बाँब फेकी विमाने: वायुसेनेकडे असलेल्या आक्रमक विमानांचा एक प्रकार. आधुनिक काळातील युद्ध हे आकाशात, भूतलावर व सागरात लढले जाते. त्याचे स्वरूप त्रिमितीय झाले आहे. भूतल, जलपृष्ठ व पाण्यातील लक्ष्यावर ⇨ बाँब, क्षेपक व पर्यटक अस्त्रे ⇨ पाणतीर इ. विध्वंसक साधनांच्या साह्याने बाँबफेकी विमाने आकाशातून मारा करू शकतात. दूरगामी क्षेपणास्त्रांहून बाँबफेकी विमानांचे वेगळेपण दाखविण्यासाठी त्यांना मानवनियंत्रित बाँबफेकी विमाने म्हणण्याचा प्रघात आहे. क्षेपणानंतर क्षेपणास्त्रे परत येऊ शकत नाहीत पण बाँबफेकी विमानांना परत बोलाविता येते. आयत्यावेळी लक्ष्य बदलणे भाग पडले, तर या विमानांना दुसऱ्या लक्ष्यावर पाठविता येते. बाँबफेकीत किंवा शत्रूच्या हवाई संरक्षणाच्या विमानविरोधी माऱ्याला विमान जर बळी पडले नाही, तर एकाहून अधिक लक्ष्यावर बाँब फेकणे या विमानांना शक्य असते. पूर्वसूचना न देता जर शत्रूने प्रक्षेपणास्त्रांची क्षेपणस्थाने उद्‌ध्वस्त केली, तर उत्तरादाखल शत्रूवर दूरगामी बाँबफेकी विमाने धाडून त्यांच्यावर अणुबाँब टाकणे शक्य असते. दूरगामी क्षेपणास्त्रांना पर्याय म्हणूनही या विमानांचा उपयोग होईल, अशी अमेरिका वा रशिया या बलाढ्य राष्ट्रांची धारणा आहे. दूरगामी बाँबफेकी विमाने सोडल्यास इतर प्रकारच्या बाँबफेकी विमानांना प्रवासकाळात संरक्षण देण्यासाठी लढाऊ विमाने लागतात. बाँबफेकी विमानांच्या अस्तित्वामुळे शत्रूवर वचक बसतो. शत्रूला हवाई व नागरिक संरक्षणावर मोठा खर्च करावा लागतो.

वर्गीकरण : दुसऱ्या महायुद्धात दूरगामी, मध्यम, हलकी, झेप व लढाऊ बाँबफेकी असे विमानाचे विविध प्रकार प्रचारात होते. जेट प्रचालन, क्षेपणास्त्रे, शस्त्रास्त्रांच्या प्रगती, युद्धतंत्रीय बदल, विमान अभिकल्प आणि त्यांच्या बांधणीतील नव्या पद्धती यांमुळे दूरगामी व रणसाहाय्यक असे दोनच मुख्य वर्ग उरले आहेत. बांधणी करताना विविध आक्रमक कार्यासाठी मूळ विमानातच सोयी केल्या जातात. जरूरीप्रमाणे कार्योपयोगी अशी शस्त्रास्त्रे त्यात झटपट बसविता येतात. आता सर्वच बाँबफेकी विमाने जेट एंजिनाने चालविली जातात.

दूरगामी बाँबफेकी विमाने : शत्रुराष्ट्राच्या अंतर्भागात युद्धाची झळ पोहोचवून तेथील नागरिकांचे मनोधैर्य व त्यांचा युद्धोत्साह भंग करण्यासाठी ही विमाने आवश्यक असतात. शत्रुराष्ट्रावर मारा करून त्याचे औद्योगिक व युद्धोपयोगी उत्पादन, विमानतळ, बंदरे, धरणे, दळण-वळणव्यवस्था इ. बंद पाडून अगर त्यांचा विध्वंस करून शत्रूची एकंदर युद्धक्षमताच नष्ट करण्याचे उद्दीष्ट असते. त्यामुळे समाजजीवन विस्कळीत होते. शासक व जनता यांच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. युद्धआघाडीवर विपरीत परिणाम होऊन लढाईस निराळे वळण लागते. विमानविरोधी शस्त्रांपासून बचाव करण्यासाठी ही विमाने चिलखतयुक्त बनविलेली असतात. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर मशीनगन व क्षेपणास्त्रे बसविलेली असतात. रडार व इतर इलेक्ट्रॉनीय उपकरणे असतात. साधारणतः ६ ते ८ विमान कर्मचारी त्यात असतात. प्रवासपल्ला वाढविण्यासाठी हवाईप्रवासात इंधनपुरवठा करणारी विमाने इंधन पुरवितात. अमेरिकेचे बी-५२ (स्ट्रॅटो-फोर्ट्रेस) रशियाची टीयू-२२ ब्लायंडर व टीयू-२६ बॅकफायर, फ्रान्सचे मिराज-४ ए, ब्रिटनचे व्हॅलिअर ही दूरगामी विमाने प्रसिद्ध आहेत. मुख्यतः अणुबाँब (५० किलोटन ते ५ मेगॅटन भार) अथवा पारंपरिक बाँब (६,००० ते २७,२६० किग्रॅ. भार) ते वाहून नेऊ शकतात. या प्रकारच्या विमानांची दले सुसज्ज ठेवणे अत्यंत खर्चाचे असते. दूरगामी बाँबफेकी विमानांच्या आवश्यकतेबद्दल मतैक्य नाही. शत्रूवर वचक बसविणारे आणि आंतरखंडीय अणुबाँबयुक्त प्रक्षेपणास्त्रांना पर्याय म्हणून त्यांचे अस्तित्व राहिले आहे. दूरगामी टेहळणीसाठी, शस्त्रास्त्रांच्या ऐवजी यांच्यात रडार, फोटो-कॅमेरे इ. उपकरणे बसवितात. दूरगामी बाँबफेकी विमानांच्या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी विमानविरोधी तोफा, क्षेपणास्त्रे व रोधक विमाने तयार ठेवावी लागतात. विमानविरोधी अस्त्रांच्या माऱ्यात न सापडण्यासाठी बाँबफेकी विमाने लक्ष्यापासून शेकडो किमी. दूर असताना पर्यटकास्त्रे किंवा इतर मार्गदर्शित अस्त्रांचा मारा लक्ष्यावर करू शकतात. विमानविरोधी अस्त्रांची रडारयंत्रणा निकामी करण्यासाठी, रडारविरोधी अस्त्रे व इलेक्ट्रॉनीय उपकरणे यांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करावा लागतो.

स्ट्रेटो फोर्टेस बी-५२


रणसाहाय्यक (टॅक्टिकल) विमाने : स्वपक्षीय सेनादलांची उदा., पायदळ, रणगाडा व तोफखाना इत्यादींची रणांगणीय लढाऊ कामगिरी निर्विघ्न करण्यासाठी रणसाहाय्यक विमानांची जरुरी भासते. रणसाहाय्यक विमानांकरवी रणांगण व युद्धक्षेत्रावरील आकाशात हवाई वर्चस्व व नियंत्रण प्रस्थापित करून आकाशातील शत्रूच्या हालचालींना पायबंद घालता येतो. परिणामतः शत्रूचे भूतलावरील कार्य निष्प्रभ होते. अशीच कामगिरी विमानवाहू युद्धनौकांवरील विमाने नाविक युद्धांत करतात. रणसाहाय्यक कामगिरी व त्यासाठी लागणाऱ्या विमानांची माहिती पुढे दिलेली आहे.

सेनासाहाय्यक विमाने : सेना या संज्ञेने भूसेना व नौसेना अभिप्रेत आहेत. भूसेना दलांच्या साहाय्यासाठी शत्रुविमानांच्या हल्ल्यापासून दलांचे संरक्षण करणे आणि रणगाडे, तोफा, क्षेपणास्त्रे, बलस्थाने व गुटिकास्थाने यांवर तसेच पायदळावर हल्ले करणे इ. प्रकारे प्रत्यक्ष लढाईला सुकर करण्यासाठी भूसेनासाहाय्यक विमाने कार्यरत असतात. नाविक युद्धात युद्धनौकांचा हवाई हल्ल्यापासून बचाव करणे, टेहळणी करून शत्रूच्या आरमाराच्या हालचालींची माहिती मिळविणे, गस्ती, पाणतीर व लघुनौकांवर हल्ला करणे इ. कामगिरी नाविक विमाने पार पाडू शकतात. या विमानांवर अग्निबाण, क्षेपणास्त्रे, लघुतोफा व बाँब असा शस्त्रसंभार असतो. सेनासाहाय्यक विमानांना अत्यंत घनघोर व धोकादायक सांग्रामिक पर्यावरणात कामगिरी करावी लागते. विमानविरोधी क्षेपणास्त्रांच्या माऱ्याला टाळण्यासाठी त्यांना फार कमी उंचीवर उडावे लागते. असे केल्यास ती विमानविरोधी तोफांचे आणि पायदळी क्षेपणास्त्राचे बळी ठरतात. रणांगणावरील विविध लक्ष्यांवर मारा करण्यासाठी उपयुक्त शस्त्रसंभार विमानात असणे अनिवार्य असते. शस्त्रसंभार, इलेक्ट्रॉनिकीय उपकरणे, वेग व प्रवासक्षमता यांच्यात समतोल राखणे ही एक समस्या असते. भारताची हंटर, नॅट (अजित), मिग-२१ व मिग-२३ ब्रिटनची जॅग्वार, हॅरियर अमेरिकेची एफ्-१४, एफ्-१५, एफ्-१६, एफ्.बी-१११ रशियाची मिग-१९, मिग-२१, मिग-२३ व फ्रान्सची मिराज-एफ् आणि मिराज-२००० ही या विमानप्रकारांची आधुनिक उदाहरणे होत. यांना पक्क्या विमानतळांची आवश्यकता असतेच असे नाही अजित सारख्या विमानाला विमानोड्डाणासाठी रस्ता पुरेसा होतो.

फायटर बाँबर एफ्-१६ फॉल्कन

सखोल आघात – हल्लेबाज विमाने : ही विमाने सखोल अडवणूक (इंटरडिक्शन), सखोल आघात –  हल्लेबाजी (डिप पेनिट्रेशन स्ट्राइक अटॅक) किंवा लढाऊ बाँबफेकी (फायटर – बाँबर) विमाने या नावांनी ओळखली जातात. सखोल आघात क्रिया ही दूरगामी बाँबफेक व रणसहाय्यक क्रिया यांमधील कामगिरीला लागू पडते. पिछाडी क्षेत्रातील मध्य क्षेपणास्त्रस्थाने, रणसाहाय्यक विमानांचे आघाडीतळ व राखीव दलांची केंद्रस्थाने यांना निकामी करणे, तसेच रणांगणाकडे रसद व राखीव दले जाऊ न देणे, दळणवळण व नियंत्रण – व्यवस्था बंद पाडणे इ. संरक्षक व आक्रमक कार्ये या विमानांनी पार पाडावी लागतात. नाविक लढायांत आघाडी बगला सागरात असत नाहीत. युद्धनौकांवर कोणत्याही दिशेने (पाण्यातूनही) विमानांचा, पाणबुड्यांचा आणि अस्त्रांचा मारा होऊ शकतो. विमानवाहक युद्धनौका हे अत्यंत महत्त्वाचे लक्ष्य असते. क्रूझर, विनाशिका वगैरेंवर युद्धनौकांना बुडविणारी लांब पल्ल्याची प्रक्षेपणास्त्रे असतात. अशा नौकांचा नाश करण्यासाठी नाविक लढायांत आघाती विमाने लागतात. सागरी मार्गाने शत्रुप्रदेशावर जेव्हा चढाई होते, त्यावेळी विमानवाहक नौकांवरील सेनासाहाय्यक व सखोल आघाती विमाने उपयोगी पडतात वरील कार्य करण्यासाठी या विमानात मार्गदर्शन व ⇨इलेक्ट्रॉनिय युद्धतंत्र साधने बसवावी लागतात. त्यांना लक्ष्य ओळखणे कठीण नसते. अपेक्षित कार्य विमानाऐवजी मध्यम पल्ल्याची प्रक्षेपणास्त्रे करू शकतील असे पूर्वी वाटत असे परंतु प्रक्षेपणास्त्राच्या मर्यादा लक्षात घेता प्रक्षेपण शास्त्राचा किंवा विभंजन विमानांचा वापर करण्यावरसुद्धा मर्यादा पडतात. विमानांच्या हालचालींवर मानवनियंत्रण असल्यामुळे राजकीय मर्यादातिक्रमण टाळणे शक्य असते. म्हणून या विमानांचे अस्तित्व टिकले आहे. जमिनीवरील तसेच युद्धनौकांवरील तोफा किंवा प्रक्षेपणास्त्रे ही स्थिर व अस्थिर लक्ष्ये टिपू शकत नाहीत परंतु चल व अचल लक्ष्ये वैमानिक टिपू शकतो. म्हणून या प्रकारच्या विमानांची आवश्यकता भासते. या विमानांना लक्ष्य दाखविण्यास बाहेरची मदत लागते. धोक्याच्या क्षेत्रातच व ते सुद्धा कमी उंचीवरून झटपट कार्य पार पाडावयाचे असल्यामुळे रडार आणि अवरक्त दूरदर्शक (इन्फ्रारेड टेलिव्हिजन), प्रतिमावर्धक (इमेज इन्टेन्सिफायर) इ. महागडी उपकरणे अनिवार्य झाली आहेत. या विमानांना विमानविरोधी तोफा व क्षेपणास्त्रे तसेच शत्रूची रोधक विमाने यांना तोंड द्यावे लागते. स्वसंरक्षणासाठी लघुतोफा व विमान-ते-विमान क्षेपणास्त्रे आणि आघातकार्यासाठी बाँब व विमाने ते जमीन किंवा युद्धनौका क्षेपणास्त्रे असा शस्त्रास्त्रसंभार असतो. अमेरिकेची एफ्-१४ टॉमकॅट (नाविककार्य), एफ्-१५ ईगल, एफ्-५ इ टायगर, एफ्-४ फॅटम व ए-७, १७ व १९, मिग-२७ फ्रान्सची मिराज-३ व मिराज एफ् भारताची कॅनबेरा, सुखोई-७, हंटर व मिग-२१ (बिस्) ब्रिटनची जॅग्वार, व्हल्कन व बुकॅनियर ही आधुनिक विभंजन विमाने प्रसिद्ध आहेत.

 फायटर बाँबर जॅग्वार – एस् - ०६

बहुकामी युद्धविमाने : वायुयुद्धात आकाशक्षेत्रावर सत्ता व नियंत्रण स्थापण्यासाठी अनेक प्रकारची विमाने न ठेवता एकच बहुकामी युद्धविमान तयार करण्याची प्रवृत्ती आहे. अमेरिकेचे एफ्-४ फॅटम, एफ्-१५ ईगल व रशियाची मिग-२३, सुखोई-१७ व सुखोई-१९ ही विमाने विरोध, टेहळणी, सखोल आघात, मध्यमपल्ल्याची बाँबफेक इ. कामे करू शकतात.

इतिहास : १९०८ मध्ये अमेरिकेचा विल्बर राईट याने दोनतासांचा विमानप्रवास केला. हे पाहून १९०५ साली इटलीच्या कर्नल जुल्यो दूहे याने वायुयुद्ध व विमाने यांचे भविष्यकाळातील महत्त्व विशद केले.

तुर्कस्तान व इटली यांच्यातील लिबियाच्या युद्धात इटलीने १ नोव्हेंबर १९११ रोजी तुर्की सैन्यावर उपलब्ध विमानातून बाँब टाकले. पहिल्या महायुद्धात जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, रशिया इ. संबंधित राष्ट्रांनी बाँबफेकी विमाने तयार केली व ती युद्धात वापरली. बहुतेक बाँबफेकी विमाने दिवसाच बाँबफेक करू शकत. ४ जून १९१८ रोजी फ्रान्सच्या ब्रेगे या विमानांनी जर्मन सैन्यावर सु. आठ किग्रॅ. वजनाचे ७,२०० बाँब फेकून त्यांची वाताहत केली. विमानांचा कमाल वेग १७७ किमी. असे. बाँबफेकी विमानांचा स्वतंत्ररीत्या व दूरपरिणामासाठी वापर करण्याची कल्पना अमेरिकेचा कर्नल विल्यम मिचेल याने सप्टेंबर १९१८ मध्ये प्रत्यक्ष साकार केली. मिचेलने लढाईत भूसेनासाहाय्यासाठी व दूरपरिणामासाठी जर्मनांचे विमानतळ, दळणवळणकेंद्रे निकामी केली. (त्सेपेलिन) वायुयानाचा उपयोगही बाँबफेकीसाठी केला गेला. पहिल्या महायुद्धानंतर मिचेल, दूहे व ब्रिटनचा ⇨ ट्रेंचर्ड यांनी बाँबफेकी विमानांचा जोरदार पुरस्कार केला. १९२१ मध्ये दूहेने कमांड ऑफ एअर या त्याच्या ग्रंथात नुसत्या बाँबफेकीने आगामी युद्ध जिंकता येईल, असा ऐकांतिक सिद्धांत मांडला. मिचेल व दूहे यांच्या विचाराचा प्रभाव १९४५ पर्यंत टिकला. १९३० मध्ये अमेरिकेत भारी बाँबफेकी विमानांची निर्मिती सुरू झाली. फ्लाइंग फोर्ट्रेस व सुपर फोर्ट्रेस ही भारी विमाने मिचेलच्या विचारसरणीच्या प्रभावामुळेच निर्माण झाली. दुसऱ्या महायुद्धापूर्वी हिटलरने जर्मन वायुबल दांडगे आहे, असे ब्रिटन व फ्रान्स यांना भासवून १९३८ मध्ये म्यूनिक करार घडवून आणला. १९३९ – ४५ च्या युद्धात जर्मनी व रशिया यांनी दूरगामी बाँबर बनविण्यात कुचराई केली व सेनासाहाय्यक विमाने (झेप बाँबफेकी) इत्यादींवर भर दिला. अमेरिका व ब्रिटन यांनी सर्व प्रकारची बाँबफेकी व साहाय्यक विमाने बनवून जर्मनी व जपान यांचे फार मोठे नुकसान केले. सुपर फोर्ट्रेस विमानांतून नागासाकी व हीरोशीमावर अणुबाँब टाकण्यात आले. जपानने पाणतीरफेकी नाविक विमानांवर भर दिला. हिंदुस्थानी वायुसेनेकडे १९३९ – ४५ कालात दूरगामी बाँबफेकी विमाने नव्हती. दुसऱ्या महायुद्धात दोस्तराष्ट्रांच्या दूरगामी वायुहल्ल्यामुळे जर्मन राष्ट्र पराभूत झाले, याबद्दल मतैक्य नाही. भारी बाँबफेकी विमाने नसल्यामुळे हिटलरला ब्रिटनवर चढाई करता आली नाही. बाँबफेकी विमानांना प्रवासात संरक्षक विमानांची सोबत देणे आवश्यक असते. मार्गशोधक व लक्ष्यदर्शक विमानांचे सुद्धा साहाय्य घेणे भाग पडले. लक्ष्य अचूकपणे टिपणे कठीण झाल्यामुळे सैनिकी लक्ष्याबरोबर नागरी वस्ती व नागरिक यांची प्रचंड हानी झाली. १९४५ नंतर जेटयुग व अण्वस्त्रयुग सुरू झाले. युद्धाचे स्वरुप बदलले. अण्वस्त्रांमुळे होऊ शकणारी अपरिमित हानी लक्षात घेता संकुल जागतिक युद्धाची संभाव्यता जाऊन त्याऐवजी परिमित युद्धे – उदा., कोरिया, इंडोचायना इत्यादींतील अशी विशिष्ट मर्यादित राजकीय कारणांसाठी होतील म्हणून मानवनियंत्रित बाँबफेकी विमानांची आवश्यकता आगामी काळात राहील, असे म्हणण्यास वाव आहे.

पहा : तडित् युद्धतंत्र तोफ व तोफखाना नाविक युद्धतंत्र नौसेना भूसेना युद्ध व युद्धप्रक्रिया रणगाडा वातयान वायुवाहिनीसेना व युद्धतंत्र संयुक्त सेनाकारवाई हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे.

संदर्भ : 1. Goyal, S. N. Air Power in Modern Warfare, Bombay, 1952.

            2. Martin, Laurence. Arms and Strategy, London, 1973.

            3. Parsons, Jain, Ed., The Encyclopedia of Air Warfare, London 1977.

            4. Saundby, R. Air Bombardment, London, 1961.

  

दीक्षित, हे. वि.