कोडामा, काउंट जेंटारो : (५ फेब्रुवारी १८५२–२३ जुलै १९०६). जपानचा सुप्रसिध्द सेनानी आणि मुत्सद्दी. प्राचीन सूओ प्रांत व सध्याचा यामागुचीचा भाग यातील एका गावी जन्म. जर्मनीत युध्दशास्त्राचा अभ्यास . १९०० मध्ये फॉर्मोसाचा राज्यपाल म्हणून नेमणूक. १९०४-०५ मध्ये रशिया-जपान युध्दात तो फील्ड मार्शल ओयामाचा चीफ ऑफ स्टाफ होता. त्यावेळी त्याने स्वतः आखून संचलित केलेल्या यशस्वी मँचुरियन मोहिमेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. संभाव्य सैन्यहानीची पर्वा न करता जिद्दीने दोन वर्षात हा लढा त्याने यशस्वी करून दाखविला. त्यानंतर त्याला सरसेनापती करण्यात आले परंतु लढाईच्या दगदगीने प्रकृती ढासळून टोकिओ येथे तो मरण पावला.

चाफेकर, शं. गं.