टाटू व टूर्नामेंट, सैनिकी : रात्री सु. साडेनऊ-दहाच्या वेळी पडघम, बिगुल किंवा ट्रंपेट वाजवून, सैनिकांना छावणीकडे परतण्याची सूचना देणे म्हणजे टाटू होय. सैनिकांना दारूचे गुत्ते बंद झाल्याची आज्ञा करणे असाही टाटूचा उद्देश आहे. सतराव्या शतकात ब्रिटिश सैन्यात ही प्रथा प्रथम सुरू झाली. त्या काळी सैन्यामध्ये ब्रिटिशांबरोबर इतर देशांतील भाडोत्री व पोटभरू सैनिकांचाही भरणा मोठ्या प्रमाणावर होई. अशा भाडोत्री सैनिकांवर नियंत्रण ठेवणे टाटूमुळे शक्य होत असे. पडघम वाजविताना ‘डू डेन टप टू’ असा ध्वनी होतो, त्याचेच शब्दांतर म्हणजे टाटू, हे होय. अमेरिकेत ‘तोटी बंद करा’ (टर्न द टॅप ऑफ) असे म्हटले जाई. या परंपरेतूनच एकोणिसाव्या शतकात दिवट्या-मशालींच्या प्रकाशात प्रतिवर्षी सैनिकी वाद्यवृंदाच्या साथीत सैनिकी खेळ व कसरती सुरू झाल्या. या खेळांनाही टाटू म्हणण्याचा प्रघात पडला. ब्रिटनमध्ये ऑल्डॅरशॉट व वुलिच येथील छावण्यांत प्रतिवर्षी टाटू साजरे होतात. भारतात स्वातंत्र्योत्तर काळात एप्रिल १९४८ मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडांगणावर जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत प्रथमच टाटू साजरा झाला होता. सर्व सेनाशाखांनी व वाद्यवृंदांनी त्यात भाग घेतला होता. अप्रतिम प्रकाशयोजना, सैनिकी खेळ, संचलने आणि छत्रीधारी सैन्याच्या उड्या व सैनिकी सामग्रीचे प्रदर्शन असे या टाटूचे स्वरूप होते. आता जरी दर वर्षी टाटू साजरा होत नसला, तरी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या समारोप प्रसंगी सूर्यास्ताच्या वेळी टाटूसारखे संचलन वा वाद्यवृंदसंगीत इ. कार्यक्रम होतात. त्याच्या शेवटी राष्ट्रगीत आणि अंतिम बिगुल (लास्ट पोस्ट) या कार्यक्रमांनी त्याची सांगता होते. हा सर्व कार्यक्रम भारताच्या राजधानीत विजय चौकात होतो.

घोडदळातील सैनिकांची कसरत, प्रजासत्ताक दिन, दिल्ली, १९५०.

सैनिकी कसरतीचे दृश्य, जम्मू, १९७६.

टूर्नामेंट : एक प्रकारची चढाओढ किंवा स्पर्धा. दोन योद्ध्यांचे सशस्त्र द्वंद्व किंवा दोन युद्धसंघांत शस्त्राने खेळल्या जाणाऱ्‍या चढाओढी असे टूर्नामेंटचे स्वरूप आहे. प्राचीन काळी एखाद्या बक्षिसासाठी किंवा टूर्नामेंटकरिता निवड झालेल्या स्त्रीच्या कृपादृष्टीसाठी या चढाओढी होत असत. १०६६ च्या सुमारास फ्रान्समध्ये जिओफ्रांय द प्रेयुल्ली याने या प्रकारच्या चढाओढींना सुरुवात केली. या चढाओढीत घोडेस्वार तलवारीने लढत. साहजिकच त्यात ते मृत्यू पावत. हे टाळण्यासाठी चढाओढीकरिता पुढे नियम करण्यात आले. ११३० मध्ये पोप दुसरा डन्नोसेंट व १२७९ मध्ये पोप तिसरा निकोलस या दोघांनी या चढाओढींचा निषेध केला. इंग्लंडमध्ये दुसऱ्‍या हेन्रीने चढाओढींवर बंदी घातली. याचे कारण चढाओढीसाठी इंग्लंडमधील बहुतेक सरंजामदार व सरदार एकत्र होत. त्यांच्याकडून राजाला धोका होण्याचा संभव असे. शिवाय दंगेधोपे होण्याची देखील शक्यता असे. त्यामुळे राजाकडून परवानगी मिळाल्याशिवाय चढाओढी करणे हा गुन्हा ठरविला गेला. तथापि होतकरू योद्धे व सरदार यांना युद्धाचा अनुभव मिळावा म्हणून तलवारी, भाले इ. धारहीन करून चढाओढी चालू ठेवण्यात आल्या. पुढे चढाओढींना सामाजिक मेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. राज्यारोहण किंवा राजघराण्यातील विवाहप्रसंगी जे सरदारदरकदार गोळा होत, त्यांच्यात लुटुपुटीच्या शस्त्रांनी द्वंद्वयुद्धे होत. पुढे या चढाओढींना अश्वारोहण समारंभाचे स्वरूप आले. सुंदर स्त्रियांचे लक्ष वेधून घेणे, हे अश्वारोहकांचे उद्दिष्ट असे. आजही ‘अश्वारोहण चढाओढी’ प्रतिवर्षी होतात. भारतात दिल्ली येथे लाल किल्ल्यासमोर या चढाओढी होतात. या चढाओढीत सैनिक तसेच इतरही भाग घेतात. ऑलिंपिक क्रीडासामन्यात अश्वारोहणाचा अंतर्भाव आहे.

 

दीक्षित, हे. वि.