शिष्टाचार, सैनिकी : सेना हा समाजातील प्राचीन काळापासून चालत आलेला एक महत्त्वाचा, गुंतागुंतीचा व व्यापक असा व्यावसायिक समूह असतो. समाजातील या प्रकारच्या मोठ्या समूहामध्ये व्यक्तीच्या वर्तनासंबंधी काही सभ्यतादर्शक प्रथा किंवा संकेत रूढ झालेले असतात. लष्करातील या प्रकारच्या आचारसंहितेस सैनिकी शिष्टाचार असे म्हणता येईल. प्रत्येक समाजातील सैनिकी शिष्टाचार विशिष्ट प्रकारचे असून ते बहुधा समाजाच्या इतिहासक्रमातून हळूहळू उत्क्रांत होत आल्याचे दिसते. आधुनिक काळात मात्र काही सैनिकी शिष्टाचारांच्या बाबतीत जगभर समानता आढळते. सैनिक हा समाजातील एक नागरिकही असतो त्यामुळे सैनिकी शिष्टाचारांचे स्वरूप नागरी शिष्टाचारांशी मूलतः सुसंवादी असते. याशिवाय सैनिकी पेशामध्ये युद्ध सुरू करणे, चालविणे व समाप्त करणे यांबरोबरच शांतताकालीन तसेच राष्ट्रीय विपत्कालीन विधायक कार्याचाही समावेश असतो. तसेच सैनिकी शिष्टाचारांच्या मुळाशी सैनिकी व्यवसायाची काही मूलभूत तत्त्वे असतात. उदा., सैनिकाची देशनिष्ठा, कर्तव्यबुद्धी आणि आत्मसन्मान इत्यादी. या सर्वच कारणांनी सैनिकी शिष्टाचारांचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे दिसून येते.

विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जवळजवळ जगभर यूरोपीय सत्तांची साम्राज्ये विखुरलेली होती, त्यामुळे जगभर प्रचलित असलेले बहुतेक सैनिकी शिष्टाचार मुळात यूरोपीय वळणाचे आहेत. त्यांपैकी काही लक्षणीय शिष्टाचार व प्रथा म्हणजे राष्ट्र्ध्वजाचा व सैन्याच्या गौरवपताकांचा सन्मान, राष्ट्राध्यक्ष अथवा राष्ट्रप्रमुखांचे सर्व सैनिकी दलांवरील घटनात्मक आधिपत्य, सैनिकी ⇨गणवेशाबद्दल सदैव बाळगलेली टापटीप, वरिष्ठांना कनिष्ठांनी वंदना देण्याची व त्यांच्या आदेशांचे पालन करण्याची शिस्त, वरिष्ठांकडून कनिष्ठांची घेतली जाणारी काळजी, सर्व कामातील वक्तशीरपणा व ते पूर्ण होईपर्यंत अथक परिश्रम करण्याची कार्यपद्धती आणि सांघिक भावनेबरोबरच स्पर्धेतून स्वतःची कार्यक्षमता सतत वाढविण्याची जिद्द इ. होत.

सैनिकी शिष्टाचारांचे खास प्रशिक्षण द्यावे लागते. त्याविषयी लष्करी कायदा मुलकी कायद्यापेक्षा वेगळा असून त्याचेच अधिष्ठान सैनिकी शिष्टाचारांना असते. लष्करी कायद्यानुसार शत्रूशी लढण्यास नकार देणाऱ्या सैनिकाला मृत्युदंड देण्यात येतो. तसेच शिष्टाचारांचा भंग करणाऱ्यास विविध प्रकारच्या शिक्षा देण्यात येतात [⟶ लष्करी कायदा]. सैनिकी शिष्टाचारांत व्यक्तिस्वातंत्र्याला मुरड घातलेली असते. सैनिकांची वस्ती नागरी वस्तीपासून दूर लष्क़री टापूत ठेवल्याने सैनिकी जीवनशैलीचा वेगळेपणा टिकवायला मदत होते.

युद्धाची झळ निःशस्त्र व असहाय लोकांपर्यंत पोचू नये, यासाठी करावयाचे प्रयत्न व घ्यावयाची दक्षता, हा युद्धकालीन सैनिकी शिष्टाचारांचा एक विशेष पैलू आहे. महाभारतातील ‘धर्मयुद्धाची’ संकल्पना अशा शिष्टाचाराचा आविष्कार होय.

आधुनिक सैनिकी शिष्टाचार हे सैनिकी इतिहासक्रमातून हळूहळू उत्क्रांत होत आले आहेत. पॅरिसचा तह (१८५६), जिनीव्हा करार (१८६४, १९०६, १९२९, १९७७), जिनीव्हा विषारी वायुबंदी करार (१९२५), सेंट पीटर्झबर्ग व हेग परिषदा (१८६८, १८९९, १९०७), न्युरेंबर्ग खटल्यात दुसऱ्या महायुद्धातील जर्मन युद्धगुन्हेगारांना दिलेल्या शिक्षा (१९४७), संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांचा जाहीरनामा (१९४८) व १८६४ च्या जिनीव्हा कराराद्वारे स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटना यांसारखे काही महत्त्वाचे ऐतिहासिक घटनांचे टप्पे या संदर्भात नमूद करता येतील. त्यामुळे सर्वंकष युद्धातही नि:शस्त्र नागरिकांना, जखमी सैनिकांना. युद्धबंदींना आणि शरणार्थींना सदयतेची वागणूक मिळावी, यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे व करार करता आले आणि युद्ध गुन्हेगारांची चौकशी करून दोषी व्यक्तींनी शिक्षा ठोठावता आल्या.

सैनिकी शिष्टाचारांत अनेक वर्षे चालत आलेल्या रीती, गणवेश व त्यांतील विशिष्ट खुणा, अधिकारी वर्गाचे स्वागत करण्याच्या पद्धती, वेगवेगळ्या पलटणींच्या कवायतीतील वैशिष्ट्ये, शौर्यपदके आणि ⇨मानचिन्हे यांचा वापर व आदर करण्याची रीत यांसारख्या अनेक गोष्टींचा समवेश होतो. भूसेना, नौसेना व वायुसेना या प्रमुख सैनिकी दलांचेही काही विशिष्ट शिष्टाचार असतात. प्रत्येक पलटणीचे गणवेश, दर्जादर्शक चिन्हे यांतही वेगळेपणा राखणे, हे सैनिकी शिष्टाचारात मोडते. कायद्याने जरी युद्धकैद्यांना खास वागणूक मंजूर केली असली, तरी सैनिकी संस्कृतीचा तो एक भाग मानला जातो. राष्ट्रध्वजाला मानवंदना, पलटणीच्या ध्वजाला मानवंदना, हे ध्वज परेडवर आणण्याची खास पद्धत सैनिकी शिष्टाचारांत मोडते. [⟶ ध्वज]. मृत सैनिकाला द्यावयाची मानवंदना हा लष्करी शिष्टाचाराचा एक भाग होय. सैनिकी स्त्री-अधिकाऱ्यांना पुरुष-अधिकाऱ्यांच्या बरोबरीची वागणूक मिळते.

समारंभाच्या परेडच्या वेळी सामान्यतः प्रथम घोडदळ, उंट, चिलखती रणगाडे, तोफा, अभियंते, पायदळ व नंतर इतर असा क्रम असतो. पायदळात गार्डस रेजिमेंट, छ्त्रीधारी रेजिमेंट व ठराविक क्रमाने इतर रेजिमेंट उभ्या असतात.

सैनिकी ‘मेस’ (अधिकाऱ्याचे जेवणघर) मध्ये समारंभाच्या जेवणाच्या प्रारंभी सर्व सेनादलांचे वरिष्ठ अधिकारी राष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा व्यक्त करतात. मदिरेच्या ऐवजी पाणी पिऊन हे अभिष्टचिंतन करण्यात येते. [⟶ मेस, सैनिकी]. शिपायांना वेळोवेळी मेजवानी (बडा खाना) देण्यात येते, त्यावेळी ‘रम’ वाटली असल्यास ‘तगडा रहो’, ‘राम राम’, ‘सतश्रीअकाल’, ‘जयहिंद’ यांसारखी शुभेच्छादर्शक वचने उच्चारून रमचे घोट घेतले जातात.

लढाईत धावा बोलताना ‘बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘आयो गोरखाली’, बोले सो निहाल–‘जय दुर्गे’, ‘हर हर महादेव’ यांसारख्या प्रत्येक रेजिमेंटच्या ठराविक घोषणा देण्यात येतात.

कोर्टमार्शल होऊन जर दोषी व्यक्तीला तुरुंगात धाडावयाचे असेल, तर परेड भरवून सर्वांसमक्ष त्याचा गणवेश फाडून काढला जातो, कारण त्याने गणवेशाचा मान राखलेला नसतो.

पहा : टाटू व टूर्नामेंट, सैनिकी पदक शिरस्त्राण सैनिकी शिक्षण व प्रशिक्षण हुजूर पथके.

पेंडसे, के. शं.