राव, जनरल के. व्ही. कृष्ण : (१६ जुलै १९२३ –). भारताचे माजी भूसेनाध्यक्ष. जन्म लुकुलम (आंध्र प्रदेश) येथे. वडिलांचे नाव के. एस्. नारायण राव, तर आईचे के. लक्ष्मी राव.

जनरल के. व्ही. कृष्ण राव

शिक्षण आंध्र विद्यापीठ व रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज, लंडन (पूर्वीचे इंपीरियल डिफेन्स कॉलेज) येथे झाले. ऑगस्ट १९४२ मध्ये ते लष्करात राजादिष्ट अधिकारी म्हणून दाखल झाले. लष्करी युद्धतंत्रातील त्यांचे प्रशिक्षण अमेरिका, कॅनडा, रशिया इ. देशांत झाले. दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९ – ४५) त्यांनी वायव्य सरहद्द आघाडी आणि ब्रह्मदेश येथे काम केले. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेच जम्मू आणि काश्मीरमधील घुसखोरांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांचा विवाह १९५३ मध्ये के. राधा राव यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.

 

भारतीय भूसेनेत राव यांनी आपल्या कर्तृत्वावर अनेक महत्त्वाची उच्चाधिकार पदे संपादन केली. राव यांनी राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनी, डेहराडून (१९४९ –५१) व संरक्षण सेवा अधिकारी महाविद्यालय, वेलिंग्टन-तमिळनाडू राज्य (१९६३ –६५) येथे अध्यापक म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी कर्नल, महार रेजिमेंट (१९६८) पायदळ विभाग प्रमुख (१९६९-७०) चीफ ऑफ स्टाफ वेस्टर्न कमांड (१९७२ –७४) कोअर कमांडर जम्मू (१९७४ –७८) इ. मोठी पदे सांभाळली. भारताचे उपभूसेनाध्यक्ष (१९७८) आणि भूसेनाध्यक्ष (१९८१ – ८३) म्हणून त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे.

बांगला देश युद्धातील (१९७१) पराक्रमाबद्दल भारत सरकारने त्यांना परम विशिष्ट सेवा पदक बहाल केले. आंध्र विद्यापीठानेही त्यांना सन्मान्य डी. लिट्. दिली. निवृत्तीनंतर त्यांची मणिपूर, नागालँड, त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

भारतीय भूसेनेच्या आधुनिकीकरण व पुनर्रचना यांसंबंधी नेमलेल्या तज्ञांच्या समितीचे ते काही काळ अध्यक्ष होते. बागकाम, गोल्फ, क्रिकेट व छायाचित्रण हे त्यांचे आवडते छंद आहेत.

लेखक : बोराटे, सुधीर