चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्गलिंडबर्ग, चार्ल्स ऑगस्टस : (४ फेब्रुवारी १९०२-२६ ऑगस्ट १९७४). प्रख्यात धाडसी अमेरिकन वैमानिक, २०-२१ मे १९२७ रोजी न्यूयॉर्क ते पॅरिस हे सु. ५, ८०० किमी. अंतर अटलांटिक महासागरावरून एकट्याने विमानातून विनाथांब पार करून विमानवाहतूकक्षेत्रात त्याने एक विक्रमी इतिहास निर्माण केला. त्याचा जन्म डिट्रॉइट (मिशिगन राज्य) येथे झाला. त्याचे वडील अमेरिकन काँग्रेसचे सदस्य (१९०७-१७) होते. लिंडबर्गचे सुरूवातीचे शिक्षण लिट्‍ल फॉल्स (मिनेसोटा) व वॉशिंग्टन डी. सी. येथे झाले. त्यानंतर यांत्रिक अभियांत्रिकीच्या अध्ययनासाठी त्याने आपले नाव विस्कॉन्सिन विद्यापिठात दाखल केले. परंतु हा अभ्यासक्रम सोडून तो वैमानिक शिक्षणासाठी लिंकन (नेब्रॅस्का) येथील वैमानिकी विद्यालयात गेला (१९२०-२२). पहील्या महायुध्दातील ‘कर्टिस जेनी’, नावाचे एक विमान त्याने विकत घेतले आणि त्यामधून त्याने अमेरिकेच्या दक्षिण व मध्य-पश्चिम राज्यांच्या प्रदेशांवर अनेकवेळा धाडसी विमानोड्डाणे केली.  

अमेरिकेच्या राखीव हवाई सेवेत सेकंड लेफ्टनंट म्हणून लिंडबर्गची नेमणूक करण्यात आली (१९२५). त्याच वर्षी त्याने वैमानिकी विषयातील पदवी प्राप्त केली. १९२६ मध्ये त्याने शिकागो ते सेंट लूइस (माँटॅना) यांदरम्यान हवाई डाक वैमानिक म्हणून काम केले. १९२७ मध्ये त्याने ‘रेमंड ऑर्टिग बक्षीस योजने’तील अटलांटिक महासागर ओलांडून न्यूयॉर्क ते पॅरिस या विनाथांबा उड्डाणस्पर्धेत भाग घेतला. या उड्डाणासाठी त्याला सेंट लूइसमधील व्यापाऱ्यांनी आर्थिक साहाय्य करून उत्तेजन दिले. या स्पर्धेत चांगली साधनसामग्री असलेल्या काही नावाजलेल्या वैमानिकांना अपयश पतकरावे लागले. काहींना तर आपला प्राण गमवावा लागला. परंतु लिंडबर्गने लाँग बेटावरून ‘स्पिरिट ऑफ सेंट लूइस’ या स्वतः बनविलेल्या यानामधून हे ऐतिहासिक विनाथांब उड्डाण केले आणि सु ५, ८०० किमी. चा प्रवास ३३१/२ तासांत पूर्ण करून ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेतील २५ हजार डॉलरचे बक्षीस त्याने पटकाविले व जगातील श्रेष्ठ वैमानिक म्हणून तो नावाजला जाऊ लागला. अमेरिकन काँग्रेसने ‘मेडल ऑफ ऑनर’, फ्रेंच शासनाने ‘शेव्हलिअर लिजन ऑफ ऑनर’, ग्रेट ब्रिटनने ‘रॉयल एअर क्रॉस’ व बेल्जियमने ‘ऑर्डर ऑफ लिओपोल्ड’ हे किताब बहाल करून त्याचा गौरव केला.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास लिंडबर्गने बर्लिन येथील अमेरिकन दुतावासात लष्करी साहाय्यक म्हणून काम केले. या काळात त्याने जर्मन हवाई दल व त्याचा विकास यांबाबत पाहणी केली. त्यासाठी त्याला जर्मनीला अनेक वेळा भेटी देण्याचा योग आला. जर्मनीने त्याचा ‘जर्मन मेडल’ देऊन गौरव केला, परंतु त्याने तो नंतर परत केला.

लिंडबर्ग १९३९ मध्ये मायदेशी परतला. त्याच वर्षी त्याची अमेरिकेतील विमाननिर्मिती व तंत्रज्ञान या कामी विशेष सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धापासून परावृत्त होण्याचा त्याने जाहीर सल्ला दिला. तथापि राष्ट्राध्यक्ष फ्रँक्‍लिन डी. रूझवेल्ट यांना तो मानवला नाही. परिणामतः त्याला आपल्या कर्नल या पदाचा राजीनामा देणे भाग पडले. युद्धकाळात लिंडबर्गने हेन्‍री फोर्ड या उद्योगपतीच्या साहाय्याने बी-२४ प्रकारच्या बाँब उत्पादनाचे व विविध विमानांच्या चाचण्यांचे काम केले. पॅसिफिक महासागराच्या कक्षेत त्याने सु. पन्नास लढाऊ विमानांचे नागरी उड्डाण केले. १९४१ मध्ये जपानने केलेल्या हल्ल्याविरुद्ध लिंडबर्गने सर्व हवाई युद्धक्षेत्रांवर अमेरिकेचे हित जपण्याचा प्रयत्‍न केला. 

दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्राध्यक्ष आयझनहौअरने लिंडबर्गची पुन्हा अमेरिकन हवाई दलाचा तांत्रिक सल्लागार आणि त्यानंतर याच राखीव दलाचा ब्रिगेडिअर जनरल म्हणून नेमणूक केली. (१९५४) ‘पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज’ या विमान कंपनीचा सल्लागार म्हणूनही त्याने काही काळ काम केले.

मेक्सिकोतील अमेरिकन राजदूताची सुकन्या ॲन स्पेन्सर मॉरो हिच्याशी लिंडबर्गचा १९२९ मध्ये विवाह झाला. जगातील अनेक देशांना या पतिपत्‍नींनी विमानाने प्रवास करून सदिच्छा भेटी दिल्या आणि नागरी विमान वाहतुकीमध्ये होत असलेल्या अभूतपूर्व विकासाचा त्यांनी पाठपुरवठा केला. अलौकीक कीर्ती व संपत्ती मिळूनसुद्धा लिंडबर्ग दांपत्याचे अखेरचे आयुष्य दुःखात गेले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अतिरेक्यांनी त्यांच्या दोन वर्षे वयाच्या मुलाचे व्यपहरण करून त्याची अमानुषपणे केलेली हत्या हे होय. मुलाच्या सुटकेसाठी पन्नास हजार डॉलर अतिरेक्यांना देऊनही मुलगा जिवंत मिळू शकला नाही. या घटनेने व्यथित होऊन लिंडबर्ग पतिपत्‍नींनी यूरोपचा आश्रय घेतला. अमेरिकन काँग्रेसमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. संघराज्य शासनाने या घटनेवरून ‘लिंडबर्ग ॲक्ट’ नावाचा अधिनियम संमत करून (१९३२) व्यपहरण किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्यांना जरब बसावी म्हणून त्यात मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद केली लिंडबर्गपुत्राच्या हत्याकारांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.

लिंडबर्गने विविध प्रकारचे लेखन केले असून त्याचे वुई (१९२७) द कल्चर ऑफ ऑर्गन्स (सहलेखक जीवशास्‍त्रज्ञ आलेक्‍सिस कॅरेल) (१९३८), ऑफ फ्‍लाइट अँड लाइफ (१९४८) व द स्पिरिट ऑफ सेंट लूइस (१९५३) हे ग्रंथ विशेष गाजले. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील द स्पिरिट ऑफ सेंट लूइस या ग्रंथास पुलिट्‍झर पारितोषिक मिळाले (१९५४). या थोर व्यासंगी वैमानिकाच्या जीवनावर इतरही अनेक लेखकांनी लेखन केले असून एक चित्रपटही काढण्यात आला आहे. किपाहुलू (हवाई बेटे) येथे त्याचे निधन झाले.

बाळ, नि. वि. संकपाळ, ज. बा.