क्षेपणास्त्रे : (मिसाइल्स) . शीघ्रगतीने अत्यंत अचूकपणे स्फोटकाग्राचा मारा करणारे अभिकल्पित रॉकेट-गतिवर्धक अस्त्र. बहुतेक सर्व क्षेपणास्त्रांत काहीतरी मार्गदर्शक प्रपत्रता आणि नियंत्रित यंत्रणाअसते. म्हणून या क्षेपणास्त्रांचा निर्देश सामान्यतः किंवा नेहमीच मार्गदर्शित क्षेपणास्त्रे (गायडेड मिसाइल्स) किंवा दिग्दर्शित क्षेप्यास्त्र असा करतात. हे एक विशिष्ट प्रकारचे स्वयंवाहक युद्धोपयोगी अस्त्र असून ते भाडेवजन (पेलोड) घेऊन नियुक्त लक्ष्यावर आघात करते. याचे नियंत्रण अंतर्गत संगणकाद्वारे केले जाते. क्षेपणास्त्राच्या अभिकल्पात प्रक्षेप पथ (ट्रॅजेक्टरी), स्फोटक मुख किंवा स्फोटकाग्र (वॉरहेड), अभिसीमा (पल्ला), लक्ष्य (टार्गेट), वेग आणि क्षेपण चबुतरा यांचा साकल्याने विचार केला जातो. तसेच क्षेपणास्त्रातील परिचालन पद्धतीला अंतिम टप्पा गाठण्यासाठी स्फोटक मुख, अभिसीमा आणि वेग यांवर लक्ष केंद्रितकरावे लागते. क्षेपणास्त्राचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक, मार्गदर्शित (मार्गक्रमित) क्षेपणास्त्र व दोन, प्रक्षेपी (बॅलिस्टिक) क्षेपणास्त्र. क्षेपणास्त्रे रॉकेट किंवा जेट एंजिनाद्वारे परिचालितात. द्रव किंवा घन इंधनाद्वारेजेट/रॉकेट एंजिने कार्यरत होतात. काही क्षेपणास्त्रांच्या रॉकेटमध्ये संमिश्र इंधन तंत्रज्ञानाचा परिचालनासाठी उपयोग करतात. लष्कराच्या उपयोगासाठी जी क्षेपणास्त्रे वापरली जातात, त्यांच्या रॉकेट्समध्ये प्रामुख्याने घन इंधन वापरतात कारण त्यामुळे रॉकेटचा स्फोट होण्याची शक्यता कमी असते. 

जर्मननिर्मित पहिले क्षेपणास्त्र : व्ही-१.

क्षेपणास्त्राची मूळ संकल्पना अग्निबाण किंवा रॉकेट या प्राचीन अस्त्रावर आधारित असली, तरी त्याचा शोध, बांधणी, युद्धोपयोग आणि प्रगती ही सर्व आधुनिक काळातील, विशेषतः विसाव्या शतकातील आहेत आणि त्याच्या वैकासिक प्रगतीत जर्मनी या राष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. दुसऱ्या महायुद्धात (१९३९–४५) मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा प्रत्यक्षात वापर सुरू झाला. या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर्मनीने क्षेपणास्त्रे बनविली आणि त्यांचा चपखल उपयोग करून यूरोपमधील अनेक शहरे उद्ध्वस्त केली. त्यात वित्तहानीबरोबर जीवितहानीही झाली. ही क्षेपणास्त्रे जर्मनीच्या युद्धशास्त्रात व्ही-१ आणि सुधारित आवृत्ती व्ही-२ या नावांनी प्रसिद्ध असून व्ही-१ हे ७.६ मीटर लांब व एक टन स्फोटक द्रव्य वाहून नेणारे यान असून त्याचा वेग ताशी ५८० किमी. होता तर व्ही-२ चा वेग ताशी ५,३०० किमी. होता. पुढे शीतयुद्धाच्या काळात क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत सुधारणा होऊन आंतरखंडीय मार्गदर्शित क्षेपणास्त्रे पाश्चात्त्य देश बनवू लागले आणि अणुबाँब-हायड्रोजन बाँब वाहून नेणारी व लक्ष्यावर अचूक मारा करणारी, रॉकेट्सद्वारे कार्यरत असलेली क्षेपणास्त्रे बनविली जाऊ लागली. त्यांचा अचूकपणा इतका काटेकोर असे की, ती पूर्व-निर्धारित मार्गापासून यत्किंचितही बाजूला सरकलेली नाहीत. ही रॉकेट-जेट परिचालित मार्गदर्शक क्षेपणास्त्रे अत्यंत संहारक बाँब कोणत्याही लक्ष्यावर टाकण्यास सक्षम असून दिवसेंदिवस त्यांची क्षमता व वेग वाढत आहे.या बाबतीत अमेरिका, फ्रान्स, इझ्राएल, जर्मनी, रशिया, चीन आदीदेशांनी लक्षणीय प्रगती केली आहे.

 

क्षेपणास्त्रांचे मार्गक्रमण सामान्यतः क्षेपण फलाटाचे स्थानक आणि लक्ष्यावर अवलंबून असते. ती कशी उडतात आणि कोणत्या लक्ष्यावर हल्ला करतात, यांनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. उदा., प्रक्षेपी क्षेपणास्त्रांचे वर्गीकरण लघू पल्ला, मध्यम पल्ला, मध्यवर्ती पल्ला आणि आंतरखंडीय असे करतात. ही लष्करी दृष्ट्या महत्त्वाची क्षेपणास्त्रे असून दूरवरचा प्रवासकरतात परंतु त्यांना दीर्घ उड्डाणांसाठी, उंची व योग्य तो वेग गाठण्यासाठी, मोठ्या प्रमाणात प्रणोदकांचा (प्रॉपेलंट) साठा बरोबर वाहून न्यावालागतो. त्यांच्या वजनात ९० टक्के वजन प्रणोदकांचे असते. त्यामुळेप्रक्षेपी क्षेपणास्त्रे सर्वांत मोठी असतात. अन्य सर्व क्षेपणास्त्रे अप्रक्षेपी असून त्यांचे चार प्रकार संभवतात : (१) भूपृष्ठभागावरून भूपृष्ठभागावर मारा करणारी, (२) भूपृष्ठभागावरून हवेत मारा करणारी, (३) हवेतून हवेत मारा करणारी आणि (४) हवेतून भूपृष्ठभागावर मारा करणारी.

क्षेपणास्त्रांच्या प्रभावी निर्मितीनंतर आणि त्यांच्या सततच्या वाढत जाणाऱ्या मारक व संहारक क्षमतेनंतर साहजिकच या क्षेपणास्त्रांपासून आपल्या प्रदेशाला वाचविण्याची गरज सर्वच देशांना वाटू लागली आहे. त्यातूनच या क्षेपणास्त्रांना भेदणाऱ्या दुसऱ्या क्षेपणास्त्रांची निर्मिती झालीआहे व होत आहे. सांप्रत विविध देशांच्या ‘मिसाइल डिफेन्स सिस्टिम’द्वारे ही अत्याधुनिक प्रक्रिया साधली गेली आहे. काही देशांच्या संघर्षांत ( व्हिएटनाम युद्धे) या तंत्राचा प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणात झाला. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि तिची मित्र राष्ट्रे यांनी विविध प्रकारची मार्गदर्शक क्षेपणास्त्रे इराणच्या आखाती युद्धात (१९९१) उपयोगात आणली. याशिवाय अमेरिकेने इराकी युद्धात (२००३–१०) इराकच्या प्राणघातक रासायनिक व विषारी वायू पसरविणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्रांचा अचूक मारा केला. पुढे अमेरिका व नाटोराष्ट्रांनी शेकडो मार्गदर्शक क्षेपणास्त्रे लिबियन लष्कराच्या तळांवर हल्ला करण्यासाठी वापरली. अलीकडे मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा आतंकवादी व घुसखोर यांविरुद्ध सर्रास उपयोग केला जातो. ‘ड्रोण’ या मनुष्यविरहित क्षेपणास्त्राचा उपयोग अमेरिका अफगाणिस्तान व पाकिस्तान यांतील तालिबान व अल्-कायदा या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी करीत आहे (२०१४-१५). लघु पल्ल्याच्या ‘आयर्नडोम ‘सारख्या रॉकेटभेदी यंत्रणेसारखी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रभेदीयंत्रणा रशिया, अमेरिका, इझ्राएल, फ्रान्स या देशांनी विकसित केलीआहे. या बाबतीत चीन व भारत हे देशही फारसे मागे नाहीत. त्यांनीहीहे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

क्षेपणास्त्रनिर्मितीमध्ये भारत जवळजवळ स्वयंपूर्ण झाला आहे. भारताचा ‘इंटेग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलप्मेन्ट प्रोग्रॅम’ (आय्जीएम्डीपी) याला १९७०–७२ या कालावधीत तत्त्वतः मान्यता मिळाली परंतु प्रत्यक्षात त्याची कार्यवाही १९८० मध्ये सुरू झाली. भूतपूर्व राष्ट्रपती व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी रोहिणी उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडताना आय्जीएम्डीपीची आवश्यकता बोलून दाखविली होती. तत्कालीन संरक्षणमंत्री के. सी. पंत आणि नंतर वेंकटचलम यांनी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमास निधी उपलब्ध करूनदिला, तेव्हा पृथ्वी हे क्षेपणास्त्र १९८८ मध्ये चाचण्यांद्वारे यशस्वी झाले.


 

भारतीय बनावटीचे पहिले क्षेपणास्त्र : पृथ्वी.
 

ते जमिनीवरून शत्रूच्या जमिनीवरील लक्ष्यावर मारा करणारे, लढाऊ डावपेच कार्यवाहीत आणणारे प्रक्षेपी क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला १५० ते ७५० किमी. इतका आहे. त्यानंतर अल्पावधीतच भारताने अग्नी ह्या क्षेपणास्त्राची निर्मिती १९८९ मध्ये केली आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र बनविणाऱ्या निवडक चार देशांच्या पंक्तीत भारताच्या अग्नी-१ ने स्थान पटकाविले. यानंतर अग्नीच्या अनुक्रमे २, ३, ४ अशा प्रतिकृतींच्या यशस्वी चाचण्या झाल्यानंतर भारताने अग्नी-५ या शक्तिशाली आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची निर्मिती करून त्याची यशस्वी चाचणी १९ एप्रिल २०१२ रोजी करून जगातील निवडक पाच देशांबरोबरीचे (इझ्राएल, अमेरिका, फ्रान्स, रशिया व चीन) स्थान मिळविले. अग्नी-५ चा पल्ला ५,००० किमी. इतका प्रचंड आहे आणि १.५ टन वजनाची अणुगर्भीय स्फोटाकाग्रे (न्यूक्लीअर वॉरहेड) वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. त्याचे मार्गक्रमण तीन टप्प्यांत आपल्या लक्ष्याकडे होते. त्याची उंची ५० मीटर असून वजन ४९ टन आहे. याशिवाय भारताने त्रिशूल हे लघू पल्ल्याचे क्षेपणास्त्र तयार केले असून त्याचा पल्ला १५० ते ३०० किमी. आहे. तसेच आकाश हे क्षेपणास्त्र बनविले असून ते जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी उत्तम आहे. हवाई दलाचे सर्व तळ शत्रूच्या विमान हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ते भारतीय हवाई दलाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. नाग हे आणखी एक क्षेपणास्त्र रणगाडे नष्ट करण्यासाठी विशेषतः वापरले जाते. त्याचा पल्ला १ ते ८ किमी. एवढा असून अँटी-टँक मिसाइलसदृश हे क्षेपणास्त्र उपयोगी पडते. अँटी-टँक हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र असून त्याचा अभिकल्प अशा पद्धतीने केलेला असतो की, रणगाडा नष्ट करून ते इतर चिलखती दलावर हल्ला करते. त्याला हेलिकॉप्टर किंवा साधी लष्करी विमाने परिचालनासाठी चालतात. धनुष हेही एक क्षेपणास्त्र भारतीय शास्त्रज्ञांनी बनविले आहे. ते नौदलाच्या जहाजावरून शत्रूंची जहाजे व पाणबुड्यांवर मारा करते. क्षेपणास्त्रे विविध प्रकारची असून त्यांची क्षमता व अभिकल्प वेगळे असतात. पृथ्वी-१, पृथ्वी-२, अग्नी-१, अग्नी-२, धनुष इ. प्रक्षेपी क्षेपणास्त्रे असून भारताच्या संरक्षण दलांत सद्यःस्थितीत ती कार्यवाहीत आहेत.

भारत दहा हजार किमी.हून अधिक दूरपर्यंत मारा करणारे आंतरखंडीय प्रक्षेपी क्षेपणास्त्र बनविण्यासाठी सक्षम असल्याचे ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलप्मेन्ट ऑर्गनाय्झेशन ‘च्या (डीआर्डीओ) शस्त्रास्त्र संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस्. के. सलवन यांनी एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानावर आधारित सहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अग्नी-६ या आवृत्तीवर सांप्रत डीआर्डीओ संशोधनकरीत आहे. त्याचबरोबर त्याच्या भुयारी मॉडेलवरसुद्धा संशोधन व अभ्यास सुरू आहे. लेसर तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांवर आयातबंदी उठविल्यानंतर लेसर तंत्रज्ञानात स्वावलंबी असलेल्या अमेरिका, ग्रेट ब्रिटन आणि काही मोजक्या देशांच्या यादीत भारताचा अंतर्भाव झाल्याचेडॉ. सलवन यांनी स्पष्ट केले.

‘सुपरसॉनिक’ क्षेपणास्त्र : ब्राह्मोस.
 

भारताने रशियाच्या सहकार्याने ब्राह्मोस या ‘सुपरसॉनिक’ (वेग, माक २-३) क्षेपणास्त्राची निर्मिती केली असून त्याचा समावेश भूदल व नौदल यांमध्ये केला गेला आहे. हे क्षेपणास्त्र भूपृष्ठावर व सामुद्री तळावर जलदगतीने मारा करू शकते. या क्षेपणास्त्राची ‘हायपरसॉनिक’ (ब्राह्मोस II वेग, माक ५–७) ही आवृत्ती रशियाच्या मदतीने विकसित करण्याचे प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञ करीत आहेत.

‘आयर्न डोम’ या रॉकेटभेदी यंत्रणेला मिळालेल्या यशामुळे या तंत्राची चर्चा क्षेपणास्त्री तंत्राचा विकास करणाऱ्या राष्ट्रांमध्ये आढळते. इझ्राएलच्या ‘राफेल’ या कंपनीने ते तयार केले आहे. लघू पल्ल्याच्या ‘डोम ‘सारख्या रॉकेटभेदी यंत्रणेसारखी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रभेदी यंत्रणाही अमेरिका, रशिया, फ्रान्स, इझ्राएल अशा मोजक्या देशांनी विकसित केली आहे.भारत आणि चीन या देशांनीही हे तंत्रज्ञान विकसित केले असून त्याच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. भारताने २००६ मध्ये क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेतली. त्यानंतर अनेक यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. त्यासाठी पृथ्वी एअर डिफेन्स (पीएडी) आणि ॲडव्हान्स एअर डिफेन्स (एएडी) या दोन क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रांचावापर करण्यात आला. पीएडी आणि एएडी यांद्वारे वातावरणाच्या आतील ५० किमी. उंचीपर्यंत (एंडोॲटमॉस्फिरिक) आणि बाहेरील ५० ते ८० किमी.पर्यंत (एक्झोॲटमॉस्फिरिक) चाचण्या घेण्यात आल्या. एप्रिल २०१४ मध्ये पृथ्वी डिफेन्स व्हीइकल (पीडीव्ही) या क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्राची (इंटरसेप्टर मिसाइल) चाचणी यशस्वी रीत्या घेण्यात आली. ही चाचणी १२० किमी. उंचीसाठीची होती. शत्रूचे क्षेपणास्त्र दोन हजार किमी. अंतरा-वरून डागण्यात आल्यानंतर त्याला भेदण्याची क्षमता तपासण्यासाठी ही चाचणी होती. त्यामुळे क्षेपणास्त्र संरक्षण क्षेत्रात भारताने केलेली प्रगती आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.

भारतामध्ये क्षेपणास्त्र नेस्तनाबूद करणाऱ्या क्षेपणास्त्रभेदी तंत्राची व यंत्रणेची निर्मिती झाली असली, तरी त्यामध्ये अचूकता साधणे आवश्यक आहे कारण एकापेक्षा अधिक लक्ष्यांना एकाच वेळी भेदणाऱ्या क्षेपणास्त्रांचा (मल्टिपल इन्डिपेन्डन्टली टार्गेटेबल रिएंट्री व्हीइकल, एम्आय्आर्व्ही) मारा झाला, तर त्याला भेदण्यासाठी एकापेक्षा अधिक क्षेपणास्त्रांची आवश्यकता लागते. शत्रूचे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे, ते किती अंतरावरून व कोठून डागण्यात आले आहे, त्याची मारक व संहारक क्षमता किती आहे, याची आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, विशेषतः रडार आणि ट्रॅकिंग यंत्रणेद्वारे, माहिती घेऊन तत्काळ काही सेकंदांतच त्याला भेदणाऱ्या क्षेपणास्त्राची योजना करावी लागते. क्षेपणास्त्राचा वेग सेकंदाला काही किमी. (गती, माक ४-५) असल्यामुळे यंत्रणेमध्ये अचूकता राखणे हे काम किती कठीण आहे, याची जाणीवहोते. ‘आयर्न डोम’ हे रॉकेटभेदी असल्याने त्याला एम्आय्आर्व्हीचीबाब लागू पडत नाही तथापि या यंत्रणेद्वारे अचूकता साधणे निश्चितच आव्हानात्मक आहे. सांप्रत आधुनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीबरोबरच क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या विकासाकडे बहुतेक राष्ट्रांनी लक्ष केंद्रित केले आहे.

देशपांडे, सु. र. पाटणकर, गो. वि.