प्रादेशिक सेना : (टेरिटोरियल आर्मी ). राष्ट्रीय संरक्षणासाठी, शासनाने प्रादेशिक तत्त्वावर, उभारलेली सेवाभावी नागरिकांची एक लढाऊ संघटना. असे नागरिक आपापले व्यवसाय सांभाळूनच प्रादेशिक सेनेत काम करतात. ही सेना देशातील स्थायी सेनेला पूरक असते परंतु तिचे स्वरूप राखीव सेनेसारखे नसते. स्थायी सेना ही आर्थिक दृष्टीने उत्पादनशील नसते त्यामुळे एखादे राष्ट्र कितीही सुसंपन्न व औद्योगिक दृष्ट्या प्रगत असले, तरीही त्यास शांतताकाळात स्थायी सेनाबळाचा खर्च सोसणे अशक्य असते. म्हणून स्थायी सेनेतील सैनिकांची संख्या न वाढविता तिला पूरक ठरणारी प्रादेशिक सेना उभारणे सोयीचे ठरते. प्रादेशिक सेनेतील सैनिक शांतताकाळात अर्धवेळ सैनिक असतो, तर युद्ध व आपत्कालात तो पूर्णवेळ सैनिक असतो. यासाठी त्यास सर्वप्रकारचे सैनिकी प्रशिक्षण देण्यात येते. काही राष्ट्रांत प्रादेशिक सेना ही लोकसेना (मिलिशिया) किंवा राष्ट्रीय रक्षकदल यांसारख्या नावांनी ओळखली जाते. तसेच ⇨ होमगार्ड वा आत्मरक्षकदल अशाही बिगर सैनिकी संघटना या प्रकारात आढळतात.

युद्धकाळात किंवा राष्ट्रीय आपत्कालात स्थायी सेनेचा विस्तार करण्याचे तीन मार्ग उपलब्ध असतात. ते असे : (१) स्थायी सेनेतून निवृत्त अशा सैनिकांचे राखीव बळ उभारणे, (२) सक्तीची सैन्यभरती करणे व (३) प्रादेशिक सेनाबळ तयार करणे. स्थायी सेना ही संरक्षणाची पहिली फळी होय. तिला पूरक अशी दुसरी फळी सज्ज असणे अनिवार्य ठरले आहे. हिंदुस्थानात १८५७ साली झालेल्या पहिल्या उठावाविरुद्ध सर्व ब्रिटिश आणि अँग्लो-इंडियन लोकांनी सैनिकी संघटना स्थापन केल्या. १८६९ साली रेल्वे कंपन्यांनीही पायदळ पलटणी उभारल्या. १८७९ साली मद्रासमध्ये यूरोपीय लोकांनी सेवाभावी तोफखाना दल उभारले. १९१७ सालच्या हिंदुस्थान संरक्षण अधिनियमानुसार सर्व यूरोपीय तसेच ब्रिटिश नागरिकांना सैनिकी शिक्षण व सेवा ही सक्तीची करण्यात आली. १९२० साली साहाय्यक बल अधिनियमाप्रमाणे सक्तीची सैनिकी सेवा रद्द करण्यात आली. १९२० साली हिंदुस्थानी प्रादेशिक बल अधिनियम अमलात आला. या अधिनियमानुसार प्रादेशिक बलात विद्यापीठीय सैनिकी प्रशिक्षण दल (युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोअर) व प्रांतिक सेनादले स्थापन करण्यात आली. विद्यापीठीय दलात विद्यार्थी असून स्थायी सेनेतील ब्रिटिश अधिकारी त्यांना प्रशिक्षण देत. त्यावेळी वीस प्रांतिक पायदळ पलटणी होत्या व त्यात सु. २०,००० प्रादेशिक सैनिक होते. १९३० साली अठरा पलटणींत सु. १५,००० सैनिक होते. प्रत्येक पलटणीत पाच ब्रिटिश अधिकारी असत. हिंदी लोकांना व्हाइसरॉय कमिशन देण्यात येई. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बहुतेक प्रादेशिक पलटणी स्थायी सेनेत समाविष्ट करण्यात आल्या. हिंदी लोकांना पायदळाशिवाय इतर दलांत प्रवेश नसे. ब्रिटिशकालीन प्रादेशिक सेनेत काळे-गोरे हा भेद प्रकर्षाने दिसून येई.

स्वतंत्र भारतात ही परिस्थिती पालटली. ब्रिगेडियर ⇨जयंतनाथ चौधरी यांच्या योजनेप्रमाणे स्वतंत्र भारताला उपयुक्त अशी प्रादेशिक सेना उभारण्यास आरंभ करण्यात आला.

भारतातील विद्यमान प्रादेशिक सेना ही १९४८ सालच्या प्रादेशिक सेना अधिनियमानुसार स्थापन करण्यात आली व नोव्हेंबर १९४९ मध्ये वरील अधिनियमानुसार सेनेचे कार्य प्रत्यक्षात सुरू झाले. तत्पूर्वीचा १९२० सालचा हिंदी प्रादेशिक सेना अधिनियम रद्दबातल करण्यात आला. १९४८ सालच्या अधिनियमाप्रमाणे १८ ते ३५ वर्षांच्या वयोगटातील योग्य पात्रता असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला प्रादेशिक सेनेत प्रवेश मिळू शकतो.

भारतीय प्रादेशिक सेनेचे कार्य पुढीलप्रमाणे असते : (१) देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था आणि दळणवळणव्यवस्था अबाधित राखणे (२) विशिष्ट अशा तांत्रिकी पलटणी पुरविणे (३) हवाई संरक्षण पुरविणे (४) युद्धकालात व राष्ट्रीय आपत्कालात स्थायी सेनेला देशांतर्गत सैनिकी कार्यातून मुक्त करणे आणि (५) गरजेनुसार स्थायी सेनेच्या बरोबरीने लढण्यासाठी पूर्ण पलटणी व पलटणसमूह (फॉर्मेशन) पुरविणे.

सामान्यतः प्रादेशिक सेना ही देशाबाहेरील सैनिकी कार्ये करण्यास बांधील नसते. तथापि केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशाबाहेरसुद्धा भारतीय प्रादेशिक सेनेला कामे करावी लागतात. युद्धकाळात शासकीय आदेशाने स्थायी सेवेत प्रादेशिक सेना समाविष्ट करण्यात येते. त्यानंतर ती स्थायी सेनेला बिनलढाऊ, तांत्रिकी व नित्य स्वरूपाच्या इतर कार्यांतून मुक्त करते. जरूरीप्रमाणे ती स्थायी सेनेबरोबर प्रत्यक्ष युद्धातही भाग घेते.

भारतीय प्रादेशिक सेनेत स्थायी सेनेप्रमाणेच पायदळ, तोफखाना अभियांत्रिकी, टपाल व तार, गोदीबंदरे, रेल्वे, सिग्नल इ. दले असतात. त्यांचे अधिकारीही प्रादेशिक सेनेतूनच निवडले जातात. भारतीय प्रादेशिक सेनेचे नागरी (अर्बन) व प्रांतिक (प्रॉव्हिन्सियल) असे दोन विभाग आहेत. नागरी विभागात शहरातील नागरिक, तर प्रांतिक विभागात ग्रामीण भागातील नागरिक असतात. रेल्वे, टपाल व तार आणि गोदीबंदरे दलांत त्या त्या खात्यातील कर्मचारीच भरती होऊ शकतात. भारतीय प्रादेशिक सेनेतील सैनिकांना अधिकारपदे निवडणुकीद्वारे मिळू शकतात. तांत्रिकी दलात तांत्रिकी पदवीधर किंवा पदविकाप्राप्त उमेदवारांनाच अधिकारपदे मिळतात.

प्रशासनाच्या दृष्टीने स्थायी भूसेनेचा उपसेनाध्यक्ष हा भारतीय प्रादेशिक सेनेचे उच्च व्यवस्थापन पाहतो. भूसेनेच्या मुख्यालयात भारतीय प्रादेशिक सेनासंचालनालय आहे. निम्नस्तरीय व्यवस्थापनासाठी भारतीय प्रादेशिक सेनेचे चार क्षेत्रविभाग केले आहेत. प्रत्येक राज्यात तसेच भूसेनेच्या मुख्यालयात प्रादेशिक सेना सल्लागार मंडळ असते. भूसेनेची स्थानिक कार्यालये प्रादेशिक सेनेची भरती, प्रशिक्षण इ. कामे पाहतात.

भारतीय प्रादेशिक सेनेने ⇨ भारतचीन संघर्ष (१९६२), ⇨ भारतपाकिस्तान संघर्ष (१९६५) व बांगला देशाचे स्वातंत्र्ययुद्ध (१९७१) [⟶ बांगला देश] यांत तसेच इतर राष्ट्रीय दुर्घटनाकालात स्थायी सेनेच्या तोडीचे कार्य केले आहे. मराठी भाषिकांच्या प्रादेशिक पलटणींनी (उदा., क्र. १०९ पायदल पलटण) कच्छचे रण तसेच बांगला देश येथील लढ्यांत प्रत्यक्ष भागही घेतला होता.

बांगला देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या (१९७१) संदर्भात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय प्रादेशिक सेनेला एक अतिविशिष्ट सेवापदक, पाच वीरचक्र पदके, तीन विशिष्ट सेवापदके, पाच सेनापदके आणि सोळा उल्लेखनीय कामगिरीपदके अशी पदके व सन्मान लाभलेले आहेत.

पहा : लोकसेना संरक्षणव्यवस्था, भारताची.

संदर्भ : 1. Chaudhuri, J. N. Arms, Aims and Aspects, Bombay, 1966.

2. Sharma, Gautam, Indian Army Through the Ages, Bombay, 1966.

दीक्षित, हे. वि.