वायुसेनाध्यक्ष ओ. पी. मेहरामेहरा, ओमप्रकाश : (१९ जानेवारी १९१९–    ). भारताचे माजी वायुसेनाध्यक्ष, जन्म लाहोर (हल्ली पाकिस्तानात) येथे वडिलांचे नाव जगतराम, आईचे जीवनदेवी व पत्नी सत्या. मेहरा यांचे शिक्षण एम्.ए. पर्यंत शासकीय महाविद्यालय लाहोर व स्टाफ महाविद्यालय क्वेट्टा येथे झाले. त्यांनी त्यानंतर (१९६८) पिट्‌सबर्ग (अमेरिका) येथील विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम पूर्ण केला. १९४० मध्ये त्यांनी भारतीय वायुदलात प्रवेश करून उत्तर व पश्चिम प्रांतांत तडफदार कामगिरी बजावली. दुसऱ्या महायुद्धकाळात [→ महायुद्ध, दुसरे] त्यांची ब्रह्मदेशाच्या आराकान प्रांतात नियुक्त व युद्धानंतर आय्. ए. एफ. (इंडियन आर्म्‌ड फोर्सेस) चे प्रमुख प्रतिनिधी म्हणून ऑस्ट्रेलिया येथे नेमणूक करण्यात आली होती. ते १९४७ मध्ये भारतात परतले.

भारतीय वायुदलात त्यांनी अनेक महत्त्वांच्या पदांवर कामे केली. उदा., चीफ ग्राउंड इन्स्ट्रक्टर, एअर फोर्स फ्लाईंग कॉलेज (१९४७) कमांडंट एअर फोर्स अकादेमी (१९४७ ते १९५०) कमांडेड नंबरटू ग्रांउंड ट्रेनिंग स्कूल, तांबरम्‌ (१९५० ते ५३) सीनिअर एअर स्टाफ ऑफिसर, ऑपरेशनल कमान्ड (१९५४ ते १९५८) कमांडेड आर्मामेन्ट ट्रेनिंग विंग, जामनगर (१९५८ ते १९६०) डीन ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेन्ट स्टडीज, खडकी (१९६०–६३) डेप्युटी चीफ ऑफ एअरस्टा फ (१९६९–७१) अध्यक्ष हिंदुस्थान एअरॉनॉटिक्स लि. बंगलोर (१९७१ ते १९७३). पुढे ते जानेवारी १९७३ ते जानेवारी १९७६ पर्यंत भारताचे वायुसेनाप्रमुख होते. निवृत्तीनंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल (३ नोव्हेंबर १९८० ते ५ मार्च १९८२ पर्यंत) व त्यानंतर ते राजस्थानचे राज्यपाल (६ मार्च १९८२ ते ३ नोव्हेंबर १९८५ पर्यंत) होते.

त्यांना पद्मविभूषण (१९७७) तसेच भारतीय वायुदलातील कामगिरीबद्दल परम विशिष्ट सेवा पदक (१९६९) हे सन्मान मिळाले. गोल्फ, गिरिभ्रमण, संगीत व बागकाम हे यांचे आवडते छंद आहेत. ते उत्कृष्ट क्री डापटू असून मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे गेलेल्या ऑलिंपिक हॉकी संघाचे व्यवस्थापक होते (१९५६). तसेच भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९७५–८०) व एशियन गेम्स फेडरेशनचे अध्यक्षपदही (१९७८–८०) त्यांनी भूषविले होते.

त्यांची पत्नी सत्त्या मेहरा वायुदलाच्या विविध सामाजिक कल्याणाच्या संघटनांमधून कार्य करीत असून त्या गेल्या काही वर्षांपासून ‘विद्यार्थी एकता’ या संघटनेच्या प्रमुख आहेत. ‘भारतीय बालकल्याण परिषद’ व ‘वयोवृद्धांची काळजी’ (एज केअर इंडिया, राजस्थान) या संस्थेच्या त्या प्रमुख आहेत. ते राजस्थानच्या राज्यपाल पदावरून नोव्हेंबर १९८५ मध्ये निवृत्त झाले.

बोराटे, सुधीर आपटे, मु. दि.