ट्रेंचर्ड, ह्यू माँटेग्यू : (३ फेब्रुवारी १८७३–१० फेब्रुवारी १९५६). ब्रिटिश वायुसेनाध्यक्ष व ब्रिटिशवायुसेनेचे जनक. वडिलांचे नाव माँटेग्यू. इंग्लंडमध्ये समरसेट प्रांतातील टाँटन येथे जन्म. १८९३ साली भूसेनेत प्रवेश. दक्षिण आफ्रिका व नायजेरियातील युद्धात भाग व नंतर विमानोड्डाणाचे शिक्षण. पहिल्या महायुद्धात ब्रिगेडिअरच्या हुद्यावर असताना, भूसेनेच्या वायुशाखेचे मुख्याधिपती, वायुसेनाध्यक्ष, स्वतंत्र बाँबर दलाचे प्रमुख आणि दोस्त सेनेच्या बाँबर दलाचे नियोजक म्हणून त्यांनी लष्करी कार्ये केली. ही कामे करताना भूसेनेच्या साहाय्यासाठी लढाऊ विमानांची कर्तव्ये, छायाचित्रे, टेहळणी व बाँबर यांचे कार्य आणि त्यांविषयीचे नवे सिद्धांत त्यांनी मांडले. तसेच विमानांचे प्रकार व वर्गवारी करून वायुसेनेची स्कॉड्रनमध्ये संरचना व प्रमाणीकरणही केले. वायुसेना हे आघातदल मानून त्याच्या मदतीने मोठ्या संख्येने शत्रूला हैराण करणे व त्याचे मनोधैर्य खच्ची करणे या तंत्राचा पुरस्कार त्यांनी केला. तसेच सतत हल्ला करणे म्हणजेच संरक्षण हे तत्त्वही त्यांनी घोषित केले. १९२९ पर्यंत ते वायुसेनाध्यक्ष होते. ब्रिटिश वायुसेनेचे जनक या नात्याने ते सुप्रसिद्ध आहेत. निवृत्त झाल्यावर ते लंडन येथे पोलीस आयुक्त (१९३१–३५) होते. पोलीस दलाचेही त्यांनी शास्त्रीय पद्धतीने पुनर्संघटन केले. ज्ञानविज्ञानावर त्यांचा विशेष भर असे. क्रॅनवेल व अँडोव्हर येथे त्यांनी वायुसेनेची अनुक्रमे स्टाफ व छात्र विद्यालये स्थापन केली. या त्यांच्या बहुमोल कार्याचा गौरव म्हणून त्यांस बॅरोनेट, बॅरन व व्हायकाउंट हे राजकिताब देण्यात आले. त्यांनी वायुसेनेविषयी काही निबंधही लिहिले आहेत.

दीक्षित. हे. वि.