छत्रीधारी सैन्यशत्रूच्या पिछाडीवर वा रणक्षेत्रावर हल्ला करण्यासाठी वायुवाहिनी ( एअर बोर्न ) सेनेचा उपयोग केला जातो. या सेनेची दोन अंगे आहेत : एक छत्रीधारी सैन्य व दुसरे विमानउतार सैन्य ( एअर लँडिंग ट्रुप्स). दुसऱ्या महायुद्धात ग्लायडर सैन्य हे तिसरे अंग अस्तित्वात होते परंतु ग्लायडर-सैन्याची हानी फार होत असल्याने ते आता व्यवहारात नाही.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : पहिल्या महायुद्धामध्ये ( १९१४—१८)  टेहळणी, छायाचित्रण, बाँबहल्ले, मारामारी इत्यादींसाठी विमाने वापरण्यात आली परंतु शत्रूच्या पिछाडीला उतरून शत्रूची फळी उलटविण्याची कारवाई झाली नाही. अमेरिकी जनरल मिचेल याने अशा कारवायांची योजना तयार केली होतीपण ती अमलात आली नाही. १९२७ मध्ये सर्वप्रथम इटलीत २५० छत्रीधारी सैनिकांचे एक पथक तयार करण्यात आले परंतु त्यात पुढे काही प्रगती झाली नाही. रशियाने १९३० मध्ये मोठ्या संख्येने छत्रीधारी सैनिक व त्यांचे युद्धसाहित्य जमिनीवर उतरविण्याचे प्रदर्शन केले. १९३६ साली एका लष्करी हालचालीच्या सरावात एक संपूर्ण डिव्हिजन विमानातून उतरली. १९३९ मध्ये फिनलंडवरील चढाईत रशियाने छत्रीधारी सैन्य वापरले परंतु रशियाने छत्रीधारी सेनातंत्रात लक्षणीय असे यश मिळविले नाही. फ्रान्समध्येही या सेनेबाबत फारसे प्रयत्‍न झालेले दिसत नाहीत.

दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभीच, वायुवाहिनी सेनेच्या बाबतीत जर्मनी सर्वांच्या पुढे आहे, हे कळून चुकले होते. १९३९ मध्ये पोलंडवरच्या आक्रमणात छत्रीधारी सैन्य कमांडो  म्हणून जर्मनीने वापरले. नॉर्वे व डेन्मार्कवरील चढाईतही याच दृष्टीने पंचमस्तंभीयांच्या साहाय्याने छत्रीधारी सैन्य वापरण्यात आले. १९४० मध्ये हॉलंडवरील चढाईत जर्मनसेनेच्या डावपेचात्मक हालचालींस आवश्यक असे तीन पूल छत्रीधारी सैन्याने काबीज केले. बेल्जियममधील इबन एमिल या किल्ल्याचा कबजा त्या किल्ल्यावरच उतरून जर्मन छत्रीधारी सेनेने घेतला. तसेच क्रीट बेट काबीज करण्याची जर्मनीची मोहीम ही सर्व दृष्टींनी लक्षणीय आहे. या मोहिमेत फक्त छत्रीधारी सैन्य, विमानउतार व ग्लायडरमधून नेलेले सैन्य यांनी कामगिरी केली. त्यात जर्मन सैन्याची फार हानी झाली. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी छत्रीधारी सैन्य वापरल्याची काही उदाहरणे आहेत. उदा., १९४४ मधील ओव्हरलॉर्ड मोहीम. यात नॉर्मंडीच्या किनाऱ्यावरील मोठ्या तोफांचे मोर्चे उद्ध्वस्त करणे व बगला पकडणे अशी कारवाई होती. १९४५ मध्ये ऱ्हाईन नदी पार करण्याच्या मोहीमेत व्हेझेल येथे १४,००० छत्रीधारी व ग्लायडर सैनिक उतरविले. याकरिता १,५७५ विमाने आणि सु.१,४०० ग्लायडर वापरले. ही मोहीम फारच सावधगिरीने झाली. छत्रीधारी सैनिकांना मदत मिळण्यात अडचण नव्हती. जर्मनीचा प्रतिकारही नव्हता. या कारवाईत काही लक्षणीय असे रणकौशल्य दिसत नाही. रशियाने १९४१-४२ मध्ये व्ह्याझमा-स्मोलेन्स्क रणक्षेत्रावर छत्रीधारी सैन्याच्या सहा ब्रिगेड वापरल्या.

विमानातून उडी घेत असलेला छत्रीधारी सैनिक

छत्रीधारी सैनिकाचे वैशिष्ट्य :इतर सैनिकापेक्षा छत्रीधारी सैनिक थोडा वेगळा असतो. कोठल्याही सेनेत त्यास मानाचे स्थान मिळते. विमानातून उडी मारून तो जमिनीवर उतरण्यापर्यंत त्याला स्वतःवर मानसिक ताबा ठेवावा लागतो. आकाशातून उतरताना त्याला एका वेगळ्या तऱ्हेचा एकाकीपणा वाटत असतो. जमिनीवर उतरल्यानंतर त्याला शत्रुप्रदेशात काही वेळ एकाकी काम करावे लागते. तो एकाकी पडल्यास त्याला येईल त्या प्रसंगास तोंड द्यावे लागते. त्याच्या ठायी शारीरिक व मानसिक बल, सहनशक्ती, निर्धारशक्ती व शस्त्रास्त्रे चालविण्याचे कौशल्य इतर सैनिकांपेक्षा उच्च प्रकारचे असावे लागते.

छत्रीधारी सैन्याची कामगिरी व संघटना :पुढील कामगिरीकरिता छत्रीधारी सैन्याचा वापर झाल्याचे गेल्या ४० वर्षांच्या इतिहासातून आढळून येते. (१) टेहळणी करणे, शत्रूला पिछाडीस त्रास देणे व किरकोळ लढाया करणे. (२) कमांडो कारवाया करणे. (३) अण्वस्त्रांच्या हल्ल्यानंतर ते क्षेत्र ताबडतोब ताब्यात घेणे किंवा शत्रुफळीत पडलेल्या भगदाडांतून युद्धक्षेत्र वाढविणे. (४) शत्रूची नियंत्रक संघटना आणि दळणवळण विस्कळीत करणे. (५) नवीन युद्ध-आघाडी सुरू करणे. (६) चिलखती व इतर दलांनी केलेल्या आघाताला पूरक कामगिरी करून शत्रूची त्वरेने दाणादाण करणे.  

संघटना :छत्रीधारी सैन्याची संघटना ही प्रत्येक राष्ट्राची राजकीय व आर्थिक क्षमता आणि युद्धनीती यांवर अवलंबून असते. सध्या अणुयुद्धासाठी ही संरक्षण दले सिद्ध ठेवावी लागतात. एका डिव्हिजनमध्ये  तीन छत्रीधारी ब्रिगेड म्हणजे नऊ पलटणी असतात. स्वयंचलित तोफखाना, रॉकेटप्रक्षेपण, विमानविरोधी तोफखाना, संदेशवाहक पलटण, प्रक्षेपणास्त्र पलटण व इतर साहाय्यक पलटणी असतात. आधुनिक डिव्हिजनमध्ये ७,००० ते ८,००० सैनिक असतात. तसेच रणांगणावर वापरावयाची  अण्वस्त्रेदेखील  असतात.  त्यांत लहानमोठ्या उखळीतोफा, णगाडाविरोधी प्रक्षेपणास्त्रे वगैरे शस्त्रास्त्रसंभार असतो. रशियाकडे वायुवाहिनी डिव्हीजनकरिता अन्टॉनॉव्ह—१२ व अन्टानॉव्ह—२२ विमाने आहेत. यांशिवाय ४० टन वजन घेऊन जाणारी हेलिकॉप्टरही आहेत. अमेरिकेकडे एक वायुवाहिनी डिव्हिजन व एक वायुचलित (एअरमोबाइल) डिव्हिजन आहे. तसेच फेअरचाइल्ड ११९, सी—१३० लॉकहीड वगैरे मोठी विमानेही आहेत. 


कारवाईची प्रक्रिया व आखणी :छत्रीधारी सैन्याच्या कारवाया तीन प्रकारच्या असतात : (१) रणनीतीच्या स्वरूपाची (टॅक्टिकल) कारवाई : या कारवाईचे उद्देश पुढीलप्रमाणे असतात. रणांगणावर लढत असलेल्या शत्रूच्या पिछाडीवर उड्या टाकून लढाया देणे. छत्रीधारी सैन्य ज्या ठिकाणी उड्या मारणार त्या क्षेत्रावर लढाऊ विमानाद्वारे हल्ले करून शत्रूवर दहशत बसविणे. नंतर मार्गशोधक (पाथफाइंडर्स) उड्या टाकून ज्या क्षेत्रावर छत्रीधारी सैन्य उतरणार असेल त्याची आखणी करून ती ओळखण्याचे व दिसण्याचे निर्देशक लावणे, तसेच तोफा व भारी शस्त्रास्त्रे सोडणे इत्यादी. यानंतर पाठोपाठ छत्रीधारी सैन्य विमानातून किंवा हेलिकॉप्टरमधून उड्या मारून जमिनीवर येते व ते शस्त्रास्त्रे गोळा करून लढाईकरिता कूच करते. (२) डावपेचाच्या स्वरूपाची (स्ट्रॅटेजिक) कारवाई : ही कारवाई शत्रूफळीच्या मागे फार दूर असलेली रसदपुरवठा स्थाने, औद्योगिक केंद्रे, बंदरे, हवाई आणि नाविक तळ [⟶ नाविक तळ व गोदी ]सरकारी कार्यालये वगैरे काबीज करण्यासाठी केली जाते. छत्रीधारी सैन्याला फार दिवस स्वतंत्र रीत्या व कोणाचीही मदत मिळणार नाही, हे गृहीत धरून ही कारवाई करावी लागते. असल्या कारवायांची आखणी, योजना व नियंत्रण राष्ट्रीय सेना कार्यालयातून प्रत्यक्ष केले जाते. युद्धक्षेत्रीय वा रणांगणीय सेनापतीकडे ही कारवाई सोपवीत नाहीत. (३) प्रत्यक्ष युद्धक्षेत्रीय (ऑपरेशनल) कारवाई : ही कारवाई युद्धक्षेत्रातील एकंदर हालचालीस साहाय्यभूत होईल या दृष्टीने केली जाते. हिचे नेतृत्व युद्धक्षेत्रीय सेनापती करतो. रणांगणाच्या शत्रूपिछाडीवरील पूल, दळणवळण केंद्रे, रस्त्यांची जोडस्थळे, राखीव सैन्याचे तळ, दूरपल्ल्याची प्रक्षेपणकेंद्रे, तसेच मोहिमेच्या दृष्टीने महत्वाची स्थाने काबीज किंवा उद्ध्वस्त करण्याचा उद्देश या कारवाईमागे असतो. हा उद्देश रणनीतिस्वरूप प्रक्रियेप्रमाणेच असून त्याचे नियंत्रणही तसेच असते. यामध्ये छत्रीधारी सैन्याच्या कारवाईची योजना, आखणी व नियंत्रण फार काळजीपूर्वक व काटेकोरपणे करावे लागते. तसेच अनपेक्षित प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागते. ५,००० छत्रीधारी सैन्य नेण्यासाठी सु. ७०० विमाने लागतात. 

भारतीय छत्रीधारी सैन्याची स्थापना व कामगिरी :ब्रिटीश राजवटीत १९४० ऑक्टोबरमध्ये सरसेनापती सर रॉबर्ट कॅसल्स याने हिंदुस्थानी छत्रीधारी सैन्य खडे करण्याचा बेत केला. १९४१ मेमध्ये सरसेनापती सर क्लॉड ऑकिन्‌लेक  यांनी एक छत्रीधारी ब्रिगेड तैनात करण्याचा निर्धार केला. १९४१ जूनमध्ये त्याला इंग्लंडमधून तत्त्वतः मंजुरी मिळाली. त्याप्रमाणे २,५०० छत्रीधारी सैनिकांची एक ब्रिगेड व विमानउतार सैनिकांची (एअर लँडिंग) एक ब्रिगेड संघटित करण्याचे कार्य सुरू झाले. अशा प्रकारे १९४१ ऑक्टोबरमध्ये दिल्ली छावणीत पन्नासाव्या हिंदुस्थानी छत्रीधारी ब्रिगेडची प्रतिष्ठापना झाली आणि तिला विमानातून उड्या मारण्याची व अन्य पूरक शिक्षण देण्याची व्यवस्था विलिंग्डन विमानतळावर करण्यात आली. इंडियन मेडिकल सर्व्हिसचे लेफ्टनंट रंगराज आणि पायदळाचे हवालदार मेजर मथुरासिंग हे दोन पहिले हिंदुस्थानी छत्रीधारी सैनिक मानले जातात. उड्या मारण्यासाठी हॅलेन्शिया विमान वापरात होते. यास त्याच्या मंदगतीमुळे ‘उडते डुक्कर’ म्हणत. ही विमाने उड्या मारण्याच्या दृष्टीने सोयीस्कर नव्हती, सैनिकांना विमानाच्या तळाशी असलेल्या भोकातून उड्या माराव्या लागत. उड्या मारताना भोकाच्या काठावर सैनिकांचे तोंड आदळून कित्येक वेळा दात पडत असत. उडी मारल्यानंतर जर दुर्दैवाने छत्रीत हवा शिरली नाही, तर सैनिक जमिनीवर आदळून मृत्यू पावत. उडी मारल्यानंतर विमानाच्या वायुझोतात (स्लीप स्ट्रीम) सैनिक सापडत व तो जर व्यवस्थित उभा नसेल, तर त्यास कोलांट-उड्या खाव्या लागत. नाकावर गुडघे आदळत. पाच उड्या मारल्यानंतर— रात्रीची एक धरून –सैनिकास लायक म्हणून ‘पंख’ प्रदान केले जात. पुढे सैनिकास याकरिता सात उड्यांची परीक्षा द्यावी लागे. १९४२ मध्ये कानपूरला ‘छत्र्या’ बनवण्याचा कारखाना अमेरिकेचे एक कारखानदार अर्व्हिन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. १९४२ फेब्रुवारीमध्ये दिल्लीनजीक गाझियाबादपाशी ब्रिगेडचा पहिला सराव झाला. १९४२ नोव्हेंबरमध्ये पन्नासावी ब्रिगेड कँबेलपूर व छत्रीधारी सैनिकी शाळा चकलाल (सध्या दोन्ही गावे पाकिस्तानात) येथे हलविण्यात आली. १९४५ मेमध्ये पन्नासाव्या ब्रिगेडने रंगूनच्या मुक्ततेच्या कारवाईत प्रशंसनीय काम केले. यापूर्वी १९४४ डिसेंबरमध्ये हिंदुस्थानी छत्रीधारी रेजिमेंटची स्थापना झाली. त्या वेळी हॉर्सा, हेड्रियन, हॉटस्पर व वॅको ही सैनिकी ग्लायडर वापरात होती. बंगलोर येथील वालचंद हिराचंद यांच्या हिंदुस्थान कंपनीत १० बैठकांचा ग्लायडर बनविण्यात आला. टाटा एअरक्राफ्ट कंपनीनेदेखील हॉर्सा बनविण्यास प्रारंभ केला. पुढे पन्नासाव्या ब्रिगेडनंतर सत्याहत्तराव्या ब्रिगेडची उभारणी झाली. यातील पलटणी हिंदू, मुसलमान व गुरखा या पद्धतीने उभ्या केल्या. १९४५ मेमध्ये दोन वायुवाहिनी डिव्हिजनचे एक वायुवाहिनी कोअर उभे करण्याचे ठरले परंतु १९४५ ऑगस्टमध्ये दुसरे महायुद्ध संपले. दुसरी हिंदुस्थानी वायुवाहिनी डिव्हिजन कराची येथे नोव्हेंबरमध्ये पोहोचली. पन्नासावी ब्रिगेड केट्टा येथे व सत्याहत्तरावी मलीर कराची येथे आली. चौदावी ब्रिगेड बिलासपूर (मध्य प्रदेश) येथेच होती. याच सुमारास ब्रिटीश छत्रीधारी पलटणी काढून घेण्यात आल्या. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर सैन्यवाटपात चौदावी ब्रिगेड पाकिस्तानला मिळाली व सत्याहत्तराव्या ब्रिगेडमधील हिंदू पलटणी पन्नासाव्या ब्रिगेडमध्ये आल्या. पहिल्या पलटणीचे (दुसरी पंजाब) कर्नल यशवंतराव परांजपे होते. ही सर्वांत वरिष्ठ छत्रीधारी पलटण आहे. यानंतरची दुसरी पलटण तिसरी मराठा व तिसरी कुमाउनी आहे. पुढे १९४७ जूनमध्ये पन्नासाव्या ब्रिगेडचे परांजपे हे पहिलेच भारतीय ब्रिगेडिअर झाले. १९४७-४८ मध्ये पाकिस्तानने जम्मू—काश्मीरवर आक्रमण केले. ब्रिगेडिअर परांजपे यांच्या नेतृत्वाखाली पन्नासाव्या ब्रिगेडने जम्मू—अखनूर—नौशहर अशा मार्गाने जाऊन पाकिस्तानी व पठाण टोळीवाल्यांच्या पराभव करून कोटली गाव ताब्यात घेतले. परांजपे यांच्या योजनेप्रमाणे कोटलीच्या नैऋत्येस असलेले मीरपूर हे मोक्याचे गाव कोटलीच्या अगोदर घेतले असते, तर पुढे कोटली हे सोडावे लागले नसते परंतु त्या वेळचे जम्मू-काश्मीरचे सेनापती जनरल कुलवंतसिंग यांनी परांजपे यांची योजना फेटाळली. त्याचे दुष्परिणाम कोटली सोडण्यात झाले. शिवाय झांगड व नौशहर येथे पाकिस्तानी सैन्याशी व टोळीवाल्यांशी घनघोर युद्धे करावी लागली. या सुप्रसिद्ध लढायांत दुसऱ्या मराठा छत्रीधारी पलटणीने अभिमानास्पद कामगिरी केली. नौशहरच्या लढाईत परांजपे यांच्यानंतर आलेले ब्रिगेडियर उस्मान ठार झाले. एकंदरीत जम्मू- काश्मिरच्या युद्धात पन्नासाव्या ब्रिगेडने नाव मिळविले.  


स्वतंत्र भारतात १५ एप्रिल १९५२ या दिवशी भारतीय छत्रीधारी रेजिमेंट जन्मास आली. पहिली पलटण (पंजाब), दुसरी पलटण (मराठा) व तिसरी पलटण (कुमाउनी) अशा तीन छत्रीधारी पलटणी त्यात सामील झाल्या. आग्रा येथे मुख्य कार्यालय सुरू झाले. याच सुमारास भारतीय परंपरेला अनुरूप असे छत्रीधारी ब्रिगेडचे बोधचिन्ह (फॉर्मेशन साइन), रेजिमेंट बॅज, पंख इ. प्रचारात आले. बोधचिन्ह म्हणून शत्रुजित व त्याचा पंखयुक्त घोडा कुवलय हे आहे, तर पंखयुक्त बेयोनेट व ‘बलिदान’ शब्द असलेले बॅज कमांडो विभागाचे आहे. पन्नासाव्या ब्रिगेडच्या दुसऱ्या छत्री पलटणीने व साठाव्या वैद्यकीय छत्री पलटणीने कोरियात (१९५०—५३) उत्तम काम केले. ‘शांति’ सैन्य म्हणूनही पॅलेस्टाइनमध्ये भारतीय छत्रीधारी पलटणीने प्रशंसनीय कार्य केले, तर गोवा मुक्तिसंग्रामात (१९६२ डिसेंबर) पन्नासावी ब्रिगेड अग्रेसर होती परंतु सर्व कामगिरी पायदळी सैन्य म्हणूनच झाली.

‘डकोटा’ विमानातून सैनिक उड्या घेत असल्याचे दृश्य

छत्रीधारी सेना म्हणून बांगला देश मुक्तिसंग्रामातदेखील तिने काम केले. तनगैल गावापाशी सुप्रसिद्ध ‘दुसरी  पॅराट्रुप पलटण’ आकाशातून उतरली आणि तनगैल गाव, पुंगली पूल व एक नदी पायउतारा होऊन काबीज केली. यामुळे पाकसेनेच्या फळीत पाचर बसून डाक्क्याकडे पाकसैन्याला जाता आले नाही. त्याच पलटणीने डाक्क्यात विजयाचे प्रथम पाऊल टाकले.  

एक्कावन्नावी छत्रीधारी ब्रिगेड १९६५ सप्टेंबरमध्ये जन्मास आली. ब्रिगेडिअर सुचासिंग (दुसऱ्या पलटणीचे कर्नल) हे तिचे पहिले ब्रिगेडिअर झाले. राजस्थानमध्येही गंगानगर येथे या पलटणीने लढाया मारल्या. पन्नासावी व एक्कावन्नावी ब्रिगेड या छत्रीधारी ब्रिगेडींचा गौरवास्पद इतिहास फार मोठा आहे. यांशिवाय छत्रीधारी सैन्याबरोबर छत्रीधारी कमांडो पलटणींनी बांगला देश, काश्मीर व राजस्थान येथेही मोठ्या धाडसी कारवाया केल्या आहेत.  

विमाने व इतर सामरिक संभार :छत्रीधारी सैनिकांना इच्छित स्थळाकडे वाहून नेण्यास व त्यांना उतार क्षेत्रात (ड्रॉपिंग झोन) आकाशातून उडी मारण्यासाठी भारतीय सेनेत सध्या खालील विमाने वापरली जातात.

(१)फेअरचाइल्ड पॅकेट सी – ११९ : ही विमाने १९६३ पासून वापरात असून ती अमेरिकी बनावटीची आहेत. यांना दोन एंजिने असतात व यातून ४२ सैनिक जाऊ शकतात. याच्या फ्युजिलाजच्या डाव्या-उजव्या बाजूंच्या दोन दरवाजांतून सैनिकांना उड्या मारता येतात.

(२)कॅरिबू : हे २४ सैनिकांचे विमान कॅनेडीयन बनावटीचे आहे. सैनिकांना याच्या फ्युजिलाजच्या मागच्या बाजूला असलेल्या दरवाजातून उड्या मारता येतात. हे १९६४ पासून वापरात आहे.

  

(३)अन्टॉनॉव्ह-१२ : ही रशियन बनावटीची विमाने असून ती ६२ सैनिक वाहून नेतात. १८० नॉट वेग असताना सैनिक यातून उड्या मारतात. उडी घेण्याचा दरवाजा याच्या फ्युजिलाजच्या मागच्या टोकाला आहे.  

छत्रीधारी सैनिकांकरिता आधुनिक बनावटीच्या छत्र्या असून त्या छत्र्या व सैनिकांचे बूट, कोट, हेलमेट इ. इतरांपेक्षा वेगळे असतात. यांच्या बंदुका वगैरेही हलक्या असतात. तोफा, जीप इ. सोडण्यासाठी चार ते सहा छत्र्यांची कार्गो-छत्री असते. सैनिकांना रसदपुरवठा देखील विमानातून छत्रीने किंवा छत्रीविना टाकला जातो.  

  छत्रीधारी सैन्य विरोध-संघटना :‘शत्रूला बेसावध ठेवून अकस्मात’ आघात करणे, हे छत्रीधारी सैन्याच्या हल्ल्याचे मूलतत्वे आहे. म्हणून त्याला अनुसरून विरोधी संघटना उभी करावी लागते. विमानतळ, औद्योगिक केंद्रे, नाविक तळ, रसद पुरवठा व दळणवळण केंद्रे, रस्त्यांची जोडस्थाने, पूल व इतर महत्त्वाची केंद्रे, अस्त्रप्रक्षेपक केंद्रे, रडार  व सैनिकी कार्यालये यांच्या रक्षणासाठी विमानविरोधी तोफा, मशिनगन वगैंरेंची व्यवस्था करावी लागते. निरीक्षकाची व टेहळणी पथकांची उभारणी करून विमानांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागते. आपली व शत्रूची विमाने ओळखता यावी म्हणून शत्रु-विमानांची माहिती ताबडतोब सर्व संबंधित केंद्रांकडे पोहचवावी लागते. छत्रीधारी सैन्याशी मुकाबला करण्यासाठी राखीव फौजा, रणगाडे वगैरे मोक्याच्या ठिकाणी तयार ठेवतात. पारंपारिक युद्ध असो वा अणुयुद्ध असो, दोहोंना छत्रीधारी सैन्याची आवश्यकता असतेच. विशेषतः अणुयुद्धातील कारवायांपेक्षा पारंपरिक युद्धतंत्रांत छत्रीधारी सैन्य वापरणे विशेष सोयीस्कर ठरते. रणनैतिक कारवायांकरिता हेलिकॉप्टर व अन्य कारवायांकरिता विमाने योग्य वाटतात. जमिनीवरील शत्रूच्या बळाला निष्प्रभ करण्यावर कारवाईचे यश अवलंबून असते. जेथे दळणवळण साधने फारशी नाहीत अशा ठिकाणी किंवा जंगली पहाडी मुलखांत वा वाळवंटात छत्रीधारी सैन्य वापरणे लाभदायक असते. शत्रूचा जमिनीवर जम बसेपर्यंत आकाशात आपले वायुवर्चस्व असले, तरच छत्रीधारी पथकाची कारवाई यशस्वी होणे शक्य असते. कारवाईपूर्वी शत्रूविषयी संपूर्ण गुप्तवार्ता  मिळविणे आणि योग्य उतारक्षेत्रे निवडून ठेवणे आवश्यक असते. अशा वेळी छत्रीधारी सैन्य व त्याची मध्यम, भारी शस्त्रास्त्रे यांची वाहतूक एकत्रित व एकवटून झाली पाहिजे. कोठल्याही चुकीमुळे शत्रू सावध झाला, तर तो जबर प्रतिरोध करुन छत्रीधारी सैन्याची वाताहत करू शकतो. छत्रीधारी सैन्य तयार करणे व ते जय्यत राखणे अत्यंत खर्चाचे असते. छत्रीधारी सैन्याच्या दृष्टीने ग्लायडर हे वाहन निरूपयोगी असल्यामुळे त्याची जागा आता विमाने किंवा हेलिकॉप्टरने घेतली आहे.

  

पहा : वायुवाहिनी सेना व युद्धतंत्र.

संदर्भ :     1. Gavin, J. G. Airborne Warfare, Washington, 1947.

2. Miksche, F. D. Paratroops, London.

3. Praval, K. C. India’s Paratroopers, Delhi, 1974.

 

दीक्षित, हे. वि.