रोमेल, अर्विन : (१५ नोव्हेंबर १८९१-१४ ऑक्टोबर १९४४). जर्मन फील्ड मार्शल. दुसऱ्या महायुद्धातील [⟶महायुद्ध, दुसरे] ⇨ ॲडॉल्फ हिटलरचा एक प्रसिद्ध सेनानी. जन्म हाइडनहाइम (प. जर्मनी) येथे. त्याचे वडील शिक्षक होते. दुसऱ्या महायुद्धात ⇨मरुभूमि युद्धतंत्राच्या रणनीतीतील कुशल जाणकार म्हणून त्याचा लौकिक होता. आफ्रिकी कोअरचा प्रमुख असताना त्याने दाखविलेल्या चतुर डावपेचांमुळे व उत्तम लष्करी पराक्रमामुळे तो ‘डेझर्ट फॉक्स’ या टोपणनावाने प्रसिद्धीस आला. सुरुवातीस त्याची १२४ व्या पायदळ पलटणीत कॅडेट ऑफिसर म्हणून नेमणूक झाली (१९१०). त्यानंतर दोन वर्षांतच त्याला कमिशन मिळून तो सेकंड लेफ्टनंट झाला.

फील्ड मार्शल रोमेलरोमेलने पहिल्या महायुद्धात [⟶ महायुद्ध, पहिले] फ्रान्स, रूमानिया, इटली येथील आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी बजावली. युद्धानंतर काही काळ त्याने ड्रेझडेन इन्फन्ट्री स्कूल (१९२९-३३) व पॉट्सडॅम वॉर अकॅडेमी (१९३५-३८) येथे निदेशक (इन्स्ट्रक्टर) म्हणून काम केले. त्यानंतर त्याची व्हीनर नॉइश्टाट येथील वॉर अकॅडेमीवर समादेशक (कमांडंट) म्हणून नेमणूक झाली. प्राग व सुडेटन येथील मोहिमांवर असताना हिटलरच्या खास सुरक्षा व्यवस्थेसाठी नेमलेल्या पलटणीचा तो प्रमुख होता. त्यानंतर त्यास मेजर जनरलचा हुद्दा मिळून पोलंडवरील स्वारीच्या वेळी त्यास दुसऱ्यांदा हिटलरच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आले. १९४० मध्ये फ्रान्समधील सातव्या पँझर डिव्हिजनचा तो प्रमुख  होता. लेफ्टनंट जनरल या पदावर असताना लिबियामधील जर्मन सैन्याचा प्रमुख म्हणून त्याने केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. येथेच त्याने ब्रिटिशांच्या फौजा ईजिप्तमध्ये परतवून लावल्या. २१ जून १९४२ मध्ये त्यास फील्ड मार्शल करण्यात आले. आफ्रिकेमध्ये इटालियन-जर्मन फौजांचे नेतृत्व करीत असताना त्याने अनेक अडचणींवर मात करून ब्रिटिशांना ट्युनिशियातून माघार घ्यावयास भाग पाडले. तसेच एल् ॲलामेन येथे झालेल्या युद्धात ब्रिटिशांना त्याने थोपवून धरले [⟶ एल् ॲलामेनची लढाई]. परिणामतः संपूर्ण अरब जगतात त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. तथापि ॲलेक्झांड्रिया तो काबीज करू शकला नाही. ऑक्टोबर १९४२ मध्ये एल् ॲलामेन येथेच झालेल्या दुसऱ्या लढाईत जनरल ⇨बर्नार्ड लॉ मंगमरीकडून मात्र त्याला पराभव पतकरावा लागला. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे हिटलरने रोमेलला जर्मनीत परत बोलविले.

पुढे उत्तर इटलीमध्ये त्याची ‘आर्मी ग्रुप बी’ चा प्रमुख म्हणून नेमणूक झाली. जानेवारी १९४४ मध्ये नेदर्लंड्सपासून ल्वार नदीपर्यंत असलेल्या सर्व जर्मन फौजांचे त्याने नेतृत्व केले. नॉर्मंडीकडून होणाऱ्या शत्रू सैन्याच्या आक्रमणाचा प्रतिबंध करण्याचा त्याने अयशस्वी प्रयत्न केला.

रोमेल हिटरलचा अत्यंत विश्वासू सल्लागार सेनानी होता परंतु हिटलरची युद्धपद्धती व अत्याचारी आदेश यांमुळे त्याचा भ्रमनिरास झाला. त्यातच त्याने हिटरलरच्या नेतृत्वावर निर्भीड आणि स्पष्ट टीकाही केली. त्यामुळे हिटरलशी त्याचे तीव्र मतभेद झाले. रोमेल हिटलरच्या हत्येच्या कटात सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याने नाझी पीपल्स कोर्टापुढे खटल्यासाठी उभे राहण्याऐवजी विष घेणे पसंत केले. हेर्लिंगन (प. जर्मनी) येथे त्याचा मृत्यू झाला.

हिटरलच्या आदेशाप्रमाणे त्याच्यावर संपूर्ण लष्करी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

रोमेलचा Infanterie greift an हा युद्धविषयक डावपेचांसंबंधीचा ग्रंथ प्रसिद्ध (१९३७) असून त्याच्या मृत्यूनंतर इंग्रजीमध्ये द रोमेल पेपर्स या शीर्षकाने त्याचे लेखन प्रसिद्ध झाले आहे (१९५३).

बोराटे, सुधीर