बंकरहिलची लढाई : १७ जून १७७५. अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहती व ब्रिटन यांच्यात राजकीय संघर्ष चालू होता. त्यातूनच बंकरहिलची लढाई उद्‌भवली व तिचे पर्यवसान अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात झाले. १९ एप्रिल १७७५ रोजी ब्रिटिश दल आणि अमेरिकन लोकसेना यांच्यात बॉस्टनपाशी काँकर्ड व लेक्झिंग्टन येथे चकमक उडाली. बॉस्टनमधील ब्रिटिश सैन्याला अमेरिकन सैन्याने वेढा घातला व बॉस्टन बंदराची नाकेबंदी करण्यासाठी बंकर टेकडी व्यापण्याऐवजी चुकून जवळची ब्रीड्झची टेकडी अमेरिकन लोकसेनेने व्यापली. या ब्रीड्झ टेकडीवरील ब्रिटिशांचे दाने हल्ले अमेरिकी सैन्याने धैर्याने परतविले परंतु ब्रिटिशांचा तिसरा मुसंडी हल्ला यशस्वी झाला. कारण अमेरिकन सैन्याचा दारूगोळा संपला होता व म्हणून ब्रीड्झची टेकडी त्यांनी सोडून दिली. या लढाईत अमेरिकेचे ४५० व ब्रिटिशांचे १,०५४ सैनिक ठार झाले. ब्रीड्झ टेकडीची लढाई ही बंकर टेकडीची लढाई म्हणून इतिहासजमा झाली. अमेरिकन सैन्याने गोळीबाराबरोबर कुशल नियंत्रण राखून ब्रिटिशांची मोठी हानी केली. ब्रिटिशांनी अमेरिकेच्या बचावभिंतीवर मुसंडी हल्ले बिनधोकपणे मारून फारच हानी करून घेतली, त्याऐवजी त्यांना बंकर टेकडीच्या मागे चार्ल्‌झ नदीमधून नौका नेऊन पिछाडीवर हल्ला करता आला असता. या यशामुळे अमेरिकन लोकसेनेचा आत्मविश्वास वाढला. पुढे याच अमेरिकन लोकसेनेचे खड्या सैन्यात रूपांतर झाले. जनरल वॉशिग्टन त्या सेनेचा प्रमुख झाला.

संदर्भ : Montross, Lynn, War Through The Ages, new York, 1960

दीक्षित, हे. वि.