हवाई दल, भारतीय :भारतीय लष्कराची एक महत्त्वाची शाखा. पहिल्या महायुद्धापासून युद्धशास्त्राचे एक नवे अंग निर्माण झाले, ते म्हणजे हवाई युद्ध. या युद्धाचा उपयोग जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन,रशिया व अमेरिका ह्या राष्ट्रांनी अनुक्रमे युद्धात करण्यास सुरुवात केली. १९१८–३८ या एकवीस वर्षांच्या – दोन जागतिक युद्धांच्या – संधिकालात एकामागून एक लहान-मोठ्या राष्ट्रांनी हवाई दले स्थापण्यास सुरुवात केली. या काळात ब्रिटिशांनी हिंदुस्थानात ‘रॉयल एअर फोर्स’ ची (शाही हवाई दल) स्थापना केली. त्यात दोन स्क्वॉड्रन्स, ८० अधिकारी व ६०० सैनिक हिंदुस्थानात ठेवले (१९१८). १९२० पर्यंत स्क्वॉड्रन्सची संख्या आठपर्यंत गेली व १९२३-२४ मध्ये ती सहापर्यंत खाली आली. त्यांपैकी चार भूसेनेला पाठिंबा देणारी व दोन बाँबर स्क्वॉड्रन्स होती. सर ॲण्ड्र्यू स्कीन कमिटीच्या शिफारशीनुसार १९२८ मध्ये क्रॅनवेलच्या वैमानिक शाळेत सहा हिंदी सैनिकांनी दरवर्षी प्रशिक्षण घ्यावयाचे, असे ठरले व हिंदी हवाई दलाची स्थापना झाली मात्र हिंदी वैमानिकांची पहिली प्रशिक्षित तुकडी १९३३ मध्ये बाहेर पडली.

 

सुरुवातीची कामगिरी : भारतातील अगोदरच्या कर्तव्यक्षेत्राप्रमाणे या चिमुकल्या हिंदी हवाई दलाचे कार्य वायव्य सरहद्द प्रांतातील बंडखोर पठाणांना काबूत ठेवणे, हे होते व या दलाला युद्धक्षम बनविण्याचे शिक्षण तेथेच मिळाले. ऑगस्ट १९४० मध्ये दौर खोऱ्यात तीव्र गोळी-बाराविरुद्ध हिंदी वैमानिकांनी अकरा हल्ले केले. या वेळी त्यांच्या वाट्याला बहुधा शाही हवाई दलातील नको असलेली जुनाट विमानेच आली. त्यांना सरहद्दीवरील कर्तव्याबरोबरच भूसेनेला सहकार्य करावे लागे. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर हिंदी महासागराच्या किनाऱ्याचे संरक्षण करणारे दल उभारले गेले पण याचे एक स्क्वॉड्रन होण्यासदेखील दोन वर्षांचा अवधी लागला.

 

दुसऱ्या महायुद्धातील वाढ व कामगिरी : १९४१ मध्ये शाही हवाई दलामधील काही तुकड्या हिंदुस्थानात ठेवण्याचे ठरले. फेब्रुवारी १९४२ पर्यंत हिंदी हवाई दलाची तीन स्क्वॉड्रन्स उभारण्यात आली. या वेळी हवाई दलाची मुख्य शिक्षण संस्था लाहोरजवळ होती. जरी याअगोदरच हिंदी हवाई दलाची दहा स्क्वॉड्रन्स तयार करण्याचे ठरले होते आणि जपानबरोबरचे युद्ध जोरात सुरू झाले होते, तरी १९४३-४४ सालापर्यंत जेमतेम नऊ स्क्वॉड्रन्स उभारली गेली मात्र त्यांचे कर्तव्यक्षेत्र भूसेनेच्या सहकारापुरतेच मर्यादित राहिले नसून टेहळणी, बाँबिंग, रसद पुरवठा, शत्रूच्या विमानांचा पाठलाग करणे इत्यादींसाठी होते. त्यासाठीच भारतीय वैमानिकांचे पदार्पण झाले.

 

समुद्रतट संरक्षणाच्या तुकड्या भारतीय हवाई दलाच्या स्वयंसेवक राखीव दलाच्या कर्मचाऱ्यांमधून १९३९ मध्ये बनविण्यात आल्या व त्यांचे प्रशिक्षण रिसालपूर येथे झाले. ऑक्टोबर १९४१ पर्यंत पाच तुकड्या (फ्लाइट्स) मद्रास, मुंबई, कराची, कलकत्ता व कोचीन येथे स्थापन झाल्या.

 

१६ मार्च १९३९ रोजी सुब्रोतो मुखर्जी हे पहिले हिंदी अधिकारी स्क्वॉड्रन कमांडर झाले. तेच पुढे भारतीय हवाई दलाचे पहिले हिंदी प्रमुख झाले. सुरुवातीला ‘वाफिटी’ नावाचे जुनाट विमान हिंदी वैमानिकांना मिळाले. १९४१ च्या अखेरीस ‘ऑडॅक्स’ नावाचे विमान मिळाले. सप्टेंबर १९४२ मध्ये ‘हरिकेन’ नावाच्या प्रसिद्ध लढाऊ विमानावर प्रशिक्षण घेण्याकरिता अनेक हिंदी वैमानिक रिसालपूरला गेले.

 

सप्टेंबर १९४० मध्ये २४ हिंदी वैमानिकांची एक तुकडी इंग्लंडमध्ये लष्कराच्या मदतीकरिता रवाना झाली. तेथे त्यांना लढाऊ क्रमांक ७ विमानोड्डाणाचे उच्च शिक्षण दिल्यानंतर युद्धात भाग घेता आला. तीव्र हवाई लढायांत त्यांनी नाव गाजविले. जुलै १९४२ पर्यंत ८ जणांनी युद्धकार्यात प्राणाहुती दिली. यानंतर आणखी काही तुकड्या शिक्षणा-करिता इंग्लंड व कॅनडा येथे पाठविण्यात आल्या. यांत्रिकी शिक्षण घेण्याकरितासुद्धा हिंदी अधिकारी इंग्लंडमध्ये पाठविण्यास सुरुवात झाली होती. १९४५ पर्यंत ३७ अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतले.

 

पूर्वेकडील आघाडीवरील कामगिरी : हिंदी वैमानिकांची दुसऱ्या महायुद्धातील सगळ्यात महत्त्वाची कामगिरी म्हणजे ब्रह्मदेशातील ( म्यानमार) जपानी सेनेविरुद्धचे हल्ले होत. हिंदी क्रमांक १ स्क्वॉड्रन त्या वेळी कुंगू गावी होते. त्याच्याजवळ ‘लिसँडर’ नावाचे टेहळणी करण्याच्या लायकीचे जपान्यांच्या विमानांपेक्षा धिम्या गतीचे विमान होते पण स्क्वॉड्रन कमांडरने त्यात जुजबी फेरबदल करून त्याला युद्धक्षम बनविले आणि जपानी हवाई अड्ड्यावर यशस्वी बाँबहल्ले केले. जपानी सैन्याने जेव्हा फार मोठे हल्ले करून ब्रह्मदेश पादाक्रांत केला, त्या वेळी माघार घेणाऱ्या भूसेनेला हिंदी वैमानिकांनी पुष्कळ मदत केली. हवाई युद्धात स्क्वॉड्रन लीडर मेहरसिंग व यांत्रिकी कौशल्यात वारंट ऑफिसर (नंतर एअर व्हाइस मार्शल) हरजिंदरसिंग यांनी चांगली कामगिरी केली. मेहरसिंगांना डी.एस्.ओ. (अतिविशिष्ट सेवामंडल), तर हरजिंदरसिंग यांना एम्.बी.आर्. हा किताब देण्यात आला. पहिल्या स्क्वॉड्रनचे स्क्वॉड्रन लीडर मुजुमदार यांना त्यांच्या नेतृत्वाबद्दल व शौर्याबद्दल डी.एफ्.सी. (अतिविशिष्ट वायुसेना) हे वीरचिन्ह देण्यात आले. हिंदी वैमानिकाला हा बहुमान पहिल्यांदा मिळाला होता. पहिल्या स्क्वॉड्रनची या कामी पुष्कळच वाहवा झाली. लढाई संपेपर्यंत त्यांनी ४,८१३ विमानी हल्ले (सॉर्टीज) केले व बरीच वीरचिन्हे मिळविली. स्क्वॉड्रन लीडर राजाराम आणि अर्जुनसिंग (पुढे १९६९ चे हवाई दलाचे प्रमुख) तसेच फ्लाइंग ऑफिसर कॉक, बलसारा व गुप्ता हे ते शूर वैमानिक होत.

 

या आघाडीवर हिंदी वैमानिकांनी फार महत्त्वाचे कार्य केले व बहादुरी गाजविली. नोव्हेंबर १९४३-४४ दरम्यान आराकानवरील दुसऱ्या मोहिमेत हिंदी हवाई दलाच्या सहाव्या व आठव्या स्क्वॉड्रन्सनी मिळून चारशेवर हल्ले करून जानेवारीत सातशे तासांपेक्षा अधिक विमानोड्डाण केले आणि मित्र राष्ट्रांना सर्वतोपरी मदत करून आराकानमधून जपानी लष्कराला हाकलून देण्यास मदत केली.

 

आराकानमधून बंगालवर स्वारी करण्याचा जपानचा बेत अयशस्वी झाल्यानंतर त्याने मणिपूरच्या खोऱ्यांतून पुढे जाऊन इंफाळ व कोहिमा ही शहरे हस्तगत करून आसाम पादाक्रांत करण्याचे ठरविले पण तो बेत असफल झाला. प्रसिद्ध सेनाधिपती जनरल स्लिमकडे मित्र राष्ट्रांच्या सेनेचे आधिपत्य होते. हवाई दलाचे पहिले हिंदी स्क्वॉड्रन मुद्दाम वायव्य सरहद्दीवरील कोहट गावाहून या आघाडीवर पाठविण्यात आले. त्यानंतर क्रमांक ५, १ आणि शेवटी क्रमांक ४ स्क्वॉड्रन्सदेखील आली. या सगळ्यांनी या अटीतटीच्या लढाईत महत्त्वाचे युद्धकार्य केले. इंफाळच्या वेढ्यात मित्र राष्ट्रे यशस्वी झाल्यावर जपानी सैन्याची सारखी पीछेहाट झाली. कालादान खोऱ्यात सरतेशेवटी शत्रूचा पूर्णपणे निःपात करण्यात आला (डिसेंबर १९४४ ते जानेवारी १९४५). हिंदी हवाई दलाचे पहिले स्क्वॉड्रन या लढाईतसुद्धा होतेच.


 

या तीनही लढाया गव्हर्नर जनरल ॲडमिरल माउंटबॅटन याच्या आधिपत्याखाली झाल्या. हिंदी वैमानिकांना अनेक आधुनिक बाँबर्स व लढाऊ विमानांमधून युद्ध करण्याचे प्रात्यक्षिक मिळाले. भूसेनेबरोबर सहकार्य करण्याचा अनुभव मिळाला. स्वतंत्र भारतातील हवाई दलाची मुहूर्तमेढ यांतील शूर व कौशल्यपूर्ण वैमानिकांनी रोवली व त्यांच्या युद्धातील सर्व प्रकारच्या अनुभवामुळे नव्या तरुण हिंदी वैमानिकांना तयार करणे त्यांना शक्य झाले. आराकानच्या तिसऱ्या हल्ल्यात या महायुद्धा-तील हिंदी वैमानिकांचे कार्य जवळजवळ पूर्ण झाले (फेब्रुवारी – एप्रिल, १९४५). त्यांनी तोपर्यंत २४,००० हल्ले केले व मानवंदनेनिमित्त २ अतिविशिष्ट सेवामंडले, २२ अतिविशिष्ट वायुसेना व अन्य पुष्कळ वीरचिन्हे मिळविली. हवाई दलाच्या यांत्रिक व जमिनीवर कार्यरत असलेल्या हवाई सैनिकांनी निष्ठापूर्वक ही कामगिरी केली.

 

भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत-पाक फाळणी होऊन हवाई दलाची विभागणी झाली. भारताच्या वाट्यास केवळ साडेसहा स्क्वॉड्रन्स आल्या. चांगल्या छावण्या, विमानतळ व प्रशिक्षण संस्था पाकिस्तानात गेल्या. भारतातील बहुतेक सगळे विमानतळ – विशेषतः दोन्ही सरहद्दींवरील – कच्चे किंवा अर्धकच्चे, कमी लांबीचे व इतर आवश्यक त्या सामग्रीशिवाय होते. याच सुमारास पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीरमध्ये हल्ला करून श्रीनगर घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने प्रतिकार करून पाकिस्तानी फौजांना मागे रेटले. ह्या युद्धात हवाई दलाच्या स्पिटफायर तुकडीस ‘टेम्पेस्ट’ या विमानांनी बहुमोल मदत केली. त्यानंतर भारत हे पहिले आशियाई राष्ट्र होते, ज्याने जेट विमाने (व्हॅम्पायर जेट फायटर्स) वापरली (१९४८). पुढे १९५३ पर्यंत भारतीय हवाई दलात १५ स्क्वॉड्रन्स प्रविष्ट झाल्या होत्या.

 

भारतात बंगलोर येथे वालचंद हिराचंद यांनी हिंदुस्थान एअरक्राफ्ट लि. ही कंपनी स्थापन केली (१९४०). सुरुवातीस या कंपनीने दट्ट्याचे एंजिन असलेल्या ‘हॅर्लो’ विमानाचे उत्पादन केले. त्यानंतर ‘ग्लायडर ङ्खचा अभिकल्प संस्थेचे प्रमुख व्यवस्थापक डॉ. वि. म. घाटगे यांनी तयार केला. दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या विमानांच्या डागडुजीचे काम केले. टायगर, मॉथ, डकोटा, लिबरेटर यांसारखी रॉयल इंडियन एअर फोर्सने वापरलेली विमाने दुरुस्त करून पूर्ववत (रिकंडिशनिंग) करण्याचे काम हाती घेतले. घाटगे यांनी एच्टी-२ या विमानाचा अभिकल्प तयार केला (१९४८). पहिल्या प्रजासत्ताक दिनी (१९५०) रॉयल इंडियन एअर फोर्स या नावातील रॉयल शब्द वगळण्यात आला आणि इंडियन एअर फोर्स ह्या नावाबरोबरच हवाई दलाचे बोधवाक्य ‘नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ‘ (भगवद्गीता) हे स्वीकारले आणि चौकोनात डाव्या कोपऱ्यात राष्ट्रध्वज, त्याच्या समांतर उजव्या बाजूस केशरी, पांढरा व मधोमध हिरवा रंग असलेली आकाशाच्या निळसर पार्श्वभूमीवरील वर्तुळे असे बोधचिन्ह निश्चित करण्यात आले. कंपनीने मरुत् (एच्एफ् –२४), किरण, पुष्पक व कृषक या विमानांचे उत्पादन कूर्ट टँक (टांक) या जर्मन अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतले. अर्थातच किरण, पुष्पक व कृषक यांचेही अभिकल्पक घाटगेच होते. जेट (झोत) विमानाचे मूलभूत प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय हवाई दलात वापरण्यात येणारे मरुत् हे प्रमुख विमान आहे. याशिवाय हिंदुस्थान एअरक्राफ्टने डी हॅव्हिलँड, व्हॅम्पायर, फॉलंड (ब्रिटन), नॅट व एअरो-स्पाशिएल (फ्रान्स) ही विमाने व ऑल्यूत (चेतक) हेलिकॉप्टर यांचेही परवान्याच्या आधारे उत्पादन केले आहे. पुढे केंद्र शासनाने हॉकर सिड्ली व ॲव्हरो –७४८ (ब्रिटन) या विमानांच्या उत्पादनासाठी हवाई दलाचा एक विभाग म्हणून एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग डेपो कानपूर येथे स्थापन केला (१९६०) आणि एरॉनॉटिक्स इंडिया लि. ही कंपनी स्थापिली (१९६३). सोव्हिएट मिग-२१ च्या निर्मितीसाठी या कंपनीने ओझर (नासिक), कोरापूट (ओडिशा) व हैदराबाद येथे कारखाने उभारले आणि एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग डेपोचे एरॉनॉटिक्स इंडियामध्ये विलिनीकरण करण्यात आले. नंतर ही कंपनीसुद्धा हिंदुस्थान एअरक्राफ्ट लि. मध्ये विलीन झाली. तिचे मुख्य कार्यालय बंगलोर येथे असून तीत बारा उत्पादन विभाग आहेत. त्यांपैकी बंगलोर येथे सहा आणि कानपूर, कोरापूट, नासिक, हैदराबाद, लखनौ व कोर्वा येथे प्रत्येकी एक विभाग आहे. विमाने, विमानाची एंजिने, पूरक साधने, वैमानिकीय इलेक्ट्रॉनीय घटक, तसेच अवकाशविज्ञानाच्या प्रकल्पासाठीचे व क्षेपणास्त्रांचे घटक यांचे अभिकल्प, विकास, उत्पादन, दुरुस्ती व संपूर्ण निरीक्षण या प्रकारची सर्व कामे ही संस्था करते. भारतीय हवाई दल हे तिचे प्रमुख ग्राहक आहे. सैन्य दलाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी सुधारित विमानांची नेहमीच गरज भासते. ती भागविण्याचे तसेच आयातीद्वारे मागणी पूर्ण करण्याचे काम ही संस्था करते. उदा., जॅग्वार, मिराज-२०००, मिग-२३, मिग-२९, सुखोई-३०, एम्के इत्यादी.

 

भारताला हवाई दलाच्या विमानांच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होण्याला आणखी काही वर्षे लागतील. सध्या तरी त्याला ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, रशिया या देशांच्या सहकार्यावर-मदतीवर अवलंबून राहावे लागते.

 

संघटना : हवाई दलाचे मुख्यालय दिल्ली येथे असून त्याचे प्रमुख एअर चीफ मार्शल असतात. त्यांना मदतनीस म्हणून एअर मार्शल दर्जाचे काही उच्चाधिकारी काम पाहतात. हवाई दलाचे विभाजन समादेशांत (कमान्ड्ज) केलेले असून त्यांचे समादेश क्षेत्र प्रक्रियावादी आवश्यक बाबींवर (भौगोलिक) आधारित असते. प्रत्येक हवाई दल समादेशावर एक एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (एओसीआय्सी) प्रमुख असतो. त्याच्या हाताखाली प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असतो. समादेश हवाई दलाचा स्वयंभू-सुविधा असणारा सर्वांत मोठा विभाग असून त्याचे कार्यानुसार विंग, युनिट, स्टेशन अशा छोट्या कनिष्ठ शाखांमध्ये पुन्हा विभाजन केलेले असते. त्यांवर विंग कमांडर ते एअर व्हाइस मार्शल दर्जाचा अधिकारी कार्यक्षेत्र आणि भूमिकेबरहुकूम प्रमुख असतो. या उड्डाण विशिष्ट रचनाक्षेत्रात (विंग वा स्टेशन) अनेक विमान स्क्वॉड्रन्स असून ते भूमिका, भौगोलिक स्थळ आणि आवश्यकता यांवर अवलंबून असते. या उड्डाण विशिष्ट रचनाक्षेत्रांवर विंग कमांडरपासून ग्रुप कॅप्टन दर्जाचा प्रत्येकी एक अधिकारी प्रमुख असतो. मूलभूत लढाऊ दल हे फायटर स्क्वॉड्रन असते. सामान्यतः त्यात सोळा विमाने आणि दोन भरारी पथके (फ्लाइट) असतात. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या खालच्या दर्जाचा अधिकारी (फ्लाइट कमांडर) असतो.

 

हवाई दलातील अधिकाऱ्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे असते : त्यांची कार्यकारी शाखा फ्लाइंग ब्रँच (उड्डाण शाखा) या नावाने ज्ञात असून त्यामध्ये वैमानिक आणि मार्गनिर्देशक हे प्रमुख अधिकारी असतात. यांतूनच उच्च अधिकाऱ्यांची निवड होते. त्यांमध्ये एअर व्हाइस मार्शल, कमांडर, ग्रुप कॅप्टन हे असून त्यांची नियुक्ती समादेशांचे प्रमुख म्हणून करण्यात येते. हे कमांडिंग अधिकारी उच्चशिक्षित (विशेषित) आणि सक्रिय वैमानिक असून ते सर्व विमानविद्याविषयक घटनांचे व्यवस्थापन पाहतात. या विमानोड्डाण शाखेशिवाय तांत्रिक व अतांत्रिक असे आणखी दोन विभाग हवाई दलात आढळतात. तांत्रिक विभाग हा वैमानिकी अभियांत्रिकीशी किंवा विमानाच्या यांत्रिकीकरणाशी संबद्ध असून अतांत्रिक विभाग हा व्यवस्थापकीय प्रशासन व्यवस्था पाहणाऱ्या, विशेषतः लेखापरीक्षक, वैद्यकीय अधिकारी, वातावरणविज्ञ, रसदशास्त्रज्ञ अशा अधिकाऱ्यांचा असतो मात्र सर्व अधिकाऱ्यांना शारीरिक व मानसिक क्षमतेची आवश्यकता असून युद्ध वा शांतता काळात उद्भवणाऱ्या ताण-तणावांच्या तसेच विषम हवामानांतील बदलांना उन्नतांशांत कार्यक्षम


 

रीत्या कार्यरत राहण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

 

भारतीय हवाई दलात भरती झालेल्या युवकांना फ्लाइंग, टेक्निकल, ग्राउंड ड्यूटी शाखांचे पद्धतशीर प्रशिक्षण देण्याचे कार्य एअर फोर्स अकॅडेमी (१९६७) ही संस्था करते. हैदराबादपासून २५ किमी.वर दुन्डीगल येथे २,८०० हे. परिसरात ही संस्था कार्यरत आहे. तीत हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. ही संस्था बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या युवक-युवतींतून जबाबदार नेतृत्व घडविण्यासाठी प्रशिक्षण देते. शिवाय येथे प्रामुख्याने खेळ, क्रीडा या प्रकारांना महत्त्व दिले जाते. हवाई दलातील भरती व प्रशिक्षण यांबाबत काही प्रमाणित निकष असून विमानोड्डाण शाखेतील वैमानिकांची भरती राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमार्फत तसेच एअर फोर्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजद्वारे केली जाते. शिवाय राष्ट्रीय छात्रसेनेतील पदवीधरांतून किंवा शास्त्रविषयातील (भौतिकी किंवा गणित) पदवीधरांतून त्यांची निवड केली जाते. दहावी किंवा बारावी (शास्त्रशाखा) झालेल्या मुलांतून एअरमनची निवड होते, तर मार्गनिर्देशक (नेव्हिगेटर) पदासाठी प्रत्यक्ष भरती होत नाही. प्रशिक्षणार्थी वैमानिक म्हणून जे उमेदवार सुरुवातीपासून प्रशिक्षणाच्या कालावधीत दर्जा (ग्रेड) सिद्ध करत नाहीत, त्यांना मार्गनिर्देशक शाखेत प्रविष्ट करतात. तांत्रिक शाखेतील उमेदवारांची निवड वैमानिकीय अभियांत्रिकीमधील पदवीधरांतून वा स्नातकोत्तर मुलां-मधून करतात. या सर्वांची निवड हवाई दल निवड मंडळाद्वारे करण्यात येते आणि शारीरिक क्षमता सिद्ध झाल्यानंतरच निवडलेल्या सर्व उमेदवारांना त्या त्या शाखेनुसार प्रशिक्षण देण्यात येते. प्रथम कोईमतूरच्या एअर फोर्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजमध्ये १२ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. बीदरच्या एलिमेन्टरी फ्लाइंग स्कूलमध्ये वैमानिकी प्रशिक्षार्थी शिक्षण घेतात. हे प्रशिक्षण यशस्वी रीत्या पूर्ण केल्यानंतर ते हैदराबाद एअर फोर्स अकॅडेमीत सहा महिने प्रशिक्षण घेऊन अनुभवी सेवा वैमानिक बनतात. हे अनुभवी नवीन कमिशन्ड वैमानिक प्रगत प्रशिक्षणासाठी हकीमपेठ (सिकंदराबाद) व येलहंका (बंगलोर) या ठिकाणी २२ आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जातात. या प्रशिक्षणानंतर एक वर्षाच्या परिवीक्षा कालावधीनंतर त्यांची स्थायी विमान अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. दोन वर्षांच्या सेवेनंतर ते फ्लाइंग ऑफिसर होतात. पाच वर्षांनंतर त्यांना फ्लाइट लेफ्टनंट पदावर बढती मिळते. त्यानंतरच्या अकरा वर्षांच्या सेवेनंतर त्यांना स्क्वॉड्रन लीडरपद प्राप्त होते. पुढे त्यांना १६ वर्षांच्या सेवेनंतर विंग कमांडरची पदोन्नती मिळते मात्र सेवेत प्रविष्ट झाल्यानंतर ही अखेरची पदोन्नती शारीरिक दृष्ट्या सक्षम, पदांची रिक्तता आणि निवड समितीची शिफारस यांवर अवलंबून असते.

 

भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यावर, काश्मीर युद्धामध्ये भूसेनेची वाहतूक व रसद पुरवठा हे जबाबदारीचे काम हवाई दलाने सुकर केले. तसेच नैसर्गिक आपत्तींच्या वेळीही त्याचा विनियोग अनेक वेळा झाला. पूर्व आघाडीवर (नेफा, नागालँड व मणिपूर) तसेच लडाखमध्ये सैन्याला जी रसद पुरविली जाते, ती प्रायः हवाई दलाच्या मालवाहतूक व छत्री प्रपात (सप्लाय ड्रॉप्स) विमानांद्वारा. भारत-चीन युद्धात (१९६२) हवाई दलाने प्रत्यक्ष युद्धकार्यात भाग घेतला नाही पण त्याची भरपाई करण्याची सुवर्णसंधी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात तसेच १९७१ च्या बांगला देश युद्धात आणि विशेषतः १९९९ च्या कारगील युद्धात भारतीय हवाई दलाला मिळाली. पाकिस्तानी विमानतळ, दळणवळणाची साधने यांवर भारतीय विमानांनी चढाई केली. पाकिस्तानी हवाई दलावर वर्चस्व मिळवून विजयश्रीचा मोठा वाटा या तीन युद्धांत भारतीय हवाई दलाने उचलला आहे.

 

आज भारतीय हवाई दलाचा विस्तार ४५ पथके म्हणजेच सु. ५००– ७०० विमान संख्या आहे, असे सांगण्यात येते. सध्या भारतात २-३ प्रकारच्या लढाऊ विमानांची निर्मिती सुरू झाली आहे. तौलनिक दृष्ट्या पाहावयाचे झाले तर, १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा अमेरिकेकडे ८००, इंग्लंडकडे १,९०० व जर्मनीकडे ४,१०० लढाऊ विमाने होती. हे महायुद्ध संपल्यानंतर विमाननिर्मितीमध्ये क्रांती झाली आणि विमानांचे आकार-प्रकारही वाढले. १९६५-६६ दरम्यान नऊ देशांनी मिळून ६० नवीन प्रकारच्या विमानांच्या उड्डाणाची प्राथमिक चाचणी केली. या विमाननिर्मितीत अमेरिकेची संयुक्त संस्थाने व रशियासह अन्य पाश्चात्त्य देश आघाडीवर होते. भारतही या देशांच्या फार मागे नाही. ८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय हवाई दल दिन म्हणून पाळला जातो.

 

पहा : विमान उद्योग हवाई दल हवाई युद्ध.

टिपणीस, य. रा.