तोफ व तोफखाना : लष्करातील एक महत्त्वाचा विभाग. तोफ म्हणजे अवजड बंदूक किंवा आत स्फोटक दारू भरून बार काढण्याचे यंत्र. तोफेतून अनेक प्रकारचे संहारक गोळे (क्षेप्य) उडविता येतात. भारतीय व्याख्येप्रमाणे तोफ हे यंत्रमुक्त अस्त्र ठरते. तोफ हे संहारक तसेच संरक्षक शस्त्रही आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ज्या तोफेचा व्यास (कॅलिबर) १५ मिमी. पेक्षा अधिक असे, तिला तोफ (गन/कॅनन) म्हणत. दुसऱ्या महायुद्धातच अग्निबाण (रॉकेट) वगैरेंचा उदय झाल्यामुळे तोफा व तोफांसारखीच काम देणारी शस्त्रे उदा., रॉकेटक्षेपक यांमधील फरक करणे कठीण होऊन बसले. पुढे तर भारी तोफांतून अण्वीय संहारशीर्षेही डागण्याची सोय झाली. ज्या सैन्यविभागात तोफा, भारी रॉकेट व अण्वीय क्षेपक इत्यादींना संघटित केले जाते आणि ज्यांच्या कार्यासाठी विशिष्ट आधिपत्य व नियंत्रणपद्धती असते, असा विभाग म्हणजे तोफखाना होय. तोफखान्यात अनेक उपविभाग असतात.

तोफ : इ. स. पू चौथ्या शतकात तटबंदीचा विध्वंस करण्यासाठी आणि तटबंदीच्या आतील लोकांवर मारा करण्यासाठी भारी धनुष्य (बॅलिस्टा) व गलोल यांचा उपयोग केला जाई. भारतीय आणि ग्रीक इतिहासात याविषयी पुष्कळ उल्लेख आहेत. हीच यंत्रे तोफांची पूर्वरूपे होत. स्फोटक दारूगोळ्याचा शोध इ. स.सातव्या–आठव्या शतकात प्रथम चीनमध्ये लागला. ताव्हेर्न्ये या फ्रेंच प्रवाशाच्या नोंदीप्रमाणे आसाममधून चीनमध्ये दारूगोळ्याचे ज्ञान गेले, असे दिसते. तत्कालीन चिनी बौद्ध प्रवाशाच्या वर्णनात असे उल्लेख आढळत नाहीत. अकराव्या–बाराव्या शतकात परकीयांच्या आक्रमणामुळे जे जाट, जिप्सी किंवा रोमानी युरोप खंडाकडे गेले, त्यांच्याकरवी तोफ आणि तोफदारू यूरोपात ज्ञात झाली असेही एक मत आहे.

अर्वाचीन काळातील शास्त्रीय प्रगतीमुळे तोफांच्या बनावटीत खूपच बदल झाले. विविध प्रकारचे तोफगोळे व त्यांनुरूप तोफांच्या नळ्या बनविल्या जातात. तोफगोळा व प्रक्षेपणास्त्र एकाच नळीतून उडविता येते. नळीचा व्यास साधारणपणे २० मिमी.च्यावर असतो. त्याचप्रमाणे तोफा व गाडे स्वयंचलित असण्यावर भर असून गोळामार आणि इतर कार्यांसाठी रडार व इलेक्ट्रॉनीय उपकरणांचा जास्त उपयोग करण्यात येतो. गोळे व प्रक्षेपणास्त्रे यांच्या स्फोट-नियंत्रणासाठी निरनिराळ्या इलेक्ट्रॉनीय नियंत्रित काडवाती (फ्यूझ) वापरतात. तोफ व अग्निबाण बसविलेले हेलिकॉप्टरही वापरात येते आहेत. अग्निबाण व प्रक्षेपणास्त्रे यांमुळे तोफांची मारकशक्ती तर वाढली आहेच, शिवाय त्यांना लवचिकतादेखील प्राप्त झाली आहे.

१०५ मिमी. रणांगणात हलकी तोफ : (१) रोधक, (२) नळी, (३) प्रत्यागतिशेषक, (४) नळीचा प्रर्श्वभाग (ब्रिच), (५) पल्ला लक्षवेधक उपकरण, (६) ओढदांडा (ट्रेल), (७) आकडी (हूक).

तोफरचना : नळी, बैठक, प्रत्यागतिशोषक–यंत्रणा, पल्ला व लक्ष्यवेध उपकरण आणि विवर असे तोफेचे पाच प्रमुख भाग असतात. नळीच्या तोंडाला रोधक बसलेला असतो. त्यामुळे तीव्र गतीच्या गोळ्याचा जो झटका बसतो, त्यास प्रतिरोध होतो. तसेच प्रत्यागतिशोषक–यंत्रणाही गोळ्याच्या झटक्यामुळे नळीच्या मागे येण्याच्या क्रियेवर नियंत्रण ठेवते, त्यामुळे तोफ मागे येत नाही. पल्ला व लक्ष्यवेध उपकरणामुळे नळी वरखाली व डाव्या–उजव्या बाजूस करून लक्ष्यावर नेम धरता येतो तर विवरामध्ये गोळा ठासला जाऊन त्यामुळे परिचालक स्फोटशक्ती वाया जात नाही आणि गोळे भराभर ठासता येतात.

तोफखाना : शत्रूचा प्रदेश पादाक्रांत करीत जाणाऱ्या भूसेनेला तोफखान्याची विशेष गरज असते. अर्थात आधुनिक शस्त्रास्त्रांची वाढती संहारक्षमता आणि संरक्षणक्षमता यांना अनुरूप ठरणारी प्रगती तोफखान्यातही झालेली आढळते. तोफखाना हा कोणत्याही ऋतुकालात व कोठल्याही स्थळी नेऊन वापरता येतो. बिनचूक लक्ष्यवेधासाठी, ‘मॅप ग्रिड कोऑर्डिनेशन’ पद्धतीच्या आधारे तोफांचे स्थान व लक्ष्य यांचा संबंध झटपट निश्चित करता येतो. या कामी रडारचेही साहाय्य घेतले जाते. त्यामुळे आकस्मित गोळामार करून शत्रूला चकित करता येते. पारंपरिक व अण्वीय तोफा आणि अग्निबाण यांच्या संयुक्त माऱ्यामुळे रणगाडे आणि विमाने यांच्या आक्रमणाला पायबंद घालता येतो. तोफखान्याला पुढील प्रकारची कामगिरी करावी लागते : (१) शत्रूच्या संरक्षक व आक्रमक क्षमतेला निकामी करणे (२) स्वपक्षीय रणगाडे व इतर लढाऊ सैन्य आक्रमण करीत असताना व त्यानंतर गोळामार करून शत्रूंचे रणगाडे, विमाने व सैन्य यांच्या हालचाली मोडून काढणे आणि (३) शत्रूच्या तोफखान्यांचा विध्वंस करणे. सुरुंगक्षेत्रावर व इतर अडथळ्यांवर मारा करून, स्वसैन्याचे संचारक्षेत्र निर्विघ्न करणे.

१०५ मिमी. खेचरगामी पहाडी तोफ

भारतीय तोफखाना : कर्नाटकातील अडोणी येथील वेढ्यात बहमनी सुलतानाने १३६८ साली प्रथमच तोफा वापरल्याचे दिसते. पंधराव्या शतकाअखेर गुजरातच्या मुहंमदाने तोफांचा उपयोग केला होता. बरीदशहाने (१५४२–८०) बीदरच्या दुर्गात तोफा बसविल्या होत्या.

दक्षिण भारतातच प्रथम तोफा येण्याचे कारण म्हणजे तेथील तत्कालीन मुस्लिम सुलतानांचा तुर्की व इराणी राज्यकर्त्यांशी आलेला संबंध. दक्षिण तोफखान्यात तुर्की तोफांचाच भरणा असे. पोर्तुगीजांचा संबंधही प्रथम दक्षिणी राजांशीच आला. उत्तर हिंदुस्थानात बाबराच्या अगोदर काश्मीरात मुसलमानी राजांनी तोफा वापरल्या असाव्यात. बाबराच्या आक्रमणामुळे उत्तर हिंदुस्थानात तोफखाना खऱ्या अर्थाने प्रचारात आला. अकबराने यूरोपियनांच्या मदतीने तोफेत बऱ्याच सुधारणा केल्या. त्याचा रिकबीचा तोफखाना प्रसिद्ध आहे. मोगली तोफखान्यात हिंदूंची भरती होत नसे. तोफखाना–सैनिकांना इतर सैनिकांपेक्षा पगार जादा मिळे. बैल किंवा हत्तीच्या गाड्यांतून तोफा वाहून नेल्या जात. लहानसहान तोफा उंटावर किंवा हत्तीवर बांधून त्यांचा फिरता तोफखाना बनवीत. त्यास सुतरनाल आणि गजनाल म्हणत. तोफगाडे ओढण्यास किमान २५० बैल लागत. दिवसाला ५ ते ६ किमी. चाल होई. तोफगोळे १५ ते ६० किग्रॅ. वजनाचे दगडी किंवा भरीव लोखंडी असत. गोळामारीचा वेग फारच कमी (दिवसाला ६ ते ७) इतपत असे. बीदर येथील तोप–इ–इलाही (१५७२), लाहोरची झमझामा (१७५७) इ. तोफा जतन केलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी पोर्तुगीज–इंग्रजांकडून तोफा विकत घेई. राजापूर (कोकण) येथे त्याने तोफांचा कारखाना काढला होता. पेशवाईत अंबेगवाण, पुणे इ. ठिकाणी तोफा व गोळे बनविण्याचे कारखाने होते. त्यांचे मुख्य सरदार पानसे होते. पेशवाई तोफांचे काही नमुने पुणे येथील हवेली तालुक्याच्या कार्यालयाच्या दारापाशी ठेवलेले आहेत. भारतीय तोफा अवजड असल्यामुळे सैन्याच्या हालचाली जलद होत नसत. रणांगणावरही त्यांची कामगिरी असमाधानकारक ठरे. गोलंदाजी निकृष्ट होती. हलक्या तोफांमुळे इंग्रजांनी भारतीयांवर वर्चस्व मिळविले. इंग्रजांचा घोडतोफखाना नेहमीच वरचढ ठरला. याला अपवाद म्हणजे टिपूचा व शिखांचा तोफखाना होय. शिखांचा तोफखाना जवळजवळ इंग्रजांच्या तोडीचा होता. सावनूरच्या लढाईत टिपूच्या तोफखान्याने मराठ्यांची फार हानी केली होती. प्रगतीच्या दृष्टीने हैदर अली व टिपू यांचा अग्निबाणाच्या स्वरूपाचा तोफखाना उल्लेखनीय आहे. टिपूच्या या अग्निबाणीय स्वरूपाच्या तोफखान्याचा अनुभव लक्षात घेऊन पाश्चिमात्यांनी अग्निबाण बनविण्यास सुरुवात केली. टिपूने तोफा ओढण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या बैलांची नवीन पैदास सुरू केली. वॉटर्लूच्या लढाईत (१८१५) याच कर्नाटकी बैलांची आठवण वेलिंग्टनला पदोपदी झाली. महाराज रणजितसिंगाने सु. २·२, २·८ व ५·४ किग्रॅ. (५, ६ व १२ पौंडी) गोळे फेकणाऱ्या तोफा तयार केल्या. त्याचा घोडतोफखानाही उत्तम होता. धातुशास्त्र, प्राक्षेपिकी, ओतीवकाम या विषयांतील अपुरे ज्ञान व गोलंदाजीचे मागासलेले तंत्र यांमुळे तोफखाना हाताळण्यात भारतीय मागे पडले.

अर्वाचीन भारतीय तोफखान्याची परंपरा १७४८ पासून सुरू होते. ईस्ट इंडिया कंपनीने १७६८ साली दायनापूर (बिहार) येथे पितळी तोफा बनविण्याचा कारखाना काढला. कासीपूर (कलकत्ता) येथे १८०३ मध्ये आणखी एक कारखाना सुरू झाला. १८०२ व १८९४ साली अनुक्रमे श्रीरंगपटम व जबलपूर येथे तोफगाडे तयार करण्याचे कारखाने उभारले गेले. तेथे सु. १·३, २·८, ४, ५·४, ८·२, १०·९ व १४·८ किग्रॅ. वजनाचे (३, ६, ९, १२, १८, २४ व ३२ पौंडी) गोळे फेकणाऱ्या तोफा तयार होत असत. तोफांचे नमुने इंग्लंडमधून येत. तोफांच्या तोंडातून गोळे ठासले जात. १८५६ पर्यंत हिंदी सैनिकांचे तोफखाने होते परंतु १८५७ नंतर हिंदी सैनिकांना तोफखाना बंद झाला. याला कारण १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात हिंदी गोलंदाजाने स्वतंत्रपणे कौशल्याने इंग्रजांविरुद्ध तोफा वापरल्या हे होते. पहाडी तोफखान्यात मात्र हिंदी गोलंदाज असत. १९३६ सालापासून तोफखान्याच्या भारतीयकरणास प्रारंभ झाला. आता भारतीय तोफखान्यात सर्व तऱ्हेच्या आधुनिक तोफा व त्यांस लागणारी साहाय्यक गणकयंत्रे, रडार, संदेश उपकरण इ. आहेत. तथापि हेलिकॉप्टर तोफखाना त्यात नाही.

यूरोपीय तोफ, (१५ वे शतक).

जागतिक आढावा : यूरोपात तोफ व तोफांच्या दारूगोळ्याचे ज्ञान तेराव्या शतकात पोहोचले. पंधराव्या शतकाच्या मध्यात तोफदारूसाठी लाकडी कोळसा, गंधक व सोरा यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करण्याची प्रक्रिया निश्चित झाली. १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपाल जिंकताना तुर्कांनी १०० तटफोड्या तोफा वापरल्या होत्या. तत्पूर्वी १३४६ मध्ये क्रेसीच्या लढाईत इंग्रजांनी तोफा वापरल्या असे म्हणतात. चौदाव्या शतकाअखेर यूरोपात लोखंड वितळविण्याचे आणि ओतण्याचे तंत्र साध्य झाल्यामुळे लोखंडी तोफा तयार करणे शक्य झाले. भारी तोफा लोखंडाच्या बनवीत. नळीच्या भोवती घडीव लोखंडी पट्‌ट्यांचे आवरण घालीत. भारी तोफांत नळीच्या पिछाडीत गोळे घालीत. इतर तोफांच्या तोंडातून गोळे ठासले जात. तोफा मातीच्या वा लाकडाच्या धमधम्यावर ठेवण्यात येत. तोफगोळे फेकण्याचा वेग फारच कमी असे. अर्धा ते एक तासाच्या कालांतराने गोळे सोडले जात. याला कारण दारूचा स्फोट झाल्यावर त्या धुरामुळे काही दिसत नसे हे होय, शिवाय स्फोटकाच्या धक्क्यामुळे तोफ जागेवरून मागे जाई. पंधराव्या शतकाअखेर फ्रान्समध्ये तोफा चाकावर बसवून त्यांची हालचाल जलद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. १५५०–१६०० या कालात सु. ०·४५ ते ४२·७ किग्रॅ. वजनाच्या (१ ते ९४ पौंडी ) गोळा फेकणाऱ्या अकरा प्रकारच्या तोफा रूढ असल्याचे दिसते. सोळाव्या शतकात इटलीचा तार्ताल्या याने प्रक्षेपिकी शास्त्राचा पाया रोवला, त्यांच्या ‘टँजंट’ या उपकरणामुळे लक्ष्यावर तोफा रोखणे सोपे झाले. डच शास्त्रज्ञांनी गोळाचालक दारूचा स्फोट होत असतानाच गोळ्यांतील स्फोटदारूची काडवात पेटविण्याचा शोध लावला. त्यामुळे गोलंदाजांच्या जिवास संभवणारा धोका कमी झाला. १५८८ सालच्या स्पेन व इंग्लंड यांमधील युद्धांत इंग्रजांच्या हलक्या, पण लांब पल्ल्याच्या तोफांनी स्पेनच्या भारी पण लघुपल्ल्याच्या तोफांवर मात केली. सतराव्या शतकात स्वीडनचा राजा आडॉल्फस याने कातडी आवरणाच्या हलक्या, सुटसुटीत व कार्यक्षम तोफा निर्माण केल्या. १७४२ मध्ये बेंजामिन रॉबिन्सने गोलंदाजीची तत्त्वे (प्रिन्सिपल्स ऑफ गनरी) प्रसिद्ध करून तोफेच्या पार्श्वभागात गोळे ठासण्याची पद्धत सुचविली. त्याच्या प्रक्षेपिकी लंबकाचा (बॅलिस्टिक पेंड्युलम) शोधामुळे क्षेप्याच्या गतीचे मापन करणे सोपे झाले. तोफनळी आतून गुळगुळीत न ठेवता मागील टोकापासून तोंडापर्यंत खाचा ठेवून गोळे उडविले, तर गोलंदाजी अचूक होईल असाही एक सिद्धांत त्याने मांडला. अठराव्या शतकात गोळ्याच्या पोटात लहान गोळ्या ठेवून अधिक हनिकारक असा श्‍रॅप्‌नेल गोळा वापरात आला. एकंदरीत अठराव्या शतकाअखेर तोफांत आणि तोफखान्यात महत्त्वाचे बदल झाले. एकोणिसाव्या शतकात फ्रेंच राज्यक्रांतीमुळे झालेल्या लढायांत नेपोलियनने प्रचंड तोफखाना वापरून एक नवीनच प्रथा सुरू केली.

७६ मिमी. व्यासाची तोफ

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून तोफांत लक्षणीय प्रगती झाली. बिनधुराची तोफदारू, जर्मनीतील क्रप कंपनीतर्फे होणारे तोफांचे यांत्रिक उत्पादन, पोलादी खाचायुक्त तोफा व त्यांच्या पार्श्वभागात गोळा ठासण्याची पद्धती, परिचालक दारू इ. प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या. तसेच सेनेपुढे तोफा न ठेवता तोफखान्याने पिछाडीस राहून तेथून गोळीमार करण्याचे तंत्र प्रचारात आले. सु. ८·२ किग्रॅ. (१८ पौंडी) वजनाच्या व सु. १०·१६, १२·७० आणि २०·३२ सेंमी. (४·५, ५·९ व ८ इंची) क्षेपकव्यासाच्या तोफा रणांगणावर आल्या. गोळामारीचा धक्का जिरविणाऱ्या यांत्रिक क्लृप्त्या योजण्यात आल्या.

पहिले महायुद्ध तोफखान्याच्या प्रचंड प्रमाणावरील वापरासाठी प्रसिद्ध आहे. ईप्रच्या तिसऱ्या लढाईत (१९१७) दोन मीटरवर गोळे टाकण्यासाठी एक तोफ याप्रमाणे ३,००० तोफा व ४३·५ लाख गोळे वापरण्यात आले. खंदकांच्या उभारणीमुळे प्रत्येक खंदकफळी तोडण्यासाठी भारी व हलक्या तोफा वापराव्या लागल्या. तोफगाडे घोड्यांनी ओढले जात. फुगे व विमाने यांच्या साहाय्याने लक्ष्याची टेहळणी होत असे. नकाशावरून गोळामारीची योजना तयार केली जाई. पायदळ पुढे कूच करीत असता सबंध आघाडीवर गोळामार (बॅरेज फायर) केला जाई. शत्रूला भिडण्याच्या जरा अगोदर ते बंद केला जाई परंतु ज्या क्षणी पायदळास तोफांचे संरक्षण मिळावयास पाहिजे त्या क्षणी ते मिळत नसे. त्यामुळे पायदळाची हानी फार होई. यासाठी पायदळा–घोडदळाबरोबर तोफा ठेवणे आवश्यक होते. या महायुद्धात सु. ५·९, ६·८, ८·२, २७·२ किग्रॅ. (१३, १५, १८, ६० पौंडी) वजनाचे गोळे उडविणाऱ्या व सु. १०·१६ ते २२·८६ सेंमी. (४·७ ते ९·२ इंची) व्यासाच्या अशा नऊ प्रकारच्या तोफा वापरात होत्या. धुराचे गोळेही वापरण्यात येत. जर्मनांची २१ सेंमी. व्यासाची व १२० किमी. अंतरावर गोळा फेकणारी तोफ त्याचप्रमाणे आगगाडीच्या डब्यावरून मारा करण्यासाठी उखळी तोफांचे पुनरागमन झाले.

एल् ७०/४० मिमी. विमानविरोधी तोफा व रडार

दुसऱ्या महायुद्धात रणगाड्यांनी वर्चस्व गाजविले परंतु तोफखाना वगैरेंच्या साहाय्याशिवाय रणगाडे यशस्वी होणे अशक्य होते. या महायुद्धात रशियाने ५७ मिमी. ते २०३ मिमी. व्यासाच्या लहानमोठ्या तोफा प्रचंड प्रमाणात रणांगणावर वापरल्या. पायदळाबरोबर त्याचप्रमाणे पिछाडीस राहून कोणत्याही क्षणी व कोणत्याही जागी गोळामार करू शकणारे तोफखाने वापरले गेले. तोफखान्यांचे गाडे आधुनिक स्वरूपाचे करण्यात आले. तोफांना रणगाड्यांच्या सांगाड्यावर बसविल्यामुळे आघाडीवर राहून अडथळे तोडणे सोपे झाले. रणक्षेत्रीय साहाय्यक, भारी तोफखाना, रणगाडाध्वंसक, विमानविरोधी, प्रहारक व अग्निबाणयुक्त असे तोफखान्याचे सहा भाग झाले. त्यांची कामे पुढीलप्रमाणे होती. रणक्षेत्रीय साहाय्यक तोफखाना : पिछाडीस राहून शत्रुआघाडीवर इच्छित क्षेत्रावर किंवा बिंदूवर प्रचंड संख्येने गोळामार करून पायदळ, रणगाडे यांच्या हालचालींना संरक्षण देणे. याकरिता ७५ मिमी. ते २०३ मिमी. व्यासाच्या सु. ११·३ किग्रॅ. ते ९०·८ किग्रॅ. (२५ ते २०० पौंडी) च्या गोळा फेकणाऱ्या हलक्या व मध्यम तोफा होत्या. यांचा गोळामार सरळ असून पल्ला १४ किमी. पर्यंत असे भारी तोफखाना : शत्रूच्या पिछाडी क्षेत्रावर मारा करण्यासाठी याचा वापर होई. रणगाडे व त्याबरोबरच्या सैन्याने शत्रुफळी फोडून पुढे जाण्यास या तोफखान्याचे त्यांना साहाय्य मिळे. यातील तोफांचा मारा वक्र असे. रणगाडाध्वंसक : यात ५७ ते १०५ मिमी. च्या तोफा होत्या.त्यांच्याकरिता ट्रॅक्टर किंवा तत्सम वाहने होती. जर्मनांची ८८ मिमी. व रशियाची ७६ मिमी. या तोफा सर्वोत्कृष्ट ठरल्या. त्यांची क्षेपणगती अत्यंत वेगवान असते विमानविरोधी तोफखाना : या स्थायी आणि वाहनगामी सु. ७·६२ सेंमी. ते ८·१६ सेंमी. (३ ते ४·७ इंची) च्या तोफा आपले गोळे १५ किमी. उंचीवरील विमानावर डागू शकत प्रहारक तोफखाना : या तोफांना (असॉल्ट) अडथळे तोडक असेही म्हणतात. या तोफा प्रत्यक्ष हल्ला करणारे पायदळ व रणगाडे यांबरोबर राहून त्यांच्या मार्गात येणारे शत्रूचे अडथळे, गुटिकास्थाने वगैरेंचा विध्वंस करीत. रणगाड्यांचाही विध्वंस करण्यास त्यांचा उपयोग होतो. या तोफा रणगाड्यांच्या सांगाड्यावर बसविल्या जातात अग्निबाणयुक्त तोफखाना : अठराव्या शतकानंतर अग्निबाणांचा उपयोग परत जर्मनांनी व रशियनांनी सुरू केला. यांचा मारा अचूक नसे परंतु अग्निबाणातील महास्फोटकामुळे विस्तीर्ण क्षेत्राचा सरसकट नाश करणे सोपे होई. यांचा आवाज व अगणित संहारक्षमता यांमुळे सैनिकांचा धीर खचून जाई. त्याला ‘कॅट्युशा’ किंवा ‘स्टॅलिन ऑर्गन’ असे अभिधान जर्मनांनी दिले होते.

२०० मिमी. तोफ

तोफांच्या आवाजावरून व स्फोटप्रकाश यांचा वेध घेऊन तोफांचा ठावठिकाणा निश्चित करण्याचे तंत्र प्रगत होत आले आहे. गोळामारनियंत्रण व शत्रूची हालचाल आणि लक्ष्ये टिपण्यासाठी तोफखान्याची हवाई निरीक्षक दले असतात. विमानातूनही तोफा डागण्याचे प्रयत्न होतात. विशिष्ट कार्यासाठी नवीन प्रकारचे तोफगोळे तयार करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धाअखेर ॲटम बाँबचा वापर झाल्यामुळे युद्धक्षेत्र व शस्त्रास्त्रे यांत बदल होण्यास प्रारंभ झाला. उखळी तोफखाना : या तोफांच्या नळ्या आखूड असून त्या आतून गुळगुळीत असतात. १०२ ते २०८ मिमी. इतका त्यांचा क्षेपकव्यास असतो. तसेच गोळामार अण्वस्त्रीय असल्यामुळे टेकड्या वगैरे अडथळ्यांच्या पिछाडीवर मारा करता येतो. यांचा पल्ला इतर तोफांच्या मानाने फार कमी असतो. उखळी तोफा साध्या सुटसुटीत, हलक्या व गोलंदाजीस सोप्या असतात. गोळामार अचूक नसतो. म्हणून क्षेत्रसंहारास उपयुक्त असतात. गनिमी युद्धतंत्रात यांचा फार उपयोग होतो. पायदळास यांचे साहाय्य असते. पहाडी तोफखाना : यांचे यांत्रिक भाग वेगवेगळे करता व जोडता येतात. वाहतूक खेचरांवरून केली जाते. यांचा मारा वक्री असतो. तोफांचा क्षेपकव्यास १०५ मिमी. असतो. अण्वीय तोफखाना : हा तोफखान्याचा आणखी एक उपप्रकार असून याची भर नव्यानेच पडली आहे. या तोफखान्याच्या तोफांतून अण्वीय संहार शीर्षे फेकली जातात. अशा तोफांचा समावेश भारी तोफखान्यात केला जातो. सध्या तरी या तोफांचा क्षेपकव्यास २० सेंमी. पेक्षा कमी नसून त्यांचा पल्ला १५ किमी. पर्यंत असतो. व २८ सेंमी. अण्वीय तोफेच्या एका अण्वीय गोळ्याचा स्फोट ३५,००० म्हणजे १०५ मिमी. तोफांच्या स्फोटाइतका प्रचंड असतो, असे म्हणतात. त्यांचा उपयोग सुरुंगक्षेत्रे, पूल, मोर्चे, सैन्यसमुदाय यांचा निःपात करण्याकडे केला जाण्याची शक्यता आहे. या तोफांची गोळामारक्षमता अचूक असून त्यांचे वजन १५ ते ५० टनांइतके असते.

अण्वीय शस्त्रास्त्रांमुळे युद्धाचे स्वरूप आघाडीबद्ध राहिले नसून विस्तारित क्षेत्रामध्ये व विशिष्ट प्रदेशासाठी शीघ्र लढाया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शत्रूच्या पिछाडीवर लक्ष केंद्रित होणार असल्यामुळे दीर्घ पल्ल्याची अस्त्रे उपयोगात आणावी लागतील व म्हणून पारंपरिक तोफखाना आणि अग्निबाण यांचा वायुसेनेबरोबरही वापर होण्याचा संभव आहे.

संदर्भ : 1. Batchelor, J. Hogg, I. Artillery, London, 1972.

2. Directorate of Artillery, Army, Headquarters, India History of the Regiment of Artillery India, 1972.

3. Smith, B. Gunners at War, London.

दीक्षित, हे. वि.