आद्य बंदूक, सु. १३ वे शतक.बंदूक रायफल : लांब नळीच्या प्रक्षेपकातून प्रचालक दारूस्फोटाच्या साहाय्याने गोळी झाडून लक्ष्य टिपणारी आधुनिक आयुधे, मनुष्याला हाताने नेण्यासारखे व हाताळण्याजोगे त्यांचे सुटसुटीत आकारमान असते. नळीचा व्यास १८.२५ मिमी. पेक्षा कमी असतो. बंदुकीची नळी आतून गुळगुळीत असते तर रायफलीच्या नळीत आतून उभ्या सर्पिल खोबण्या असतात. खोबण्यामुळे  गोळीला फिरकी गती मिळते व लक्ष्याच्या वाटेवर ती स्थिर रेषेत राहते. शिवाय त्यामुळे गोळीबाराचा पल्लाही वाढतो व नेमबाजी अचूक होऊ शकते. नळीचा व्यास व लांबी, गोळीचे वजन व आकार प्रचालक स्फोटशक्ती, आयुधाचे एकूण वजन व लांबी-रूंदी आणि गोळीबाराचा पल्ला या सर्व घटकांचा आयुधाच्या उद्दिष्टांनुसार विचार करून बंदूक व रायफल यांची रचना निश्चित करण्यात येते. खेळाच्या शिकारीच्या आणि सैनिकांच्या असे बंदुकीचे व रायफलीचे प्रकार आहेत.

कौटिल्याच्या अर्थशास्त्रात उद्धाटिमचा (२.१८) उल्लेख आहे परंतु त्याची रचना, क्षेप्याची स्वरूप व प्रचालनपध्दती यांविषयी निश्चित माहिती मिळत नाही. अकराव्या शतकात किंवा तत्पूर्वी सर्वप्रथम चीनमध्ये हाततोफा प्रचारात आल्या असाव्यात बांबूच्या नळीतून तोफदारूने बाण झाडले जात. पंधराव्या शतकातील वु-जिंग-जुंग् याव् आणि सोळाव्या शतकातील धु-वै-जृ या सैनिकी ग्रंथात हाततोफांची चित्रे दिलेली आहेत. मंगोल आणि अरब यांच्या आक्रमणामुळे यूरोपियांना हाततोफ अवगत झाली असावी. १३८८ सालापासून हाततोफ यूरोपात प्रचारात आली. अरबी दफ्तरात मिज्फा अन-नफ्त हे हाततोफांचे दुसरे नाव सापडते.

प्रारंभकाळातील बंदुका २० ते २५ सेंमी लांबीच्या असून त्या कासे, पितळ किंवा लोखंड या धातूंच्या असत. एका बाजूला बंद असलेल्या या धातूच्या नळीला लाकडी फळकुटात घट्ट बसविण्यात येई. पुढील तोंडातून दारू ठासल्यावर छोटे बाण किंवा शिश्याची गोळी ठासली जाई. नळीच्या मागील बाजूस एक छिद्र ठेवलेले असे. त्यात जळती काडी, तापलेली तार किंवा वात (तोडा) खुपसून व नंतर तोफदारूला बत्ती लावून बाण किंवा गोळी झाडली जाई .अशा प्रकारच्या हाततोफांना तोड्याच्या (मॅचलॉक) बंदुका (मस्केट) म्हणत. पुढे त्यांमध्ये सुधारणा होऊन दारूला बत्ती लावण्यासाठी स्प्रिंगच्या साह्याने सरकन फिरणारे लहानसे लोखंडी चक्र व त्यावर घासली जाणारी गारगोटी (फ्लिन्ट) बंदुकीवर बसवून चकमकीतून दारूवर ठिणग्या पाडून बत्ती लावण्याची योजना करण्यात येऊ लागली. त्यांना ‘व्हील लॉक’ बंदुकी म्हणत. अठराव्या शतकात ‘फ्लिन्ट लॉक’ म्हणजे चकमकीने दारूवर ठिणग्या पाडून बत्ती लावण्याची यांत्रिक क्लृती असलेल्या बंदुकी पाश्चिमात्य देशांतील सैन्यात सर्वत्र रूढ होत्या. त्यांचे वजन १२ पौंडांपर्यंत (सु. ५.४४३ किग्रॅ.) व नळीचा मुखव्यास ०.५ ते ०.७५ इंचांपर्यत (सु.१.२७ ते १.९० सेंमी) असे.

तोड्याची बंदूक, सु. १७ वे शतक.सोळाव्या शतकाअखेर रायफलीचा शोध लागला परंतु एकोणिसाव्या शतकापर्यंत तिच्यात अपेक्षित सुधारणा उदा.,, कटिप्रोथभरण (ब्रीच लोडिंग) झाल्या नाहीत. या शतकाच्या उत्तरार्धात धातूंच्या काडतूस गोळ्या व आघातप्रेरित स्फोटक दारूचा शोध लागल्यावर बंदूक व रायफल यांच्या यंत्रणेत अधिक प्रगती झाली. अमेरिकेत बंदुकी व रायफली यांचे प्रमाणीकरण होऊन त्यांच्या महोत्पादनास प्रारंभ झाला. १८८० ते १८९२ या काळात डेन्मार्क फ्रान्स, ग्रेट ब्रिटन या देशांत ‘मानलिशर’, ‘लेबेल’, ‘योरजेनसेन’ व ‘ली-मेटफर्ड’ या दट्ट्याच्या (बोल्ट ॲक्शन) रायफली प्रचारात आल्या ली-मेटफर्ड रायफली हिंदुस्थानी सैनिकांना देण्यात आल्या. दुसऱ्या महायुध्दानंतर एकदा चाप दाबल्यावर गोळी ठासण्याच्या व स्वयंचलित गोळीबार करणाऱ्या सैनिकी रायफली तयार होऊ लागल्या. आता सर्वत्र या प्रकारच्या स्वयंचलित गोळी ठासण्याच्या व उडविणाऱ्या (सेल्फ लोडिंग सेमीऑटोमॅटीक) रायफली रूढ झाल्या आहेत. १८६० सालापूर्वी एकेका सैनिकावर गोळीबार करण्याची पध्दत होती. अमेरिकन, ब्रिटिश, भारतीय व पाकिस्तानी सैनिक नेमबाजीवर भर देत. विद्यमान काळात सैनिक उघडपणे दिसत नाही म्हणून शत्रुसैनिकांच्या दिशेने सामूहिक गोळीमार केला जातो. यासाठी शत्रूवर गोळ्यांचा पाऊस पाडण्यासाठी आधुनिक रायफली आवश्यक ठरल्या. तथापि त्यामुळे नेमबाजीचे महत्त्व कमी झालेले नाही. भारतात प्रथम पंधराव्या शतकाअखेर पोर्तुगीजांनी तोड्याच्या, ठासणीच्या बंदुका आणल्या. त्यांचे अनुकरण दक्षिणेतील राजांनी केले असावे. छत्रपती शिवाजींच्या सैन्यात दुरूस्तंदाज कानडी आणि भाडोत्री बंदूकधारी होते. तथापि मराठ्यांनी बंदुकीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. घोड्यावरचे बंदूकधारी नसावेत असे संभाजी-पोर्तुगीज लढायांवरून वाटते. पुरंदर किल्ल्याच्या वेढ्यात मराठ्यांच्या बंदुकीने मोगलांवर गोळ्या झाडल्या होत्या पेशवाईत बिगर मराठी व गोऱ्‍यांनी शिकविलेल्या बंदुकी पलटणी होत्या. मराठे किंवा पेशवे यांनी बंदुकांचे कारखाने काढले नाहीत.

रायफलबाबरने उत्तर हिंदुस्थानात तोड्याच्या बंदुकी आणल्या. त्यांचा रणांगणावर कितपत उपयोग झाला, हे सांगणे कठीन आहे. अकबराचा तोड्याच्या बंदुकीचा कारखाना होता परंतु पुढे तो चालू राहिला की नाही, हे सांगता येत नाही. बंदुकीत सुधारणा मात्र झाल्या नाहीत. मोगल बरकंददाज किंवा बंदूकधारी कुशल नव्हते. दाढी जळेल अशी त्यांना भीती वाटे. आठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बंगालचा सुभेदार मीर कासीम याच्या कारखान्यात तयार बंदुका तत्कालीन इंग्रजी बंदुकांपेक्षा चांगल्या होत्या. त्याचे तेलंगी बंदूकधारी कंपनी बंदूकधाऱ्‍यांपेक्षा अधिक तरबेज होते. इशापूर (प. बंगाल ) येथे विसाव्या शतकात बंदुकाचा कारखाना निघाला. अजूनही तो कारखाना चालू आहे. १८९२ पर्यंत कंपनी आपल्या सैनिकांना स्नायडर, मार्टिनीऱ्‍हेन्री, ली-मेडफर्ड व एन्फील्ड या जातींच्या बंदुका व रायफली पुरवीत असे.गोऱ्‍या सोजीरांकडे असलेल्या रायफलींपेक्षा कमी दर्जाच्या बंदुका, रायफली हिंदी सैनिकांना देण्याची पध्दती १९०३ साली बंद झाली.


स्वातंत्र्योत्तर कालात स्वयंचलीत रायफलींबाबत संशोधन होऊन ७.६२ मिमी. स्वयंगोळीभरण रायफली प्रमाणभूत ठरल्या. सैनिकांचे व्यक्तिगत आयुध म्हणून सर्व सैनिकांना त्या पुरविल्या जातात.त्यांना संगीन जोडता येते. कमीनदार सैनिकांना (स्नायपर) अचूक निशाणबाजीसाठी दूरदर्शक जोडता येतो.

स्वयं गोळीभरणी रायफल : (१) प्रज्वलन निरासक, (२) संगीन-अटक, पूर्वदर्शि, (४) वायुनियंत्रक, (५) पिस्टन, (६) कटिप्रोध, (७) गोळीभांडार, (८) घोडा, (९) चाप, (१०) पार्श्र्वंदर्शी, (११) मूठ, (१२) टेकू.

 गोळीची संहारशक्ती व संहारक्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न जारी आहेत. या प्रयत्नांपैकी काहींच्या दिशा पुढीलप्रमाणे सांगता येतील: (१)गोळी अंगातून गरगर फिरत व लोळत अंग फोडून बाहेर पडणे. (२) गोळीत टाचणीसारख्या सूक्ष्म वस्तू घालून मारा करणे आणि (३) गोळ्या अग्निबाणाप्रमाणे बनवून त्यांचा धडाका वाढविणे.

रायफलीच्या संहारशक्तीचाही विस्तार करण्यात येत आहे. उदा., रायफलीला ⇨ग्रेनेड उडविण्याचे साहीत्य जोडून ३५ मी . पेक्षा लांब अंतरावर ग्रेनेड मारणे, धूर सोडणे इत्यादी. पायदळाकडे अग्निबाण प्रेक्षपक आणि वि-प्रतिक्षेपक रायफली असतात. त्याच्या क्षेपकनळीचा व्यास १०५ मिमी. पर्यंत असतो.

रणतंत्र : सोळाव्या शतकाच्या अखेरपर्यंत तोड्याच्या बंदुकांना रणक्षेत्रावर फारसे महत्त्व नव्हते. बंदुकीचा अवजडपणा, गोळी भरण्याचा त्रास, तिचा असमाधानकारक वेग व बिनभरवशाची नेमबाजी यांमुळे सैनिक धनुष्यबाणच पसंत करीत [⟶धनुर्विद्या]. त्यावेळी सहा बाणास एक प्रमाण पडे. बंदुकीत गोळी ठासत असतानाच प्रतिपक्षाचे ⇨घोडदळ हल्ला करीत असे .त्यावर उपाय म्हणून बंदूकधाऱ्‍यांच्या रक्षणासाठी भालेकरी लागत. या पुढची पायरी म्हणजे बंदूकधाऱ्‍यांच्या एकापाठोपाठ रांगा उभ्या करण्यात येत व त्या रांगा एकापाठोपाठ गोळीबार करीत. त्यामुळे घोडेस्वारांच्या हल्ल्याचे भय कमी झाले. बगलेवर व आघाडीवर बंदूकधारी उभे राहत. पुढे बंदुकीला संगीन जोडण्याची सोय झाल्यामुळे आत्मरक्षण करणे व हातघाईत संगिनीचा भाल्याप्रमाणे उपयोग करणे सोपे झाले. रांगा उभ्या करण्यासाठी रणांगणाच्या अघाडीची लांबी वाढली, पण त्यासाठी सपाट रणांगणाची निवड करावी लागे. रांगा विस्कळीत होतील या भितीमुळे शत्रूचा पाठलाग करणे कठीण होई. बंदुकीमुळे सैन्यांची ३३ ते ५० टक्के हानी होऊ लागल्यामुळे बंदूकधाऱ्‍याला प्रशिक्षण देण्यास दीर्घकाळ लागत असल्यामुळे युद्धाची वारंवारता कमी होई.

शिखारी बंदूकसामान्यतः लढाईच्या प्रारंभी तोफांचा भडिमार करून शत्रूच्या पायदळात घबराट उडवून त्यावर घोडदळ आणि संगिनधारी पायदळ तुटून पडे. घोडदळ तोफखाण्यावर पळणाऱ्‍या सैनिकांवर चढाई करी. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धापासून (१८६१–६५ ) रायफलीची गुणवत्ता लक्षात आली. घोडदळ व गोळीबार यांना उत्तर म्हणून खंदक खणून किंवा आडोसे उभे करून हल्ल्खोरांचे जबरदस्त नुकसान करता येऊ लागले. दुसरा प्रकार म्हणजे, आघाडीच्या खूप पुढे भुरटे परंतु नेमबाज बंदूकधारी इतस्ततः फिरून शत्रूच्या फळीत गोंधळ उडवीत व पठोपाठ घोडदळ व पायदळाच्या रांगा चढाई करीत.रायफलींचा पल्ला मोठा असल्यामुळे तोफा अघाडीला ठेवणे धोक्याचे झाले. म्हणून त्यांचा पल्ला वाढविण्यासाठी मोठ्या व्यासाच्या भारी तोफा प्रचारात येऊ लागल्या, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील बिनधुराची दारू, धातूच्या काडतूसी गोळ्या व ली-मेटफर्डसारख्या ब्रीच लोडींग मॅगेझिन रायफली यांच्या शोधामुळे रायफल व तोफखाना हे प्रभावी ठरले व घोडदळ निष्प्रभ होऊ लागले. घोडदळाला लहान रायफली देण्यात आल्या व त्याचा घोडपायदळ (ड्रॅगून)म्हणून उपयोग करणे भाग पडले. आवश्यक झाल्यास घोडपायदळ-सैनिक पायउतार होऊन गोळीबार करीत. पहिल्या महायुध्दाअखेरपर्यंत वरीलप्रमाणे वस्तुस्थिती  होती. दुसऱ्‍या महायुध्दातील अनुभवावरून रायफली स्वयंचलीत होऊ लागल्या. रायफल हे आत्मसंरक्षक वैयत्किक आयुध बनले. शत्रुवर हल्ला करताना त्याच्यावर बगलेवरून मारा करून त्याला अगतिक बनविणे व नंतर त्यावर तुटुन पडणे, असे तंत्र रूढ झाले. पायदळाच्या बरोबरीने लढाऊ विमाने, रणगाडे, तोफखाना [⟶तोफ व तोफखाना] ह्यांनीही भाग घेणे इष्ट ठरते.रायफलीच्या गोळीमाराची तीव्रता वाढविण्यासाठी मशीनगन व ग्रेनेड-क्षेपक पायदळास पुरविले जातात. हिंदी राजेरजवाड्यांनी भाडोत्री गोऱ्‍या अधिकाऱ्‍यांकरवी यूरोपीय पध्दतीप्रमाणे हिंदी कवायती फलटणी उभ्या केल्या परंतू हिंदी अधिकारी मात्र तयार झाले नाहीत. या उणिवांमुळे बहुतेक लढायांत हिंदी राजांना पराभव पतकरावा लागला. ईस्ट इंडीया कंपनीच्या सैन्यात अधिकांशाने हिंदी सैनिकच होते, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.

खेळाच्या व शिकारी बंदुका आणि रायफली : इंग्रजीत खेळ व शिखारी बंदुकांना ‘गन’ (म्हणजे आंतून गुळगुळीत नळ्या असलेल्या ) म्हणतात. खेळाच्या बंदुका व ऱायफली  वापरून नेमबाजीचा सराव करता येतो. नंतरच शिखार करण्याची पात्रता येते. लक्ष्यावर कृत्रिम पक्ष्यावर(स्कीट अँड ट्रॅप) नेमबाजीचा सराव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका व रायफली लागतात.


लक्ष्य नेमबाजी : यासाठी वापरावयाच्या बंदुकीचा नळीचा व्यास सु ५.५ मिमी. असतो. १०० मी. अंतरावर सु. ६.२५ सेंमी. क्षेत्रफळाचे लक्ष असते. पोटावर पडून, गुडघे  टेकून व बसून हे लक्ष्य टिपावे लागते. बंदूक व रायफली या एकबारी, अनुवारबारी (रिपीटर) व स्वयंभरणशील (सेल्फ ऑटोलोडिंग) रचनेच्या असतात. १,००० मी. वरील नेमबाजीसाठी महा-व्यास बंदूक किंवा रायफल वापरतात. कृत्रिम पक्षी नेमबाजीत नेमबाज्याच्या पुढे डाव्या व उजव्या बाजूकडून फेकलेल्या लक्ष्यपक्ष्याला टिपावे लागते. सापळा (ट्रॅप) नेमबाजीत लक्ष्यपक्षी आकाशात दूर जात असताना त्याला टिपावे लागते. यासाठी बारा मापाची (बोअर) बंदूक वापरतात.

शिखारी बंदूक व रायफल: लहानमोठ्या पशुपक्ष्यांच्या शिखारीसाठी वजनाने हलक्या, हाताळण्यास सोप्या अशा बंदूकीची व रायफलीची गरज असते. शिकार करताना हिंस्त्र व दांडगी जनावरे वगळता सामान्यतः नेम धरत नाहीत. गोळीतील छऱ्‌याच्या नाशक्षेत्रात लक्ष्यास ठेवून गोळीबार करतात. ज्या अंतरावर लक्ष्यावर जास्तीत जास्त छरे लागतात, त्यास मारक-पल्ला म्हणतात. एकाच वजनाची व बनावटीची गोळी मारल्यास वीस बोअरपेक्षा सोळा बोअरचा पल्ला अधिक असतो. सोळा बोअरपेक्षा बारा बोअरचा पल्ला अधिक असतो. बंदूकीच्या व्यासास व लक्ष्यनाशाला उपयुक्त ठरण्याच्या दृष्टीने गोळीतील प्रचालक दारूचे वजन व छऱ्‍यांची संख्या निश्चित करतात. म्हणून गोळ्यांचे विविध प्रकार आढळतात. बंदूकीच्या तोंडाला मुखरोधक जोडून गोळीचा वेग व नाशक्षेत्र कमीजास्त करता येते. दट्ट्या-क्रिया, तरफ-क्रिया, पंप किंवा सरक-क्रिया व स्वयंमगोळीभरण अशा विविध प्रकारच्या यांत्रिक रचना असलेल्या रायफली असतात. हिंस्त्र, भारी वा दांडग्या जनावरांच्या शिकारीसाठी महाघातक शक्ती असलेल्या व अचूक नेमबाजी करता येईल, अशा बंदुका व रायफली वापरतात.

गोळीबाराच्या चढाओढी सुरू  झाल्या. गुळगुळीत नळीच्या बंदुकांकरिता १९० मी. व रायफलींकरिता २५० मी. वरील लक्ष्यभेद करावा लागे.

ऑलिपिंक क्रिडासामन्यांमध्ये नेमबाजीच्या विविध स्पर्धा होतात. त्या पुढीलप्रमाणे होत : (१) रायफल, (२) लघु-व्यास रायफल, (३) पिस्तूल, (४) क्रिडा पिस्तूल, (५) मृदा कबूतर (क्ले पिजन) व (६) धावते हरिण. या स्पर्धामध्ये एकूण दोनशे लक्ष्ये अचूक टिपावयाची असतात.प्रत्येक लक्षय अचूक टिपल्यास एक गुण दिला जातो. भारताचे परिमल चतर्जी, सुशील चौधरी, महाराज कर्णीसिंग व रणदीर सिंग यांनी ऑलंपिंक स्पर्धात भाग घेतला आहे. कर्णीसिंगांनी मेक्सिको (१९६८)येथील स्पर्धात १९४ गुण मिळविले होते. भारतात कॉलेज ऑफ कॉम्बॅट, महू छावणी, मध्य प्रदेश येथे राष्ट्रिय नेमबाजी स्पर्धा होतात. भारतात ठिकठिकाणी रायफल संघ असून भारतीय रायफल संघटना ही राष्ट्रिय पातळीवरील संघटना होय. ग्रेट ब्रिटनमध्ये बिझ्ली (सरी परगणा) येथे नेमबाजी स्पर्धा होतात [⟶नेमबाजी  ].

पहा:पिस्तुल व रिव्हॉल्व्हर. 

संदर्भ : 1. Blackmore, H.L. Guns and Rifles of the World, London, 1965.

           2. O’connor, J. Dunlap. R. &ampOthers Complete Book of Shooting, New York, 1965.  

         3. मोडक, ग. वा. बंदूक कशी उडवावीॽ पुणे, १९३४. 

दीक्षित, हे. वि.