्षिततेविषयी दक्षता घेतली नाही, तर गूढलेखाचे निःसंकेतन करणे सोपे होऊन शत्रूला महत्त्वाच्या घटनांची वा संदेशांची माहिती मिळते. गूढलेखाचा उलगडा करणे व त्यांतील सूत्रशब्द व अंक यांचे ज्ञान मिळविणे यांस निःसंकेतन म्हणतात. निःसंकेतन करण्यास भाषाशास्त्र, सांख्यिकी, गणित इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पुष्कळ संकेत आणि गूढलेख यांचे परिशीलन व विश्लेषण भाषाशास्त्र आणि गणित यांच्या सिद्धांताप्रमाणे करून संकेत व गूढलेखनपद्धतीचा पाया तसेच प्रक्रिया यांचे ज्ञान मिळवावे लागते. मगच निःसंकेतन करणे शक्य होते. गूढलेखनात निर्हेतुक चुका घडतात. त्यांचाही उपयोग निःसंकेतनास होतो. शत्रूच्या नकळत जर सूत्रशब्द वा अंक मिळाले, तर उत्तमच. प्रत्येक भाषेची वैशिष्ट्ये असतात. निःसंकेतनकर्त्यास त्या त्या भाषेतील शब्दरचना व त्यात येणारी अक्षरे यांची उत्तम माहिती असावी लागते. इंग्रजी भाषेत E, T, N, R, O, A, IS ही अक्षरे शब्दात वारंवार येतात. शब्दाच्या शेवटीदेखील काही अक्षरे वारंवार येतात. शब्दाच्या शेवटीदेखील काही अक्षरे वारंवार येतात. संदेशांतही काही शब्द बरेचवेळा वापरावे लागतात. अशा शब्दांची यादी बनवावी लागते तसेच एखादे लेखन सांकेतिक आहे की गूढ आहे, हे प्रथम ठरवावे लागते. जर ते गूढलेखन असेल, तर त्यात स्थानांतरण आहे की पर्याययोजन आहे, हे निश्चित करावे लागते. स्थानांतरण पद्धतीच्या गूढलेखाच्या निःसंकेतनास बरेच प्रयोग करावे लागतात. निरनिराळ्या लांबीचे, रुंदीचे व चौकोनांचे उपयोग करून त्यांत त्या भाषेतील गूढलेख घालून चौकोनांची फोड करावी लागते. 

पर्याययोजन प्रकारातील गूढलेखाचे निःसंकेतन करताना असे दिसते, की विशिष्ट अक्षरे वारंवार त्या भाषेत आढळून येतात. असे शब्द व अक्षरे लक्षात आल्यास निःसंकेतन सुलभ होते. अनेकाक्षरी पर्याययोजनाने तयार केलेल्या गूढलेखाचे निःसंकेतन करण्यासाठी (१) किती गूढाक्षरे वापरली गेली आहेत, ते ठरविणे, (२) अशी गूढाक्षरे किती वेळा आली आहेत, हे ठरवून त्याच्या जंत्र्या तयार करणे व (३) शेवटी या जंत्र्यांतील अक्षरे व उघड मजकुरांत आलेली अक्षरे यांची सांगड घालून विश्लेषण करणे, अशा चाकोरीतून जावे लागते.

निःसंकेतन कठीण व्हावे म्हणून संदेश वगैरे त्रोटक व लहान ठेवणे उत्तम. अत्यंत महत्त्वाच्या संदेशाकरिता एकच शब्दसूत्र वापरणे इष्ट. एकच सूत्र व गूढ अक्षरे वारंवार वापरली गेली, तर निःसंकेतन करणे सोपे जाते.

निःसंकेतनावर सर्वप्रथम सिक्को सिमोनेट्टा याने १४७४ साली ग्रंथ लिहिला आहे.

संदर्भ : 1. Bryan, W. G. Cryptographic ABC’s, New York, 1967.           2. Gaines, H. F. Elementary Cryptoanalysis, London, 1939.           3. Kahn, David, The Code Breakers, New York, 1967.

दीक्षित, हे. वि. नगरकर, व. वि.