कामिकाझे :`दैवी तुफान’ या अर्थाचा जपानी शब्द. १२८१ साली कूब्लाईखानाच्या जपानवरील स्वारीमध्ये त्याच्या जहाजांची ज्या तुफानामुळे वाताहत झाली त्याला ‘कामिकाझे’ नाव रुढ झाले. दुसर्‍या महायुद्धात जपानी वायुदलातील एका संघटनेला हे नाव देण्यात आले होते. यातील वैमानिक आपल्या दारूगोळा भरलेल्या विमानासह शत्रूच्या युद्धनौकेवर नेम धरुन आदळावयाचे. ओकिनावा बेटावरील बर्‍याच अमेरिकन युद्धनौकांना अशी जलसमाधी मिळाली होती. दुसर्‍या महायृद्धात एकूण १,९०० ‘कामिकाझे’ यांनी आत्मसमर्पण केले होते.

पाटणकर, गो.वि.