ओसा : प्रक्षेपणास्त्रसज्ज नौका.

तोफनौका : (गनबोट). लढाऊ नौकेचा एक प्रकार. ज्या युद्धसज्ज नौकेचे वजन सामान्यपणे ४०० टनांपेक्षा अधिक नसते, ती तोफनौका होय. तोफनौका ही संज्ञा सध्या प्रचलित नाही. गस्तनौका,  क्षेपणास्त्रनौका इ. नावे त्या त्या लघुनौकांवरील शस्त्रास्त्रांच्या उपयोगाच्या अनुषंगाने त्यांना दिली जातात. आधुनिक वर्गवारीप्रमाणे तोफनौकांचा अंतर्भाव ‘लढाऊ लघुनौका’ या वर्गात होतो. रशियन वर्गवारीप्रमाणे ६५० टनांपर्यंतच्या नौकांना लढाऊ लघुनौका म्हणतात. उदा., रशियाच्या ‘नानुच्का’ या तोफनौकेचे वजन ६५० टन आहे. लढाऊ लघुनौकांवरील प्रमुख शस्त्रास्त्रांवरून त्यांचे पाणतीर, सुरुंगसंमार्जक, पाणबुडीविरोधी व गस्तटेहळणी करणारी इ. प्रकार होतात. सर्व तोफनौकांवर बहुतांशी स्वयंचलित विमानविरोधी तोफा असतातच. या नौकांतील एंजिनांची अश्वशक्ती २,००० ते २०,००० व्होल्टपर्यंत असते. यांचा प्रवास सुखकारक नसतो. त्या कलंडण्याची भीती असते. त्यांचा पल्ला सामान्यतः १,५०० किमी. पर्यंत असतो. या नौकांवर लक्ष्यवेधी, अस्त्रमार्गदर्शक व अस्त्रक्षेपण–नियंत्रक इ. युद्धाकार्यानुकूल इलेक्ट्रॉनीय उपकरणे असतात. विनाशिका वा क्रूझर यांसारख्या भारी नौकांचे वजन, त्यांवरील शस्त्रास्त्रसज्जता व नौसैनिकांची संख्या तसेच चलनवलनासाठी आवश्यक सागरी पाण्याच्या खोलीचा अभाव या कारणांमुळे सागरी किनाऱ्यालगत त्या लढू शकत नाहीत. अशा वेळी तोफनौकांची गरज असते. शिवाय नद्या,

मराठा नौसेनेचे गलबत (१७ वे शतक)

खाड्या व उथळ पाण्याची ठिकाणे या स्थळी लढाऊ लघुनौका उपयोगी पडतात. मूल्यवान भारी युद्धनौका आधुनिक क्षेपणाच्या माऱ्यामुळे निष्प्रभ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑक्टोबर १९६८ मध्ये इझ्राएली ‘ऐलाट’ ही विनाशिका इजिप्तच्या ‘कोमार’ क्षेपणास्त्र तोफनौकेने बुडविली. या प्रत्यक्ष अनुभवावरून गस्तटेहळणी, अवचित हल्ले, आंतर अडवणूक (इंटरडिक्शन) व किनारी वाहतूक–संरक्षण या कार्यांसाठी बडी राष्ट्रेसुद्धा मोठ्या संख्येने तोफनौकांचा उपयोग करतात. या प्रकारच्या नौका चीनजवळ ५३०, तर रशियाजवळ ३२५ आहेत. भौगोलिक कारणांमुळे इंडोनेशियाकडेही पुष्कळ तोफनौका आहेत. सागरी लढाया बहुतांशी सागरतीरापाशी अथवा त्यालगत होतात. या दृष्टीनेही तोफनौका उपयुक्त ठरतात. तोफनौकेला पूरक किंवा स्वतंत्रपणे लघु पाणबुड्या (मिड्‌जेट सब्‌मरीन) वापरण्याचे तंत्र पाकिस्तानने अवलंबिले आहे. १९६० सालापासून रशियाने वेगवान हल्लेखोर लघुनौकांचा विशेष पुरस्कार केला. जगातील बहुतेक देशांच्या नौसेनांकडे तोफनौका आहेत. शांतताकाळात सागरी तेलविहिरींचे रक्षण, दहशती प्रकारांचा प्रतिकार, वाहतूक–संरक्षण इ. कार्यांसाठी या नौका उपयोगी पडतात. क्षेपणास्त्रनौका आघाडीवर राहून शत्रूच्या भारी युद्धनौकांवर हल्ले करतात. पाणतीर वगैरेंसारख्या इतर तोफनौका किनाऱ्याजवळ राहून, कमांडो–हल्ले वा इतर घातपाती कृत्ये यांच्याशी मुकाबला करतात. त्याचप्रमाणे शत्रूच्या किनाऱ्यावरील महत्त्वाची नागरी व सैनिकी स्थाने त्या नष्ट करू शकतात. शत्रूच्या बंदरात शिरून सुरूंग पेरणे, त्याच्या युद्धनौकांना सुरूंग चिकटवून त्या उडवून देणे वगैरेंसारखी घातपाती कृत्ये करण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. त्यांच्या लहान आकारामुळे त्यांना ओळखणे व टिपणे रडारलाही कठीण असते. त्यांनी डागलेली अस्त्रे सागरी पाण्याला लगटून जात असल्यामुळे शत्रूला त्यांची चाहूल लागत नाही. अस्त्रे डागून या नौका त्वरेने पळून जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचा पाठलाग करणे कठीण होते. त्यांना विमानाच्या साह्याने टिपणेही अवघड जाते. आशियातील बहुतेक राष्ट्रांचा भर या तोफनौकांवरच आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात वेगवान गलबतांचे प्रमाण गुरब वगैरे मोठ्या नौकांपेक्षा अधिक होते. इराण, ईजिप्त, पाकिस्तान, चीन वगैरे राष्ट्रांतील नौसेनेत या नौकांची संख्या वाढत आहे. भारताकडे ‘ओसा’ व ‘कोमार’ या तोफनौका आहेत.

पहा: नौसेना युद्धनौका.

दीक्षित, हे. वि.