उंटदल : वालुकामय प्रदेशातील लढाईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी असलेली उंटस्वारांची सैनिकी संघटना. उंट २५० किग्रॅ. वजन पाठीवर घेऊन दिवसाला ४० किमी. अंतर तोडू शकतो. तो पाण्याशिवाय राहतो, काटेरी झाडपाल्यावर गुजारा करतो आणि ताशी १२ ते १६ किमी. वेगाने वालुकामय रस्त्यातून अठरा अठरा तास धावतो. ह्या गुणांमुळे वाळवंटी प्रदेशातील टेहळणी व वजनदार वस्तूंची वाहतूक यांसाठी उंटदलाचा फार उपयोग होतो. त्यामुळे पहिल्या महायुद्धकाळापर्यंत सैनिकी संघटनेत उंटदलाचा अधिक उपयोग केला जात असे. अलीकडे मात्र जास्त कार्यक्षम व कोठल्याही प्रदेशात चालू शकणाऱ्या वेगवान यांत्रिकी वाहनांच्या सोयीमुळे व उंटाचा उपयोग फक्त वाळवंटी प्रदेशापुरताच मर्यादित असल्याने उंटदल नामशेष होत आले आहे.

भारतीय उंटदल

अमेरिकेने प्रथम १८५० मध्ये वाळवंटी सरहद्दीच्या सैनिकी वाहतुकीसाठी उंटदल उपयोगात आणले. ईजिप्तमध्ये १८८४ साली जनरल गॉर्डनच्या सुटकेसाठी आखलेल्या मोहिमेत प्रथम उंटदल उभारण्यात आले. मोहिमेनंतर त्याचे विसर्जन करण्यात आले होते पण पुढे पुन्हा त्याची उभारणी करण्यात आली व त्याने खलीफांच्या विरुद्ध झालेल्या १८९६–९८ मधील युद्धात खास कामगिरी केली.

भारतात उंटाचा सैनिकी उपयोग प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. किल्ल्याचे दरवाजे हत्तीच्या धडकेने मोडून काढताना हत्तीचे डोके फुटू नये, म्हणून मध्ये उंट बळी दिला जात असे. भारताच्या पश्चिम सरहद्दीवरील राजस्थानातील जोधपूर, बिकानेर इत्यादींच्या नरेशांनी आपल्या सैन्यात उंटदलाची तरतूद केलेली होती. पहिल्या जागतिक महायुद्धात बिकानेरच्या नरेशाने आपला सुप्रसिद्ध गंगारिसाला (उंटदल) ब्रिटिश सेनेच्या दिमतीस दिला होता. त्याने ईजिप्त पॅलेस्टाइनमधील गाझाच्या व बीअरशीबाच्या चढाईत, तसेच अम्मानच्या हल्ल्यात भाग घेऊन महत्त्वाची कामगिरी केली. गंगारिसाल्याने दक्षिण आफ्रिकेत सोमली युद्धात भाग घेतला होता. स्वातंत्र्यानंतर बिकानेरचा गंगारिसाला भारतीय सैन्याचा भाग बनला. वाळवंटी भागातील टेहळणी व वाहतुकीसाठी स्थानिक पथक म्हणून हे दल कायम करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पारंपरिक सैनिकी संचलनात जागतिक प्रतिष्ठेचे निदर्शक म्हणून घोडदळाच्या बरोबरीने अग्रभागी उंटदलाची हजेरी रुजू असते.

पाटणकर, गो. वि.