मानचिन्ह: एखाद्या व्यक्तीला तिच्या गौरवार्थ प्रदान करण्यात येणारी उपाधी. सांस्कृतिक (धार्मिक, सामाजिक वा सैनिकी), ज्ञानविज्ञान, क्रीडा, जीवनरक्षा, दानशूरता इ. क्षेत्रांत असामान्य व लक्षणीय कार्य करणाऱ्या किंवा केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्याची अथवा त्यांना सन्मानित करण्याची प्रथा जगात प्राचीन काळापासून सर्वत्र चालू आहे. सन्मानित करण्याच्या प्रथेत (१) राष्ट्रीय, (२) आंतरराष्ट्रीय, (३) संयुक्त राष्ट्रीय, (४) वेगवेगळे धर्म व संप्रदाय, (५) वैश्विक धर्मसंस्था व (६) अखिल मानवता असे विभिन्न दृष्टिकोन आढळतात. जगात घडलेल्या महायुद्धांचा परिणाम होऊन संकुचित असा राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक दृष्टिकोन त्याज्य ठरून आणि जग हा एक महासमाज गृहीत धरून असामान्य सत्कार्य वा कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींचा मानचिन्हे देऊन गौरव करण्याची प्रथा अलीकडे रूढ होत आहे.

महात्मा गांधींना मिळालेली सन्मानदर्शक पदके : बोअर युद्ध (१८९९ – १९०२) पदक झूलूलँड (द. आफ्रिका प्रजासत्ताक) मुक्तिआंदोलन (१९०६) सेवापदक व कैसर-इ-हिंद (१९१५).

मान वा मानचिन्ह या संकल्पनेचे अधिष्ठान वैयक्तिक तसेच त्या त्या व्यक्तीचा कुलाभिमान वकुलपरंपरा आणि सामाजिक अस्मिता या भावनांवर अवलंबून असते. व्यक्ती व तिच्या जातिवर्गातील तसेच जातीजातींमधील संबंध व वर्तन यांमुळे समाज आणि राष्ट्र यांचे नियंत्रण होऊ शकते. व्यक्तीचे वर्तन व तिचे कार्य यांचे मूल्यमापन इतर व्यक्ती व समाज हे करीत असतात. म्हणूनच वर्तनमूल्यमापन आणि तद्‍भव कीर्ती वा अपकीर्ती यांचा अन्योन्य संबंध प्रस्थापित होतो. व्यक्तीच्या आकांक्षा व सामाजिक मूल्यमापन यांमधील मानचिन्ह हा एक दुवा असतो. व्यक्तिसमूहाच्या (उदा., सैन्य, सैनिकी गट) मूल्यांशी (परंपरा, इतिहास, आदर्श) त्या गटातील व्यक्ती तादात्म्य झाल्याचे निदर्शक म्हणजे त्या व्यक्तीचा अभिमान होय उदा., क्षत्रिय वर्णाची क्षात्रवृत्ती व रणांगणावर लढताना वीरगती पावणे. व्यक्तीच्या या कर्तृत्वाबद्दल तिला मान देणे उचित ठरते. मात्र त्या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाने स्वतःला मानपात्र ठरण्यासाठी प्रथम मूल्यदान करणे अगत्याचे असते. धैर्यगुण हा मानाचा पाया असतो. आयाबहिणींचा मान वा अब्रू अबाधित राखणे हे पौरुषत्वाचे सन्माननीय कृत्य समजले जाते. राष्ट्राची सार्वभौमिकता व अखंडत्व राखणे तसेच स्थावर-जंगम संपत्ती उदा., गुरेढोरे, पवित्र स्थाने वा सांस्कृतिक मूल्ये इत्यादींचे संरक्षण करणे व त्याप्रीत्यर्थ प्राणार्पण करणे प्रत्येक नागरिकाचे व सैनिकाचे परम कर्तव्य समजले जाते. म्हणूनच अशा व्यक्ती सन्मान्य ठरतात.

मानचिन्हांचे किंवा मानसन्मान देण्याचे विविध प्रकार आढळतात, उदा., संबोधन, पदवी, ⇨ पदक, ताम्रपट, प्रशस्ती, स्मृतिचिन्ह, आसनाची उच्चनीचता, आसनपंक्तीतील स्थान, पुतळे, वीरगळ उभारणे, सती जाणे, मिरवणूक वा शोभायात्रा काढणे, मान्यवर व्यक्तीचे वाहन ओढणे रस्ता किंवा सार्वजनिक वास्तूंना गौरवास्पद व्यक्तींचे नाव देणे तोफ व बंदूकीच्या फैरींची सलामी झाडणे, नगारे-दुंदुभी वाजविणे वा बहाल करणे, पोशाख, कीर्तिस्तंभ, ध्वजप्रदान [⟶ ध्वज] वा शस्त्र देणे, आर्थिक निधी अर्पण करणे इत्यादी.

मानचिन्हांच्या उलट नीचता व अपमानचिन्हेही असतात. उदा., फेटा-पागोटे वापरण्यास बंदी करणे, फेटा उडवून देणे, हुक्कापाणी बंद करणे, स्त्रियांची अब्रू घेणे, गधेगाळी किंवा शिवीगाळी करणे, केस विमुक्त करणे वा पाट काढणे, पदर पसरणे, पदवी देणे, पदके काढून घेणे वा परत करणे, पुतळे-मूर्ती-भंजन, गाढवावरून धिंड काढणे व बहिःष्कृत करणे इत्यादी ⇨ द्वंद्वयुद्ध हाही मानापमानाच्या देवाण -घेवाणीचाच प्रकार आहे, तर ⇨ दिव्य करणे हाही एका अर्थी मानसन्मानच ठरतो. भारत, चीन, जपान, किंबहुना दक्षिण आशियातील बहुतांश राष्ट्रांमध्ये मानापमान, अकलंकित नाव, पापपुण्य, मरणोत्तर कीर्ती इ. संकल्पनांत बरेच साम्य दिसते. भगवद्‍गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवरून मान, कीर्ती, पाप वा संभावित व्यक्ती यांचे सांस्कृतिक महत्त्व समजून येते.

अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।

ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापवमवाप्स्यसि ॥३३॥

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेSव्ययाम् ।

संभावितस्य चाकीर्तिर्मरणदतिरिच्यते ॥३४॥

जगातील काही राष्ट्रांची मानचिन्हे: जगातील काही प्रमुख राष्ट्रांतील मानचिन्हांविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

स्पार्टा (ग्रीस) : या प्राचीन नगर-राज्याचा पाय सैनिकी होता. स्पार्टा समाज उत्तम लढवय्ये व लढवय्यांच्या उत्तम बायका निर्माण करण्यात धन्यता मानून त्या कार्यालाच अग्रहक्क देत असे. जो पुरुष राज्याला तीन पुत्र देई, त्याला सैन्यभरतीतून मुक्त केले जाई. जो चार पुत्र देई, तो राजाकरिता कोणतेही कर्तव्य करण्यास बांधील नसे. या दोन्ही सवलती म्हणजे एकप्रकारची मानचिन्हेच होती. सैनिकी सेवेतून मुक्तता मिळविण्याचे हे दोन सन्मान्य मार्ग होते.

रोम : रोमच्या सैन्यात शिस्त व आज्ञापालन यांसाठी शिक्षेचे भय नेहमी असे. त्याबरोबरच सैनिकापुढे वेतनाव्यतिरिक्त मानसन्मानांचे आमिष असे. उदा., हस्ता पुरा (फाळ नसलेली भाल्याची काठी), पदक (फॅलेरी), हस्तपट्टा किंवा गळपट्टा, मुकुट (करोना मुरालिस) इत्यादी. तसेच वेढा दिलेल्या गावांची तटबंदी पहिल्या प्रथम चढून जाणाऱ्या सैनिकास मुकुट, तर असामान्य धैर्य दाखविणाऱ्या सैनिकास करोना आरिआ आणि शिबीर किंवा दुर्ग यांची वेढ्यातून सुटका करणाऱ्याला तृणचोल परिधानाचा, पूर्ण-मान-मुकुट घालण्याचा, हातात दंड धारण करण्याचा, धूम्रवर्णीय व सुवर्ण कार्मिक चोल-वेष पांघरण्याचा आणि रक्तवर्णीय झगा घातलेल्या रक्षकांच्या रथातून जाण्याचा अधिकार प्रदान करण्यात येई तर विजयी दलपतीला लूट, पशुबली, ओलीस ठेवलेली व्यक्ती व शृंखलाबद्ध युद्धबंदी विजयोत्सवात प्रदर्शित करण्याची मुभा देणे, हे एकप्रकारे सन्मानचिन्ह मानले जाई त्यामुळे अधिपतीच्या सैनिकांचा आणि सामान्य जनतेचा युद्धोत्साह साहजिकच वृद्धिंगत होत असे.

यूरोप: येथे मध्ययुगाच्या प्रारंभापासून मान व अभिमान या संकल्पना तथाकथित कुलीन जनांनी रूढ केल्या. मानाभिमान केवळ कुलिनांचाच विशेषाधिकार असल्याने कनिष्ठ वा अकुलीन जनांना मानाभिमान असा नसतोच म्हणून अकुलीन लोक मानचिन्हांना पात्र नसतात. सेनाधिकारी त्यातही घोडदळाचे वा पायदळाचे कुलीन असल्याने तेच मानसन्मानास पात्र होत, असा दृढ समज असे. म्हणूनच इतरांनी त्यांचे आज्ञापालन करणे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहणे आवश्यक असल्याचे समजले जाई. पूर्वी ब्रिटन आणि प्रशिया येथील सैन्यात सामान्य सैनिकाला मानापासून वंचित केले होते परंतु पुढे यूरोपात व एकूण पाश्चात्य राष्ट्रांतच युद्धासाठी आणि साम्राज्यविस्तारासाठीही मोठ्या सैन्याची गरज भासू लागल्याने सामान्य सैनिकाला मानचिन्हे देण्यास सुरुवात झाली. फ्रान्समधील मार्शल साक्स तसेच राज्यक्रांती व नेपोलियनची युद्धे यांचाही परिणाम मानचिन्ह प्रणालीवर घडून आला.

ग्रेट ब्रिटन: हे राजाधिष्ठित लोकशाही राष्ट्र असले, तरी तेथे बऱ्याच सन्मान-पुरस्कारांची परंपरा सरंजामशाही स्वरूपाची आहे. सामाजिक स्थान लक्षात ठेवूनच तेथे मानसन्मान श्रेणी निश्चित केलेल्या असतात तथापि कालशक्ती व आर्थिक उन्नयन-प्रक्रियेमुळे पूर्वकालीन वर्गीय भेदाभेद लुप्त होत असल्याचे प्रतिबिंब मानसन्मानप्रदान पद्धतीत दिसून येते.

फ्रान्स : येथे सतराव्या शतकात सैन्यभरती व लढाऊपणा यांसाठी सर्वांना मानसन्मानास पात्र धरावे, असे मार्शल साक्स याचे मत होते. तेथे सुवर्ण अंगठी व सेंट लुई नामक मानचिन्हे देण्यात येत. राज्यक्रांती झाल्यानंतर समतातत्व राष्ट्रवाद व विजयश्री यांनी सर्व जनता प्रभावित झाली. त्यातच मानसन्मानाची ईर्ष्या प्रबळ करण्यासाठी फ्रान्सच्या क्रांतिकारी शासनाने व नेपोलियनने मानचिन्हे प्रदान करण्यास जोराने चालना दिली. त्यामुळे अधिकारी व सामान्य सैनिक यांना मिळणाऱ्या मानचिन्हांतील भेदाभेद संपला. ‘लिजन ऑफ ऑनर’ हे उच्च मानचिन्ह कोणाही पात्र सैनिकास मिळू लागले.

रशिया : येथे झारशाहीचा उच्छेद झाल्यावर (१९१७) साम्यवादी व राजकीय शासन आले. साहजिकच, मानचिन्हप्रकार व प्रदानपद्धती साम्यवादी सिद्धांतावर आधारिली गेली. येथील ‘सोव्हिएट जनतंत्र महावीर’ याचा सर्व मानचिन्हांत अग्रक्रम असून ते भारतातील भारतरत्नाच्या दर्जाचे आहे. लेनिन, स्टालिन व ब्रेझन्येव्ह हे याच मानचिन्हाने विभूषित केले गेले होते. रशियातील इतर मानचिन्हे पुढीलप्रमाणे आहेत : हातोडा-कोयता, सुवर्णपदक, लेनिन ऑर्डर, विजयमानचिन्ह, मार्शल तारा, लाल झेंडा, सुव्हॉरॉव्ह ऑर्डर, कूटूझॉव्ह ऑर्डर, अलेक्झांडर नेव्हस्की, उशकॉव्ह, नाकिमॉव्ह, बगदान खम्यल्यन्यीत्स्की, लाल तारा व लाल झेंडा इत्यादी. वरील मानचिन्हांव्यतिरिक्त रशियांतर्गत न्याय व सुव्यवस्था राखण्याच्या कामगिरीबद्दलही १९५२ सालापासून पदके देण्यात येतात. इतर समाजवादी राष्ट्रांतही (चीन प्रजासत्ताक वगळून) सामान्यपणे मानचिन्हे प्रदान करण्याची पद्धत अनुसरली जाते.


चीन: चीन प्रजासत्ताक राष्ट्रात १९६५ सालापासून गणवेषावर मानचिन्हे प्रदर्शित करण्याचे बंद झाले. काही राष्ट्रीय पुरस्कार उदा., स्वातंत्र्य व मुक्ती हे अस्तित्वात असले, तरी ते आता देण्यात येत नाहीत तथापि काही सन्मान व प्रशंसापुरस्कार मात्र व्यक्तींना व सैनिकी दलांना अजूनही देण्यात येतात. त्यांची नावे अशी : रोजनिशी, वस्त्रे, रणवीर, आदर्श सैनिक, लाल व पोलादी कंपनी, व्याघ्रदल, तिखट तलवार, तुकडी इत्यादी.

अमेरिका : अमेरिकेत काही मानचिन्हे सार्वकालिक असतात. उदा., विशिष्ट सेवा नौ-क्रॉस, रौप्य तारा, पर्पल हार्ट इत्यादी. ही सर्वश्रेष्ठ सन्मानचिन्हे तेथे प्रदान केली जातात. वरील मानचिन्हांव्यतिरिक्त काही प्रासंगिक उदा., पहिले महायुद्ध, फिलिपीन्स, यूरोप इ. मानचिन्हेही प्रदान करण्यात येतात. आतापर्यंत अशी ६४ चिन्हे देण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष हा सर्वोच्च सेनापती असल्याने सार्वकालिक पदके तोच प्रदान करतो. अन्य पदके अमेरिकी काँग्रेस किंवा राष्ट्रपती बहाल करतो.

जपान: जपानमध्ये ज्या व्यक्तींनी समाजासाठी असामान्य सत्कृत्ये केली त्यांना मानसन्मानांनी (जपानी भाषेत इटेन) अलंकृत करण्यात येते. येथील मानप्रदानपद्धती १८८१ मध्ये सुरू झाली असून राज्यशासन, राजकारण व सैनिकी कामगिरी यांकरिता जपानचा सम्राट ही मानचिन्हे प्रदान करतो. १९३७ पासून विज्ञान, वाङ्‍मय, कला, संगीत व नाट्यकला या क्षेत्रांतील थोर व्यक्तीही सन्मानित करण्यास आरंभ झाला. मात्र अमीर-उमराव सन्मान रद्द करण्यात आले (१९४७). त्याचप्रमाणे जपानी संविधानात युद्ध हे त्याज्य मानले गेल्याने, सैनिकी कामगिरीसाठी सन्मान देण्याचेही बंद करण्यात आले. वरील मानसन्मानांच्या भरतीला एखाद्याचे प्राण वाचविणे, सद्‍वर्तन, व्यापार, उद्योग व प्रज्ञावंत यांना मानांकित करण्याची प्रथा जपानमध्ये कार्यान्वित झाली आहे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार तेथील सम्राट या मानचिन्हांचे दान करतो.

मुस्लिम राष्ट्रे: येथे बहुतांश इस्लाम धर्माधिष्ठित मानचिन्हेच दिली जातात. इस्लाम धर्माचा विस्तार करणाऱ्या व्यक्तींच्या नावाने ही मानचिन्हे असतात. येथे गाझी अन्सार वा मुजहिंद यांसारखी सन्मान संबोधनेदेखील वापरली जातात.

आंतरराष्ट्रीय मानचिन्हे : ज्या व्यक्तींनी समग्र मानवसमाजाची सेवा व प्रगती यांसाठी कार्य केले त्यांना काही जागतिक संस्थांकडून मानचिन्हे अर्पण करण्यात येतात. उदा., ⇨ नोबेल पारितोषिके, मागसायसाय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्वरूपाची क्रीडासेवा पदके, लेनिन शांतिपुरस्कार इत्यादी.

भारत: भारतातील मानचिन्ह-प्रदानपद्धतींचा परिचय करताना पुढील मुद्यांचा विचार करावा लागतो. (१) भारतात परकीयांचे आगमन किंवा त्यांची तथाकथित आक्रमणे व त्यांची एतद्देशीयांवर स्थापलेली राज्ये व त्यांमुळे झालेले धार्मिक-सामाजिक परिणाम. (२) हिंदु धर्माव्यतिरिक्त अन्य धार्मिक संकल्पना, संस्था व त्यांचे परिणाम. (३) एतद्देशीयांवर राज्य स्थापून त्याचा विस्तार करण्यासाठी परकीयांनी युद्धाशिवाय योजिलेले अन्य उपाय व साधने. या पार्श्वभूमीवर भारतात देण्यात येणाऱ्या मानचिन्हांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

प्रागैतिहासिक पार्श्वभूमि: प्राचीनतम सिंधुसंस्कृतीचे निश्चित सांगोपांग ज्ञान अद्यापि झालेले नाही तथापि वैदिक वाङ्‍मयावरून इंद्र या अतिशय शूर अशा मानुषी व्यक्तीचे दैवतीकरण झाले असावे, असे विद्वानांचे मत आहे. बौद्ध व जैन धर्मात युद्ध हे पापकृत्य समजले जाते, त्यामुळे युद्धवीरांचा मानसन्मान करण्याची रीत त्यांत नसावी. मात्र त्यातील धार्मिक नेते, विचारवंत, ज्ञानी उपदेशक यांना महावीर, मुनी महामुनी, विद्वान, विदुषी ही मानचिन्हात्मक संबोधने पूर्वीच्या काळी लाविली जात. आपल्या मृत पतीबरोबर सहगमन करणाऱ्या त्याच्या पत्नीला ‘सती’ म्हणून गौरविण्याची चाल होती. भिक्षु-भिक्षुणी तसेच श्रमण व श्रमणी यांच्यासाठी लेणी, अक्षय्यविधी इ. अर्पण केली जात. धर्मदायाची पार्श्वभूमी मानचिन्हात्मकच दिसते. हिंदू धर्मात ऋषिमुनी व वीर, सूर्यमंडळ भेदून जातात अशी कल्पना रूढ आहे. म्हणून वीर म्हणजे पूज्य वा माननीय व्यक्ती ठरत असे. वर्णधर्मानुसार कर्तव्य न केल्यास अपकीर्ती होते या जाणिवेतूनच ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ आणि ‘ये विषयी न धरता तकवा पूर्वज हांसती’ अशी परंपरा जोपासली जाते. त्यासाठी मानसन्मानही दिले जातात.

अशोककालीन पद्धत: सम्राट अशोकापासून भारतात मानचिन्हे देण्याची परंपरा सुरू झाली असावी. उदा., ‘देवांचा प्रिय’, ‘देवपुत्र’ व ‘देवराय’ इ. बिरुदावली आणि ‘प्रौढप्रतापचक्रवर्ती’, ‘आदित्य भट्टारक’, ‘अरिकेसरी’ ही अभिधाने याची साक्ष देतात. ही मध्ययुगीन राजबिरुदे, प्रजेने राजाला दिली, की राजांनी आत्मस्तुतिप्रीत्यर्थ स्वतःच लावून घेतली हे सांगणे कठीण आहे. राजसेवेबद्दल जमिनी, शेला-पागोटे, बिरुदे वा मानचिन्हे शूरवीरांना दिली जात. सिविस्थान जिंकल्यानंतर तेथील हिंदु राजा काक याने महंमद बिन कासिमला, आसन-दान, रेशमाचा पोशाख, शिरोभूषण, मोर बसविलेले छत्र व सालंकृत घोडे देणे ही हिंदची (सिंधची) मानचिन्हे आहेत, असे सांगितले होते. अफगाणिस्तानात, मुस्लिम राज्यांच्या हिंदू सेवकांना पागोटे बांधावयास बंदी असे.

मुसलमानी राजवटीतील पद्धत: मुसलमानी राजवटीत हिंदु परंपरा व मुस्लीम राजांच्या कुलपरंपरेप्रमाणे मानचिन्हे दिली जात. उदा., जहागिरी-वतने, अंगरखे (खिलाफ), पालखी, नौबद वाजविणे, हत्तीवरून मिरविणे, सालंकृत घोडे-शस्त्रास्त्र, बिरुदे, जन्मनामाच्या जोडीला नवीन नावे देणे, निशाणाला याकच्या शेपट्या बांधणे इत्यादी. आग्रा येथील दरबारात छत्रपती शिवाजी राजे यांना औरंगजेबाने आसन न देता किरकोळ उमरावाच्या बरोबर उभे ठेवून त्यांचा जो अपमान केला होता त्यामागे ही मानापमानाचीच धारणा होती. शत्रूकडील महत्त्वाच्या व्यक्तींना फंदफितुरीस उद्युक्त करण्यासाठी देखील पूर्वीच्याकाळी मानसन्मानांचा उपयोग केला जाई. उदा., छत्रपती संभाजीच्या वधानंतर मराठा सरदारांना वश करण्यासाठी औरंगजेबाने मानचिन्हांची केलेली खैरात.

मराठा-पेशवा-राजवटीतील पद्धत: मराठा व पेशवा राजवटीत शेला-पागोटे, सोन्याची सलकडी व वतने-जहागिरी दिल्या जात. ‘शेले-सावळीचे झुंजार वीर…..’(शेला व शेमला असलेला अक्कडबाज वीर.). ‘शेला पांघरला आणि हिंवाने मेला…..’(मोठेपणाच्या नावाखाली स्वतःची हानी करून घेणे.) या मराठीतील सामाजिक म्हणी या दृष्टीने लक्षणीय आहेत.


ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश राजवटीतील पद्धत: हिंदुस्थानात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जशीजशी वाढू लागली, तसतसे तेथील कारभारासाठी तिला हिंदी लोकांवर विसंबून राहणे भाग पडू लागले. यासाठी कंपनीशी हात मिळविणाऱ्या व्यक्ती व समाजावर वर्चस्व असलेले सामाजिक गट यांना वश करण्यासाठी कंपनी सरकारने पुढील उपाय योजिले. राज्यकारभारात त्यांची अंशतः भागीदारी व मुलकी हक्क ठेवणे वर्षारंभी आणि बादशाहाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अभिधान देणे, उदा., रावसाहेब, रावबहाद्दूर, खानबहाद्दूर इ., सैनिकांना जमिनी, पदके, वार्षिक अनुदाने देणे इत्यादी. या मानसन्मान पद्धतीमुळे ब्रिटिशांनी हिंदुस्थानात राजनिष्ठ असा वर्ग निर्माण केला. याव्यतिरिक्त विद्वानांचाही महामहोपाध्याय इ. बिरुदांनी सन्मान करण्यात आला. एखादा सैनिक अत्युच्च कोटीचा असला किंवा त्याने प्रसंगी स्वात्मार्पण केले, तरीही पहिल्या महायुद्धापर्यंत हिंदी सैनिकाला ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ मिळत नसे. हा पंक्तिप्रपंच व वांशिक भेद यांबद्दल सर विन्स्टन चर्चिल यांनी खंत आणि नापसंतीही व्यक्त केली होती. हिंदी राजेराजवाड्यांचा पराभव केल्यानंतर गोळा केलेली लूट व युद्ध खंडणी यांतही हिंदी शिपायांना अत्यल्प वाटणी दिली जाई. मात्र दुसऱ्या महायुद्धापासून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हिंदी सैनिकांना मानचिन्हे देण्यात उदारता दाखविण्यास आरंभ केला त्यामुळे हिंदी व गोरखा सैनिकांनाही व्हिक्टोरिया क्रॉस मिळू लागला. कदाचित इंडियन नॅशनल काँग्रेसने १९३९ पर्यंत लष्कराविषयी घेतलेल्या भूमिकेचाही तो परिणाम असू शकेल.

स्वातंत्र्योत्तर कालातील पद्धत : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतामध्ये भारतीय मूल्यसंकल्पना, समिश्र संस्कृती, धार्मिक समभाव, स्वातंत्र्यलढा व प्रजासत्तात्मक संविधान यांच्या संदर्भात, मानसन्मान व मानचिन्हे या बाबतीत अमूलाग्र बदल घडून आले. सैनिकी समारंभ, मानवंदना व सन्मान गारद (गार्ड ऑफ ऑनर), सैनिकी संचलन व रुढिसांप्रदायिक यांत उचित फेरफार करण्यात आले व येतही आहेत. भारतीय राष्ट्रीयत्व व सार्वभौमिकता यांना बाधक किंवा आपमानकारक चिन्हे रद्द झाली [उदा., पलटणी कोअर इत्यादींचे ‘शाही’ (रॉयल) हे बिरुद रद्द होणे] तर स्वतंत्र भारताच्या मानचिन्हांना अग्रक्रम देण्यात आला (उदा., परमवीरचक्रानंतर ‘व्हिक्टोरिया क्रॉस’). पुढे तर (१९६८) सैनिकी समारंभ, संचलन व रुढी कार्यालयदेखील स्थापन करण्यात आले.

ही मानचिन्हे प्रदान करताना भारतीयांतील वांशिक, धार्मिक व जाती-भेदाभेद या बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येऊन मानचिन्ह श्रेणीतील क्रमांक हा सन्माननीय व्यक्तीची सेवा, त्याग व गुणवत्ता यांवर अवलंबून असतो. मानचिन्ह प्रदानपद्धती आहे : केंद्र शासन या मानचिन्हांना राष्ट्रपती मानचिन्हे, (म्हणजे राष्ट्रपती स्वहस्ते प्रदान करतात ती) म्हणतात. याबद्दलच्या सूचना, अटी, नियम, प्रदानदिन आदींचे प्रस्तुतिकरण राष्ट्रपती सचिवालयात करण्यात येते. आतापर्यंत एकंदर त्रेचाळीस मानचिन्हे प्रस्थापित झाली असून त्यांचे तीन वर्ग पडतात : (१) केंद्र शासनाच्या सेवासंस्थांतील सैनिक-सैनिकेतर संस्था, पोलीस सीमासंरक्षक दले व त्यांतील कर्मचारी (२) भारतीय नागरिक (३) भारतीय नागरिकांव्यतिरिक्त व्यक्ती.

राष्ट्रपती मानचिन्हे : सैनिकी – परमवीरचक्र, अशोकचक्र, परमविशिष्ट सेवापदक इत्यादी. सैनिकेतर –राष्ट्रपती पोलीसपदक, राष्ट्रपती अग्निशामकसेवापदक इत्यादी. भारतीय नागरिक–भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री व पद्मजीवनरक्षा पदके इत्यादी. भारतेतर नागरिकांनाही नेहरू पुरस्कार देण्याची प्रथा आहे.

राज्यांतर्गत मानचिन्हे : भारतातील वेगवेगळी राज्यशासने ही आपापल्या राज्यातील नागरिकांना (सैनिक व पोलीस धरून) मानचिन्हे देतात. उदा., महाऱाष्ट्र राज्यातील श्रीशिवछत्रपति क्रिडापुरस्कार, शूर महाराष्ट्रीय सैनिकांना एकरकमी किंवा त्याबरोबरचे वार्षिक अनुदान, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, जमीन देणे इत्यादी. याशिवाय राज्यशासनपुरस्कृत संस्कृती, साहित्य, कला इ. संस्थांचे पुरस्कार, उदा., त्या त्या संस्थांची अधिछात्रवृत्ती, नेहरू पारितोषिक, कृषिपंडित इत्यादी. असे पुरस्कार भारतेतर व्यक्तींनाही दिले जातात.

विद्यापीठीय सन्मान : हे सन्मान म्हणजे विद्यापीठीय परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या परीक्षा-पदव्यांव्यतिरक्त भव्य सन्मान्य पदव्या असतात. उदा., डी. लिट्., एल्.एल्.डी. इत्यादी. विद्याप्रेमी तसेच सामाजिक हितैषू सद्‍गृहस्थांनी प्रस्थापित केलेल्या संस्थांकडून व अक्षय्यनिधीमधून देखील सन्मान प्रदान केले जाता. उदा., ⇨ भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार इत्यादी.

धर्माधिष्ठित सन्मान : भारत हे सर्वधर्मसमभावी राष्ट्र असल्याने शासनाच्या वतीने धार्मिक दृष्टिकोनातून मानचिन्हे दिले जात नाहीत तथापि भारतातील वेगवेगळी धार्मिकपिठे व संस्था विशेष कार्य केलेल्या त्या त्या धर्मियांचा आदर–गौरव करतात. (उदा., श्रीशंकराचार्य कांची कामकोटी पीठातर्फे देण्यात येणारे पुरस्कार, इस्लाम धर्मियांना देण्यात येणारी वली, पीर, गाझी, निझाम-इ-मुस्तफा, मसाह ही बिरुदे रोमन कॅथॉलिक चर्चकडून देण्यात येणारी सेन्ट व यहुदी धर्मातील अनागतदर्शक किंवा प्रेषित (प्रॉफेट) ही बिरुदे इत्यादी.

लौकिक सन्मान : वरील मानचिन्हाव्यतिरिक्त सामान्य लोक, मान्य व समाजप्रिय व्यक्तींचा विविध रीतीने मानसन्मान करतात. उदा., उद्यान, पूल इ. स्थावर वस्तूंना लोकमान्य, संत, लोकनायक नेते, देशबंधू इत्यादींचे नामाविधान देऊन त्या त्या व्यक्तींचा गौरव करतात. तसेच त्यांचे पुतळे वा स्मृतिस्मारके उभारून आदर व्यक्त करतात, उदा., कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारक. [⟶ स्मारके].

सामूहिक सैनिकी सन्मान : वैयक्तिक सैनिकांचा जसा गौरव केला जातो तसा रणांगणावर लक्षणीय व अपेक्षेबाहेर कामगिरी केल्याबद्दल पलटणी, स्क्वॉड्रन व नौदल यांच्या सामूहिक गौरवप्रीत्यार्थ्य त्यांना रणांगण-सन्मान (बॅटल ऑनर्स) देण्यात येतो. उदा., पहिल्या महायुद्धात केलेल्या कूट अल अमारा येथील कामगिरीबद्दल पहिल्या मराठा पलटणीला (काळी पाचवी) मिळालेला रणांगण सन्मान. सैनिकी धर्मभंगाबद्दल मात्र पलटणीचा भंग केला जातो तर उत्तम सैनिकी कमगिरीबद्दल राष्ट्रपतींकडून ध्वज दिली जातो.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान : आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी तिच्या पुढून संचलन करण्यासाठी व तिला मानवंदना देण्याची प्रथा फार जुनी आहे. या प्रसंगी यजमान अभ्यागतास आपली शस्त्रे देतो व अभ्यागत आणि अभयगताचे राष्ट्र व जनता यांच्याशी असलेली मैत्रीभावना आणि त्यांच्याबद्दलचा उच्चादर व सदिच्छा प्रकट करतो. अभ्यागत व्यक्ती सन्मान गारदांचे निरीक्षण करीत असताना गार्दी सैनिक तिच्याकडे डोके वळवून दृष्टीक्षेप करतो. या प्रसंगी तोफांची सलामी देतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गव्हर्नर जनरल, पंतप्रधान, राजदूत, परराष्ट्रीय व राष्ट्रकूल शिष्टदौय मंडल प्रमुख व राज्यपाल यांनाच फक्त तोफांची सलामी दिली जाते. राष्ट्रगीताचे वादनही करण्यात येते. यावेळी त्या त्या अभ्यागत व्यक्तीच्या दर्जाप्रमाणे ५० ते १५० सन्मान गार्दी असतात.

राजे वा सैनिकांच्या अंत्यसंस्कार प्रसंगीचे सन्मान : मृत राजा, मृत सेनापती, सैनिक इत्यादींचा अंत्यसंस्कार गांभीर्याने पार पाडला जातो. रणांगणावर ठार झालेल्या वीराचे कलेवर किंवा मृतावशेष शत्रूच्या हातात पडू न देण्याबद्दल अत्यंत दक्षता घेतली जाते. तसे न केल्यास सैन्याचा तसेच संपूर्ण राष्ट्राचा अपमान व अकीर्ती होते असे समजण्यात येते. याचे निर्देश रामायण, महाभारत वा इलिअडसारख्या महाकाव्यांतून आढळतात. मृताच्या कलेवराबरोबर अंत्ययात्रेपर्यंत जागता पहारा ठेवला जातो. शोकाकूल सैनिक व लोक मृताचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहतात. अंत्ययात्रा सैनिकी पहाऱ्यात होते. सैनिक नतमस्तक होऊन आपापली शास्त्रास्त्रे अधोमुख करतात. उलटे भाले वा तलवारी जमिनीवरून फरफटत नेणे किंवा घोड्यावरच्या रिकिबीत मृताची पादत्राणे उलटी घालणे अशा रीतीने शोक प्रदर्शन करीत अंत्ययात्रा होते. मृताचे कलेवर वा मृतावशेष राष्ट्रीय ध्वजात अवगुंठित करून आणि तोफगाड्यांवर ठेवून ते सैनिकी पहाऱ्यात नेमण्यात येतात. 

संदर्भ : 1. Kapur, T. B. Regimental Colours and Cermonials in the Indian Army, New Delhi, 1983.

            2. Mason, Philip, A Matter of Honour, Harmondsworth, 1976.

            3. Toynbee, A. J. A Study of History Vol. VIII, London, 1955.

            4. Vagts, A. A History of Mllitarism, New York, 1967.

            5. Wach, Joachim, Sociology of Religion, London, 1947.

दीक्षित, हे. वि.

मानचिन्हकारी : 'नाइट ऑफ द गार्टर' ग्रेट ब्रिटन, १४२९.मानचिन्हकारी : 'नाइट ग्रँट क्रॉस ऑफ द रॉयल व्हिक्टोरियन ऑर्डर' द ग्रेट ब्रिटन, १९३६.भारत सरकारचे गोपालरत्न पदक १९८३-८४.स्वतंत्र्य भारताची काही पदके व मानचिन्हे : १ ली ओळ : भारत रत्न दुसरी ओळ : परमवीर चक्र, अशोक चक्र, पद्मविभूषण, पद्मभूषण, सर्वोत्तम युद्धसेवा पदक, महावीर चक्र, कीर्तिचक्र ३ री ओळ : युद्धसेवा पदक, समरसेवा तारा, पूर्वी तारा, पश्चिमी तारा ५ वी ओळ : रक्षापदक, संग्रामपदक, विदेशसेवा पदक, दीर्घ सेवा व सद्‌वर्तन पदक, प्रादेशिक सेना पदक ६ वी ओळ : रक्षा-सुरक्षा कोअर पदक.