विमानातून अवकाशात उतरलेले हवाई छत्रीधारक

हवाई छत्री :(पॅरशूट ). मानवाला विमान वा तत्सदृश हवाई जहाजातून अंतराळात उडी मारून जमिनीवर सुखरूपपणे उतरण्यास साहाय्यकारक ठरणारे छत्रीसदृश साधन. या साधनाचा मुख्य उद्देश अवकाशातून संथ गतीने वातावरणाशी जुळवून घेऊन हळुवारपणे जमिनीवर उतरणे होय. हवाई छत्रीचा उपयोग नुकत्याच जमिनीवर उतरलेल्या विमानाचा वेग कमी करण्यासाठीही होतो. हवाई छत्रीद्वारे जड वाहने वा अन्य लष्करी सामग्री सुरक्षितपणे जमिनीवर सोडता येते. अवकाशयानांनाही सुरक्षितपणे पृथ्वीतलावर, विशेषतः पाण्यात, उतरण्यास हवाई छत्री उपयुक्त ठरली आहे. हवाई छत्री फक्त लष्कर किंवा हवाई वाहतुकीसाठीच वापरतात असे नाही तर अनेक लोक तिचा करमणुकीसाठी एक छंद वा खेळ म्हणूनही वापर करतात मात्र या हवाई छत्र्यांची रचना वेगळी असते. त्यात छत्रीच्या उघड-झापीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा असून दिशानियंत्रकाद्वारे (स्टिअरिंग) इच्छित जागी उतरता येते.

 

ऐतिहासिक पार्श्वभूमी : चिनी हवाई कसरतीचा व हवाई छत्री-सारखे साधन वापरल्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे (१३०६). लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) या चित्रकाराने पिरॅमिडसदृश हवाई छत्रीचे रेखाटन केले होते. बी. ब्लॅन्चर्ड नावाच्या (१७५३–१८०९) फ्रेंच वैमानिकाने पहिली हवाई छत्री तयार केली व उंच गेलेल्या फुगेरी विमानातून त्याने प्रयोगादाखल या छत्रीला एक कुत्रा बांधून खाली सोडले. पुढे १७९३ मध्ये त्याने स्वतः हवाई छत्रीचा उपयोग केला परंतु त्यात तो जखमी झाला. त्यानंतर २२ ऑक्टोबर १७९७ रोजी पॅरिसमध्ये जे. गार्नेरिन नावाच्या फ्रेंच वैमानिकाने ६०० मी. उंचीवरील फुगेरी विमानातून उडी घेतली. त्यानंतर २१ सप्टेंबर १८०२ रोजी त्याने असेच प्रात्यक्षिक इंग्लंडमध्ये दाखविले. त्या वेळी त्याने २,४०० मी. उंचीवरून उडी घेतली होती. त्याची सु. सात मी. परिघाची कॅन्व्हसची बनविलेली छत्री असून तिच्या मधोमध २५ सेंमी. व्यासाचा लाकडाचा तुकडा होता. त्याच्यात व छत्रीत हवा निघून जाण्याकरिता लहानसे भोक होते. यानंतर पोलंडमध्ये व इंग्लंडमध्ये हवाई छत्री बन-विण्याचे प्रयत्न झाले. विमानामधून हवाई छत्रीसह पहिली यशस्वी उडी १९१२ मध्ये कॅप्टन बेरीने सेंट लुईस (अ. सं. सं.) येथे घेतली. पहिल्या जागतिक महायुद्धात, विशेषतः हवाई युद्धात, निकामी झालेल्या विमानातून स्वबचावाकरिता उडी घेण्याची प्रथा फक्त जर्मन वैमानिकांनी युद्धाच्या शेवटी शेवटी पाडली. परंतु स्थायी फुगेरी विमानांमधून मात्र निरीक्षक आपल्या निरीक्षणाची वेळ झाली की, छत्रीच्या साहाय्याने खाली उतरत असत. बैठकीखाली हवाई छत्रीची घडी करून त्यावर विमानात बसण्यासाठी जागा होई. अमेरिकन हवाई दलाने उड्डाणांत १,५०० प्रयोग केल्यानंतर हवाई छत्री साधारण वैमानिक सामग्री (इक्विपमेन्ट) म्हणून उपयोगात आणली. यानंतर इटालियन व रशियन सैन्यांत तिच्या रचनेत बरीच सुधारणा झाली. नागरिकी विमानोड्डाणात मात्र पहिल्यापासून तिचा उपयोग निषिद्ध राहिला.

 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९३९–४५) विमानांची गती वाढली आणि लष्करी हवाई दलाचा वापरही वाढला. परिणामतः हवाई छत्रीच्या वैमानिक आधुनिकीकरणास चालना मिळाली आणि त्यातूनच हवाई छत्रीच्या वायुगतिकीय शास्त्राचा जन्म झाला. अनेक वैशिष्ट्यपूर्ण हवाई छत्र्यांचे अभिकल्प निर्माण झाले.

 

हवाई छत्रीची रचना व उपयोग : हवाई छत्रीचा आकार घुमटाकार असून विशिष्ट प्रकारचे रेशीम किंवा नॉयलॉनच्या कापडापासून ती तयार करतात. तिची शिवण मजबूत असून एखाद्या ठिकाणी फाटले, तर ती लहान तुकड्यापलीकडे धसत नाही. दोऱ्या अत्यंत मजबूत रेशमी असून घडी उघडताना त्यांचा गुंता होत नाही. खोगीर विशिष्ट प्रकारच्या कॅन्व्हसचे व कडी न गंजणाऱ्या (स्टेनलेस) पोलादाची असते. जमिनीवर पाय टेकताच हवाई छत्री पटकन मोकळी करता येईल, अशी तिची रचना असते. पाश्चिमात्य देशांत अनेक ‘पॅराक्लबङ्ख आहेत. काही वर्षांपूर्वी बनीर मँकफेडन नावाच्या प्रसिद्ध निसर्गोपचारकाने आपल्या ऐंशीव्या वाढदिवसाला हवाई छत्रीने उडी घेतली. हवाई छत्रीधारी व्यक्तीने जमिनीवर उतरण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे कारण विमानातून अंतराळात उडी घेताना तांत्रिक ज्ञान नसेल, तर अपघात होण्याची शक्यता असते.

 

हवाई छत्रीच्या आवेष्टनाचे पुढील चार प्रकार आहेत : १. आसन आवेष्टन : नावाप्रमाणेच याच्यावर बसता येते व दोन्ही हात हाल-चालीला मोकळे राहतात. छत्रीचा आकार ४ ? ४.५ मी., वजन सु. ९.७० किग्रॅ. (छत्रीसकट), व्यास ७.३ मी. हे छत्रीधारी सैनिक वापरतात तर लठ्ठ माणसांसाठी ८.५ मी. व्यासाची छत्री असते.

 

. द्विबिंदू अलग करण्याजोगे आवेष्टन : ज्या वैमानिकाला विमानात तांत्रिक कार्याकरिता फिरावे लागते, त्याच्यासाठी हे असते. असा वैमानिक हवाई छत्रीची फक्त सामग्री खांद्यावर बाळगतो व तिचे बोचके सहज हाताशी लागेल अशा ठिकाणी ठेवतो. जरूर पडली की, तो ते बोचके चटकन लागणाऱ्या आकड्याने सामग्रीला जोडतो.

 

. प्रशिक्षार्थी आवेष्टन : ही आवेष्टने जोडीने येतात. ती ८.५ मी. व ६.७ मी. व्यासाची व मागे-पुढे लावली जातात. शिकविताना मोठी हवाई छत्री उघडतात कारण तिच्या आकारामुळे उतरण्याचा वेग मंद होत असतो व जमिनीवर पोहोचताना लागणारा धक्का सौम्य असतो. मोठी छत्री यदाकदाचित उघडली गेली नाही, तर लहान पटकन उघडता येते.

 

. फुग्याच्या धर्तीची हवाई छत्री : यात एक छोटी वैमानिक हवाई छत्री असते. छत्रीधारीने उडी घेतली की, त्याच्या धक्क्याने छोटी हवाई छत्री बाहेर येते व नंतर हळूहळू मोठी हवाई छत्री ओढली जाते. यामुळे छत्रीधारकाला फार ताण सहन करावा लागत नाही.

 

हवाई छत्रीचा सैनिकी उपयोग छत्रीधारी सैनिकांना शत्रुमुलखात उतरविणे, लढाऊ वैमानिकांनी आणीबाणीच्या प्रसंगी विमानाचा त्याग करून सुरक्षित खाली उतरणे व छत्रीच्या साहाय्याने रसद पुरविणे अशा अनेक प्रकारे विवक्षित आहे. शांततेच्या वेळी तसेच नैसर्गिक आपत्तींच्या वेळी हवाई छत्रीच्या साहाय्याने अन्नधान्याचा पुरवठा करता येतो. तसेच लष्करी कुमक पाठविणे, वैद्यकीय दल उतरविणे या गोष्टी शक्य होतात. द्रुतगतीने चालणाऱ्या विमानांना विमानतळावर उतरताना रोखून धरण्यासाठी विमानाच्या पिछाडीला बांधलेली हवाई छत्री (ब्रेकिंग पॅरशूट) उघडतात.


 

विमानाचा वेग नियंत्रीत करणारी हवाई छत्री

हवाई छत्रीचा खेळ : हा खेळ म्हणजे अतिउंचावरून खाली उड्या मारण्याचा प्रकार नव्हे, तर आकाशातील ४,५०० मी. उंचीवरून जमिनीवर उडी मारण्याचा प्रकार आहे. त्यालाही शास्त्रीय बैठक आहे. नैसर्गिक आपत्तींशी सामना देत स्पर्धकाला खाली यावे लागते. मूळची हवाई छत्री ऐनवेळी नादुरुस्त होण्यातला धोका लक्षात घेऊन त्याला आणखी एक जादा हवाई छत्री दिली जाते. दिशा आणि उंचीदर्शक यंत्र तर आवश्यकच असते. क्वचित उडी जलाशयाच्या परिसरात पडण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याच्या पोशाखात एका ‘लाइफ जॅकेट ङ्खचाही समावेश केला जातो. ऑक्सिजनच्या बाटल्या तर अपरिहार्यच असतात. थोडक्यात, स्पर्धक हौस म्हणून खेळणारा केवळ क्रीडापटू आहे, याचे भान (इतर सर्वच हवाई खेळांसारखेच) हवाई छत्री खेळाडूच्या बाबतीत ठेवावे लागते.

एक हौशी हवाई छत्रीधारक

 

हवाई छत्री स्पर्धकांच्या सांघिक प्रकारात, नागमोडी वळण आणि दहीहंडीच्या मनोऱ्याची आठवण देणारी सहा हवाई छत्र्यांची उंच शिडी व प्रात्यक्षिके अपूर्व असतात. हवाई छत्रीच्या उड्यांच्या चढाओढीतून जे स्पर्धक त्यांच्या ‘लक्ष्या ङ्खच्या जेवढे जवळ असतील, तेवढी ती कामगिरी विजेतेपदावर अधिक हक्क सांगणारी ठरते. सर्वांत बाहेरच्या वर्तुळाचा परिघ ३५ मीटर्सचा, तर त्यातील सर्वांत मधले छोटे इलेक्ट्रॉनिक पॅड १६ सेंमी. आणि त्यावर मध्य-लक्ष्य ५ सेंमी. एवढे असते. जमिनीतून येणारे उष्ण वारे विमानांना अधिक उंची देण्यात नैसर्गिक रीत्या उपयुक्त ठरतात. त्याच तत्त्वाच्या आधारावर त्याच हवेला कृत्रिम रीत्या अधिक उष्णता देऊन एक अजस्र बलून तयार करण्यात संशोधकांना यश मिळाले आणि त्यातूनच हवाई क्रीडाक्षेत्राचे जणू एक नवे दालनच खुले झाले. ही नवी हवाई बलून्स ७९३ पासून ते ६,७९७ क्यूबिक मी. दरम्यानच्या आकारात उपलब्ध असून त्यांच्यावर हवेचा दाब, वेग अगर उंची सर्वकाही कमी-अधिक करण्याच्या झडपा आहेत. तसेच अनेक आधुनिक उप-करणेही आहेत. अर्थात त्यातली क्रीडास्पर्धात्मकता वेग-अंतर-उंची याच निकषांवर आधारलेली आहे. किंबहुना हा क्रीडाप्रकार अद्याप चढा-ओढीपेक्षा उत्सुकता आणि आगळे सौंदर्य यांतच अधिक गुंतलेला आहे. तसेच त्यातील तांत्रिकता हीसुद्धा क्रीडाकौशल्यांपेक्षा अधिक महत्त्वाची दिसते आहे. 

 

पहा : छत्रीधारी सैन्य.

 

संदर्भ : 1. Poynter, Dan, Parachuting : The Skydivers Handbook, New York, 1983.

            2. Shea-Simonds, Charles, The Complete Sport Parachuting Guide, Sterling, 1986.

 

टिपणीस, य. रा.