गेस्टापो : (Geheime Staats Polizei — Gestapo). नाझी जर्मनीमधील राजकीय गुप्त पोलीस संघटना. नाझी पक्ष, सरकार आणि हिटलर यांच्याविरूद्ध होणारी टीका आणि ती कारवाई दडपून टाकण्याच्या उद्देशाने प्रशिया प्रांताचा तत्कालीन मुख्य मंत्री ⇨ गोरिंग  याने १९३३ साली प्रशियातील पोलीसदलामधून ही नवीन संघटना उभी केली. ती जी. पी. ए. (Geheimes Polizei Amt) अशा नावाची होती. तथापि रशियाच्या गुप्त पोलिस संघटनेचे संक्षित नाव जी.पी.यू. असल्याने गोरिंगने आपल्या संघटनेला गेस्टापो हे नाव दिले. नाझी अमदानीचे वैशिष्ट्य असे होते, की तिने नाझी पक्षाच्या सर्व स्वयंसेवक संघटना आणि सरकारी अधिकृत पोलीसदल यांची सांगड घातली. सत्तेवर येण्यापूर्वी नाझी पक्षाचे सु. २० लाख स्वयंसेवकांचे स्वतंत्र दल (एस्. एस्.) होते. त्यातून कडव्या स्वयंसेवकांची एक संरक्षणसंघटना उभारली गेली. हुषार आणि सुशिक्षित स्वयंसेवकांचा गुप्तचर विभागही (एस्.डी.) सुरू करण्यात आला होता. नाझी सरकार स्थापन झाल्यावर या विभागाकडे अधिकृतपणे देशाचा गुप्तचर विभाग सोपविण्यात आला. हिम्‌लरला पोलीस प्रमुख नेमण्यात आले. त्याच्या हाताखालील हाइड्रिक या नाझी पुढाऱ्याकडे गेस्टापो आणि एस्.डी. या दोन्ही संघटनांचे कार्य सोपविण्यात आले. त्याच्या हाताखाली पूर्वीपासूनचा पोलीस अधिकारी म्यूलर गेस्टापो-प्रमुख म्हणून काम पाहू लागला. हिम्‌लर याची एस्. एस्. चा प्रमुख म्हणून १९२९ सालीच नेमणूक करण्यात आली होती. हाइड्रिकच्या एका विभागाने म्हणजे एस्. डी. ने देशाच्या नाझी पक्षाच्या विरोधकांची बातमी पुरवायची व दुसऱ्या विभागाने म्हणजे गेस्टापोने संशयितांची धरपकड, चौकशी आणि जरूर पडली तर खून करावयाचा असा प्रकार सुरू झाला. कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना आणि लाखो ज्यूंना ठार करण्यात आले. पुढे तर गेस्टापोने स्वतःचीच स्वतंत्र गुप्तहेर यंत्रणाही उभारली. एस्. डी. आणि गेस्टापो यांच्या अशा यंत्रणेखाली सर्व जर्मन राष्ट्र आले. परदेशांतील गेस्टापो संघटनेचे उद्दिष्ट वाटेल ती किंमत देऊन जगावर जर्मनीचे वर्चस्व स्थापन करणे, हे होते.

प्रचलित कायदा आणि न्यायपद्धती बाजूस सारून नाझी विरोधकांना हुडकून काढून यांना अटक करणे किंवा ठार मारणे यांसाठी गेस्टापोचा उपयोग अगदी प्रथमपासून करण्यात आला. त्यावेळी जर्मनीतील प्रत्येक प्रांतासाठी वेगळी पोलीसदले होती. परंतु १९३३ नंतरच्या तीन वर्षांत या सर्व पोलीसदलांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय पोलीसदलाची आणि राष्ट्रीय गेस्टापोची अधिकृत स्थापना करण्यात आली. गेस्टापोचे बहुतेक कार्यकर्ते पूर्वीचे पोलीस अधिकारी होते. त्यांत जी थोडीफार वाढ झाली, ती पक्षाच्या स्वयंसेवकांमधून करण्यात आली. गुप्त पोलीस संघटना असली, तरी गेस्टापोचे सदस्य गणवेश वापरीत असत आणि त्यांना आधुनिक शस्त्रे तसेच वाहने पुरविण्यात आली होती.

गेस्टापोच्या या कृत्यांना न्यायालयीन अधिष्ठान नव्हते. १९३६ च्या संविधीप्रमाणे जर्मन राष्ट्राला ज्या शक्तींपासून धोका आहे, अशा शक्तींना विरोध करणे, हे गेस्टापोचे कर्तव्य आहे, असे सांगण्यात आले. गेस्टापोविरूद्ध अपील करणे झाल्यास ते हिटलर किंवा गृहमंत्री म्हणजेच हिम्‌लर यांच्याकडे करावे लागे. देशातील कोणत्याही व्यक्तीकडून माहिती मिळविण्यासाठी तिचा वाटेल तसा छळ करण्याचा अधिकार गेस्टापोला होता. देशाच्या सुरक्षिततेला बाधा येईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य अगर कट झाल्याचा संशय आला, तर तपास करून संशयितांना शासन करणे, हद्दपार करणे, मारपीट करणे, धमक्या देणे, तुरुंगात डांबणे, त्या व्यक्तीची सुधारणा करण्यासाठी तिला बंदी-छावण्यांत कोंबणे, तिची हत्या करणे तसेच अखेरीस मृत्यु-छावण्यांत सामूहिक हत्याकांड करणे, अशी गेस्टापोची क्रूर कार्यपद्धती होती. जवळजवळ पन्नास बंदीछावण्या व सु. दहा मृत्यु-छावण्या गेस्टापोने चालविल्या होत्या. अशा अघोरी मार्गांनी लाखो ज्यूंची कत्तल करण्यात आली. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर आक्रमित देशांतही गेस्टापोच्या शाखा उभारण्यात आल्या. एस्. एस्. व गेस्टापो यांच्या तुकड्या आगेकूच करणाऱ्या जर्मन सैन्याबरोबर यासाठी वाटचाल करीत असत. 

चेक गनिमांनी १९४२ साली हाइड्रिकचा खून केला. महायुद्धातील पराभव दिसू लागल्यानंतर हिम्‌लर आणि गोरिंग यांनी इंग्लंड-अमेरिकेबरोबर स्वतंत्र बोलणी करण्याचा प्रयत्न केला. दोस्तराष्ट्रांच्या हाती लागल्यावर हिम्‌लरने आत्महत्या केली, तर फाशीची शिक्षा अंमलात येण्यापूर्वीच गोरिंगनेही आत्महत्या केली. कालटेन ब्रुनर हा गेस्टापोचा आणखी एक प्रमुख न्यूरेंबर्ग येथील चौकशीनंतर फाशी गेला. म्यूलर रशियाला पळून गेल्याचा संशय होता. आइकमानला १९६० साली इझ्रायली गनिमांनी दक्षिण अमेरिकेत अटक केली. पुढे इझ्राएल सरकारने त्याला फाशी दिले. अशा तऱ्हेने आधुनिक इतिहासातील एक काळीकुट्ट व निर्घृण संघटना कायमची नष्ट झाली.

संदर्भ : Delarue, J. Trans. Savill, M. The History of the Gestapo, London, 1964. 

दिक्षित, हे. वि. नगरकर, व. वि.