टेहळणी, सैनिकी : शत्रूसंबंधीची माहिती मिळविण्याची पद्धत. टेहळणीमध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून छायाचित्रे घेऊन, इलेक्ट्रॉनीय उपकरणे वापरून अथवा उपलब्ध साधनांद्वारे शत्रू, रणांगण वा युद्धाशी संबंधित तसेच युद्धाला उपयुक्त अशा कोणत्याही बाबींसंबंधीची माहिती मिळविण्यात येते. टेहळणी हे गुप्तवार्तासंकलनाचे एक अंग असून संनिरीक्षण (सरव्हायलन्स) हे टेहळणी-कार्याचा एक घटक आहे. टेहळणी उघड रीत्या करता येते, तर हेरगिरी ही अत्यंत गुप्तपणे केली जाते. टेहळणी-सैनिक व पथके यांना टेहळणीचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच विशिष्ट प्रकारच्या टेहळणीस व संनिरीक्षणास उपयोगी पडतील अशी खास बनावटीची उपकरणे पुरविली जातात. सर्वसाधारणपणे सैनिकही टेहळणीला उपयुक्त असतात. आधुनिक युद्धतंत्रातील युद्धाची गतिमानता व रणांगणावरील परिस्थितीत होणारे झपाट्याचे बदल यांमुळे युद्धविषयक डावपेच-टेहळणीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शांततेच्या काळातही टेहळणीचा कार्यक्रम चालू असतो.

शत्रूच्या क्षेत्रात संपर्क साधून तो टिकविणे, विशेषतः त्याच्या संरक्षणक्षेत्राच्या चहुबाजूंनी टेहळणी करणे या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. टेहळणीचा कार्यक्रम शांततेच्या काळातही चालू असतो. टेहळणीचे पुढीलप्रमाणे पाच प्रकार पडतात ते असे : भूपृष्ठ, वायू, सागरी, इलेक्ट्रॉनीय आणि हवामान व वातावरण.

भूपृष्ठीय टेहळणी

भूपृष्ठीय टेहळणी : शांतताकाळात तसेच युद्धपूर्व व युद्धकाळात लष्करी संरक्षण-संरचना, हालचाली, आधिपत्य व नियंत्रण केंद्रे, रडार व क्षेपणकेंद्रे आणि मोर्चे वगैरेंविषयीची माहिती गस्ती तुकड्या, कमांडो, असंतुष्ट व्यक्ती, युद्धकैदी यांच्याकडून मिळविली जाते. विमाने, हेलिकॉप्टर आणि कृत्रिम उपग्रह यांचाही या कामी उपयोग केला जातो. डिसेंबर १९७३ मध्ये अरब-इझ्राएल यांच्यामधील ‘योम कोपूर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या युद्धात रशियाने कृत्रिम उपग्रहाद्वारे इझ्राएली सैन्याची माहिती मिळविली होती. छत्रीधारी सैन्यासाठी उड्या टाकण्याच्या जागा, त्याभोवती असलेले शत्रूचे बळ, हेलिकॉप्टर उतरण्याच्या जागा इत्यादींची माहिती भूपृष्ठावरून सैनिकांकरवी व विमानातून छायाचित्रे घेऊन मिळविली जाते.

हवाई टेहळणी

हवाई टेहळणी : जमिनीवरून होणाऱ्या टेहळणीपेक्षा विमानातून केलेल्या टेहळणीद्वारे शत्रूच्या ताब्यातील क्षेत्राची अधिक विस्तृत माहिती मिळते. याकरिता टेहळणीगस्ती विमाने, हेलिकॉप्टर, निर्चालक विमाने (ड्रोन) वापरली जातात. कृत्रिम उपग्रहदेखील यासाठी वापरतात. तसेच शीघ्रगतीचे कॅमेरे, दूरचित्रनिदर्शक, रडार, इलेक्ट्रॉनीय उपकरणे इत्यादींचाही यासाठी वापर करण्यात येतो.

सागरी टेहळणी : युद्धकाळात सागरी दळणवळण आणि व्यापारी व सैनिकी वाहतूक अनिर्बंध व बिनधोक ठेवण्यासाठी सागरी वर्चस्व मिळविणे आणि ते टिकविणे अनिवार्य असते. आपली जहाजे व पाणबुड्या यांच्या संरक्षणासाठी शत्रूच्या सागरी बलाची तसेच सागरावर प्रवासात असलेली जहाजे व पाणबुड्या यांची बिनचूक माहिती मिळविण्यासाठी पाणबुड्या, टेहळणी-जहाजे आणि लांब पल्ल्याची व दमदार टेहळणी-विमाने यांची गरज असते. या कामी विमान, हेलिकॉप्टर-वाहक जहाजांवर असलेल्या विमानांचा व हेलिकॉप्टरचा फार उपयोग होतो. सागरातील प्रवासमार्गावर व बंदराच्या मुखावर पेरलेल्या पाणसुरूंगांची माहिती मिळवावी लागते. त्यामुळे पाणसुरूंग वेळीच काढणे शक्य होते. अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांमुळे सागरी टेहळणीस अत्यंत महत्त्व आले आहे. सागरी किनाऱ्याच्या व सागरी तेलखानीच्या संरक्षणासाठी सागरी टेहळणी सदैव चालू ठेवावी लागते. टेहळणी विमाने व हेलिकॉप्टर यांच्यात कॅमेरे, दूरचित्रवाणी, स्वनक (सोनार), चुंबकीय शोधक, रडार, संगणक व विश्लेषण-उपकरणे, रेडिओ प्रारण अंतर्छेदक इ. यंत्रसामग्री बसविलेली असते. सागरी अपघातात सापडलेल्यांना साहाय्य करण्यासाठीही सागरी टेहळणीचा उपयोग होतो [⟶ किनारासंरक्षण].


इलेक्ट्रॉनीय संनिरीक्षण

इलेक्ट्रॉनीय टेहळणी : विद्युत् चुंबकीय प्रारण उपकरणांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर आज होत आहे. प्रारणांचा अंतर्छेद (इंटरसेप्शन) व बोधन (मॉनिटरिंग) करून शत्रूच्या आधिपत्य व नियंत्रण-संरचनेची माहिती कळते. तसेच रडार आणि क्षेपणास्त्र मार्गनिर्देशक पद्धती, वायुसंरक्षणसिद्धता, अण्वीय स्फोट, प्रदुषित क्षेत्र आणि विषारी वायू वगैरे अनेक बाबींचा इलेक्ट्रॉनीय टेहळणीमुळे छडा लागतो. इलेक्ट्रॉनीय टेहळणीसाठी विशिष्ट विमाने, कृत्रिम उपग्रह (फेरेट सॅटेलाइट), बोटी, जहाजे वगैरे साधने असतात. उ. कोरियाने अमेरिकेचे प्यूब्लो हे इलेक्ट्रॉनिकी टेहळणीचे जहाज पकडले होते. अमेरिकेने अशा टेहळणीसाठी हवाई, न्यू हँपशर, द्येगो गार्सीआ येथे कृत्रिम उपग्रह केंद्रे स्थापन केली आहेत. साधारपणे शंभर कृत्रिम उपग्रहांद्वारे पृथ्वीवरील ७५ टक्के भागाची टेहळणी करणे शक्य आहे, असे म्हटले जाते.

हवामान व वातावरण टेहळणी : बहुधा इलेक्ट्रॉनीय उपकरणांद्वारे हवामानाची व वातावरणाची टेहळणी केली जाते. त्यामुळे हवामान व वातावरणातील घडामोडींचे विश्लेषण करता येते आणि युद्धविषयक कारवायांना अनुकूल वेळ निश्चित करता येते. गोळाबारी, अस्त्रांचे क्षेपण, आकाशातील हालचाली, ⇨जैव व रासायनिक युद्धतंत्राला अनुकूल वातावरण व हवामान इ. समजून येते.

संनिरीक्षण : (सरव्हायलन्स). युद्धकारवायांसाठी इच्छित वेळेला उपयोगी पडेल अशी अद्ययावत माहिती गोळा करणे म्हणजे संनिरीक्षण. संनिरीक्षण सातत्याने करावे लागते. यासाठी रडार, दूरचित्रवाणी आणि अवरक्त संवदेकांवर भर दिला जातो. व्हिएटनाम युद्धात अमेरिकेने आधुनिक संवेदी उपकरणे (उदा., वास ओळखून शत्रूची माहिती मिळविणे) वापरली होती. रणगाड्यांमध्ये अवरक्त व लेसर-किरण उपकरणे असल्यामुळे रणांगणावरील वस्तू गडद अंधारातही दिसू शकतात. रणांगणावरील इलेक्ट्रॉनीय उपकरणांचा वाढता उपयोग पाहता आधुनिक रणभूमीला ‘इलेक्ट्रॉनीय रणभूमी’ म्हणणे योग्य ठरेल.

 पहा : गस्त गुप्तवार्ता हेरगिरी.

दीक्षित, हे. वि.