ड्यूक ऑफ मार्लबरोमार्लबरो, ड्यूक ऑफ : (२१ जून १६५०–१६ जून १७२२). पूर्ण नाव जॉन चर्चिल. ग्रेट ब्रिटनचा एक अजोड युद्धधुरंधर व राजकारणी पुरुष. डेव्हन परगण्यामध्ये ॲश या गावी जन्म. लंडनच्या सेंट पॉल शाळेत शिक्षण. त्याची बहीण ॲराबेला ही ब्रिटनचा राजा दुसरा जेम्स याची रखेली (प्रिया) होती जेम्सची आणखीही एक प्रिया कॅव्हनडिशची डॅचेस ही मार्लबरोची सुद्धा प्रिया होती. या दोन स्त्रियांमुळे मार्लबरोचा राजदरबारात व सैन्यात प्रवेश झाला असे म्हणतात. शाही ड्रॅगून व लाईफ् गार्ड या रिसाल्यांचा [ → घोडदळ] तो कर्नल झाला. राजा जेम्सने याच्या राजकीय तसेच सैनिकी कर्तृत्वाला उत्तेजन दिले. फ्रान्सचा राजा चौदावा लूई याचा विख्यात सेनापती ⇨ तूरेन आंरी याच्या हाताखाली त्याला श्रेष्ठ सैनिकी नेतृत्वाचे शिक्षण व अनुभव मिळाला. जेम्सविरुद्ध झालेले ड्यूक ऑफ मॉनमथचे बंड (१६८५) त्याने निर्घृणपणे मोडून काढले, तसेच उत्तर आफ्रिकी चाच्यांचा उपद्रवही १६८८ मध्ये बंद पाडला. त्याच वर्षी इंग्लंडमध्ये राज्यक्रांती होऊन, विल्यम ऑफ ऑरिंज हा राजा झाला. मार्लबरो विल्यमला मिळाला तरीही त्याने पदच्यूत झालेल्या दुसऱ्या जेम्सशी संबंध चालू ठेवले. विल्यमने त्याला मार्लबरोचा अर्ल व पुढे ड्यूक केला, फ्लँडर्स प्रदेशात व्हालकूरची लढाई त्याने घोडदळाच्या अग्रभागी राहून जिंकली. आयरिशांचे बंड (१६८९–९१) मोडण्यात तो राजा विल्यमबरोबर होता. दुसऱ्या जेम्सशी असलेल्या संबंधामुळे त्याला कारावासात टाकण्यात आले. १६९५ साली त्याची सुटका झाली. स्पेनच्या गादीसाठी  वारसायुद्ध होणार या शंकेमुळे विल्यमने मार्लबरोला १७०० सालाअखेर सेनापती केले. पुढील नऊ वर्षे त्याने एकट्याने इंग्लिश परराष्ट्रीय राजकारण व संग्राम-नेतृत्व सांभाळले. ही त्याची जोड कामगिरी अद्यापिही अद्वितीय समजली जाते.

संग्रामयोजना व युद्धकौशल्याच्या दृष्टीने मार्लबरोचे गुणदोष तसेच वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे दिसतात. सतराव्या-अठराव्या शतकांच्या पूर्वार्धात संग्रामयोजना व युद्धतंत्र दुर्गपद्धतीमुळे [→  तटबंदी] संरक्षणप्रधान होते. आक्रमणात्मक युद्धतंत्र (ऑफेन्सिव्ह वॉरफेअर) व आक्रमणशील सेनानेतृत्व (ऑफेन्सिव्ह जनरलशीप) दुर्मिळ होते. शत्रूला तटबंदीबाहेर काढून खुल्या रणांगणावर लढाई देण्यास त्याला भाग पाडणे व त्याचा निर्णायक पराभव करणे. याचा त्याने अवलंब केला.त्याकाळी यूरोपमध्ये हिवाळ्यात सैनिकी कारवाया बंद ठेवीत. उरल्यावेळी, लढाया न करता केवळ आगेकूच वा हुलकावण्या देण्यावरच भर दिला जाई. त्यावर तोडगा म्हणून शत्रूच्या दृष्टीने त्याच्या दुर्गपद्धतीपासून दूर असलेल्या मर्मस्थानावर हल्ला करण्याचे ‘अपरोक्ष युद्धतंत्र’ (इन्डायरेक्ट ॲप्रोच वॉरफेअर) मार्लबरोने अंगिकारले होते. या त्याच्या अपरोक्ष तंत्रामुळे फ्रान्सच्या सेनापतींना त्याचा पिच्छा करणे भाग पडले. परिणामतः फ्रान्सला वरचेवर पराभव पतकरावे लागले. मार्लबरोच्या पुढील लढाया अभ्यसनीय आहेत. ⇨ ब्लेनमची लढाई (१७०४) रामीयी ऑफ्यू (१७०६). या लढायांत एका बगलेवरचे सैन्य काढून घेऊन व दुसरी बगल भक्कम करून त्याने विजय मिळविला आउडानार्डा (१७०८) ही लढाई त्याने शत्रूच्या पिछाडीवर हल्ला करून जिंकली. मालप्लाकेच्या लढाईत (१७०९) फ्रेंचांच्या दुप्पट हानी सोसून मार्लबरोने विजय मिळविला. अशाच प्रकारे जर पुढच्या लढाया झाल्या असत्या तर इंग्लंड आणि दोस्तांना फ्रेंचांविरुद्ध राजकीय उद्दिष्ट्ये साध्य करणे अति महाग पडले असते, असे एक मत होते.

मार्लबरोची स्पेनमधील संग्राम-योजना चुकीची होता. स्पेनचा राजा पाचवा फिलिप जरी फ्रेंच होता तरीही स्पॅनिश जनता त्याच्याशी एकनिष्ठ होती. शंभर वर्षांनी नेपोलियनला स्पॅनिश देशभक्तीचा कटू अनुभव मिळाला. मार्लबरोने सैनिकी व्यवस्थापनात क्रांती केली. जेवणखाण, पगार व रसदपुरवठा ठरल्या वेळी व ठरल्या जागी बिनचूक होई. राजकीय क्षेत्रात, डच, ऑस्ट्रियन इ. दोस्त राष्ट्रांची मदत घेऊन फ्रेंच सत्तेविरुद्ध यूरोपात बलसमतोल राखण्याचे अवघड काम त्याने पार पाडले. इंग्लंडमधील राजकीय पक्षांतील तेढीमुळे फ्रांन्स बचावले. १७१० मध्ये टोरी पक्ष सत्तेवर आला. मार्लबरोच्या पत्नीचे राणी ॲनबरोबरचे संबंध दुरावले. तसेच त्याने सेनेचे आमरण कॅप्टन जनरल हे पद मिळविण्याचा प्रयत्न केला. मार्लबरो पुन्हा इंग्लंडमध्ये क्रॉमवेलसारखी सैनिकी हुकूमशाही स्थापेल या भितीमुळे मार्लबरोचे सेनापतिपद काढून घेण्यात आले. १७१३ च्या उत्रेक्त तहाप्रमाणे इंग्लंडला स्पेनकडून जिब्राल्टर, मिर्नॉका, न्यू फाउंडलंड इ. प्रदेश तसेच गुलामांच्या व्यापाराची मक्तेदारी मिळाली. हिंदुस्थानातील इंग्लिश-फ्रेंच संबंधावर परिणाम होऊन फ्रेंचबल कमी होऊ लागले. स्पेनच्या वारसाहक्क युद्धामुळे फ्रेंच व डच या दोघांचे सागरी बळ कमी होऊन आशियात विशेषतः हिंदुस्थानात ब्रिटिशांच्या साम्राज्यविस्ताराला विरोधी सत्ता उरली नाही.

मार्लबरोने बरीच धनदौलत व शेतीभाती कमावली. ती अवैध मार्गाने मिळविली, असा त्यावर आरोप केला गेला. दुसऱ्या महायुद्धकाळातील ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल हा मार्लबरोचा वंशज होता. मार्लबरोचे ब्रिटनच्या इतिहासातील स्थान अद्वितीय गणले जाते. त्याचा मृत्यू विंझर येथे झाला. मार्लबरोने एकही ग्रंथ लिहिला नाही.

संदर्भ : 1. Barnett. Correlli, Britain and Her Army: 1609–1970, Harmondsworth. 1974.

             2. Chandler. D. G. Marlborough as Military Commander, London, 1973.

             3. Churchill, Winston. Marlborough : His Wife and Times, Two Vols., London, 1946. 

             4. Fuller, J. F. C. The Decisive Battles of the Western World, Vol. I, London, 1972.

             5. Hart, B. H. Liddel, Strategy : The Indirect Approach, London, 1967.

दीक्षित, हे. वि.