पॅटन, जॉर्ज स्मिथ : (११ नोव्हेंबर १८८५–२१ डिसेंबर १९४५). अमेरिकन जनरल व चिलखती रणगाड्याच्या युद्धतंत्रातील तज्ञ. कॅलिफोर्निया राज्यात सॅन गाब्रीएल गावी जन्म. त्याचे आजोबा व पणजोबा रणांगणावर कामी आले होते. वडील मात्र वकील होते. वेस्ट पॉईंट येथील राष्ट्रीय सैनिकी अकादमीत शिक्षण घेतल्यानंतर १९०९ मध्ये घोडदळात अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाली. झकपक राहणी व साहसी वृत्ती यांमुळे तो इतरांपेक्षा वेगळा वाटे. केवळ वीस दिवसांच्या सरावानंतर स्टॉकहोम येथील १९१२ सालच्या ऑलिंपिक क्रीडासामन्यात पाचशर्यती गटस्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे ब्राँझ पदक त्याने पटकावले होते. पहिल्या महायुद्धात अमेरिकन रणगाडा दलाचा तो प्रमुख होता. त्या युद्धातील अनुभवावरून भविष्यकाळात चिलखती दले व चिलखती युद्धतंत्र प्रभावी ठरणार, अशी त्याची मनोधारणा झाली. त्या दृष्टीनेच त्याने अमेरिकेत चिलखती सेना खडी केली. दुसऱ्या महायुद्धात उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को, ट्युनिशिया व सिसिली येथील लढायांत त्याच्या सैन्याच्या शीघ्र व वेगवान चढायांमुळे जर्मनांना पराभव पतकरावा लागला. पुढे १९४४ मध्ये पश्चिम यूरोपवर केलेल्या चढाईत पॅटनच्या तिसऱ्या आर्मीने ज्या झपाट्याने तडाखेबंद कारवाया केल्या, त्या वेगाने जर्मन सैन्याची पीछेहाट सुरू झाली. १९४४ च्या अखेरिस आर्देनच्या दुर्गम प्रदेशातून जर्मनांनी अमेरिकन सैन्याच्या आघाडीवर जबरदस्त तडित् प्रतिहल्ला केला. या उभाऱ्याच्या लढाईत (बॅटल ऑफ द बल्ज) अशक्यप्राय वाटणाऱ्या हालचाली करून पॅटनने जर्मनांनी वेढलेल्या अमेरिकन सैन्याची सुटका केली. ऱ्हाईन नदी ओलांडण्यात शत्रूने केलेल्या चुकांचा फायदा होऊन सर्वांच्या आधी जर्मनीच्या अंतर्भागात सैन्य घुसविले. त्याच्या पुढील योजनांना जर वरिष्ठ सैनिकी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा प्रतिसाद मिळाला असता, तर बर्लिन रशियाच्या अगोदर दोस्त राष्ट्रांच्या हातात आले  असते आणि कदाचित युद्धोत्तर काळातील यूरोपचा राजकीय नकाशा वेगळा झाला असता, असे म्हटले जाते. युद्धसमाप्तीनंतर बव्हेरियाचा प्रशासक असताना त्याने उघडपणे नाझींना सहानुभूती दाखविली व रशियाची अवहेलना केली. यासाठी त्याला अमेरिकेत परत बोलवण्यात आले होते. जर्मनीतील मॅनहाइम गावाजवळ झालेल्या मोटारअपघातामध्ये तो सापडला व हायड्लबर्ग येथील सैनिकी इस्पितळात निधन पावला. पॅटनचे वर्तन तऱ्हेवाईक असले, तरी युद्धकौशल्यात व अचूक निर्णय घेण्यात तो अजोडच वाटतो. जनरल आयझनहौअरपेक्षाही तो अधिक कार्यक्षम होता. असे म्हटले जाते. ⇨ रोमेल हा त्याच्या तोडीचा सेनापती म्हणता येईल. वॉर ॲज आय न्यू इट (१९४७) हे त्याचे आत्मचरित्र सुप्रसिद्ध आहे.

संदर्भ :  Bannerji, A. N. Vas, L. S. R. The Great Commandars, Bombay, 1975.

दीक्षित, हे. वि.