ब्लेनमची लढाई : १३ ऑगस्ट १७०४. फ्रान्स व त्याची मित्रराष्ट्रे आणि इंग्लंड व त्यांची दोस्तराष्ट्रे यांच्यात ही लढाई झाली. ब्लेनम हे गाव प. जर्मनीत म्यूनिकच्या वायव्येस सु. ७५ किमी. अंतरावर आहे. हखश्टेटची लढाई असाही तिचा निर्देश केला जातो. हखश्टेट हे गाव ब्लेनमच्या दक्षिणेस आहे. स्पेनच्या गादीच्या वारसाहक्कासाठी झालेल्या युद्धातील (१७०२ – १७१३) ही महत्वाची लढाई समजली जाते. फ्रेंच सेनापती माक्सिमीलिआन, तालार व मार्सिन हे होते. दोस्त राष्ट्रांचे (इंग्लंड वगैरे) सेनापती जॉन चर्चिल, ड्यूक ऑफ मार्लबरो व राजपुत्र यूजीन हे होते. फ्रेंच सैनिक ६०,००० व दोस्तराष्ट्रांचे सैनिक ५६,००० होते. दोन्ही सेनांकडे शस्त्रास्त्रे होती. १७०४ सालापूर्वीच्या पन्नास वर्षांत झालेल्या संघर्षामुळे फ्रान्स दुबळे झाले होते. फ्रेंच सैनिक व सेनापती यांचा युद्धविषयक अनुभवही बेताचाच होता. मार्लबरोने फ्रेंचांना हालचालीच्या लढ्यास भाग पाडले. ऑस्ट्रियाची राजधानी व्हीन काबीज करण्याच्या उद्देशाने फ्रेंच सेना डॅन्यूब नदीच्या काठावरील ब्लेनमपाशी १२ ऑगस्ट रोजी पोहोचली. दोस्त सेना उत्तरेकडून फ्रेंचांपुढे उभी राहली, दोन सेनांच्या मध्ये डॅन्यूबला मिळणारी नेबल नदी होती. १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता मार्लबरोने ब्लेनमपाशी फ्रेंच बगलेवर तुफानी हल्ला चढवून तिला दाबून धरले. नंतर नेबल ओलांडून मार्लबरोने फ्रेंच मध्यफळीवर धडाका देऊन ती मोडली, यूजीनने फ्रेंचांच्या डाव्या बगलेवर हल्ला केला. याच वेळी मार्लबरो व यूजीन यांची फ्रेंचांची कोंडी करण्याचा डाव टाकला. पण वाढत्या अंधःकारामुळे कोंडी होऊ शकली नाही. फ्रेंचांचा मोठा पराभव होऊन त्यांचे सु. ४०,००० व दोस्तांचे १२,००० सैनिक गारद वा जखमी झाले. फ्रेंच सत्तेला हादरा बसून इंग्लंडला अमेरिकेतील बऱ्याच फ्रेंच वसाहती तसेच स्पेनकडून जिब्रॉल्टर मिळाले. इंग्लंडचा व्यापार वाढून त्याची सागरी सत्ता निरंकुश झाली. या युद्धात डचांचीही फार हानी झाली आणि त्यांना हिंदुस्थानात इंग्रजांशी चढाओढ करणे अशक्य झाले.

संदर्भ : 1. Maurois, Andre, A History of France, London, 1961.

2. Montross, Lynn, War Through The Ages, New York, 1960.

दीक्षित, हे. वि.