क्व्हिस्लिंग, व्हिडकुन: (१८ जुलै १८८७–२४ ऑक्टोबर १९४५). दुसऱ्या जागतिक महायुद्धात ज्याचे नाव देशद्रोहाचे प्रतीक बनले, असा हा फॅसिस्ट मनोवृत्तीचा नॉर्वेजियन राजकारणी. जन्म फ्यूरसडाल, द. नॉर्वे येथे. तो १९३१ ते १९३३ पर्यंत नॉर्वेचा संरक्षणमंत्री होता. १९३९ मध्ये हिटलरशी गुप्त संधान बांधून त्याने हिटलरला एप्रिल १९४० च्या नॉर्वेवरील स्वारीत मदत केली. क्व्हिस्लिंगने नॉर्वेचे धर्मपीठ, शिक्षणसंस्था, युवकवर्ग यांना नाझी विचारप्रणालीकडे वळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ज्यू लोकांचा त्याने अनन्वित छळ करून शेकडो ज्यूंची कत्तल केली. नॉर्वेची मे १९४५ मध्ये जर्मन वर्चस्वाखालून सुटका होईपर्यंत तो सत्तेवर होता. नॉर्वेच्या मुक्ततेनंतर युद्धगुन्हेगार म्हणून त्याला अटक करण्यात आली व न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार त्याला फाशी देण्यात आले. 

टिपणीस, य. रा.