साहाय्यक सेना : (ऑग्झिलिअरी फोर्सेस). स्थायी सेनेला पूरक व आपत्कालीन साह्य करणारी सेना. देशाच्या सुरक्षिततेसाठी दोन प्रकारच्या यंत्रणांची गरज असते कारण सुरक्षिततेला बाहेरून होणाऱ्या आक्रमणांमुळे जितका धोका निर्माण होतो, तितकाच धोका नैसर्गिक आपत्ती (भूकंप, महापूर, अतिवृष्टी), अतिरेकी कारवाया, अंतर्गत बंडाळी आणि देशव्यापी संप अथवा धार्मिक दंगे यांपासूनही असतो. बाह्य शत्रूंपासून संरक्षण ही संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी असते तर अंतर्गत सुरक्षा ही गृहमंत्रालयाची जबाबदारी असते.

रोजचे जीवन सुरळीत चालावे आणि नागरिकांना संरक्षण मिळावे, म्हणून प्रत्येक राज्याच्या अखत्यारीत साधे व सशस्त्र पोलीस दल कार्यरत असते परंतु देशाच्या भू सीमा, जल सीमा व सरहद्दीवरची राज्ये यांची सुरक्षा ही अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या कक्षेत येते. त्यामुळे तेथे संरक्षक दले आणि निमलष्करी दले तैनात करावी लागतात. शांततेच्या काळात निमलष्करी अथवा सैनिकीसम संघटना (पॅरा मिलिटरी) दले सरहद्दीवर काम करीत असतात आणि युद्घाच्या प्रसंगी लष्कर ही जबाबदारी घेते व निमलष्करी फौजा अंतर्गत सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करतात.

सशस्त्र व निमसशस्त्र सैनिकांना शांततेच्या व लढाईच्या वेळी गुप्त बातम्या पुरविणारी व हेरगिरी करणारी तिसरीच एक यंत्रणा असते आणि तिचा एक कक्ष प्रत्येक राज्यात पोलिसांना मदत करतो.

शत्रूचा संपूर्ण पराभव व नायनाट, तसेच प्रजेची विनाशक प्रवृत्ती, आपत्तींपासून संरक्षण या दोन अगदी भिन्न गोष्टी असल्यामुळे सेनादले आणि निमलष्करी दले यांची रचना, त्यांची हत्यारे, त्यांच्यावरचे निर्बंध, कायदे-कानून भिन्न असणे, हे त्यांच्या कार्यकक्षेनुसार स्वाभाविकच आहे परंतु शेवटी देश हा एक घटक असल्यामुळे त्याचे अंतर्बाह्य संरक्षण हेच ध्येय ह्या दलांना डोळ्यापुढे ठेवावे लागते.

जमिनीवरून आक्रमण व अशांततेचे धोके जितके महत्त्वाचे, तितकेच जलमार्गावरून किनाऱ्यावर व वायुमार्गे कोठेही हे धोके जाणवतात. समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण, जलसंपत्ती, मासे, इंधन, खनिजे व बाहेरून होणारी तस्करी, मादक पदार्थांची जलमार्गे (वायुमार्गे व जमीनमार्गेसुद्घा) होणारी तस्करी, अतिरेकी संघटनांना युद्घसामग्री पुरविणे, अतिरेक्यांची घुसखोरी व त्यांची सुरक्षित सोडवणूक ह्या सर्व बाबी गंभीर होत. क्षेपणास्त्रे व आण्विक अस्त्रे अजून भारताच्या आसमंत देशात वापरण्यात आली नाहीत तरीही आधी सूचना मिळावी, म्हणून यंत्रणा कार्यरत आहे. ह्या सर्वांचा मेळ घालून समुच्चयाने विचार करण्याची जबाबदारी सरकारची असते. त्यात वेगवेगळे कप्पे करता येत नाहीत.

शाखा :  भारताच्या निमलष्करी दलात खालील दले प्रामुख्याने आढळतात : बॉर्डर सिक्युअरिटी फोर्स, सशस्त्र पोलिसांच्या तुकड्या, ईशान्य सरहद्दीवर आसाम रायफल्स, मणिपूरमध्ये मणिपूर रायफल्स, लडाख भागात इंडो-तिबेटियन बॉर्डर फोर्स, जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स, प्रत्येक राज्यात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस, इंडियन कोस्ट गार्ड, प्रादेशिक सेना, हवाई सुरक्षा, एअरपोर्ट सिक्युअरिटी, कस्टम, गुप्त पोलीस यंत्रणा.

जमिनीवर कार्यरत असलेल्या वर दिलेल्या सर्व दलांत काही गोष्टी एकसारख्या आहेत. स्वसंरक्षण व बाहेरच्या आणि अंतर्गत देशद्रोही कार्याला प्रतिबंध एवढेच कर्तव्य असल्यामुळे ह्या दलांची शस्त्रास्त्रे बंदूक, पिस्तुल, स्टेनगन इ. लहान स्वरूपाची असतात. उखळी तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रे, मशीनगन्स ह्यांची त्यांना गरज नसते. हवामान व भौगोलिक परिस्थित्यनुसार वाळवंटात उंट, टेहळणी बुरूज, वीज खेळवलेली तारेची कुंपणे, प्रकाश व झटके देणारी कुंपणे इ. आढळतात. ह्या यंत्रणा पोलिसयंत्रणा असल्यामुळे कमांडंट व असिस्टंट कमांडर हे कनिष्ठ हुद्दे व डी. वाय्. जी., आय्. जी. हे वरिष्ठ हुद्दे असतात. ह्यांचे पगार, भत्ते, बदल्या, निवृत्ती ह्या पोलीस खात्याच्या धर्तीवर असतात, तसेच रेशन, कँटिन-सामान, रजा वेगळ्या असतात. या दलामध्ये वेगवेगळ्या जातिधर्मांचे लोक असतात.  राज्यपोलीस दलांत त्या राज्यातील रहिवासी, आसाम रायफल्समध्ये गुरखा, गढवाली, कुमाऊँनी व आसामी, तर आय्‌टीबीएफ्‌मध्ये लडाखी, भोटिया काश्मिरी, तिबेटियन असतात.

राष्ट्रीय रायफल्स, इंडो-तिबेट बॉर्डर फोर्स, आसाम रायफल्स : राष्ट्रीय रायफल्स, आसाम व मणिपूर रायफल्स, आय्‌टीबीएफ्‌मध्ये काही सेनाधिकारी तीन-तीन वर्षांकरिता येतात. कमांडिंग ऑफिसर सेनादलाचे (आर्मीचे) असतात पण त्यांना साहाय्यक म्हणून असिस्टंट कमांडंट व कॅप्टन, मेजर दोन्हीही असतात. सिग्नल, इंजिनियर, वैद्यकीय सेवा आदी तुकड्यांत सैनिकी जवान व कनिष्ठ अधिकारीही असतात. त्यांना हत्यारे, दारूगोळा इत्यादींचा पुरवठा सैनिकी भांडारातून होतो. वाहने त्यांची स्वतःची असतात. आसाम रायफल्सच्या तुकड्या कायम ईशान्य भागातच असतात. त्यांचे रेंज नावाचे उपविभाग असतात. फौजेचे अधिकारी तीन वर्षे राहून परततात. तीच गोष्ट इंडो-तिबेटियन बॉर्डर फोर्स व मणिपूर रायफल्स आणि राष्ट्रीय रायफल्सची फक्त मिलिटरी जवान,जेसीओ व ऑफिसर अडीच ते तीन वर्षे राहून परत आपल्या रेजिमेंटला परततात. आसाम रायफल्सचे जवान बहुधा कुटुंबासमवेत राहतात. नेपाळी गुरख्यांना ईशान्येचा डोंगराळ भाग काही वेगळा वाटत नाही. कित्येक गुरखे परत नेपाळला न जाता निवृत्त होऊन बंगाल, आसाम, मणिपूरमध्ये राहिले आहेत. पूर्वी ईशान्य भाग नॉर्थ ईस्ट फ्राँटियर एजन्सी (नेफा) म्हणून ओळखला जाई. त्या काळी राजपत्रित अधिकारी व कर्मचारीवर्ग संरक्षणाकरिता आसाम रायफल्सवर अवलंबून असे. तेव्हा रस्ते नव्हते एका स्थळावरून दुसरीकडे जायचे म्हणजे आठदहा दिवस पायी चालावे लागे व तेथील लोक सामान डोक्यावरून वाहून नेत. पुढे दलाई लामांबरोबर तिबेटियन लोक घोडे, खेचरे, चवरी गाय वगैरे घेऊन आले. ते माल वाहून नेत. चार-पाच हजार मीटर उंचीवर खिंडीतून जावे लागे. ह्या भागात बर्फरेषा ३,३०० मी. वर आहे. (काश्मीरमध्ये १,६५० मी. वर आहे). नदी-नाल्यावर वेताची कडी गुंफून बांधलेले झुलते पूल व मोठ्या झाडाच्या ओंडक्यांना खाचा पाडून बनविलेल्या शिड्या रस्त्यात येत. त्यामुळे घोडे, खेचरे तेथेच सोडावी लागत.

बरेच तिबेटियन १९५४ च्या सुमारास भारतात आले. त्यांची एक सेना बनविली गेली व त्यांना हवाई छत्रीने (पॅराशूटने) उड्या मारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याकरिता डेहराडूनजवळ वेगळे केंद्र उभे केले गेले पण परत तिबेटमध्ये जायचा प्रश्नच उरला नाही. त्यामुळे त्यांचा उपयोग करता आला नाही. बांगला देशाच्या लढाईत मिझोराममध्ये एक तुकडी कार्यरत होती, आता ही सेना आय्‌टीबीएफ्‌मध्ये विलीन केली गेली आहे.

छत्रीधारी सैन्याची एक तुकडी खास काश्मीरकरिता तयार केली गेली. ती कायम काश्मीरमध्येच असे (एक अशी तुकडी कायम राजस्थानमध्ये वालुकामय प्रदेशात असे). ह्या कमांडो तुकड्या होत्या. पुढे राष्ट्रीय रायफल्सचा जन्म झाला. ह्या कायम काश्मीरमध्येच असतात.

साहाय्यक सेनेला आसपासच्या प्रदेशाची व लोकांची खोलवर माहिती पाहिजे, म्हणून त्या स्थायी स्वरूपाच्या असतात (त्याच्या उलट सेनेला कुठेही लढावे लागेल म्हणून कधी लेह, लडाख, कधी नागालँड, तर कधी बारमेर-जोधपूर व मधूनमधून पीस स्टेशन्स अशा सेनेच्या तुकड्या दर दोन-तीन वर्षांनी जागा बदलतात. संयुक्त राष्ट्रांच्या वतीने आफ्रिका व मध्यपूर्व देशांत कितीतरी सैन्य असते). काश्मीरमध्ये लेह, लडाखमध्ये वर्ष-दीडवर्ष, त्यानंतर ३,३०० मी. खाली काश्मीर खोऱ्यात आणि परत भारताच्या दुसऱ्या भागात पीस स्टेशन असते.


 प्रादेशिक सेना : (टेरिटोरिअल आर्मी–टीए) : प्रत्येक टीए बटालियनमध्ये तिचा प्रमुख, दुय्यम प्रमुख, अडज्यूटंट (मुख्याधिकारी), क्वार्टर मास्टर (भांडाराधिकारी), काही जेसीओ (नायब सुभेदार, सुभेदार मेजर) हे त्या त्या रेजिमेंटमधून आलेले कायमस्वरूपी (२-३ वर्षांकरिता) टीए बटालियनचा कणा अथवा सांगाडा असतात. त्यामुळे वर्षभर काम चालू राहते व बाकी अधिकारी आणि जवान हे प्रादेशिक सेनेने भरती केलेले हंगामी शिपाई असतात. ही माणसे कुठेतरी नोकरी करत असतात व आठवड्यांत एकदोन दिवस गणवेष घालून कवायत करायला येतात. त्यांना त्या दिवसाचा भत्ता मिळतो. काही दिवस सर्वांचे एकत्र प्रशिक्षण असते. ह्यातली बहुतेक मंडळी वयस्कर पण विविध क्षेत्रांत अनुभव असलेली जबाबदार असतात. निव्वळ देशसेवेचे व्रत घेतलेली परंतु काही कारणांमुळे लष्करात भरती न झालेली असतात. त्यांच्या भरतीची वयोमर्यादाही जास्त असते. काही निवडक अधिकाऱ्यांना काही खास कोर्स करण्याकरिता (कमी काळाच्या) पाठविले जाते. त्या काळात त्यांना त्यांच्या हुद्यांचे पूर्ण वेतन मिळते. कोर्स पूर्ण करून परत आल्यावर हे अधिकारी पुन्हा आपल्या नोकऱ्या करतात आणि शनिवार-रविवार कवायत करतात. ह्या मंडळींना कोणतीही कंपनी आडकाठी करू शकत नाही व नोकरीवरूनही या कारणामुळे काढू शकत नाही, असे कायदेशीर बंधन आहे.

दोन-तीन वर्षांतून एकदा एखादी बटालियन सुसज्ज (मोबीलाइज) केली जाते. तिचे संपूर्ण लष्करीकरण होऊन ती काश्मीर अथवा इतर भागांत वर्षा-दोनवर्षांकरिता पाठविली जाते. त्यावेळी त्यांना सेनादलाचे वेतन व इतर सर्व सुविधा मिळतात. स्वगृही जाऊन परत आल्यावर आपापल्या नोकऱ्यांवर ते रुजू होतात.

प्रादेशिक सेनेमुळे लढाऊ सैन्याची बचत होते. साध्या कामावर (वैष्णोदेवी यात्रेकरुंना संरक्षण, विमानतळाचे जमिनीवर संरक्षण, हत्यारे, दारूगोळा रेल्वेने पाठवताना संरक्षण इ. कामे) नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकारला यांची मदत मिळू शकते. टीए बटालियनमध्ये जड शस्त्रास्त्रे, उखळी तोफा, मशीनगन्स, चिलखती गाडयाविरोधी तोफा इ. ‘साहाय्यक कंपनी’ नसते. त्यांना आघाडीवर पाठवीत नाहीत, तर दळणवळण मार्गावरील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर (एल्ओसी) तैनात केले जाते. त्यामुळे लढाऊ सैन्य वाया जात नाही.

भारतीय तटरक्षक दल : (इंडियन कोस्ट गार्ड). ही भारतीय सेनादलाची सागरी साहाय्यक सेना आहे. या दलाचे पश्चिम, पूर्व, अंदमान व निकोबार बेटे आणि आग्नेय असे चार प्रादेशिक विभाग असून, त्यांची मुख्यालये अनुक्रमे मुंबई, चेन्नई, पोर्ट ब्लेअर आणि गांधीनगर या ठिकाणी आहेत. सांप्रत या दलाकडे सु. ९३ नौका आणि ४६ विमाने आहेत (२०११). [⟶ सागरी तटरक्षक दल, भारत].

पहा : प्रादेशिक सेना लोकसेना.

पित्रे, का. ग.