स्वच्छता, लष्करी : सैन्य आरोग्यसंपन्न व निरोगी राहण्यासाठी ज्या कृती व प्रक्रिया वापरल्या जातात, त्यांतील लष्करी स्वच्छता हा एक प्रमुख घटक होय. सार्वजनिक आरोग्याचे हे महत्त्वाचे अंग असून रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण यांकरिता पर्यावरणाचा समतोल असावा लागतो. परिसरीय वातावरण आरोग्यदायक बनविण्याकरिता व ते सतत अनुकूल ठेवण्याकरिता परिणामकारी उपाययोजना केली जाते. आरोग्यविज्ञानात सार्वजनिक आरोग्य व व्यक्तिगत आरोग्य अंतर्भूत असते. या दोन्ही प्रणालींचा लष्करी दृष्टिकोणातून लष्करी जीवनोपयोगी वापर म्हणजेच लष्करी स्वच्छता होय. इतरत्र उपयोगात आणल्या गेलेल्या या प्रणालींची व लष्कराकरिता उपयोगात आणलेल्या त्याच आरोग्यविज्ञानाची मूलतत्त्वे एकच आहेत. लष्करी जीवनास अनुसरून या शास्त्रांचा खास उपयोग केला असल्यामुळे मर्यादित स्वरूपाची परंतु सुस्पष्ट विशेषतः त्यास प्राप्त होते. लष्करी जीवनात स्थायित्वाचा अभाव हा विशेष असल्यामुळे त्याचा या शास्त्रांवर परिणाम होणे अटळ असते. शांततेच्या काळात मात्र नागरी जीवन व लष्करी जीवन जवळ जवळ एकसारखे असल्यामुळे स्वच्छताविषयक प्रश्नही सारखेच असतात. युद्धकाळात मात्र शरणार्थी, विस्थापित नागरिक किंवा स्थानिक रहिवासी जेव्हा मोठ्या संख्येने लष्करी नियंत्रणाखाली येण्याची शक्यता असते, तेव्हा लष्करी स्वच्छतेची विशेषता सुस्पष्ट होते. अशा वेळी पूर्वयोजना आखणे महत्त्वाचे असते. लष्करी कारवाईच्या वेळी विशिष्ट परिस्थितीत एकत्र जीवन जगण्याचे प्रसंग अटळ असतात. अशा वेळी दीर्घकाळापर्यंत संस्पर्श टिकून राहिल्यामुळे अन्नसंस्करण व वाटप यांतून रोगांचा प्रादुर्भाव होण्यास संधी मिळते. सूक्ष्मजंतू , विषाणू , कृमी व रासायनिक विषारी द्रव्ये यांमुळे संदूषण होते. यांबाबत लष्करी स्वच्छता अपरिहार्य ठरते.

लष्करी स्वच्छतेत पुढील गोष्टींचा समावेश होतो : (१) ऐतिहासिक पार्श्वभूमी, (२) लष्करी स्वच्छताशास्त्र क्षेत्र, (३) परिसरातील स्वच्छता, (४) वैयक्तिक स्वच्छता, (५) लष्करी स्वच्छतेमुळे सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य यांना मिळालेले फायदे, (६) स्वच्छतेसंबंधी स्थापत्याचे महत्त्व.

ऐतिहासिक काळापासून लष्करी आरोग्य रक्षणाकडे लक्ष देण्यात आल्याचे आढळते. याचे अभिजात उदाहरण म्हणजे हिब्रू बायबल मधील मोझेसची पुढील अभ्युक्ती होय : ‘ शिबिराबाहेर तुला जागा नेमून दिली असेल व तेथेच तू जाशील शस्त्रास्त्राशिवाय एक काठी तू बरोबर नेशील ज्या वेळी तू मलविसर्जनास बसशील, त्या वेळी काठीने माती उकरून खड्डा तयार करून मळ मातीने झाकून टाकशील.’ या कृतीमागे स्वच्छता किंवा सौंदर्यशास्त्राचा किती भाग होता, हे सांगणे कठीण आहे. सुश्रुतसंहितेत शत्रू अन्न, पेये, मार्ग, गवत, हवा व पाणी विषमिश्रित करण्याच्या शक्यतेचा उल्लेख केला आहे. या वस्तू दूषित असल्याचे ओळखणे व त्या निर्धोक बनविण्याकरिता कोणते उपाय योजावे, हेही सांगितले आहे. दूषित पाण्याचे वर्णन ते गढूळ व फेसाळ असते व त्यात मासे, बेडूक इ. प्राणी जिवंत राहू शकत नाहीत, असे केले आहे. हत्ती, घोडे आदी प्राणी अशा पाण्यात डुंबल्यास त्यांना ज्वर, शोथ आदी रोग होतात. पाणी शुद्ध करण्याची सूचना सुश्रुतसंहितेत दिली असून धावडा, अश्वकर्ण, असाणा, भद्रक इ. वृक्षांची साल जाळून तयार केलेली राख पाण्यात टाकावी म्हणजे ते शुद्ध होते, असे त्यात सांगितले आहे. पिण्याच्या पाण्यातही अशीच राख टाकावी व नंतर ते प्यावे. दूषित जमीन, दगड, नदी-घाट इ. ठिकाणी माणूस किंवा पशू यांचा संबंध येताच अंगाची आग होते व सूज येते. अशा ठिकाणी काळी माती किंवा वाल्मिकमृत्तिका ही दूध किंवा सुरा यांमध्ये खलून लावावी. दूषित हवेमुळे पक्षी मरून पडतात, माणसाचे डोके दुखते, खोकला उत्पन्न होतो व नेत्ररोग होतात. दूषित हवाशुद्धीकरिता हळद, मोथा, वाळा इ. सुगंधी ओषधी जाळाव्या. विषयुक्त अन्न किंवा गवत खाण्यामुळे उलट्या, जुलाब व क्वचित प्रसंगी मृत्यूही ओढवतो. अशा प्रसंगी विषाचा नाश करणार्‍या वैद्याचा सल्ला घ्यावा.

वरील विवेचनावरून सुश्रुतकाळापासून लष्करी स्वच्छता व आरोग्याची दक्षता घेतली जात होती, असे दिसते.

लष्कराकरिता पिण्याचे पाणी विशिष्ट प्रकारचे, वेगळे असल्याचे हीरॉडोटसच्या इ. स. पू. सहाव्या शतकातील वर्णनात आले आहे. पर्शियाचा राजा सायरस द ग्रेट जेव्हा युद्धावर जात असे, तेव्हा खेचरांनी ओढलेल्या चारचाकी गाड्यावरून उकळलेले पिण्याचे पाणी चांदीच्या कलशांतून नेत असे, असे त्याने वर्णिले आहे.

आशिया खंडातील एक मध्ययुगीन नेता तैमूरलंग (१३३६—१४०५) याने लष्कराला पाणी उकळल्याशिवाय न पिण्याचा आदेश दिलेला होता.या हुकुमामुळे त्याच्या सैनिकांत आंत्र संसर्गजन्य रोगांचा फैलाव झाला नाही, असा समज आहे.

संसर्गजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे लष्करी कारवायांवर भयंकर परिणाम झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात उपलब्ध आहेत. विसाव्या शतका-पर्यंत आमांश, विषमज्वर, मलेरिया, पीतज्वर, प्रलापक सन्निपात ज्वर इ. रोग लष्करी कारवायांचे भवितव्य ठरवीत. अगदी अलीकडच्या काळातही लष्करी कारवायांवर रोगांमुळे परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ऑस्ट्रियन युद्धभूमीवर प्रलापक सन्निपात ज्वराची जबरदस्त छाया पसरली होती. सर्बियन लष्करात या रोगाची भयंकर साथ उद्भवली होती. रोगग्रस्तांपैकी ७०% रोगी मृत्युमुखी पडत. सर्बिया हवालदिल व दुर्बल बनला होता, तर ऑस्ट्रियन फौजा केवळ या रोगाच्या भीतीने हल्ला चढविण्यास असमर्थ बनल्या होत्या. दुसर्‍या महायुद्धात इटलीमधील अमेरिकन सैन्याचा अनुभव वेगळा होता. नेपल्समध्ये याच रोगाची साथ उद्भवली. उत्तरेकडील अमेरिकन चढाईवर तिचा परिणाम होण्यापूर्वीच डीडीटीसारखी प्रभावी औषधे वापरून ती संपूर्ण आटोक्यात आणण्यात आली व अमेरिकन चढाई यशस्वी झाली.

लष्करी आरोग्य रक्षणाचा मुख्य उद्देश लष्कराची लढाऊ शक्ती टिकवणे हाच होय. प्रभावशाली मनुष्यशक्ती कोणत्याही देशाची संपत्तीच असते. तिचे जतन करणे हे लष्कराचे मुख्य कर्तव्य असते. अलीकडील युद्धांतून जास्त मनुष्यहानी प्रतिस्पर्ध्यांच्या कारवायांमुळे होते हे जरी सत्य असले, तरी रोगांमुळे येणारी असमर्थता व गैरहजेरीमुळे होणारा वेळेचा अपव्यय तितकेच हानिकारक असतात. विजय मिळविणे हाच कोणत्याही लष्कराचा मुख्य उद्देश असल्यामुळे लष्करी जवान कोणत्याही क्षणी संयोध-सिद्ध ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्याकरिता लष्करी जवानांचे शरीरस्वास्थ्य सुधारण्याचे व त्याचे संरक्षण करण्याचे कार्य योग्य ते उपाय योजून केले जाते. वैयक्तिक कृती किंवा परिसरीय परिस्थिती यांचा शरीरस्वास्थ्याशी घनिष्ट संबंध असल्यामुळे लष्करी स्वच्छतेची व्याप्ती मोठी असते. लष्करी जीवनात अस्थायी स्वरूपाचे सामूहिक जीवन जगण्याचे प्रसंग अटळ असतात. अशा वेळी उद्भवणारे प्रश्न सोडविणे हे लष्करी स्वच्छतेचे महत्त्वाचे कार्य ठरते.

दूध, पाणी, खाद्यपदार्थांचा निर्भेळ पुरवठा करणे व इतर सर्व गरजांचा सेनास्थापन तंत्राच्या दृष्टीने विचार करणे महत्त्वाचे असते. मलमूत्रादींची विल्हेवाट, रोगोत्पादक अगर रोगवाहक कृमी, कीटक व सूक्ष्मजंतूंचा नाश करणे, घन कचर्‍याची विल्हेवाट, साथीचे रोग उद्भवू नयेत म्हणून प्रतिबंधक उपाय योजणे व ते उद्भवल्यास फैलाव थोपविणे या गोष्टींना लष्करी आरोग्यात महत्त्व असते. प्रदूषण, युद्धातील रासायनिक द्रव्यांमुळे उद्भवणारी रोगराई, औद्योगिकीकरणामुळे उत्पन्न झालेले धोके, किरणोत्सर्ग इत्यादींवरील उपाययोजनांचा समावेश या शास्त्रात होतो. यांशिवाय प्रत्यक्ष युद्धक्षेत्र परिसराचा शरीरावर होणारा परिणाम, उदा., हवामान, बर्फमय प्रदेश, जंगल, वाळवंट वगैरेंविषयी विचार करणे व अपाय होऊ नये म्हणून योजना आखणे जरूरीचे असते. या सर्व गोष्टी परिसरीय स्वास्थ्यविज्ञानात मोडतात. त्यांच्याविषयी आखलेल्या योजना वैयक्तिक हिताकरिता असल्या, तरी प्रत्यक्षात व्यक्तीला त्यांची जाणीव होत नाही.

वैयक्तिक स्वास्थ्यविज्ञानात व्यक्तीच्या सहकार्याला महत्त्व असते. वैयक्तिक स्वच्छता, उष्णकटिबंधात किंवा बर्फमय प्रदेशात पावले व त्वचेची निगा, मलेरिया प्रतिबंधक उपाय, उपदंशादी विकार होऊ न देणे वगैरेंचा यात समावेश होतो. लष्करी जवानांची वेळोवेळी शारीरिक तपासणी, प्रतिबंधक लस टोचणे, क्रीडा व खेळ यांकरिता साधने पुरविणे, करमणूक इत्यादींचा समावेश यातच होतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्याकडे अप्रत्यक्ष रीत्या लक्ष पुरविले जाते.

लष्करी आरोग्य रक्षणाकरिता घेतल्या जाणार्‍या दक्षतेपासून नागरी जीवनातील स्वास्थ्यविषयक गोष्टींवर चांगला परिणाम झाला आहे. १९१० मध्ये मेजर डार्नेल याने पाणी निर्जंतुक करण्याकरिता क्लोरीन गॅस द्रवरूपात लष्करामध्ये प्रथम वापरला. तेव्हापासून नागरी जीवनात पिण्याचे पाणी क्लोरिनीकरण करून वापरण्याची पद्धत सर्रास रूढ झाली. लष्करात संशोधनास योग्य असे क्षेत्र व वाव मिळाल्यामुळे मेजर वॉल्टर रीड यांना पीतज्वराचा व ईडिस ईजिप्ताय डासांचा संबंध प्रस्थापित करता आला.

परिस्थितिविज्ञान व पर्यावरण संदर्भातील स्वच्छतेचा विचार मुख्यत्वे-करून वैद्यकीय दृष्टिकोणातून केला जात असला, तरी साधनांचा विचार करतेवेळी अभियांत्रिकी ज्ञानाचा योग्य उपयोग करणे अत्यंत गरजेचे असते. त्याकरिता स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांचा सल्ला लष्करी स्वच्छतेच्या बाबतीत अपरिहार्य ठरतो कारण लष्कराच्या वास्तू वा वसाहत बांधताना जलनिःसारण, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, भरपूर प्रकाश यांकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते. स्थायी स्वरूपाच्या लष्करी शिबिरात दैनंदिन स्वच्छताविषयक बाबतीत अशा तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज नसली, तरी आपत्तीच्या वेळी त्यांच्या विशिष्ट ज्ञानाचा योग्य उपयोग केल्याने हानी टाळणे शक्य असते. ही हानी आर्थिक स्वरूपाची नसून प्राणहानी असते, हे लक्षात घेणे जरूर आहे. लष्करी कारवायांची आखणी करतेवेळीच वैद्यकीय व स्थापत्य अभियांत्रिकी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास होणारी प्राणहानी टाळता येईल.

पहा : सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य.

भालेराव, य. त्र्यं.