क्लाउझेव्हिट्स, कार्ल फोन : (१ जून १७८०–१६ नोव्हेंबर १८३१). सुप्रसिद्ध प्रशियन सेनानी, युद्धशास्त्रज्ञ व लेखक. जर्मनीतील बुर्क येथे जन्म. वयाच्या बाराव्या वर्षी लष्करात प्रवेश, तेराव्या वर्षी ऱ्हाईन युद्धमोहिमेत प्रत्यक्ष भाग घेतला व पंधराव्या वर्षी लष्करात कमिशन. १८०१ मध्ये त्याने बर्लिनच्या युद्धशिक्षण महाविद्यालयात प्रवेश मिळविला आणि गेरहार्ट फोन शार्नहोस्ट या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली युद्धशास्त्रीय तत्त्वज्ञान आणि वाङ्‍मय यांचा सखोल अभ्यास केला.

कार्ल फोन क्लाउझेव्हिट्स

त्याने प्रिन्स आउगुस्टचा शरीररक्षक म्हणून काही दिवस काम केले. १८०६ मध्ये तो पुन्हा युद्धखात्यात आला. येनाच्या मोहिमेवर असताना युद्धकैदी म्हणून दोन वर्षे तो बंदिवासात होता. १८१२ मध्ये नेपोलियनने रशियावर स्वारी केली, त्यावेळी क्लाउझेव्हिट्स याने रशियन लष्करात प्रवेश केला. वॉटर्लूच्या लढाईत त्याने चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले व १८१८ मध्ये तो मेजर जनरलच्या हुद्यावर चढला. पुढे त्याची युद्धशिक्षण शाळेचा प्रमुख म्हणून नेमणूक झाली.

त्यापुढील एका तपाच्या काळात त्याने स्वतःला युद्धशास्त्राच्या अभ्यासाला वाहून घेतले व युद्धनीतीवर फोम क्रीग  (इं. भा. ऑन वॉर) नावाचा जगप्रसिद्ध बृहद्‍ग्रंथ लिहिला. १८३० मध्ये तो पोलिश क्रांतीचे निरीक्षण करण्यासाठी गेला असता तेथून परतल्यावर ब्रेस्लौ येथे तो कॉलऱ्याला बळी पडून मरण पावला.

त्याने आपल्या लेखनात फ्रेडरिक द ग्रेट व नेपोलियन यांच्या प्रत्यक्ष युद्धानुभवांचा आधार घेतला. त्याच्या या युद्धनीतीवरील लिखाणाचा मोठा प्रभाव आधुनिक युद्धतंत्रीय संकल्पनांवर पडलेला दिसतो. ‘युद्धासाठी युद्ध’ हे तत्त्व त्याने नाकारले असून ‘युद्ध म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भिन्न भिन्न साधनांचे अवमिश्रण करून चालू ठेवलेला तो राजकीय व्यवहार आहे’, असे तो म्हणतो. त्याच्या या युद्धवाङ्‍मयाचे परिशीलन सर्व यूरोपीय राष्ट्रांतून केले जाते. जगातील विविध भाषांतून त्याच्या ग्रंथांची भाषांतरे झालेली आहेत. कार्ल मार्क्स व एंगेल्स यांनीही त्याच्या युद्धविषयक विचारांचा अभ्यास केला होता. तसेच लेनिनने त्याच्या राजकीय मतांचे परिशीलन केले होते. साम्यवादप्रणीत साम्राज्यवादी युद्धाची संकल्पना बीजरूपाने क्लाउझेव्हिट्सच्या लिखाणातच सापडते, असे म्हटले जाते.

क्लाइझेव्हिट्सच्या फोम क्रीग  या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर जे. जे. ग्रॅहॅम यांनी ऑन वॉर  या नावाने प्रसिद्ध केले आहे (चौथी आवृत्ती, १९४०).

 जोशी, चंद्रहास