सिपिओ ॲफ्रिकेनस (थोरला) : (इ. स. पू. २३६— १८४/१८३). प्रसिद्घ रोमन सेनाधिकारी. विख्यात ⇨ झामाच्या लढाईत (इ. स. पू. २०२) कार्थेजियन सेनापती ⇨ हॅनिबल याचा दुसऱ्या ⇨ प्यूनिक युद्घात पराभव केल्यामुळे त्याला ॲफ्रिकेनस हे नामाभिधान प्राप्त झाले. लॅटिनमध्ये याचे नाव सिपिओ ॲफ्रिकेनस असे असून, त्याचे पूर्ण नाव पब्लिअस कॉर्नीलिअस सिपिओ ॲफ्रिकेनस असे आहे. त्याचा जन्म रोम (इटली) येथे एका उच्चकुलीन कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नावही पब्लिअस हेच होते. त्याचे वडील, आजोबा आणि पणजोबा हे प्राचीन रोमन अधिकारी किंवा परराष्ट्रात वकील म्हणजे कॉन्सल होते. सिपिओचा विवाह एमिलिअर पौलस या परराष्ट्र वकिलाची कन्या एमिलिया हिच्याशी झाला. त्यांना दोन मुलगे होते. त्यांपैकी पब्लिअस हा अनारोग्यामुळे शासकीय सेवेत टिकू शकला नाही. त्याने धाकटा सिपिओ ॲफ्रिकेनस आणि ल्युसिअस यांना दत्तक घेतले होते. ल्युसिअस इ. स. पू. १७४ मध्ये प्रोटर (परराष्ट्र वकिलाच्या खालील दर्जाचा अधिकारी) झाला.

इ. स. पू. २०५ मध्ये सिपिओची कॉन्सल म्हणून निवड करण्यात आली. सीनेटमधील राजकीय विरोधामुळे खचून न जाता त्याने आपले सैन्य सुसज्ज केले आणि हॅनिबलच्या ताब्यातील इटलीच्या खालील भागातील लॉक्री एपिझेफीर शहर हिसकावून घेतले. पुढे त्याने विनाशक कॅन्नी लढाईत लष्करी ट्रिब्यून म्हणून काम केले (इ. स. पू. २१६). पुढे तो नागरी सेवेत वरिष्ठ कोतवाल (मॅजिस्ट्रेट) म्हणून रुजू झाला (इ. स. पू. २१३). नंतर त्याला कौटुंबिक आणि राष्ट्रीय दुर्घटनांना सामोरे जावे लागले. स्पेनमध्ये त्याचे वडील आणि काका पराभूत होऊन मारले गेले. तेथे कार्थेजियन लोकांनी एब्रो रेषेपर्यंत आगेकूच केली होती (इ. स. पू. २११). रोमनांनी स्पेनला कुमक पाठविण्याची जबाबदारी सिपिओवर सोपविली. त्यामुळे आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची संधी त्याला मिळाली. तेथे केवळ कार्थेजियन सेनेला जेरीस आणणे आणि इटलीत हॅनिबलला कुमक पाठविण्याला प्रतिबंध करावयाचा नसून आपल्या वडिलांचे आक्रमक धोरण तेथे राबवून शत्रूला द्वीपकल्पाबाहेर काढण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याने ताराको (तारागोना) या आपल्या मुख्य ठाण्यावरुन शत्रूच्या कार्थेगो नोव्हा या मुख्य ठाण्यावर अचानकपणे पायदळ आणि नौदल यांच्या संयुक्त फौजेसह हल्ला चढविला. त्यावेळेस स्पेनमधील शत्रूच्या तिन्ही सेना मुख्य ठाण्यापासून दूर होत्या. या वेळी त्यांना लॅगूनमधील (खाजन) पाण्याच्या पातळीत झालेल्या घटीची मदत झाली. कार्थेगो नोव्हामध्ये त्यांना भांडार, रसद यांचा लाभ झाल, तसेच स्थानिक चांदीच्या खाणी, सुंदर बंदर आणि दक्षिणेकडे आगेकूच करण्यासाठी तळ या गोष्टी त्याच्या हाती लागल्या. त्यानंतर प्रशिक्षित सैन्य घेऊन बिटिकामधील बीक्युला (बैलेन) येथे त्याने कार्थेजियन सेनापती हझद्रुबल बार्का याचा पराभव केला (इ. स. पू. २०८). पुढे त्याने सेव्हिलजवळील इलिपाच्या (अल्काला डेल डिओ) लढाईत कार्थेजियन सेनेचा पराभव केला आणि स्पेनवर पूर्ण वर्चस्व मिळविले.

बाळ, नि. वि.