बूमरॅंग : काही ऑस्ट्रेलियन आदिवासी जमातींत प्रचलित असलेले पाणिमुक्त म्हणजे हाताने फेकून मारण्याचे अस्त्र. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स प्रांतातील तुरूवाल जमातीत रूढ असणाऱ्या नावावरून बूमरॅंग शब्द

बूमरॅंग फेकण्याच्या पवित्र्यात ऑस्ट्रेलियन आदिवासी.

आलेला आहे. शिकारीसाठी वा युद्धासाठी बूमरॅंगच्या प्रकारानुसार त्याचा उपयोग केला जातो. कठीण लाकडाचे हे अस्त्र सामान्यतः विळा वा खुरपे यांच्या आकाराचे असले, तरी त्याचे इतरही आकारप्रकार रूढ आहेत. सर्वसाधारणपणे बूमरॅंगचा एक पृष्ठभाग बहिर्गोल व दुसरा जवळजवळ सपाट असून अग्रभाग तीक्ष्ण, धारदार केलेला असतो. बूमरॅँगच्या पात्याची ठेवण वायुगतिकीशास्त्राच्या सिध्दांताप्रमाणे असून पाते काटछेददृष्टीने चपटे असते व त्याचा आकार दीर्घवृत्त किंवा एक वा द्विबहिर्गोल अथवा संपूर्णतः अर्धगोल असू शकतो. पात्याच्या टोकाकडील दोन बाजू समपातळीत नसून त्यांच ९०° ते १८०° चा कोन असतो आणि संपूर्ण पात्याची एकूण लांबी सु. ३०.१/२ ते ९१.४ सेंमी. इतकी असते. बूमरॅँगवजा काठयांचा उपयोग प्राचीन काळी आदिवासींमध्ये रूढ होता. या फेकण्याच्या काठ्यांचे प्रगत रूप म्हणजेच बूमरॅंग असून चक्र हे बूमरॅंगचे प्रगत रूप असावे, असे मानले जाते.

ऑस्ट्रेलियात बूमरॅंगचे दोन प्रकार आढळतात : लक्ष्यवेध करून परत येणारी व परत न येणारी. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व-पश्चिमेकडील आदिम जमातींत परत येणाऱ्या बूमरॅंगचा उपयोग रूढ आहे. तुरूवाल जमात यासाठी प्रसिद्ध आहे. परतणारे बूमरॅंग हलके, बारीक व समतोल असते. ते १२ ते ३०इंच (सु.३० ते ७६ सेंमी.) लांब, 1.१/२ –3इंच(सु.३.८१ ते ७.६२सेंमी.) रुंद, ३/१६ ते ३/८इंच (सु.०.४७६ ते ०.९५२ सेंमी.) जाड आणि वजनाने १२ औंस (सु.३४० ग्रॅम) असते. त्याच्या पात्याच्या दोन भागांना विमानाच्या पंख्याच्या पात्याप्रमाणे २° ते ३° इतकी पिरगळ (स्क्यूईंग) ठेवलेली असते. लक्ष्यभेद न झाल्यास या पिरगळीच्या योगाने अभिकेंद्रित वायुदाबामुळे बूमरॅंग फेकणाऱ्याच्या जवळपास परत येऊन पडते. काही निष्णात व्यक्ती अशा बूमरॅंगचा पल्ला ९१ मीटरपर्यंत ठेवू शकतात. परत न येणारे बूमरॅंग हे उथळ-वक्राकार असते. त्यामुळे प्राणी पंगू केले जातात किंवा मारले जातात.

लहान बूमरॅंग १२ ते ३० इंच (सु.३० ते ७६ सेंमी.) लांब असते. याचा वापर खेळासाठी केला जातो. युद्धप्रसंगी वापरण्यात येणारे बूमरॅंग २४ ते ३६ इंच (सु.६१ ते ९१.४ सेंमी.) लांब असते. त्यामुळे गंभीर इजा होऊ शकते किंवा मृत्यूही येऊ शकतो.

बूमरॅंगचे काही प्रकार : (१) व (२) फेकल्यावर परतणारे ऑस्ट्रेलियन बूमरॅंग, (३) फेकल्यावर न परतणारे द.भारतीय बूमरॅंग, भारत, (४) ॲरिझोनातील होपी इंडियनांची ससे मारण्याची काठी.

बूमरॅंग ताकद व कौशल्य वापरुन फेकावे लागते. क्रिकेटच्या खेळातील गोलंदाजाप्रमाणेच बूमरॅंग फेकणाराला थोडे धावत जाऊन मगच ते भिरकवावे लागते. फेकताना ते आपल्या खांद्यावर विशिष्ट स्थितीत ठेवून फार जलद वेगाने सोडावे लागते. बूमरॅंग टाकल्यानंतर त्याची एक बाजू जमिनीवर आदळली गेली असता ते भयंकर वेगाने हवेत उंच जाते. त्यानंतर ते ५० यार्ड (सु.४५ मीटर) किंवा अधिक लांबवर जाऊन वर्तुळाकार गरगर फिरते व त्यानंतर ते फेकणाऱ्याच्या जवळ जमिनीवर येऊन पडते.

बूमरॅंगचा वापर प्राचीन काळी ईजिप्त, इथिओपिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, कॅलिफोर्निया, ॲरिझोना, मध्य अश्मयुगीन यूरोप व द.भारत इत्यादींमध्ये रूढ होता. द.भारतातील काही आदिवासी जमातींत ससे, पक्षी इत्यादींची शिकार करण्यासाठी त्याचा उपयोग अर्वाचीन काळातही प्रचलित आहे.

बोराटे, सुधीर