हायडास्पीझची लढाई : अलेक्झांडर द ग्रेट आणि पोरस यांमध्ये इ. स. पू. ३२६ मध्ये झालेली लढाई. अलेक्झांडरच्या आशिया मोहिमेतील ही चौथी व अखेरची लढाई. अलेक्झांडर (इ. स. पू. ३५६–३२३) याने बॅक्ट्रिया व सॉग्डिआना हे प्रदेश जिंकल्यानंतर हिंदुकुश ओलांडून इ. स. पू. ३२७ च्या मे महिन्यात भारतावर स्वारी केली. या स्वारीत त्याने अनेक गणराज्ये जिंकली. पुढे अटकच्या उत्तरेस सु. २५ किमी.वर ओहिंद येथे नावांचा पूल तयार करून सिंधू नदी पार केली आणि तो तक्षशिलेस पोहोचला. तेथील राजा आंभी त्याला शरण आला पण झेलम व चिनाब नद्यांच्या दुआबात राज्य करणारा पोरस ( इ. स. पू. चौथे शतक) याने अलेक्झांडरला प्रतिकार केला. तेव्हा दोघांत घनघोर युद्ध झाले. ते हायडास्पीझची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्धआहे. या लढाईत पोरसकडे ३०,००० पायदळ (काहींच्या मते ३४,०००), ४,००० घोडदळ, ३०० रथ आणि २०० हत्ती (गजदल) होते तर अलेक्झांडरकडे निवडक ११,००० सैनिक होते. या वेळी झेलम नदीला पूर आला होता. ती दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे दोेन्हीकडील सैन्य आमनेसामने नदीच्या दोन्ही तीरांवर उभे होते. अलेक्झांडरने क्लृप्तीने झेलम नदीचा उतार पाहून नदी पार केली आणि पोरसच्या डावीकडील गजदलावर जोरदार हल्ला केला. पावसामुळे पोरसचे सैन्य निष्प्रभ झाले होते. त्याच्या रथाची चाके चिखलात रुतली व उंच धनुष्यांना बाणांचा वर्षाव करण्यास कोरडी जागा सापडेना. त्यात अलेक्झांडरच्या सैन्याने हत्तींवर केलेल्या हल्ल्यामुळे हत्ती बिथरले आणि आपल्याच सैन्यात सैरावैरा पळू लागले. त्यामुळे अनेक सैनिक त्यांच्या पायाखाली चिरडले गेले. पोरस शौर्याने लढला. लढाईत त्याची तीन मुले व सेनापती ठार झाले. अलेक्झांडरने त्याला पकडले, तेव्हा त्याच्या अंगावर नऊ जखमा होत्या. अखेर समझोता होऊन पोरससारखा शूर योद्धा आपला साहाय्यक असावा, या हेतूने अलेक्झांडरने त्याचे राज्य त्यास परत केले. शिवाय आणखी पंधरा गणराज्यांचा मुलूख त्याच्या स्वाधीन केला.

 

 पहा : अलेक्झांडर द ग्रेट पोरस भारत (इतिहास ). 

देशपांडे, सु. र.