टी. एन्. रैनारैना, तापीश्वर नारायण : (२१ ऑगस्ट १९२१–१९ मे १९८०). भारताचे माजी भूसेना प्रमुख (१९७५-७९). जन्म जम्मू येथे एका सुविद्य कुटुंबात. जनरल रैना पंजाब विद्यापीठाचे पदवीधर होते. नंतर त्यांनी हिंदुस्थानातील सैनिकी दलात प्रवेश केला. लष्करात त्यांची युद्धकालीन राजादिष्ट अधिकारी (इमर्जन्सी कमिशन्ड ऑफिसर) म्हणून नेमणूक झाल्यावर ते चौदाव्या कुमाऊँ पायदळ पलटणीत रुजू झाले. दुसऱ्या महायुद्धात आग्नेय आणि मध्य आशियातील आघाड्यांवरील लढायांत त्यांनी भाग घेतला. मलायातील युद्धातच त्यांना आपला एक डोळा गमवावा लागला. जम्मू व काश्मीरमधील सैनिकी कारवाईतही (१९४८) त्यांनी भाग घेतला होता. १९५७-५९ या  काळात त्यांची लेफ्टनंट कर्नल या पदावर नेमणूक झाली.  

भारत-चीन संघर्षात (१९६२) रैना यांच्याकडे लडाख सीमा प्रदेशाच्या संरक्षणाचे काम सोपविण्यात आले. लडाखमधील चुशूल व त्याच्या आसपासचे क्षेत्र हे चिनी आक्रमण परतविण्याच्या दृष्टीने मर्मक्षेत्र होते. चीनचे वरिष्ठ सेनाबल लक्षात घेऊन रैना यांनी समयसूचकता दाखविली आणि माघारतंत्र अवलंबिले व आपल्या सैन्याची निष्कारण होणारी हानी टाळली. त्यांच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना महावीरचक्र प्रदान केले.  

पुढे रैना यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सैनिकी महाविद्यालयात संरक्षणविषयक सर्वोच्च शिक्षणक्रम पुरा केला (१९६४). १९६६ मध्ये त्यांनी पायदळात एका तुकडीचे ब्रिगेडियर जनरल म्हणून अल्पकाळ काम केले. त्याच वर्षी मेजर जनरल म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. सप्टेंबर १९७० मध्ये त्यांची भारतीय भूसेना मुख्यालयात डेप्युटी ॲड्‌ज्युटन्ट जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळी (१९७१) त्यांनी तत्कालीन पूर्व पाकिस्तानात (विद्यमान बांगला देशात) दुसऱ्या भूसेना तुकडीचे नेतृत्व केले. त्यावेळी ते लेफ्टनंट जनरल या पदावर होते. जेसोरकडून येणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या शिरकावास पायबंद घालणे छलना व खुलना या शहरांवर ताबा मिळविणे व महत्त्वाचा हार्डिंज पूल काबीज करणे आणि बारिसालपर्यंत सैन्यदलाने धडक मारणे, अशी कामगिरी त्यांच्यावर सोपविलेली होती. रैनांच्या विरुद्ध पूर्व पाकिस्तानचे सेनापती जनरल नियाझी हे होते. या युद्धमोहिमेत रैनांची कामगिरी अत्यंत यशस्वी ठरली. डाक्का काबीज करण्याचा त्यांना मान मिळाला. या मोहिमेत भारताच्या दुसऱ्या कोअरला ३६७ जवान व अधिकारी तसेच १९ रणगाडे गमवावे लागले. पाकिस्तानचे सु. ६०० ते ७०० जवान आणि अधिकारी ठार झाले. १९७३ मध्ये भारतीय भूसेनेच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यानंतर १९७५ मध्ये जनरल ह्या पदावर त्यांची भूसेनाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. ५ फेब्रुवारी १९७९ रोजी ते या पदावरून निवृत्त झाले. त्याच वर्षी त्यांना पद्मभूषण हा किताब देण्यात आला. निवृत्तीनंतर भारत सरकारने त्यांची कॅनडामध्ये उच्चायुक्त म्हणून नेमणूक केली. या पदावर असतानाच मेंदूतील रक्तस्त्रावाने त्यांचे ओटावा येथे निधन झाले. 

बोराटे, सुधीर दीक्षित, हे. वि.