टोजो, हिडेकी : (३० डिसेंबर १८८४–२३ डिसेंबर १९४८). लेफ्टनंट जनरल आयव्ही नावानेही प्रसिद्ध. दुसऱ्या महायुद्धकाळातील जपानी पंतप्रधान व लष्करी नेता. टोकिओ येथे जन्म. लेफ्टनंट जनरल टोजी इकायो याचा मुलगा. १९०२ साली पायदळात प्रवेश. सैनिकी प्रबोधिनी व स्टाफ कॉलेजमध्ये उच्च शिक्षणानंतर १९१९ साली जर्मनीत जपानी राजदूताचा लष्करी अधिकारी म्हणून नियुक्ती. १९३७ साली चीनमध्ये ग्वांगटुंग या जपानी सेनाविभागाचा प्रमुख. १६ ऑक्टोबर १९४१ रोजी राजकुमार कोनोए याच्याऐवजी तो जपानचा पंतप्रधान झाला. आशिया खंडात व पॅसिफिक महासागरीय प्रदेशावर जपानला प्रभुत्व मिळवून देणे, हे त्याचे ध्येय होते. अमेरिकेच्या हवाई बेटावर असलेल्या पर्ल हार्बरवर यशस्वी हल्ला केल्यानंतर आशियात नव-अनुशासनपर्व स्थापण्याचे लष्करी कार्य त्याने सुरू केले व हिंदुस्थानच्या पूर्व सीमेपर्यत जपानी लष्करी सत्ता स्थापन केली परंतु दोस्तसेनेने व आरमाराने प्रतिचढाया सुरू केल्यावर जपानच्या पीछेहाटीस सुरुवात झाली. या पीछेहाटीस कारण म्हणून टोजोला राजीनामा देणे भाग पडले. १४ सप्टेंबर १९४५ रोजी जपानला शरणागती पत्करावी लागली. टोजोने हाराकिरीचा (आत्महत्येचा) प्रयत्न केला. १९४५ च्या अखेरीस युद्धगुन्हेगार म्हणून त्यास कैद करण्यात आले. आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायालयापुढे त्याच्या युद्धगुन्ह्यांविषयी चौकशी होऊन तो दोषी ठरला आणि त्यास फाशी देण्यात आले.

दीक्षित, हे. वि.