मायावरण, सैनिकी : संरक्षणासाठी करण्यात येणारी एक क्‍लूप्ती. याला छद्‌मावरण असेही म्हणतात. याचा मूळ उद्देश शत्रूची दिशाभूल करणे व त्यास फसविणे हा आहे. जे वस्तुतः आहे, ते तसे नाही व जे खरे नाही, ते खरे आहे असे शत्रूला भासवून आश्चर्यचकित करणे म्हणजेच मायावरण होय.

छद्‌मावरणाची कला ही एक निसर्गाची देणगी आहे. युद्धसमयी छद्‌मावरणामुळे लपवणूक शक्य होते आणि लपवणुकीमुळे शत्रूवर अनपेक्षित हल्ला करणेही शक्य ठरते. छद्‍मावरणामुळे सैनिक आपली शस्त्रास्त्रे वा वाहने लपवून ठेवून शत्रूला चकवितो, फसवितो व त्याच्यावर मात करू शकतो. छद्‌मावरण जर पद्धतशीर झाले तर प्राणही वाचविणे जमते. तसेच शत्रूचे एकेकटे सैनिक, मोर्चे वा तळ ओळखणे किंवा निश्चित करणे शक्य होत नाही.

वस्तू ओळखण्याचे प्रकार : वस्तू ओळखण्यासाठी त्या वस्तूचा आकार-बांधा, तिची सावली-पोत, रंग-हालचाल, चमक वा रंगसंगती यांचा उपयोग होतो. जे नैसर्गिक अवस्थेत असते, त्याची रचनाबांधणी ओबडधोबड असते. एकसारखेपणा, प्रमाणशीर आकार व बांधणी ही चिन्हे मनुष्यनिर्मित वस्तूंत असतात म्हणून अशा अनैसर्गिक वस्तूंचा सुगावा लागतो. त्या वस्तू लपविण्यासाठी सावलीचा उपयोग होतो. आकाशातून सावल्या चटकन ओळखता येतात. ज्या वस्तूचा बाह्यभाग खडबडीत असतो तिची सावली आतमध्येच पडते, तर गुळगुळीत वस्तूची सावली न पडता मोठ्या प्रमाणावर परावर्तीत होतो. छायाचित्रणामध्ये त्या वस्तू फिकट दिसतात. प्रत्यक्ष डोळ्याने व अप्रत्यक्षपणे म्हणजे आकाशातून घेतलेल्या छायाचित्रावरून वस्तूचे निरीक्षण करता येते.

छद्‍मावरणाची तत्त्वे : (१) लपण्याची वा मोर्च्याची जागा प्रारंभीच छद्‌मावरणाला योग्य अशी निवडणे. नैसर्गिक परिस्थिती तिला पूरक कशी ठरेल, हा दृष्टिकोन तिच्या निवडीमागे ठेवणे (२) शक्यतोवर पार्श्वभाग आणि आजूबाजूची परिस्थीती यांत बदल न करणे (३) जोडरस्ता वा एकटे झाड अशा ज्या गोष्टी छद्‌मावरणासाठी उपयोगी नाहीत, त्या टाळणे (४) खाच-खळग्यांचे भूक्षेत्र उत्तम असल्याने ते अवलंबविणे. (५) छद्‌मावरण यशस्वी होण्यासाठी त्या जागेभोवतीची हालचाल टाळणे. पायवाटा, खणलेल्या जागा व त्यांची माती, केरकचऱ्याचे ढीग वा धूर यांमुळे शत्रूला सुगावा लागू न देणे.

छद्‌मावरणाची कृती : छद्‍मावरणासाठी तेथील नैसर्गिक वस्तू उदा., पाने-फांद्या वगैरेंचाच उपयोग करावा लागतो त्यामुळे त्यांस त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत ठेवणे इष्ट ठरते. सूर्योदय व सूर्यास्त, ऋतुचक्र, सावल्या कशा पडतात हे लक्षात घेवूनच छद्‌मावरणाचे काम करावे लागते.

छद्‌मावरणाची पद्धती : एकरूप करणे (ब्‍लेडिंग)-यात ज्या वस्तूला लपवून ठेवावयाचे असते तिच्यासाठी छद्‌मावरणाचे साधन वापरून तिला पार्श्वभागाशी व आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप करून टाकण्यात येते. लपविणे-यामध्ये संबंधित वस्तूभोवती पडदे, जाळी किंवा आवरणे वापरून तिची ओळख पटू न देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. फसविणे-या खऱ्या वस्तूसारखीच दुसरी नकली वस्तू तयार करतात. ज्या कार्यक्रमाला लष्करी महत्त्व असते त्याची नक्कल करणे किंवा दुसऱ्या स्वरूपात तो चालू ठेवणे हल्ल्याचे विभाजन करण्यासाठी मुद्दाम जास्ती लक्ष्ये दाखवून त्यांवर हल्ला ओढवून घेणे किंवा शत्रूचे लक्ष महत्त्वाच्या वस्तूवरून दुसरीकडे वळविणे इ. प्रकार येतात.

कापडाच्या पट्ट्या व जाळे यांनी आच्छादिलेली रणगाडाभेदी तोफ.

छद्‌मावरणाची साधने व सामान : नैसर्गिक-जागेवरच मिळणाऱ्या वस्तू फार उपयुक्त ठरतात. उदा., पाने-फांद्या, काट्या वगैरे. या दृष्टीने जिवंत झाडेझुडपे वा हिरवळ यांची लागवड करून ती उगवू देतात. मोडतोडीचा माल, दगड-मातीचे ढीग हेही वापरण्यात येतात.कृत्रिम वस्तू-विविध प्रकारची जाळी, कोंबड्यांच्या खुराडी जाळ्या, वातावरणाला व आजूबाजूच्या वस्तुस्थितीला शोभून दिसणाऱ्या हिरव्या-पिवळ्या वा इतर रंगांच्या कापडपट्‌ट्या हा पक्का माल यांत वापरतात. जाळी व पट्‌ट्या प्रत्येक गाडीबरोबर आणि मोर्च्याकरिता असतात. मायावरणामुळे संबंधित वस्तूंचा बाह्याकार ओबडधोबड होऊन त्या ओळखणे कठीण होऊन बसते. जाळ्यांना पट्‌ट्या जोडणे ही एक कला आहे. साधारणपणे जाळ्याच्या मध्यभागात ८०% व टोकांना १०% पट्‌ट्या जोडतात त्यामुळे जाळे आजूबाजूच्या परिस्थितीशी मिसळून जाऊन वस्तू ओळखणे शक्य होत नाही.

इतिहास : छद्‌मावरणाचा प्रारंभ इंग्‍लंडचा राजा आठवा हेन्‍रि याच्या कारकीर्दीत (१५८४) झाला. वनात लढणाऱ्या सैनिकांनी फिक्कट हिरव्या रंगाचा पोशाख घालावा असे त्याने फर्माविले. हेरगिरी करण्याकरिता वेगवेगळी सोंगे घेण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालू आहे. शिवाजी महाराजांनी शत्रूला फसविण्यासाठी पुष्कळ हिकमती (उदा., बैलांच्या शिंगाला पेटत्या मशाली लावून सैन्याचा दुसराच मार्ग दाखविणे) योजल्या.


प्रथम महायुद्धकालीन मायावरण : पहिल्या महायुद्धात [→ महायुद्ध पहिले ] प्रथमच विमानातून रणभूमीची छायाचित्रे घेऊन तोफांचे मोर्चे, संरक्षणव्यवस्था वगैरेची माहिती गोळा करण्यास सुरूवात झाली म्हणून शत्रूची दिशाभूल करण्यासाठी व त्याला फसविण्याकरिता फ्रेंच तोफखान्यातील चित्रकारांनी तोफा लपविण्यासाठी उपाय सुचविले. १९१५ साली त्या उपायांना युद्धनेत्यांनी मंजूरी दिली. विमानांतून घेतलेल्या छायाचित्रांचा अर्थ लावणे व विश्लेषण करणे, ही एक नवीन कला जन्मास आली. तुडविलेले गवत म्हणजे पायवाटा, बिंदुवत् छाया म्हणजे दूरध्वनी वा तारायंत्रांचे खांब, पुसट सरळ रेषा म्हणजे त्यांच्या पुरलेल्या तारा, जमिनीवरील काळसर जळाल्यासारखा भाग म्हणजे तोफांचे मोर्चे, दूरध्वनीच्या तारांचा आरंभ व शेवट म्हणजे सैनिकी कार्यालये असे आडाखे बसविता येऊ लागले व दिवसेंदिवस छद्‌मावरणकला प्रगल्भ होऊ लागली. जाळ्यामध्ये पानेफांद्या लावून सावल्या पडण्याचे बंद झआले. रस्ते, मशीनगन व तोफांच्या मोर्चांना छद्‌मावरण घालून (जाळी, फांद्या वगैरे लावून) ते आजूबाजूच्या स्थितीशी एकरूप होतील असे उपाय केले. तरी सुद्धा कॅमेरा व चतुर विश्लेषक यांस फसविणे कठिण होते. व्यापारी व लढाऊ जहाजांना फिकट निळा रंग देत असत त्याऐवजी विरूद्ध व भडक रंग अनियमित पद्धतीने देणे सुरू झाले त्यामुळे जहाज जरी उठावदारपणे दिसू लागले, तरी अनियमित रंगामुळे पाणबुड्यांना त्यांचा खरा चलनमार्ग ठरविणे कठीण झाले. परिदर्शकामध्ये निरनिराळे रंगपटल वापरून व भडक रंगांचे प्रमाण कमी करून जहाजांचे केवळ तिमिरचित्र दिसणे शक्य केले. त्यानंतर पुनः जहाजांना निळा, काळा व पांढरा या रंगांचे छद्‌मावरण द्यावयास सुरूवात झाली. व्हर्डनच्या लढाईत तोफांचे जे मोठे व दीर्घ द्वंद्वयुद्ध झाले, त्यात फ्रेंच तोफांची हानी छद्‌मावरणामुळे खूपच कमी झाली. खंदकी रणतंत्रामुळे [→ खंदक युद्धतंत्र] सैनिकांच्या पोशाखांचे रंग खाकी, निळे, निळसर राखी किंवा हिरवे बनले.

छद्‌मावरण पुरे झाले म्हणजेच वस्तू ओळखणे शक्य होत नाही. मात्र छद्‌मावरणाचे काम चालू असताना ते कॅमेऱ्यापासून लपविणे कठीण असते. वरचेवर घेतलेल्या छायाचित्रांनी संगती लावून छद्‌मावरणयुक्त वस्तू ओळखणे शक्य असते. रणगाडे, तोफा इ. नकली लष्करी सामान तयार करून व शत्रूच्या लक्षात येण्यासारख्या सत्याभाशी ठिकाणी उभे करून, त्यांवर शत्रूचा विमानहल्ला वळवून घेण्याची आणी खरोखरच्या महत्त्वाच्या ठाण्यांचा बचाव करण्याची पद्धत पहिल्या महायुद्धात सुरू झाली, मात्र तिचा कौशल्यपूर्ण विकास दुसऱ्या महायुद्धात [→ महायुद्ध, दुसरे] फार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला.विशेषतः विमानतळावर लढाऊ विमानांच्या हुबेहुब प्रतिकृतींचे शत्रूचा विश्वास बसेल अशा रीतीने छद्‍मावरण करून, बाँबफेकी विमानांना वेधून घेण्यात, दोस्त राष्ट्रांनी पुष्कळ यश मिळविले. या महायुद्धात मशीनगनचा वापर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्यांसाठी परिणामकारक छद्‌मावरणाचे संशोधन, प्रात्यक्षिकांचा अनुभव घेऊन करण्यात आले ते इतके चांगले झाले की मशीनगन तर दिसतच नसे, पण गोळीबाराच्या वेळची चमकसुद्धा दुरून नजरेत भरत नसे.

एका मजेशीर फसगतीचा प्रकार यावेळी वापरण्यात येई. योद्यांची हुबेहुब तिमिरचित्रे कलाकार तयार करीत व त्या आकृतींना रणक्षेत्रातील शिपायांच्या विविध स्थितींत ठेवण्याची कळयोजना आखीत. शिपाई जणू काय लढत आहे आसा आभास उत्पन्न करून शत्रूचा गोळीबार या आकृतींकडे ओढून द्यावयाचा, हा या योजनेमागील उद्देश असे.

मायावरणाचे दोन प्रकार : वरील चित्रात विमान-तळावर कृत्रिम रस्ते तयार करून ग्रामीण स्वरूपाची आभासनिर्मिती केली आहे व खालील चित्रात झाढांच्या सहाय्यांने सीमेलगत विमानांचे गट करून ती ठेवली आहेत.

द्वितीय महायुद्धकालीन मायावरण : दुसऱ्या महायुद्धाचा विशेष म्हणजे ब्रम्हदेशातील व इतर जंगल युद्धांत [→ जंगल युद्धतंत्र] शिपायांचा केवळ गणवेशच फिकट हिरव्या (ऑलिव्हग्रीन) रंगात नसे, तर त्याची चिलखती टापीसुद्धा रंगवीत असत. पानगवत अंगावर ठेऊन जंगलात मिसळून जाण्याची पद्धत अमलात आली. प्रत्येक शिपायाला व अधिकाऱ्याला त्याच्या प्राथमिक लष्करी शिक्षणात छद्‌मावरणाचे ज्ञान प्रात्यक्षिकांनी देण्याची प्रथा त्यावेळी पाडण्यात आली होती. लपूनछपून गोळीबार करणारे तर या बाबतीत विशेष कुशल असत. नकली प्रतिकृती (डमी) वापरण्याची पद्धत सर्रास सुरू झाली. ती इतकी, की युद्धोपयोगी कारखान्यांच्या देखील प्रतिकृती निर्माण करण्यात आल्या. छद्‌मावरणी कलाकारांची लष्करात भरती करून त्यांना लष्करी छावण्यांमधून विखूरविण्यात आले. छद्‌मावरणात वापरण्यात येणाऱ्या रंगांचे, जाळ्यांचे व प्रतिकृतींचे प्रचंड उत्पादनही करण्यात आले. हिंदुस्थानाच्या वाट्याला या जिनसांच्या (विशेखतः तागाच्या जाळ्या व रंग) उत्पादनात भीव हिस्सा आला होता.

मरूस्थळांतील युद्ध : दुसऱ्या जागतिक महायुद्धात मध्य पूर्वेतील अनेक मरूस्थळांत प्रचंड युद्धे झाली. यापूर्वीच्या युद्धात शिपायांच्या गणवेशाच्या नीटनेटकेपणावर, विशेषतः धातूच्या सामानाच्या चमकेबद्दल फार कटाक्ष असे पण अनुभवानंतर असे आढळून आले, की सूर्याच्या प्रकाशात गणवेशाची व शस्त्रांची चमक फार दूरपर्यंत शत्रूच्या नजरेत भरून कूच करणाऱ्या सैन्याची उपस्थिती त्याच्या तोफखान्याचे लक्ष्य होई. या अनुभवानंतरच बुटांना चमकदार बनविणे बंद झाले. बंदुकी, मशीनगन व संगीन यांस मंद रंग देण्यास सुरूवात झाली, त्यामुळे परावर्तन थांबले. खांद्यावरचे अधिकारचिन्ह व टोपी, तसेच इतर ठिकाणची पदचिन्हेदेखील कापडाची बनली व जरूर पडल्यास सैनिक चिखलाचाही वापर करू लागले.


विमानतळ व विमाने : दुसऱ्या महायुद्धात विमानांचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की, विमान धावपट्‌ट्या शेकडो ठिकाणी बांधाव्या लागल्या त्यामुळे कित्येकदा त्यांना लष्करी संरक्षण देणे अशक्यप्राय झाले. त्यासाठी छद्‌मावरणाची कलाही फाऱ मोठ्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागली. योग्य रंगाच्या व विविध स्वरूपाच्या रंगकामाने त्यांची लपवणूक करण्याचा प्रयत्न बऱ्याच अंशी सफल होई तथापि मित्र विमानांना या धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरण्याची काय तरतूद आहे. ती विमानचालकांना अगोदरपासूनच अवगत करावी लागे. शत्रूला हुलकावणी देण्याकरिता बनावटी व धोक्याच्या धावपट्‌ट्या तयार ठेवल्याची सुद्धा उदाहरणे आहेत. अलीकडे विमानांना मळकट रंगाचे छद्‍मावरण केले जाते. जमिनीवर असताना मात्र त्यांस जाळ्याचे छद्‌मावरण देण्यात येते.

नागरी मायावरण : नागरी, पण लष्करी दृष्ट्या महत्त्वाच्या छद्‌मावरणाचे उदाहरण म्हणून, तेलाच्या मोठ्या टाक्या लपविण्याच्या पद्धतीचा उल्लेख करता येईल. दुसऱ्या महायुद्धात तेलाचा वापर इतका वाढला, की ही लपवणूक फार आवश्यक झाली. साधारणपणे शेकडा ६०% यश त्यात आले. योग्य रंग व लपवणुकीच्या जाळ्या हीच त्याची मुख्य साधने असत. मालवाहू बोटींना रंगवून, त्या जर्मन पाणबुडीचे लक्ष्य होण्याची शक्यता कमी करण्याच्या कामी दोस्त राष्ट्रांनी पहिल्या महायुद्धात ४० कोटींवर खर्च केला होता.

सैनिकांचा विशिष्ट पोशाख : बर्फाच्छादित रणभूमीकरिता सैनिकांच्या पोशाखाचा रंग पांढरा शुभ्र असतो. छत्रीधारी सैन्याकरिता हिरवे-किरमिजी पट्‌ट्यांचे रंग असलेले कोट आणि विजार असतात.

लढाऊ विमानावरील झाडाझुडपांचे व कापडी तंबूचे मायावरण

शहरे-गावे-इमारती वैगेरेंचे मायावरण : रात्रीच्या वेळी उजेड दिसू नये म्हणून खिडक्या-दारे यांवर काळे पडदे सोडतात. मोटारींचे दिवे दिसू नयेत म्हणून त्यांवर झडपा बसवितात आणि त्यांच्या काचा अर्धवट काळ्या रंगाने रंगवितात. महत्त्वाच्या इमारतींच्या छद्‌मावरणासाठी व त्यांचा आखीवपणा तोडण्याकरिता त्यांस विरूद्ध रंग लावून त्या आजूबाजूच्या परिस्थितीशी मिळत्याजुळत्या होतील अशा करतात. कित्येक वेळा मोठी जाळी वापरून त्यांचे आखीवरेखीव बाह्यस्वरूप लढाऊ विमानावरील झाडाझुडुपांचे व कापडी तंबूचे मायावरण कित्येकदा बदलतात. तेलाच्या टाक्या, कारखाने वगैरेंच्या बाबतीत छद्‌मावरण महत्त्वाच्या इमारतींप्रमाणेच केले जाते.

अणुयुद्ध आणि मायावरण : अणुयुद्धात रणांगणाचा आणि युद्धक्षेत्राचा विस्तार मोठा असल्यामुळे सैन्य पांगलेले असते. मोठ्या संख्येने सैन्य एकत्रित आले, तर ते अण्वस्त्रांचे भक्ष्य होते. सर्व हालचाली त्वरेने कराव्या लागत असल्यामुळे छद्‌मावरण करणेही अशक्य होते व हालचालीने सुरक्षितता संपादणे शक्य ठरते.

कृत्रिम ग्रहांमुळे लांबून व फार उंचीवरून छायाचित्र घेणे सांप्रत शक्य झाले असल्यामुळे यापुढे राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी लष्करी महत्त्वाची स्थाने, कार्यालये, शासकीय केंद्रे, कारखाने इ. उभारण्यापूर्वीच त्यांच्यासाठी सुयोग्य जागा निवडाव्या लागतील व इमारतीची बांधणीदेखील छद्‌मावरणाला अनुसरूनच करावी लागेल.

छद्‌मावरण यशस्वी होण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग सुरू ठेवले पाहिजेत. त्याचप्रमाणे छद्‌मावरणाची शिस्त व त्याचे नियम सर्वांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत.

संदर्भ : 1. Barkas, Geoffrey Bakas, Natalie, The Camouflage Story, London, 1953.

            2. Chesney. Clement H. R., Art of Camouflage, Hollywood, 1952.

पाटणकर, गो. वि. दीक्षित, हे. वि.