व्यूहतंत्र, सैनिकी : (स्ट्रॉटिजी, मिलिटरी). देशातील लष्करी, राजकीय, आर्थिक, तांत्रिक व इतर सर्व साधनांचा पूर्ण वापर करून लढाईत संपूर्ण यश मिळविण्याच्या उद्देशाने आखलेले धोरण तथा व्यवस्था, अशी सैनिकी व्यूहतंत्राची व्यापक व्याख्या केली जाते. आधुनिक काळातील युद्धाचे क्षेत्र सर्वव्यापी व विस्तृत झाले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत व्यूहतंत्र व युद्धव्यवस्था ह्यांचा अर्थ फक्त सैन्याची जमवाजमव, रणक्षेत्रातील सैनिकी हालचाली व प्रत्यक्ष लढाईतील डावपेच एवढ्यांपुरताच मर्यादित होता. आता युद्धाचे समग्र व सर्वांगीण नियोजन करणे, असा व्यूहतंत्राचा व्यापक उद्देश व अर्थ मानला जातो. राजकीय उद्दिष्टे व लष्करी ताकद यांना जोडणारा दुवा म्हणजे सैनिकी व्यूहतंत्र होय.

युद्ध दीर्घकाळ चालते व त्यात अनेक लढायांचा समावेश असतो. एखादी लढाई हरली, तरी चालेल पण युद्ध जिंकले पाहिजे अशी दोन्ही बाजूंची धारणा असते. युद्धाचे धोरण वरच्या पातळीवर आखले जाते व लढाईचे डावपेच रणांगणात सेनानी खेळतात. रणभूमीवरील डावपेच हे एका व्यापक सैनिकी व्यूहतंत्राचा भाग असतात. त्यामुळे व्यूहतंत्र (स्ट्रॉटिजी) व रणनीती किंवा व्यूहरचना (टॅक्टिक्स) असे दोन भाग पडतात. देशाच्या आत्मरक्षणाचे अथवा आक्रमणाचे धोरण हे ह्या दोहोंच्या वरच्या पातळीवरचे असून ते राज्यकर्ते ठरवतात. ह्यास ‘युद्धधोरण’ (ग्रँड स्ट्रॉटिजी) असे नाव आहे.

पूर्वीच्या काळात राजे लढाईचे धोरण ठरवत. युद्धरचना व व्यूहतंत्र सांभाळीत व स्वत: प्रत्यक्ष रणक्षेत्रात सैन्याचे नेतृत्व करून व्यूह रचीत. परंतु जसजसे युद्धाचे क्षेत्र व्यापक होत गेले, सैन्यसंख्या वाढली, एकाहून अधिक आघाड्यांवर युद्धे होऊ लागली तसतसे व्यूहतंत्र जास्त गुंतागुंतीचे होत गेले. राजेशाही जाऊन लोकशाही अथवा इतर राजकीय यंत्रणा अस्तित्वात आल्या. त्यामुळे राजकीय व लष्करी क्षेत्रे भिन्नभिन्न झाली व लष्करास दुय्यम स्थान प्राप्त झाले. युद्ध म्हणजे राजकीय धोरण अंमलात आणण्यासाठी वापरण्यात येणारा अखेरचा उपाय, असे समजले जाऊ लागले. लष्करी शक्ती हे राष्ट्रीय धोरण सिद्धीस नेण्याच्या इतर अनेक साधनांच्या व उपायांच्या यादीतील एक साधन होऊन बसले.

पूर्वी लष्करी डावपेच, व्यूहरचना, रसदयंत्रणा, मृत व जखमी सैनिकांची व्यवस्था, शरण आलेल्या शत्रूशी वागणूक इत्यादींसंबंधीची माहिती एकत्रित मिळत नव्हती. त्यासंबंधीचे लेखन वा ग्रंथ उपलब्ध नव्हते. पुढे हळूहळू असे साहित्य उपलब्ध होत गेले. एकोणिसाव्या शतकापासून व्यूहतंत्राविषयी पुष्कळच माहिती मिळू लागली.

व्यूहतंत्रातील बदल : पूर्वी पायदळ, घोडदळ, हत्ती व रथ यांचे चतुरंगबल असे. नंतर नाविक दलाला महत्त्व आले व अगदी अलीकडे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस वायुसेना स्थापन झाली. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी युरोपमध्ये ⇨ पहिल्या नेपोलियनने (१७६९ –१८२१) शिस्तबद्ध लढाया आखल्या व केल्या. त्यांपासून बोध घेऊन ⇨ कार्ल फोन क्लाउझेव्हिट्स (१७८० – १८३१) या प्रशियन सेनानी व युद्धशास्त्रावरील विचारवंताने युद्धाची काही गमके मांडली. युद्धनीतीवर फोम क्रीग (इं. भा. ऑन वॉर) नावाचा जगप्रसिद्ध बृहद्ग्रंथ त्याने लिहिला. राष्ट्रीय युद्धधोरण, व्यूहतंत्र व व्यूहरचना या प्रचलित संज्ञांवर त्याने प्रकाश टाकला. लष्करी हालचाली व राजकीय धोरण हे दोन विभाग अलग न ठेवता त्यांच्यात सामंजस्य असले पाहिजे व एकमेकांच्या सल्ल्यानेच ही दोन्ही खाती चालली पाहिजेत, असे त्याने प्रतिपादन केले. विजय म्हणजे निवळ शत्रूचा प्रदेश काबीज करणे नसून त्याच्या सैन्यबळाचा संपूर्ण नाश करणे, अशी कठोर व्याख्या त्याने केली. त्यामुळे संपूर्ण शत्रुसेनेचा नाश हे व्यूहतंत्राचे ध्येय बनले आणि त्यासाठी लढायांमागून लढाया लढत राहणे हा मार्ग ठरला. त्याचे व्यूहतंत्र व विचारप्रणाली यांमुळे पहिल्या महायुद्धात लाखो लोकांचे बळी गेले. तसेच युद्धाचे पर्याय म्हणून पूर्वापर चालत आलेले साम, दाम व भेद हे तीन मार्ग मागे पडले.

अमेरिकेच्या यादवी युद्धानंतर (१८६१ – ६५) एक नवीन विचारप्रणाली अस्तित्वात आली. खांद्याला खांदा भिडवून तलवारी उपसून फळी उभारून प्रथम घोडदळाने चाल करावयाची व संगिनी उपसून पायदळाने हल्ले करून, तोफा व शत्रूच्या पायदळाचा नाश करावयाचा हे नेपोलियनचे व्यूहतंत्र दूरपल्ल्याच्या बंदुकांमुळे मागे पडले. उत्तर अमेरिकेची वाढती लोकसंख्या, वैज्ञानिक प्रगती, औद्योगिक भरभराट इ. नव्या घटकांचा अमेरिकेच्या आधुनिक व्यूहतंत्रावर परिणाम झाला. या युद्धात विरोधकांचा केवळ लष्करी पराभव करण्याचे तंत्र प्रथमच वापरले. परंतु साधनसंपन्नता तसेच वंशभेद व गुलामगिरी नष्ट करण्याचे उदात्त ध्येय इ. घटक उत्तरेकडील राज्यांचा जय होण्यास कारणीभूत ठरले.

एकोणिसाव्या शतकात जर्मन तत्त्वज्ञ, वैज्ञानिक, तसेच आक्रमण हाच एकमेव मार्ग असे प्रतिपादन करणारे सेनानी यांनी अर्थिक नाकेबंदी करून, समुद्रावर ताबा ठेवून तसेच नौसेना बळ वाढवूनच जगावर अंमल बसवता येईल, असे काहीसे एकांगी विचार मांडले व युद्धनीती आणि व्यूहतंत्र यांची वेगवेगळ्या अंगांनी छाननी केली. पहिल्या महायुद्धात प्रचंड आग ओकणाऱ्या तोफा, मशीनगन व युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात रणगाडे वापर यांचा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे समोरासमोर हल्ल्याचे व्यूहतंत्र मागे पडले व नाकेबंदी व मागून छुपे हल्ले करणे आणि खंदकाची स्थायी लढाई या नव्या कल्पना व्यूहतंत्रात अस्तित्वात आल्या. तरीही ‘शेवटची गोळी शेवटचा माणूस’ व कधीही माघार घ्यायची नाही, ही शिकवण सैनिकाला होतीच. त्याचप्रमाणे हळूहळू शत्रूचे दळणवळण तोडायचे, त्याला कुमक मिळू द्यावयाची नाही, त्याचे मनोबल खच्ची करावयाचे यांसारखे व्यूहतंत्राचे नवे मार्गही चोखाळण्यात आले.


व्यूहतंत्र व साधनसामग्री : शत्रूला युद्धसामग्री तयार करता येऊ नये, त्याला कच्चा माल मिळू नये, नवीन तंत्रज्ञान प्राप्त होऊ नये, तेथील वैज्ञानिक देश सोडून जावेत, तयार सामग्री युद्धक्षेत्रात पोहोचण्यापूर्वीच नष्ट केली जावी, लोहमार्ग व जलमार्ग उपलब्ध होऊ नयेत इ. उद्दिष्टे समोर ठेवून विसाव्या शतकात व्यूहतंत्राची आखणी होऊ लागली. पुढे अस्तित्वात आलेल्या वायुदलाने व आधुनिक नौदलाने आपापली व्यूहतंत्रे तयार केली. भूदलाला मदत करणे, हेही एक महत्त्वाचे कार्य त्यांच्याकडे सोपविण्यात आले.

सैनिकी व्यूहतंत्राची भूमिका आक्रमक असावी का संरक्षणात्मक असावी, अशा दोन परस्परविरोधी विचारांची स्पर्धा पुढे सुरू झाली. ह्याचे मुख्य कारण म्हणजे, पहिले व दुसरे महायुद्ध (प्रामुख्याने सुरुवातीची तीन वर्षे) युरोपमध्ये लढले गेले. त्यामुळे जर्मनांचा आक्रमक पवित्रा आणि फ्रेंच व रशियन यांचा संरक्षणात्मक व्यूहतंत्र हे वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीनंतर तसेच इंग्लंड व अमेरिका यांच्या भरीव सहकार्यानंतर आक्रमक बनले. तरीही युद्धाचे ध्येय जर्मनांचा समूळ नाश, की रशियन समाजवादाची पायबंदी करण्याकरिता पूर्वेकडे घोडदौड करावी, अशा मुद्यांवर मित्रराष्ट्रांत मतभेद होतेच.

हिटलरची तडित युद्धतंत्राची चढाई (ब्लिटझक्रीग), रशियन फौजांची बर्फाळ प्रदेशांतून नेपोलियनच्या फ्रेंच फौजांना आत येऊ देऊन थंडीत बर्फात मारण्याची युक्ती, असईच्या लढाईत (१८०३) मराठ्यांच्या फळीला बगल देऊन ती फिरविणे, भरतपूरच्या वेढ्यात (१८०४) खंदकात पाणी सोडून दलदल निर्माण करणे इ. अनेक उदाहरणे हे दर्शवितात की, व्यूहतंत्र व व्यूहरचना प्रसंगानुसार बदलाव्या लागतात. नुसतीच डुकराची मुसंडी मारीत राहिले, तर पराजय होतो, हे भरतपूरच्या वेढ्यात जनरल लेक अनेकदा हल्ले करून शिकला.

दुसऱ्या महायुद्धात युद्धभूमीवर अथवा रणक्षेत्रात लढाई चालू असताना बॉंबगोळे टाकून शत्रूला नष्ट करणे व त्याच वेळी त्याच्या देशावर एका वेळी पाचशे, तर कधी हजार विमानांनी बॉंब टाकून औद्योगिक वसाहती, कारखाने, लोहमार्ग, गोद्या इ. नष्ट करणे असे बॉंबहल्ल्यांचे नवे व्यूहतंत्र वापरात आले. ह्या सगळ्यावर कळस म्हणजे अमेरिकेने १९४५ मध्ये हीरोशीमा व नागासाकी या जपानी शहरांवर केलेला अणुबॉंबचा वापर. ह्यापूर्वी अश्वशक्ती, जलशक्ती, विद्युतशक्ती ह्यांच्या प्रभावाने सैनिकी व्यूहतंत्रांत बदल झाले होतेच परंतु दुसऱ्या महायुद्धापासून अण्वस्त्रे, दूरवर अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे, टेहळणी करणारे उपग्रह व दूरसंचार यंत्रणा यांनी व्यूहतंत्रात क्रांती घडवून आणली.

जसजसे लढाईचे स्वरूप व्यापक होत गेले, तसतसे युद्धाबद्दलचे मूलभूत सिद्धांत वा मूलतत्त्वे शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. हे सिद्धांत पूर्वी झालेल्या युद्धांच्या अभ्यासावर आधारलेले आहेत. हे सिद्धांत त्रिकालाबाधित आहेत, असे प्रतिपादन काही विचारवंत करतात तर काहींच्या मते ते नेहमीच बदलत राहतील व म्हणून ते मूलभूत सिद्धांत किंवा मूलतत्त्वे नाहीतच. मात्र व्यूहतंत्र व व्यूहरचना यांच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात.

इ. स. पू. ४०० मध्ये सून-झू ह्या चिनी सेनानीने व्यूहतंत्रासंबंधी तेरा तत्त्वे मांडली, तर नेपोलियनने ११५ सिद्धांत मांडले. त्यांचा प्रभाव आधुनिक व्यूहतंत्रात आढळून येतो. क्लाउझेव्हिट्सने लढाई हेच एकमेव साधन व शत्रूच्या सैन्यबलाचा संपूर्ण नाश हेच ध्येय असे म्हटले. ह्याउलट नाक दाबले की, तोंड उघडते ह्या म्हणीप्रमाणे, समोरासमोर युद्ध टाळून शत्रूला काटशह देऊन त्याला नरम करणे हे सरस व्यूहतंत्र होय, असे प्रतिपादन काही विचारवंत करतात. जेव्हा निजामाने पुण्यावर चाल केली व पहिल्या बाजीराव पेशव्यांना दक्षिणेच्या मोहिमेवरून ताबडतोब पुण्यास बोलावण्यात आले, तेव्हा त्यांनी पुण्यावर निजामाशी चार हात न करता त्याच्या मुलखावर स्वारी केली व मुलूख बेचिराख करीत लुटत सुटले. त्यामुळे निजामाने पुण्याचा वेढा उठवला आणि तो आपल्या मुलखाचे संरक्षण करण्यास धावला. हे शत्रूला काटशह देण्याचे सैनिकी व्यूहतंत्राचे एक उत्तम उदाहरण आहे, असे फील्ड मार्शल ⇨ बर्नार्ड लॉ मंगमरी (१८८७-१९७६) याने त्याच्या ‘ए हिस्टरी ऑफ वॉरफेअर’ (१९६८) या ग्रंथात नमूद केले आहे.

व्यूहतंत्रदृष्ट्या महत्त्वाची युद्धतत्त्वे : व्यूहतंत्राच्या दृष्टीने काही महत्त्वाची युद्धतत्त्वे पाश्चात्त्य देशांत सर्वमान्य झाली असून त्या दृष्टीने त्यांचे शिक्षण दिले जाते : (१) ध्येयाचे सातत्य राखणे, (२) बलाचे केंद्रीकरण, (३) बलांचा संतुलित वापर, (४) शत्रूला चकविणे व अनपेक्षित कृती घडवून आणणे, (५) व्यवस्थापन व साधनसामग्रीची उपलब्धता, (६) आक्रमक धोरण, (७) गतिमानता, (८) सहकार्य, (९) सुरक्षा, (१०) सरळ सोपी व्यूहरचना इत्यादी. यांशिवाय रशियन सेनेने सर्वनाश असे एक तत्त्व मांडले आहे. या तत्त्वात कालपरत्वे बदल घडू शकतात. जसजशी शस्त्रास्त्रांमध्ये सुधारणा होईल, तसतसे व्यूहतंत्र व रणनीतीचे स्वरूप बदलेल व त्यासंबंधीचे सिद्धांतही बदलतील. उदा., अण्वस्त्रयुद्धात केंद्रीकरण जाऊन विकेंद्रीकरण व पांगापांग हेच जीव वाचविण्यास मदत करू शकेल. अंतराळ यानातून हेरगिरी करणे शक्य झाले असल्यामुळे शत्रू युद्धाकरता सज्ज होत असताना त्याचे सैन्य, रणगाडे, क्षेपणास्त्रे इत्यादींची हालचाल समजू शकते. संदेशवाहनातील प्रगतीमुळे नवीन अण्वस्त्रांच्या तसेच इतर चाचण्या आता गुप्तपणे करता येत नाहीत. शत्रूवर अकस्मात हल्ला करणे वगैरे गोष्टी आता अशक्यप्राय आहेत. शत्रू अण्वस्त्राने युद्ध सुरू करेल की इतर मार्गाने, तसेच ते कधी सुरू होईल, हे सांगणे अवघड आहे.

व्यूहतंत्रात ध्येयसातत्य हेही काही काळ टिकेल परंतु इतर राष्ट्रांचा दबाव आल्यास स्वार्थास मुरड घालावी लागेल. ‘पुढील युद्धे टाळण्यासाठी युद्ध’ (वॉर टू एंड वॉर्स), असे प्रत्येक युद्धापूर्वी सांगितले जाते पण एका युद्धात व ते संपुष्टात आणणाऱ्या करारातच दुसऱ्या युद्धाची बीजे रुजलेली असतात, हे पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर निदर्शनास आले आहे.

व्यूहतंत्राच्या बाबतीत संयुक्त राष्ट्रांच्या सनदेप्रमाणे दुसऱ्या राष्ट्राच्या अंतर्गत कलहात सैनिकी व असैनिकी हस्तक्षेप करणे, मुळातच अन्याय्य ठरते. अमेरिका व ब्रिटन यांनी काही वेळा हे तत्त्व बाजूला ठेवून इतर राष्ट्रांच्या कलहात जाणीवपूर्वक हस्तक्षेप केला. उदा., व्हिएतनाममधील यादवी युद्धात अमेरिकेने केलेला हस्तक्षेप. [→ व्हिएतनाम युद्ध].

पहिल्या महायुद्धात आक्रमण व बलाचे केंद्रीकरण करूनही खंदकाची लढाई चालूच राहिली, तर दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनवर सतत हवाई हल्ले करूनही तो देश शरण आला नाही आणि मागास समजला जाणारा रशिया हा जर्मन फौजेला पुरून उरला. जपानसारख्या लहान देशाने नाविक सामर्थ्याचे केंद्रीकरण करून अमेरिकेशी झुंज दिली व अर्धा आशिया खंड घेऊनही दोन अणुबॉंब पडताच शरणागती पत्करली. या सर्व घटना व्यूहरचना व व्यूहतंत्राच्या दृष्टीने अभ्यसनीय आहेत.

भारत : पुराणकालीन युद्धांचा अभ्यास केल्यास सैन्याचे केंद्रीकरण, रणांगणातील युद्धाचे डावपेच व व्यूहरचना ह्यांचे भारतीय स्वरूप लक्षात येते. प्राचीन भारतात घोडे, रथ व हत्ती यांचा सैन्यदलात समावेश असल्यामुळे युद्ध वेगवेगळ्या पातळ्यांवर व निरनिराळ्या व्यूहरचना आणि तंत्रे वापरून केल्याचे दिसून येते. कौरव-पांडवांच्या युद्धातील चक्रव्यूह-रचना प्रसिद्ध आहे. कालमानानुसार लढाईच्या व्यूहतंत्रात बदल होत गेले. भारतात कोणा सेनानीने अथवा विचारवंताने युद्धपुराण अथवा युद्धस्मृती लिहिलेली आढळत नाही. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात (इ. स. पू. कार. ३२४-३००) कौटिल्याने रचलेल्या अर्थशास्त्र [→ अर्थशास्त्र, कौटिलीय] ह्या ग्रंथात युद्धशास्त्राचा प्रारंभ व व्यूहतंत्र वर्णिले आहे. त्यापूर्वी अलेक्झांडर व पोरस यांची हायडास्पीझ (आधुनिक झेलम) नदीकाठावरील लढाई अथवा रामायण-महाभारतातील लढाया, ⇨ दशराज्ञ युद्ध इ. लढाया कशा झाल्या यांची वर्णने आली आहेत. पण त्यांपासून कोणते धडे शिकावे, सैन्यास कसे प्रशिक्षण द्यावे, नवीन शस्त्रास्त्रे कशी असावीत अथवा हत्ती व रथ कालबाह्य झाले आहेत असे विचार कोणी मांडल्याचे दिसत नाही. पुढे शक, हूण, मंगोल आदी टोळ्या भारतावर चालून आल्या व युद्धे होत राहिली. त्यांतूनच व्यूहतंत्र आपोआपच विकसित होत गेले.

भारतीय परंपरेतील क्षात्रधर्म, धर्मयुद्ध ह्या संकल्पना व्यूहतंत्राचा पाया मानल्या आहेत. वर्णव्यवस्थेतील समाजाचा एक घटक युद्धास जबाबदार ठरवला गेला व त्याला लढाईचे प्रशिक्षण दिले क्षात्रधर्माची चौकट उभी राहिली व युद्धाचे नियम आखले गेले. सूर्यास्तास युद्ध थांबवण्याचा महाभारतकालीन दंडक व्यूहतंत्राचाच एक भाग म्हणता येईल.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुपदपादशाही व हिंदवी स्वराज्य ह्या कल्पनांना चालना दिली, तर काही मुसलमान राज्यकर्त्यांनी जिहाद व दार-उल-इस्लाम ह्या कल्पनांचा पुरस्कार करून व्यूहतंत्राला धर्माची बैठक दिली. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी, मुळावर घाव घातला म्हणजे फांद्या आपोआप तुटून पडतील, असा सल्ला छत्रपती शाहू महाराजांना दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांना कैदेतून मुक्त केले गेले व मराठ्यांमध्ये यादवी माजली. हे व्यूहतंत्राचे उत्तम नमुने म्हटले पाहिजेत. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, बाजीरावाची उत्तरेकडे घोडदौड व राजा छत्रसालास मदत इ. उदाहरणे व्यूहतंत्र किंवा व्यूहरचनेत मोडतील अशी आहेत. मात्र आपल्या देशात सैनिकी व्यूहतंत्राच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसत नाही.

भारतास स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर १९४७-४८ मध्ये काश्मीरमधील घुसखोरांशी झालेल्या भारतीय सैन्याच्या चकमकी, १९६२ चे चीनचे आक्रमण व चिनी सैन्यापुढे भारताने घेतलेली माघार, १९६५ साली पाकिस्तानशी झालेले अल्पकालीन युद्ध, १९७१ मधील बांगलादेशचे युद्ध व श्रीलंकेच्या मदतीस धाडलेल्या भारतीय शांतिसेना दलांचा सहभाग (१९७८) ह्या मुख्य लष्करी घटना व त्यांतून आलेले अनुभव व्यूहतंत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. १९६५ च्या भारत-पाक युद्धात भारताने एका महत्त्वाच्या व्यूहतंत्रात बदल केला. युद्ध भडकल्यास ते काश्मीरपुरते मर्यादित न राहता आम्ही (तत्कालीन) पूर्व पाकिस्तान व पश्चिमेस पंजाब-राजस्थान येथेही आक्रमण करू, ही पंतप्रधान लालबहादूर शास्त्री (१९०४ – ६६) यांची घोषणा हा बदल दर्शविते. बंगाल देश मुक्तियुद्धात (१९७१) तेथील जनतेची बाजू घेऊन भारताने घेतलेला आक्रमक पवित्रा व बांगला देशीयांची मुक्ती फौज उभी करण्याचे कार्य अंगीकारणे, हे व्यूहतंत्रातले महत्त्वाचे बदल होत. [→ भारत-चीन संघर्ष भारत-पाकिस्तान संघर्ष].

पंतप्रधान राजीव गांधींच्या कारकिर्दीत (१९८४ – ८९) भारतीय सेनादल व नौदल श्रीलंकेच्या सरकारच्या मदतीस धाडले गेले, हा राष्ट्रीय धोरणातील महत्त्वाचा बदल म्हणावा लागेल. तसेच मालदीवमधील सत्तापरिवर्तनाच्या संघर्षात भारतीय छत्रीधारी सैन्याच्या मदतीने माले येथील बंडाचा बीमोड करण्यात आला (१९८८). आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतीय व्यूहतंत्रातील बदलाच्या दृष्टीने या घटना विशेष परिणामकारक ठरल्या. जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तान-प्रेरित घुसखोरी व छुपे युद्ध हे भारतीय सैनिकी व्यूहतंत्रज्ञांपुढील एक आव्हानच म्हटले पाहिजे. [→ काश्मीर समस्या].

पहा : खंदक युद्धतंत्र गनिमी युद्धतंत्र जंगल युद्धतंत्र नाविक युद्धतंत्र पाणबुडी युद्धतंत्र मरुभूमी युद्धतंत्र महायुद्ध दुसरे महायुद्ध पहिले युद्ध व युद्धप्रक्रिया रणनीती रसदयंत्रणा, सैनिकी वेढा युद्धतंत्र संयुक्त सेनाकारवाई समर्यादित युद्ध सागरी नाकेबंदी.

 संदर्भ :  1. Adam, Roberts, The Strategy of Civlian Defence, London, 1967.

             2. Baldwin, H. W. Strategy for Tomorrow, Washington D. C. 1970.

             3. Brodie, Bernard, Guide to Naval Strategy, Oxford, 1959.

             4. Brodie, Bernard, Strategy in the Missile Age, Princeton, 1959.

             5. Earle, Edward M. Makers of Modern Strategy, Princeton, 1943.

             6. Gann, L. H. Guerrillas in History, Stanford, (Calif.), 1971.

             7. Liddell Hart, Sir B. H. Strategy, London, 1967.

             8. Martin, L. W. The Sea in Modern Strategy, Toronto,1967.

             9. Montgomery, Sir Bernard L. A History of Warfare, New York, 1968.

पित्रे. का. ग.