नौसेना : सागराच्या पृष्ठभागावर व पोटात युद्ध करू शकणारी सैनिकी संघटना. भूसेना, वायुसेना यांच्याप्रमाणेच नौसेना ही राष्ट्रीय संरक्षणव्यवस्थेचा एक घटक असते. नाविक, नाविकाधिकारी, नाविक कार्यालये, ⇨ नाविक तळ, सर्व प्रकारच्या ⇨ युद्धनौका, ⇨पाणबुडी, ⇨ विमानवाहू जहाजे, ⇨ फ्रिगेट, ⇨ क्रूझर, ⇨ तोफनौका, साहाय्यक जहाजे (रसद, दुरुस्ती, संदेश, तेल इत्यादींसाठी वापरली जाणारी), सागरी किनारा तोफखाना, गोद्या, नौकाबांधणी केंद्रे इत्यादींचा समावेश नौसेना संघटनेत होतो. सामान्यपणे इसवी सनाच्या पंधराव्या शतकापूर्वी व्यापारी जहाजांचा वापर सागरी लढायांत केला जाई. आधुनिक काळात व्यापारी नौदल स्वतंत्रपणे विकसित झालेले आहे. ज्या देशांच्या अवतीभवती समुद्र असतो, त्यांना नौसेना उभारणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे देशाच्या राजकीय आणि आर्थिक गरजा व हितसंबंध यांच्या परिपूर्तीच्या दृष्टीने नौसेना राखणे इष्ट असते. ⇨ किनारासंरक्षण व नदीनौदल ही नौसेनेची पूरक अंगे असतात.

सागरी बळ वापरण्याचे नौसेना हे एक साधन होय; परंतु सागरी बळाची कल्पना व्यापक आहे. केवळ सागरी युद्धासाठी लागणारी सांग्रामिक साधने तसेच व्यापारी जहाजे म्हणजे सागरी बळ नव्हे. सागरी व्यापार करण्याची महत्त्वाकांक्षा, व्यापारी व मच्छीमारी नौकादले आणि सागरी संपत्तीचा शोध लावून तिचा उपयोग करून घेण्याची क्षमता व साधने यांचाही अतंर्भाव सागरी बळात होतो. सागरी बळ हे ज्ञानविज्ञान, अभियांत्रिकी व इतर तंत्रविद्या इत्यादींतील प्रगती, कुशल मनुष्यबळ व योग्य अधःसंरचना यांमुळे सिद्ध होऊ शकते. अमेरिकेच्या ⇨ ॲड्‌मिरल आल्फ्रेड माहॅन याने आपल्या द इन्फ्ल्यूअन्स ऑफ सी पॉवर अपॉन हिस्टरी : १६६०–१७८३ (१८९०) या ग्रंथात स्वार्थासाठी सागरावर वर्चस्व प्रस्थापित करून शत्रूला सागराचा वापर अशक्य करणे, हा सागरी नीतीचा सिद्धांत मांडला. १९२० पर्यंत हा सिद्धांत अबाधित राहिला; कारण तोपर्यंत सागरी बळ हे केवळ प्रचंड युद्धनौका व त्यांची संख्या यांच्या आधारे मोजले जाई; परंतु १९२० नंतरच्या काळात पाणबुड्या, ⇨ क्षेपणास्त्रे, सागरी संपत्ती, राजकीय मतप्रणाल्या इत्यादींमुळे सागरी नीती व सागरी बळ यांच्याविषयी जुन्या कल्पना बदलल्या. तोफानौका-मुत्सद्देगिरी, सागरी वर्चस्व, सागरपार शत्रुप्रदेशावर आक्रमण करणे, शत्रूला सागरी दळणवळण अशक्य करणे आणि त्यावर वचक बसविणे इ. अंगांनी सागरी बळाचा विचार होऊ लागला.

नौदलाचे शांतताकालीन कार्य : शांतताकाळात नौसेनेला पुढील कामे पार पाडावी लागतात : (१) युद्धाची संभवनीयता गृहीत धरून त्या दृष्टीने पूर्वतयारी करणे; (२) स्वदेशाच्या परराष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करणे; (३) नौसेनेच्या नौकांचा युद्धनैतिक परावर्तक म्हणून उपयोग करणे; (४) व्यापारी जहाजांना आपत्काली मदत करणे; (५) दुसऱ्या राष्ट्रांना भेटी देणे व अप्रत्यक्षपणे आपल्या सागरी बळाचा त्यांच्यावर प्रभाव पाडणे; (६) झगडे, तंटे-बखेडे इ. चालू असलेल्या विभागांना भेट देऊन आपल्या उपस्थितीने इतर संबंधितांवर दडपण आणणे आणि आपल्याला हवा असलेला निकाल लावून घेण्यात प्रच्छन्नपणे मदत करणे; (७) चोरट्या व्यापाराचा नायनाट करणे आणि समुद्रकिनाऱ्यावर टेहळणी करणे, या कामी किनारासंरक्षक दलास साहाय्य करणे; (८) खाद्य तेल व खनिज संपत्तीचा शोध लावण्यास मदत करणे; (९) सागरी सर्वेक्षण व नकाशानिर्मिती या कामी साहाय्य करणे आणि एकंदरीत सागरी नौकानयन सुकर करण्यास हातभार लावणे व (१०) सागरी किनाऱ्यावरील शासकीय व सैनिकी कार्यालये, मालमत्ता, गोद्या, ⇨ बंदरे इत्यादींचे सरंक्षण करणे.

वरील कार्ये आणि नौसैनिकांचे यांत्रिक व शास्त्रीय प्रशिक्षण इ. उपक्रमांमध्ये नौसेना शांतताकाळात गढलेली असते.

नौसेनेचे युद्धकालीन कार्य : भूमिभागावरील ठळकपणे जाणवणाऱ्या सीमांप्रमाणे सागरात सीमा नसतात. त्यामुळे जलद हालचाल करण्याची मुभा, गुप्तपणे सागरी बळ केंद्रीभूत करण्याची क्षमता आणि अण्वस्त्रांच्या आघातांपासून जलदपणे दूर जाऊन बचाव करण्याची पात्रता या कारणांमुळे नौसेनेचे स्थान इतर सेनांपेक्षा श्रेष्ठ ठरले आहे. या दृष्टीने युद्धकाळात नौसेनेला पुढीलप्रमाणे कामे करावी लागतात : (१) आपल्या राष्ट्रीय व सागरी सीमांचे संरक्षण करणे; (२) बंदरे व समुद्रकिनारा यांचे रक्षण करणे; (३) सागरी व्यापाराला संरक्षण देणे; (४) शत्रूची ⇨ सागरी नाकेबंदी करणे; (५) सागरांतर्गत तेल व इतर खनिज संपत्ती यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे; (६) जल-स्थलीय कारवायांना योग्य प्रतिसाद देणे; (७) आपल्या उपस्थितीने आर्थिक व राजकीय फायदे मिळविणे व (८) अनुकूल प्रसंगी लढाया करून शत्रूचे नाविक बळ खच्ची करणे.

नौसेनेचे स्वरूप भौगोलिक आणि राजनैतिक परिस्थितीवर अवलंबून असते. सभोवताली समुद्र असल्यास नाविक बळाची उभारणी केल्याशिवाय भागत नाही. परराष्ट्रविषयक धोरणाचा पाठपुरावा करण्यासाठी नौदलाचाही उपयोग केला जातो. देशाच्या परराष्ट्रीय धोरणानुसार नौसेनेचे स्वरूप व तिचा वाढविस्तार ठरतो. जागतिक व्यापार, दळणवळण, परकीय चलन मिळविण्याची आवश्यकता आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या सर्व घटकांचा विचार करून घेतलेल्या निर्णयाचे समर्थन आणि सरंक्षण करण्याच्या दृष्टीने नौसेनेचा आकार, संघटना व स्वरूप ठरविले जाते. शेजारील राष्ट्रांच्या तुलनेने आपल्या राष्ट्राची परिस्थिती आणि स्थान यांचा विचार करणे आवश्यक असते. देशाची प्रतिष्ठा प्रस्थापित करणे आणि वाढविणे यांसाठी नौसेनेचा फार उपयोग होतो. याचे कारण चलनक्षमता, लवचिकपणा आणि मारकशक्ती हे नौसेनेचे विशेष गुण होत. नौसेनेचे केवळ आगमन वा यथासमय हालचाल पुष्कळदा राजकीय घटनांची दिशा बदलण्यास कारण ठरते. या संदर्भात ब्रिटिश प्रधानमंत्री पामर्स्टन यांची तोफनौका-मुत्सद्देगिरी (गनबोट डिप्लोमसी) प्रसिद्ध आहे.

आधुनिक युगात नैसर्गिक तेल आणि खनिज पदार्थांची नितांत आवश्यकता असल्यामुळे त्यांचे नवनवे साठे शोधण्याची गरज आहे. आपल्या सागरी मर्यादा ठरविणे आणि त्यानंतर त्यांचे रक्षण करणे याची कुवत असेल, तरच सागराधीन संपत्ती हस्तगत करता येईल. यासाठी कार्यक्षम, समतोल आणि परिव्यय-फलकारक अशा नौसेनेची आवश्यकता भासते.

समतोल नाविक बळ : शांततेच्या तसेच युद्धाच्या काळात उपयोगी पडण्यासाठी नौसेनेचे स्वरूप सर्वोपयोगी युद्धनौकांनी व शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असावे लागते. विविध प्रकारच्या युद्धनौकांमध्ये संख्या व गुणवत्ता या बाबतींत समतोल राखणे आवश्यक असते. समतोल राखण्यासाठी पुढील गोष्टींचे भान राखावे लागते : (१) स्वावलंबनाने तसेच मित्रराष्ट्रांच्या मदतीने युद्धनौका व शस्त्रास्त्रे यांची पैदास करणे आणि या बाबतीत संशोधन व विकास कार्यक्रम चालू ठेवणे आणि (२) राष्ट्रीय उत्पादनक्षमता व आर्थिक परिस्थिती यांचा नौसेनेवरील खर्चाशी मेळ घालणे. युद्धनौका, पाणबुड्या, विमानवाहक, हेलिकॉप्टर्स वगैरेंची संख्या, त्यांचे परस्पर प्रमाण, त्यांच्यावर होणारा खर्च या सर्वांचा ताळमेळ राष्ट्रीय उत्पादन व आर्थिक क्षमता यांच्याशी व्यवस्थित बसविणे आवश्यक असते. कारण नौसेना ही भांडवलप्रधान सेना आहे.

संघटना : वर सांगितल्याप्रमाणे राष्ट्राच्या भूराजनैतिक, आर्थिक तसेच सामजिक वस्तुस्थितीचा व क्षमतेचा विचार करून नाविक बळ तयार करावे लागते. नौसेनेचा परमसेनापती राष्ट्रप्रमुख असतो. संरक्षणमंत्री भूसेना, नौसेना आणि वायुसेना यांवर देखरेख व नियंत्रण ठेवतो. हे नियत्रण नौसेनाध्यक्षाकरवी केले जाते. युद्धकारवायांच्या योजना, युद्धनौका व शस्त्रास्त्रांची बांधणी आणि उपयोग, शिक्षण, रसदपुरवठा, लढाऊ दलांना निर्देशन करणे इ. कामगिऱ्या नौसेनाध्यक्ष पार पाडतो. नौसेनाध्यक्षाच्या मदतीला दुय्यम नाविक अधिकारी दिले जातात. संरक्षणमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे नौसेनाध्यक्ष काम करतो. मुख्य कार्यालय, गोद्या व तळ, जलपृष्ठ युद्धनौका आरमार, पाणबुडी आरमार व संशोधन आणि विकास असे नौसेनेचे कार्यविभाग असतात. जलांतर्गत, जलपृष्ठ व वायू या तीन मार्गांनी होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने नौसेनेच्या लढाऊ दलांची व आरमाराची संरचना केली जाते. ती पुढीलप्रमाणे असते : (१) जलांतर्गत संरक्षक कारवाया – या पाणसुरुंग, पाणबुड्या व इतर घातपाती प्रकार यांच्यापासून निर्माण होणारा धोका टाळणे वा त्यांना प्रतिबंध करणे यांच्याशी निगडीत असतात. जलद गती टेहळणी-नौका व हेलिकॉप्टर, पाणबुडीविरोधी नौका, पारध-पाणबुड्या व सुरुंग संमार्जक नौका यांच्या साहाय्याने पाण्याखालील धोक्याचे निवारण करणे शक्य होते. सुरुंग पेरण्याचेही काम वेळप्रसंगी करावे लागते. (२) जलपृष्ठीय संरक्षक कारवाया – आधुनिक क्षेपणास्त्रे लक्ष्यभेदी व वेगवान असल्याने तोफांच्या आणि बाँबच्या ऐवजी त्यांचाच वापर करण्याची प्रवृत्ती बळावत आहे. या अस्त्रांची फेक युद्धनौकांवरून, पाणबुड्यांतून आणि विमानातून करता येते. या अस्त्रांविरुद्ध प्राथमिक उपाययोजना म्हणजे त्यांची पूर्वसूचना मिळविणे, ही होय. अशी पूर्वसूचना न मिळाल्यास त्यांचा प्रतिबंध करण्यास पुरेसा वेळ मिळणेच अशक्य असते. एक जटिल अशी पूर्व-सूचना-यंत्रणा जमिनीवर उभी करणे विशेष कठीण नसते; परंतु समुद्रावर मात्र हे काम कठीण असते. त्यासाठी ⇨ इलेक्ट्रॉनीय युद्धतंत्र वापरावे लागते. (३) वायू कारवाया – यांत रडारचा उपयोग महत्त्वाचा असतो. त्यामुळे धोक्याची पूर्वसूचना मिळू शकते. तथापि आधुनिक विमानांचा वेग फार मोठा असल्यामुळे ही पूर्वसूचना पुरेशी ठरत नाही, म्हणून कृत्रिम उपग्रहांचा या कामी उपयोग करावा लागतो. शिवाय लांब पल्ल्याच्या सागरी टेहळणी विमानांचाही उपयोग होतो. क्षेपणास्त्रांचा मारादेखील अशी विमाने करू शकतात.

नौसेनेचे भागविभाग व कार्यवाटप : युद्धनौकेचे प्रचालन, अभियांत्रिकी, शास्त्रास्त्रे व पुरवठा असे चार कार्यविभाग असतात. नौकानयन, संदेश-दळणवळण, रडार, नौकाकार्यालय व व्यवस्थापन हे प्रचालनाचे कार्य तर नौकेतील यंत्रसामग्री, पाणी व वीज यांचा पुरवठा इ. विषय अभियांत्रिकी कार्यांत मोडतात. तोफा, ⇨ पाणतीर, शस्त्रास्त्रमारानियंत्रण स्वनक, नांगर टाकणे व उचलणे, पाणबुड्यांचा वेध घेणे व त्या नष्ट करणे इ. कामे शस्त्रास्त्र विभागाकडे असतात आणि कपडालत्ता, भोजन, पगार वाटप इ. कामे पुरवठाविभाग करतो. नौसेनेतील नौकांचे लढाऊ, साहाय्यक व सेवा असे तीन वर्ग असतात.

लढाऊ नौदलाची संघटना : ही संघटना पुढीलप्रमाणे असते –

फ्लोटिलामध्ये विनाशिका व क्रूझर असतात. त्यांची संख्या दलाच्या कार्यानुसार वेळोवेळी निश्चित केली जाते. रीअर ॲड्‌मिरल त्याचा प्रमुख असतो. स्कॉड्रनचा प्रमुख कॅप्टन व डिव्हिजनचा प्रमुख कमांडर असतो. असे फ्लोटिला/स्कॉड्रन संघटित करून कार्यदल (टास्क फोर्स) उभे केले जाते. अनेक कार्यदले मिळून फ्लीट तयार होतो. बड्या राष्ट्रांच्या सेनेत विमानवाहक, गस्त व टेहळणी, पुरवठा, पाणबुडी विरोधक आणि मरीन अशा विविध प्रकारच्या कार्यांसाठी कार्यदले असतात.

नौसेना संघटना : नौसेना संघटना ही राष्ट्राच्या संरक्षणनीतीला अनुसरून व नौसेनेकडून अपेक्षित असलेल्या कार्यानुसार निश्चित केली जाते. साधारणतः अशी संघटना पुढीलप्रमाणे असते : शस्त्रास्त्रे-शस्त्रास्त्रे आक्रमक आणि संरक्षक या दोन्ही प्रकारची असतात. युद्धनौकेचे जे विशिष्ट कार्य असेल, त्यानुसार तिच्यावर शस्त्रास्त्रे असतात. उदा., आणवीय प्रक्षेपणासाठी तयार केलेल्या क्रूझरवर वायुहल्लाविरोधी, जलपृष्ठहल्लाविरोधी व पाणबुडीहल्लाविरोधी शस्त्रास्त्रे असतात. विमानवाहक नौकांवर विमाने व तोफा असतात. सैनिकवाहक लहान नौकांवर फक्त तोफाच असतात. जलपर्णी बोटीवर शत्रूची जहाजे बुडविण्यासाठी नौकाभेदी क्षेपणास्त्रे बचावाकरिता विमानविरोधी तोफा असतात. प्रत्येक लहानमोठ्या नौकेवर लहानमोठ्या विमानविरोधी तोफा असतात. पाणबुडीवर पाणतीर व पर्यटन क्षेपणास्त्रे असतात. विनाशिकांवर पाणतीर, तोफा, क्षेपणास्त्रे व हेलिकॉप्टर इ. असतात. युद्धतंत्राच्या दृष्टीनेही शस्त्रास्त्रांची निवड व योजना केली जाते. लांब अंतरावर नौदलाचे रक्षण करण्यासाठी लांब पल्ल्याची अस्त्रे, रडार व अस्त्रमारानियंत्रक इ. आवश्यक ठरतात. या प्रकारच्या शस्त्रास्त्रांस क्षेत्ररक्षक अस्त्रे म्हणतात. त्याउलट फक्त एकाच नौकेच्या रक्षणासाठी बिंदुरक्षक (पॉइंट डिफेन्स) अस्त्रे असतात. ही शस्त्रास्त्रे कोणत्याही नौकेवर वापरता येतात. अगदी जवळून होणाऱ्या हल्ल्यापासून नौकेचा बचाव करण्यास ही अस्त्रे समर्थ असतात. विमानवाहक, साहाय्यक, जलभूमिगत व विनाशिकासंरक्षक नौका तसेच तोफनौका यांवर बिंदुरक्षक अस्त्रे असतात. बहुतांश अस्त्रांचा प्रत्यक्ष प्रयोग इलेक्ट्रॉनिकी उपकरणांनी केला जातो. या संदर्भात पुढील प्रकारे कार्य चालते :  (१) अस्त्रमारानियंत्रण – शत्रु-मित्र ओळखणे, लक्ष्याचा वेध घेणे, माऱ्यासाठी अस्त्रांची निवड करणे, माऱ्याचा वेग निश्चित करणे, अस्त्र सोडणे, अस्त्रागमन नियंत्रित करणे आणि त्याचा स्फोट करणे इत्यादी;  (२) नौकेच्या अवतीभोवती रणक्षेत्रावर देखरेख करणे व वस्तुस्थितीची माहिती पुरविणे; (३) नौकानयन – नौकेच्या प्रवासाची माहिती मिळविणे, सागरीपृष्ठावरील किंवा जलांतर्गत नौकेचे स्थान निश्चित करणे, हेलिकॉप्टर व विमाने यांना नौकांच्या हालचालींची माहिती पुरविणे, त्यांच्या पर्यटनावर नियंत्रण ठेवणे इत्यादी; (४) जलांतर्गत संनिरीक्षण व मागोवा – पाणबुड्या किंवा इतर जलांतर्गत धोक्याची पूर्वसूचना देणे, पाणबुड्यांचा मागोवा घेणे इ. आणि (५) रडार प्रक्षेपणाची माहिती – अवतीभवती होणाऱ्या रडार प्रक्षेपणाची माहिती मिळवून शत्रूची जागा व उपस्थिती दर्शविणे.

इतिहास : नौसेनेचा इतिहास हा युद्धनौकांच्या प्रगतीशी निगडित आहे. सागरी प्रदेश काबीज करण्यापेक्षा सागरावर सत्ता स्थापण्यासाठी नौसेनेची धडपड चालू असते, हे जागतिक नौसेनांच्या इतिहासावरून कळते. सर्वप्रथम मानवाने जगाच्या कुठल्या भागात जलपर्यटनास सुरुवात केली. याची नोंद नाही. सिंधू संस्कृती व प्राचीन ईजिप्शियन संस्कृती यांच्या काळात सागरी प्रवासास सुरुवात झाली असावी, असे इतिहासावरून दिसते. इ. स. पू. बाराव्या शतकात पूर्व भूमध्य समुद्रात ‘सागरी लोक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्यांनी नौसेनासदृश संघटना उभी केली होती, असे एक मत आहे.

प्राचीन काळी सागरी लढाया करण्यासाठी नौका असत व त्या बहुधा एखाद्या सशस्त्र जमातीच्या वा टोळीच्या मालकीच्या असत. इतर जमातींच्या जमिनी बळकविण्यासाठी पुष्कळदा ते त्यांच्या लगतच्या समुद्रावर हल्ले करीत. तत्कालीन नौकांचा उपयोग व्यापार, मच्छिमार तसेच सागरी लूटमार यांसाठी होई. भूमध्य समुद्रातच राजकीय व व्यापारी परिस्थितीमुळे सागरी सत्तासंघर्ष सुरू झाला.

सागरी सामर्थ्यावर आधारित अशी पहिली नौसेना अथेन्समध्ये स्थापन झाली. अथेन्सचा एक प्रमुख नेता थिमिस्टोडीज ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात होऊन गेला. त्याने परदेशीय आक्रमणाचा धोका टाळण्यासाठी युद्धनौकांची उभारणी केली. त्यासाठी लागणारा पैसा आफ्रिकेतील अथेनियन लोकांच्या ज्या चांदीच्या खाणी होत्या, त्यांपासून मिळविला. अथेन्सने बांधलेल्या युद्धनौकांना ‘ट्रायरेमीस’ असे नाव होते. त्यावर वल्ह्यांच्या तीन रांगा असत. बाराव्या शतकात तुर्कांनी बायझंटिन साम्राज्यात धुमाकूळ माजविला आणि त्यामुळे बायझंटिन नौदलाचा ऱ्हास झाला. मध्ययुगीन इटलीतील निरनिराळ्या राज्यकर्त्यांनी आपापली नौकादले उभारली होती. त्यांपैकी जेनोआ येथील खलाशी त्या वेळी सर्वोत्कृष्ट समजले जात. पश्चिम यूरोपात व इंग्लंडमध्ये त्या खलाशांना काम मिळे. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासून उ. आफ्रिकेतून येणाऱ्या धनधान्याची आयात करण्यासाठी कार्थेज बंदराचा उपयोग होई. हे बंदर युद्ध दृष्ट्या मोक्याच्या जागेवर वसलेले होते. जमिनीवरील युद्धामध्ये रोमची सरशी होत असे; परंतु समुद्रावर मात्र शतकानुशतके कार्थेजचीच सत्ता गाजत राहिली. जेव्हा कार्थेजने इटलीच्या किनाऱ्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली, तेव्हा मात्र रोमन लोकांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून कार्थेजियन जहाजांच्या धर्तीवर मोठमोठ्या युद्धनौका बांधण्यास सुरुवात केली. पाचव्या शतकात कार्थेजच्या स्वाऱ्यांपासून संरक्षण म्हणून रोमन सम्राटांनी जरी आपल्या नौदलाकडे विशेष लक्ष पुरविले, तरी रोमन साम्राज्याचा अस्त झाल्यावर नौदलाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. पुढे सातव्या शतकात मुसलमानी सत्तेचा उदय होऊन धोका निर्माण झाल्यावरच नौसेनेकडे पुन्हा लक्ष पुरविण्यात आले. बायझंटिन नौदलात एक साम्राज्यशाही नौकाफिला होता. ड्रंगेरिअस हा त्याचा पहिला प्रमुख दर्यासारंग होता. या काफिल्याने एक नवे अस्त्र वापरण्यास सुरुवात केली, त्याला ग्रीक अग्निस्फोटक हे नाव पडले. या शतकापासून यूरोपात सांस्कृतिक दृष्ट्या जे एक नवे पर्व सुरू झाले, त्यास तुर्कांचे आक्रमण कारणीभूत ठरले. धार्मिक युद्धे व इतर राजकीय-आर्थिक घडामोडी वेगाने घडू लागल्या. आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका इ. खंडांतील वसाहतींवर धाडी घालून तेथील लूटमारीचा उपयोग यूरोपांतील युद्धासाठी होऊ लागला. पोर्तुगाल, स्पेन , इंग्लंड ही राष्ट्रे एकमेकांशी लढू लागली. तुर्कांचा लेपांटो (ग्रीक–नाफ्‌पाक्टॉस) येथील सागरी लढाईत पराभव झाला. तोफांच्या उदयामुळे पारंपरिक नाविक युद्धतंत्रांत क्रांतिकारक बदल झाले. या काळातील गॅली युद्धनौका सु. ४५·७२ मी. (१५० फूट) लांब असत. ५४ वल्ही मारण्यासाठी २७० ते ३२४ वल्हेकरी असत. तुर्कांनी गॅलीओट नावाची चिमुकली, वेगवान युद्धनौका प्रचारात आणली. गॅलीओटवर १८ ते २४ वल्ही असून सु. १०० वल्हेकरी व सैनिक असत. झामोरीन व मराठे यांची गलबते याच प्रकारची होती. व्हेनिशियन लोकांनी गॅलिआस नावाची शिडे व वल्ही असलेल्या भारी नौका तयार केल्या. गॅलिआसमध्ये ५० ते ७० तोफा असत. गॅलिओट किंवा गॅलिआस फक्त सैनिक मारण्यासाठी उपयोगी पडत. नौका फोडण्यासाठी त्या निरुपयोगी होत्या. युद्धनौका म्हणजे तरंगते किल्ले समजले जात. नौकांच्या वरच्या मजल्यांवरील दोन्ही टोकांना किल्ले म्हणत व त्यांवर तोफा बसविल्या जात. बाकीच्या तोफा या दोन किल्ल्यांच्या मधील मोकळ्या जागेत ठेवल्या जात. सोळाव्या शतकाच्या आरंभी नौ-कायेत दोन्ही बाजूंस खिडक्या ठेवून त्यांतून तोफा डागण्याचा शोध लागल्यामुळे सागरी जलपृष्ठापासून वरच्या मजल्यापर्यंत तोफा व तोफांचे मोर्चे वाढविणे शक्य झाले. ब्रिटिशांच्या काही नौकांवर दोनशेवर तोफा बसविल्या जात. जमिनीवरील सैनिक नौकांतून नेले जात. नौकादुर्गावर चढून तलवारीने हातघाईची लढाई होई. स्पेन, इंग्लंड, पोर्तुगाल यांची स्वतंत्र नाविक कार्यालये होती. कोरियात सोळाव्या शतकाच्या अखेरीस चोल्ल राजाचा नौसेनापती यी सुंग याने प्रथमच लोखंडी कवचयुक्त युद्धनौका बांधल्या. यी सुंगच्या कल्पना पुढे २५० वर्षांनंतर पाश्चात्त्यांनी पूर्णत्वास नेल्या. पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात चीनच्या जंग ह याने सागरी बळाची तत्त्वे म्हणजे नौसेना बळ, सागरी व्यापार, नाविक तळ ही प्रथम अमलात आणली. १५८८ मध्ये इंग्लंडच्या आरमाराने स्पेनच्या ⇨ आर्माडाचा पाडाव केला. त्यानंतर सतराव्या शतकापासून आधुनिक सैनिकी युगाला प्रारंभ झाला. शास्त्रीय ज्ञान व आभियांत्रिकी तंत्र वापरून नौकाबांधणी करण्याचा पाया फ्रान्सच्या ⇨ झां बातीस्त कॉलबेअर (१६६१–८३) याने घातला, सॅम्युएल पेपिसने इंग्लिश नौसेनेची नवसंघटना केली. फ्रान्सच्या नौका ब्रिटिश नौकांपेक्षा वरचढ होत्या परंतु फ्रान्सने त्यांचा उपयोग ब्रिटिशांचा सागरी व्यापार नष्ट करण्यासाठी केला. याउलट इंग्रजांनी फ्रेंच नौसेनाबळ खच्ची करण्याकडे लक्ष दिले. परिणामतः इंग्रज हे सागरावर वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले. अठरावे शतक पाश्चात्त्य नौसेनांच्या दृष्टीने सुवर्णयुग म्हटले जाते. या काळात नौकांवरील तोफांची संख्या वाढली. दोन्हीही बाजूंस तोफांचे तीन मजली मोर्चे असत. ६५ ते ७० मी. लांबीच्या आणि २,५०० टनभाराच्या युद्धनौका पुढे आल्या. अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धामुळे इंग्रजांना नौकाबांधणीसाठी तेथून लाकूड मिळविणे अशक्य झाले. हिंदुस्थानातील सागवान लाकूडफाट्याचा पुरवठा हमखास होत राहील, या दृष्टीने हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील पकड इंग्रजांनी घट्ट केली. हिंदुस्थानात मुंबई येथे नौकाबांधणीचे कारखाने उभे केले. तत्कालीन भारी नौकांवर सैनिक व खलाशी मिळून १,००० लोक काम करीत. त्या वेळी ६४ ते १०० तोफांची मोठी युद्धनौका, ५० तोफांची फ्रिगेट व २४ – ४० तोफांची क्रूझर इ. प्रचारात होत्या. या नौकांवर तीन शिडे असत. १६ ते २४ तोफांची व दोन शिडांची स्लूप आणि कटर, स्कूनर व केच या सामान्य नौका असे वर्गीकरण केले जाई. पहिल्या वर्गातील नौकांवर सु. ७·२ किग्रॅ. ते १०·९ किग्रॅ. चा (१६  ते २४ पौंडी)  व इतरांवर सु. १·८, २·७ व ४ किग्रॅ. चा (४, ६ व ९ पौंडी) गोळा फेकणाऱ्या तोफा असत. सुकाणू हाताळण्यासाठी सुकाणूचक्र वापरात आले. नौकांच्या पाण्यात राहणाऱ्या पृष्ठभागावर तांब्याचा पत्रा बसविल्याने, नौ-कायेची जलकीटकांपासून होणारी नासधूस कमी होऊन नौकांचा पर्यटनवेग वाढला. अठराव्या शतकात यूरोपात नौसेना व्यावसायिक बनल्या. सरकारी केंद्रीय कार्यालये स्थापन करण्यात आली. नौसेनेसाठी भरती, प्रशिक्षण, नौकाबांधणी इ. कामांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. व्यापारी नौदल व नौसेना यांच्यातील संबंधांत सुसूत्रीपणा आला. या सर्व घटनांना ज्ञानविज्ञानातील प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात हातभार लागला. १८०५ सालच्या ट्रफॅल्गरच्या सागरी लढाईत इंग्रजांनी नेपोलियनच्या नौसेनेचा पराभव करून फ्रेंच साम्राज्यविस्ताराची स्वप्ने उधळून लावली. हिंदी महासागरात ब्रिटिश सागरी बळ निरंकुश ठरले. १८५० ते १९०० या काळात लागलेल्या तांत्रिक शोधामुळे तोफा, पोलादी कायेच्या नौका, त्यांचा आकार व टनभार, नौकानयन, तोफदारू, तोफगोळे यांच्यात वेगळ्या सुधारणा झाल्या. कोळसा, पाणी व इतर पुरवठ्यासाठी सर्व जगभर नाविक तळ उभारण्याची स्पर्धा सुरू झाली. ब्रिटनने मुबंई, त्रिंकोमाली, सुएझ, एडन इ. ठिकाणी तळ स्थापले. अमेरिकेच्या यादवी युद्धातील नाविक लढायांच्या अनुभवावरून, पाणतीर, पाणसुरुंग, सागरी नाकेबंदी, पाणबुडी इत्यादींचा भावी युद्धावर होणाऱ्या परिणामांचा विचार सुरू झाला. अमेरिकेच्या ॲड्मिरल आल्फ्रेड माहॅन याच्या द इन्फ्ल्यूअन्स ऑफ सी पॉवर अपॉन हिस्टरी : १६६०–१७८३ या विश्लेषणात्मक ग्रंथाचा फार मोठा परिणाम अमेरिका आणि यूरोप येथील राजकीय व सैनिकी नेत्यांवर झाला. १९०० ते १९२५ या कालखंडात रूसो-जपानी युद्ध आणि पहिले महायुद्ध झाले. नाविक बळ वाढण्याची स्पर्धा हे एक त्याचे कारण होते. युद्धनौकांचा आकार व त्यांची विध्वंसक शक्ती यात फार मोठी वाढ झाली. अंतर्ज्वलन एंजिने काही नौकांत बसविण्यात आली. ग्रेट ब्रिटनच्या ड्रेड्नॉट व सुपर ड्रेड्नॉट या प्रचंड नौका २९,००० टन भाराच्या असून त्यांवर सु. ३८·१० सेंमी. च्या (१५ इंची) तोफा होत्या. नौकांची एंजिने टर्बाइन ७५,००० अश्वशक्ती निर्माण करू शकत. काही बॅटलक्रूझरचा वेग २५ नॉटपर्यंत होता, तरी त्यावर सु. २०·४८ सेमी. च्या (१२ इंची) तोफा बसविलेल्या असत. पुढे विमानावाहक नौका प्रचारात आल्या. पाणबुडी ही सागरी युद्धांतील एक महत्त्वाचे शस्त्र ठरले. व्यापारी जहाजांवर पाणबुड्यांचा रोख असे. जर्मन पाणबुड्यांनी इंग्रजांना टेकीस आणले होते. उलट जर्मन राष्ट्राची सागरी नाकेबंदी करून ब्रिटिश नौसेनेने जर्मनीवर उपासमारीचे संकट आणले. पुढे पाणबुड्यांच्या विध्वंसनासाठी पाण्याच्या दाबामुळे स्फोट होणारे जलभारस्फोटक व बाँब यांचे शोध लागले.

यानंतर युद्धनौकांवर मार्कोनीची बिनतारी संदेशवाहक उपकरणे आली. ४ ऑगस्ट  १९१४ रोजी ब्रिटिश शाही नौसेनेला युद्ध सुरू करण्याची आज्ञा बिनतारी यंत्राने देण्यात आली. युद्धनौका पाणतीरांच्या भीतीमुळे दूर अंतरावरून (सु. ३० किमी.) लढू लागल्या त्या दूर पल्ल्याच्या तोफांमुळे होय. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटन, जपान व अमेरिका यांच्यामधील निकटचे संबंध सैल होऊ लागले व वातावरण संशयग्रस्त झाले. पॅसिफिक महासागरावर वर्चस्व स्थापण्याचे मनसुबे ही राष्ट्रे करू लागली. सु. ४०·६४ ते ४५·७२ सेंमी. च्या (१६ ते १८ इंची) तोफा व ५०,००० टनभारापर्यंतच्या युद्धनौका बांधण्याचे कार्यक्रम वरील राष्ट्रांनी हाती घेतले. १९२१ साली जागतिक नाविक बळात समतोल राखण्यासाठी वॉशिंग्टन येथे तह झाला. १९३७ सालाअखेर नाविक बळ वाढविण्याची स्पर्धा सुरू झाली. जपानच्या काही नौका ६४,००० टनभाराच्या असून त्यांवर सु. ४५·७२ सेंमी. च्या (१८ इंची) नऊ तोफा (४० किमी. पल्ला) बसविल्या होत्या. जपानी युद्धनौकांत नौ-काया रक्षणासाठी १,१४७ विभागक होते. ब्रिटिश नौसेनेत विमानवाहक नौकांची संख्या जास्त होती परंतु त्या टनभार व विमानवाहू शक्तीत कमी पडत. जपान व अमेरिका यांनी संभाव्य युद्धातील विमानवाहकांचे स्वतंत्र स्थान ओळखल्यामुळे त्यांच्या नौकांवर ६० ते ९० लढाऊ विमाने असत. ब्रिटिश विमानवाहक नौकांकडे युद्धानौकांचे साहाय्यक म्हणून बघत. याउलट, युद्धनौका बुडविण्याचे व जगात कोठेही (उदा., पासिफिक महासागरातील बेटे) नाविक बळाचा विस्तार करण्याचे एक प्रमुख अस्त्रसंपन्न साधन म्हणून जपान व अमेरिका त्यांकडे बघत असत. जपानचा पर्ल हार्बर- वरील  हल्ला व पॅसिफिक बेटांवरील आक्रमणे आणि अमेरिकेचे नाविक प्रतिहल्ले ही या दृष्टीकोनाची उदाहरणे होत. शत्रूच्या नौका बुडविण्यासाठी तोफांचा अजिबात उपयोग न करता केवळ नाविक विमानांचाच उपयोग करण्याचे तंत्र प्रथम जपानने व नंतर अमेरिकेने साध्य केले. नाविक विमानांचे पाणतीर, झेप बाँबर, लढाऊ व लढाऊटेहळणी असे चार प्रकार झाले. पाणबुड्यांचा टनभार ६,५०० टनांपर्यंत व पल्ला ४०,००० किमी. पर्यंत वाढला. जपानने ४० किमी. पल्ल्यांचे पाणतीर तयार केले. पाणतीरात ५०० किग्रॅ. वजनाचे स्फोटक असे. जपानने पनामा कालवा फोडण्यासाठी भारी पाणबुड्यांवर सागरी विमाने (सी प्लेन्स) ठेवली होती. रशियाने केवळ किनारासंरक्षणासाठी नौसेना तयार केली होती. दुसऱ्या महायुद्धारंभी वायुहल्ल्यापासून युद्धनौकांचा बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विमानविरोधी तोफा असणे आवश्यक ठरले. युद्धनौकांवर विमानविरोधी तोफांची संख्या १७० पर्यंत गेली.

दुसऱ्या महायुद्धाचा नौसेनेवरील परिणाम : दुसऱ्या महायुद्धात नौसेनेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे बदल झाल्याचे दिसतात, ते पुढील प्रमाणे : (१) युद्धनौकांना दुय्यम स्थान मिळाले. समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणात शत्रूच्या किनाऱ्यावर तोफा डागणे, विमानवाहक नौकांचे वायुहल्ल्यापासून संरक्षण करणे, व्यापारी व इतर वाहतुकी जहाजांच्या काफिल्यांचे रक्षण करणे व सोने-चांदी आणि इतर मौलिक मालमत्ता यांची युद्धनौकांतून ने-आण करणे इ. गोष्टी रूढ झाल्या. (२)  आघात विमानवाहक जहाजांनी प्रथम स्थान मिळविले. नाविक बळाचा वापर करण्याचे ते प्रमुख साधन बनून लढाऊ नाविक दलांची संरचना व व्यूह त्यांच्या केंद्राभोवती होऊ लागले. विमानवाहकाला अनुकूल अशी युद्धतंत्राची आखणी नियोजन करणे क्रमप्राप्त झाले. (३) रसदपुरवठा, दुरुस्ती इत्यादींसाठी स्थायी तळांवर न विसंबिता व भर समुद्रावर न थांबता ही कामे करण्यासाठी साहाय्यक जहाजे आवश्यक ठरली. सागरी सांग्रामिक पुरवठा हे नवीन तंत्र उदयास आले. या तंत्राकडे केलेले दुर्लक्ष हे जपानी नौसेनेच्या पराभवाचे एक प्रमुख कारण आहे. (४) व्यापारी नौदलाचे पाणबुड्या व युद्धनौकांकडून  होणारे नुकसान भरून काढण्यासाठी नौकाबांधणी झपाट्याने करणे अनिवार्य झाले. भाडोत्री व्यापारी जहाजांवर विसंबून राहणे घातक ठरले. व्यापारी नौदल जर बलवान नसेल, तर शत्रूच्या प्रदेशावर आक्रमण करणे आणि त्यावर ताबा मिळविणे अशक्य आहे. (५) रडार व इतर इलेक्ट्रॉनिकी उपकरणे यांची आवश्यकता स्पष्ट झाली. शत्रूच्या युद्धनौकांवर केव्हाही व कसल्याही हवामानात मारा करणे रडारमुळे शक्य झाले. (६) सागरी रणांगण शेकडो किमी. क्षेत्र व्यापते. भरवशाचे संदेश दळणवळण इलेक्ट्रॉनिकी साधनांनी शक्य झाले. (७ ) पाणबुड्यात वायुश्वसनोच्छ्‌वसन यंत्र बसविल्यामुळे त्यांना चार दिवसांहून अधिक काळ जलांतर्गत प्रवास शक्य झाले. यामुळे पाणबुड्यांचा पिच्छा पुरविणे आणि त्यांचा नाश करणे अवघड ठरते. पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात सुधारणा करणे आवश्यक ठरले. (८) अणुशक्तीच्या उपयोगाचे नव क्षेत्र उपलब्ध झाले.

इ. स. १९४५ नंतरचा कालखंड हा ज्ञानविज्ञान व तंत्रविद्या यांनी नौसेनेवर प्रचंड प्रमाणावर केलेल्या परिणामांचा निदर्शक आहे. सांप्रत नौसेनांचा विकास पुढीलप्रमाणे होत असल्याचे दिसते. : (१) अणुशक्तिप्रेरित पाणबुड्यांची संख्या वाढविणे; (२) अण्वस्त्रे वापरून संहार शक्ती वाढविणे; (३) लहान पण जलद पर्यटन करणाऱ्या अस्त्रयुक्त नौका; (४) जलपर्णी व जलपृष्ठ परिणामी वाहने; (५) पाणबुडीविरोधी अस्त्रे व तंत्र; (६) इलेक्ट्रॉनिकी अस्त्रनियंत्रण, नौकानयन व इलेक्ट्रॉनिकी युद्ध-उपकरणे यांचा प्रामुख्याने उपयोग करणे; (७) संदेश दळणवळणासाठी कृत्रिम उपग्रहांचा वापर व (८) प्रचंड विमानवाहक नौकांऐवजी हेलिकॉप्टर आणि ऊर्ध्वारोहणावरोहणी विमानवाहक नौका.

सागरी किनारासंरक्षणदल : कोणत्याही देशाच्या सागरी किनाऱ्यापासून ४० किमी. पर्यंत असलेल्या जलप्रदेशावर त्याचा अधिकार असतो. सैनिकी संरक्षण, प्रतिरक्षण, स्वच्छता, सीमाशुल्क इ. गोष्टी त्या देशाच्या अखत्यारीत असतात. तसेच किनाऱ्यापासून ३२० किमी. अंतरापर्यंतचा जलप्रदेश त्या त्या देशाचा आर्थिक क्षेत्रविभाग मानला जातो. या क्षेत्रविभागात असलेल्या सर्व प्रकारच्या नैसर्गिक संपत्तीचा शोध लावण्याचा, तिचा उपभोग घेण्याचा व संवर्धन करण्याचा हक्क त्या देशाला असतो. या सर्व प्रकारच्या कार्यासाठी सागरी किनारासंरक्षणदल जबाबदार असते. या दलाचा नौसेनेशी घनिष्ठ संबंध असतो. हे दल पुढील कामे पार पाडते. : (१) समुद्रावरील जीवित व मालमत्ता यांचे रक्षण करणे; (२) परकीयांची बेकायदेशीर मच्छीमारी बंद पाडणे; (३) संकटग्रस्तांची सुटका करणे; (४) नष्टशेषशोधन करणे; (५) सीमाशुल्क अधिकाऱ्यास मदत करणे; (६) देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणे; (७) बेटांचे रक्षण करणे व (८) नौसेनेच्या आधिपत्याखाली नौसेनाबळाला पूरक अशी कामे करणे. ⇨ गस्त तसेच टेहळणी [→ टेहळणी, सैनिकी], तोफनौका, नष्टशेषशोधक, अग्निशामक आणि प्रदूषणनियंत्रक इ. प्रकारच्या नौका या दलाकडे असतात. या नौकांचा रंग नौसेनेच्या नौकांपेक्षा वेगळा असतो. ध्वज मात्र नौसेनेचा असतो.

नदीनौदल : नदीप्रवाहात व किनाऱ्यावरील निरुंद खाड्यांत युद्ध करण्यासाठी नदीनौदल लागते. हिंदुस्थानच्या इतिहासात नदीतील युद्धांची वर्णने आहेत. अलेक्झांडरला सिंधू नदीत लढावे लागले. ऋग्वेदात (७·१८) दाशराज्ञयुद्धामध्ये इंद्राने सुदासाच्या शत्रूंना परुष्णी (रावी) नदीत बुडविल्याचा उल्लेख आहे. कोकणच्या खाड्यांत मराठ्यांच्या गलबत व पडावांनी पोर्तुगीज व इंग्रजांशी लढाया केल्या होत्या. आधुनिक काळात गस्त व टेहळणीसाठी वेगवान छोट्या युद्धनौका (बोटी) लागतात. गोळामार तीव्रतेने करणाऱ्या तोफा, मशिनगन आणि उखळी तोफा या प्रकारची शस्त्रास्त्रे उपयोगी ठरतात. जलभूमिगामी (जलपर्णी) इ. नौका अत्यंत सोयीस्कर असतात. नदीयुद्धाचे तंत्र सागरी युद्धापेक्षा वेगळे आहे.

जागतिक नौसेना : अमेरिका, सोव्हिएट युनियन, इराण, इंडोनेशिया, ग्रेट ब्रिटन, श्रीलंका व भारत या राष्ट्रांच्या नौसेनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

अमेरिका : अमेरिका व पश्चिम युरोपीय लोकशाही राष्ट्रे (फ्रान्स वगळून) सोव्हिएट युनियन व यूरोपीय साम्यवादी राष्ट्रांविरुद्ध एकजूट करून उभी आहेत. अमेरिकेचे धोरण नौसेनेच्या बाबतीत पुढीलप्रमाणे आहे. – (१) स्वतःसाठी व मित्रराष्ट्रांसाठी सागरी मार्ग निर्धास्त करणे, तसेच शत्रूचे युद्धकाळात दळणवळण बंद पाडणे. (२) राष्ट्रीय, राजकीय व आर्थिक धोरणाला पोषक होईल परंतु संभाव्य शत्रुराष्ट्रांबरोबर युद्ध पेटणार नाही अशा पद्धतीने सागरावर अस्तित्व दाखविणे. (३) शत्रूला युद्धपराङ्‌मुख करण्यासाठी शत्रूवर दहशत व वचक बसविणे. या कार्याला दूरगामी नाविक नीती म्हणतात. या कार्याकरिता अणुशक्ति प्रेरित आणवीय क्षेपणास्त्रे असलेल्या पाणबुड्या, पर्यटन क्षेपणास्त्रे व दूरगामी बाँबर आहेत. (४) शत्रूच्या किनाऱ्यावर युद्धकाळात सैन्य उतरवून शत्रुभूमी काबीज करणे. यासाठी विमानवाहक व इतर युद्धनौका, वाहतूक जहाजे वापरली जातात. १९७५ सालाअखेर अमेरिकी नौसेनाबळ पुढीलप्रमाणे होते. युद्धनौका : लढाऊ विमानवाहक २०, हेलिकॉप्टरवाहक ७, आधिपत्य ३ पाणबुड्या (आणवीय) १११ पारंपरिक पाणबुड्या १५ भारी युद्धनौका ४  क्रूझर ३५ विनाशिका ११२ फ्रिगेट ३१ सुरंग संमार्जक ३७ गस्त ३१  अवतरण १०८ व इतर सहायक (उदा., पुरवठा, संदेश, दुरुस्ती वगैरे) १,६१४ किनारासंरक्षण २७२. विमानवाहक नौकेवर ७० ते १०० लढाऊ विमाने असतात. सर्व युद्ध नौकांवर तोफा व प्रक्षेपणास्त्रे असतात. ४० आणवीय पाणबुड्यांवर प्रत्येकी १६ अण्वस्त्रे (हायड्रोजन बाँब) बसविली आहेत. त्यांचा पल्ला ३,५०० ते ७,००० किमी. आहे. भारी युद्धनौकांवर १२·५ व ४० सेंमी. तोफा असतात. सैनिक व अधिकारी संख्या ५, ३५, १०० व नाविक लढाऊ दल १,९६,०००.

सोव्हिएट युनियन : सोव्हिएट युनियन (रशिया) चे नौसेनेविषयक धोरण अमेरिकेप्रमाणेच आहे परंतु यासाठी पाणबुड्या, आंतरखंडीय क्षेपणास्त्रे व आणवीय अस्त्रयुक्त दूरगामी बाँबर पुरेशी ठरतील, अशी रशियाची मनोधारणा आहे. १९७६ अखेर सोव्हिएट युनियनच्या नौसेनेचे बळ पुढीलप्रमाणे होते : विमानवाहक २ हेलिकॉप्टरवाहक २ क्रूझर ३२ विनाशिका १०९ संरक्षक ३१० सुरुंग संमार्जक ४१० गस्त, टेहळणी व पाणबुडीविरोधी ३०० जलपर्णी तोफ २५ जलभूमिगत १६३ साहाय्यक २४० संशोधन व सर्वेक्षण ३३२ साध्या पाणबुड्या २७५ आणवीय पाणबुड्या १२५ व इतर सु. १,०००. नौसेना सैनिक व अधिकारी ५५,०००.

पॅसिफिक महासागर सोडल्यास नौसेनेला मुक्त संचार करणे कठीण जाते. उदा., काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्रात आणि हिंदी व अटलांटिक महासागरात येण्यास दार्दानेल्स, सुएझ कालवा व जिब्राल्टरची खांडी यामधून जावे लागते. बाल्टिक समुद्रातून अटलांटिक महासागरात प्रवेश मार्गावर पश्चिम जर्मनी, ग्रेट ब्रिटन व आइसलँड ही राष्ट्रे अडथळे आणू शकतात. उत्तर ध्रुव समुद्र हा बर्फाच्छादित असतो. पॅसिफिकमधून हिंदी महासागरात येण्यासाठी मलॅका व सूंदा खाडी ओलांडावी लागते. यासाठी पाणबुड्यांवर बराच भर दिला जात आहे. नौसेनेचे प्रचलित स्वरूप व कार्य प्रतिबंधात्मक आणि संरक्षणात्मक दिसते. १९८० नंतर नौसेनेत महत्त्वाचे बदल दिसणे शक्य आहे. प्रत्येक नौकेवर आक्रमक व संरक्षक तोफा, क्षेपणास्त्रे इ. बसविलेली आहेत. त्यामुळे त्यांची मारकशक्ती मोठी आहे. सोव्हिएट नौसेनेला सागरी युद्धाचा (१९०५ नंतर) फारसा अनुभव नाही.

इराण : नौसेनाबळ (१९७६) पुढीलप्रमाणे आहे: विनाशिका ३ फ्रिगेट व कॉर्व्हेट ८ सुरुंग संमार्जक ६ गस्त १६ जलपर्णी १२ जलभूमिगामी २ सहायक ५ आणि सैनिक १३,०००. पुढील पाच वर्षांत १ क्रूझर किंवा ४ छोट्या विमानवाहक नौका ६ विनाशिका ४ फ्रिगेट कित्येक पाणबुड्या २ जलपर्णी व २ सहायक जहाजांची भरती होणे शक्य आहे. इराणी नौसेना नुकतीच जन्मास आली आहे. नौसेनेची सर्व सामग्री अमेरिका व ब्रिटनकडून घेतली जाते. चाहबहार येथे सेनातळ तयार करण्यात येत आहे.

इंडोनेशिया :  ५ ऑक्टोबर १९४५ रोजी या देशात नौसेनेची स्थापना झाली. नौसेनेचे बळ पुढीलप्रमाणे आहे : फ्रिगेट १२ क्षेपणास्त्र बोटी १२ सुरुंग संमार्जक १७ गस्त-टेहळणी-पाणतीर बोटी ९५ जलभूमिगामी १४ सर्वेक्षण ४ सहायक २९ आणि सैनिक ३९,०००. यांशिवाय ३ पाणबुड्या व ८ विनाशिका आहेत परंतु त्यांची युद्धक्षमता शंकास्पद आहे. भौगोलिक परिस्थितीच्या संदर्भात केवळ किनारासंरक्षण व किनाऱ्यालगतची युद्धकारवाई करण्यापुरतीच या नौसेनेची क्षमता आहे.

ग्रेट ब्रिटन : १९७५ सालअखेर नौसेनेचा आकार व स्वरूप पुढीलप्रमाणे दिसते. युद्धनौका : विमानवाहक व कमांडो ३ आणवीय पाणबुड्या ८ साध्या पाणबुड्या २२ क्रूझर २ विनाशिका १० फ्रिगेट ५८ जलभूमिगामी २ सुरुंग संमार्जक ४४ गस्त-टेहळणी ११ साहाय्यक ५६ आणि सैनिक ७७,४०० असून खर्च सु. १०६ कोटी पौंड आहे. ब्रिटन नाटोचा सदस्य असल्यामुळे पूर्वयूरोपीय सोव्हिएट युनियनपासून होणाऱ्या संभाव्य आक्रमणास तोंड देण्याच्या दृष्टीने त्याची नौसेना संघटना आहे. १९४५ सालापूर्वी ब्रिटनची नौसेना अद्वितीय होती. उत्तर बाल्टिक, भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागर येथील कारवायांसाठी (नाटोच्या इतर सदस्यांच्या साहाय्याने) ब्रिटिश नौसेना सज्ज आहे.

श्रीलंका : ९ डिसेंबर १९५० रोजी नौसेनेचा पाया घालण्यात आला. नौसेनेत १९७६ अखेर १ फ्रिगेट २९ तोफ नौका व गस्तीनौका आणि इतर ३ सहायक नौका असून एकूण सैनिक २३० आहेत.

भारतीय नौसेना : तेराव्या शतकापासून ते इ. स.१९४७ पर्यंत भारताने नौसेनाक्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले नाही. याची कारणे म्हणजे दीर्घकालीन पारतंत्र्य व जमिनीवर होणाऱ्या लढाया ही होत. आठव्या शतकापासून ते सतराव्या शतकाअखेरपर्यंत हिंदुस्थानावर खुष्कीच्या मार्गाने परकीय आक्रमणे झाली. पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून पाश्चात्त्यांनी सागरामार्गे व्यापारी आक्रमणे करून शेवटी इंग्रजांनी हिंदुस्थानावर राज्य स्थापले. इ. स. पू. सु. सोळाव्या शतकापूर्वी म्हणजे आर्यांच्या आक्रमणापूर्वी सिंधू संस्कृतीचा सुमेर, अक्कड इत्यादींबरोबर सागरी व्यापार चाले. हा व्यापार निर्विघ्नपणे चालत असण्याचा संभव नाही परंतु तत्कालीन नौसेना कशा असाव्यात, हे मात्र सांगता येत नाही. पुरातत्त्व उत्खननात सापडलेल्या मुद्रा व भांड्यांवरील नौकांच्या चित्रांवरून त्या काळी शिडांची जहाजे होती हे कळते. रामायणामध्ये (अयोध्याकांड ९५) नदीत लढणाऱ्या नौका व सेना यांचा उल्लेख आहे. महाभारतात नौसेना हे एक सेनांग आहे. ऋग्वेदामध्ये (मंडल १, ७ व १०) नौकांचे उल्लेख आहेत परंतु त्यांचे स्वरूप कळत नाही. पुराण, जातक इ. वाङ्‌मयात नौका, सागरी व्यापार इत्यादींची वर्णने आहेत.

अर्थशास्त्रातील नावाध्यक्ष (२·२८) या प्रकरणात शत्रूच्या नौकांचा विध्वंस करावा असे म्हटले आहे तथापि चाणक्याने नौसेनेचा उल्लेख केलेला नाही. पुराणांत व जातकादी वाङ्‌मयात नौका, नौकाबांधणी व पर्यटन यांचे उल्लेख आहेत. गुप्त, कलिंग, हर्ष, यादव, कदंब व शिलाहार इत्यादींच्या नौसेना असाव्यात. चौलांनी नाविक बळाचा उपयोग करून जावा, सुमात्रा व कंबोज या देशांत साम्राज्यविस्तार केला होता. अकबराच्या आइन-इ-अकबरीत मोगली नौसेनेची माहिती मिळते.

नौकाबांधणीबद्दल युक्तिकल्पतरु या मध्ययुगीन ग्रंथात माहिती मिळते. ज्या नौकांच्या लांबी-उंचीचे प्रमाण १० : १ व रुंदी-उंचीचे प्रमाण १·२५ : १ असते, त्या नौका अस्थिर असतात आणि ज्यांचे प्रमाण २ : १ व १ : १ असते, त्या संकट आणतात असा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत नौशिल्पकल्पना अवास्तव वाटतात. संस्कृत ग्रंथ घटक-कारिका (१६ ते १८ वे शतक) व औरंगजेबकालीन फतिया-इ-इब्रिया या ग्रंथांत नौकांविषयी पुष्कळ वर्णने आहेत.

स्वतंत्र भारताच्या व पाकिस्तानच्या नौसेनांचे मूळ, १६१३ साली सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापिलेल्या ‘हिंदुस्थानी मरीन’ (इंडियन मरीन) या नौदलात सापडते. अरबी समुद्रात ⇨ चाचेगिरी चाले. या चाच्यांशी मुकाबला करता यावा म्हणून ५ सप्टेंबर १६१२ रोजी दोन शस्त्रास्त्रयुक्त व्यापारी जहाजे ब्रिटिशांच्या सुरत वखारीत दाखल झाली हीच इंडियन मरीनची सुरुवात होय. इंडियन मरीनमध्ये गुरब व गलबते (सु. ७५ ते ३०० टनभाराची) पुढे आली. त्यात हिंदू कोळ्यांची नौसैनिक म्हणून भरती केली जाई. खंबायतचे आखात, तापी व नर्मदा यांच्या मुखाजवळील सागरीक्षेत्राचे रक्षण हे काम मरीनकडे होते. सुरत, अहमदाबाद आणि खंबायत येथे नाविक प्रशिक्षण दिले जाई. १६१५ पर्यंत १० गुरब आणि गलबते काम करीत. १६२२ मध्ये इराणी आखातातील ओर्मुझ बंदर ‘मरीन’ ने ताब्यात घेऊन चाचेगिरीला बराच आळा घातला. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराशी इंडियन मरीनला लढावे लागले. ५ जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराजांच्या सुरतवरील हल्ल्यात मरीनने तोफा डागून फॅक्टरीचे रक्षण केले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर शिवाजींनी जलदुर्ग बांधून ब्रिटिश, सिद्दी व पोर्तुगीज यांच्या सागरी सत्तेवर दडपण आणले. खांदेरीवरून मराठा आरमाराला हुसकावून लावण्यात इंडियन मरीन व इतर अयशस्वी झाले. १६८३ मध्ये सुरत सोडून मुंबईत इंडियन मरीनचा तळ हलविण्यात आला व त्यास ‘बाँबे मरीन’ हे नवे नाव देण्यात आले. १६८६ ते १७३६ पर्यंत मराठा आरमार व बाँबे मरीन यांच्यात पश्चिम किनाऱ्यावरील वर्चस्वासाठी सागरी लढाया चालू होत्या. ब्रिटिश शाही नौसेना, सिद्दी व पोर्तुगीज यांचे साहाय्य बाँबे मरीनला जर मिळाले नसते, तर मराठ्यांनी सरखेल आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर स्वामित्व स्थापले असते व हिंदुस्थानच्या इतिहासाला कदाचित निराळे वळण लागले असते. १६८० ते १७०७ या काळात मराठ्यांना जमिनीवर मोगलांशी निर्वाणीचा लढा द्यावा लागला, ही वस्तुस्थिती या संदर्भात महत्त्वाची ठरते. १७१६ च्या सुमारास बाँबे मरीनकडे २५ गुरब व गलबते होती. या नौकांवर एकूण ३८४ लहानमोठ्या तोफा होत्या. कमोडोर मॅथ्यूझ हा मरीनचा सरखेल होता. अठराव्या शतकात यूरोपात इंग्रज-फ्रेंच यांच्यामध्ये युद्धे चालू होती. त्यामुळे बाँबे मरीनची झपाट्याने प्रगती होत राहिली. १७३५ मध्ये मुंबईत हल्ली असलेल्या नाविक गोदीची बांधणी पुरी होऊन तेथे नौकाबांधणीस सुरुवात झाली. १७५० मध्ये सुकी गोदी तयार झाली. १७५१ मध्ये मरीनकडे ११ मोठ्या युद्धनौका, २५२ तोफा व पुष्कळ गलबते होती. १७४८ ते १७५६ च्या दरम्यान सरखेल संभाजी आंग्रे यांच्या मराठा आरमाराचा धुव्वा उडविण्यासाठी ब्रिटिशांनी फार प्रयत्न केले. आंग्रे यांचा वरचष्मा पेशव्यांना सहन होत नसे. नानासाहेब पेशव्याने जमिनीच्या बाजूने व बाँबे मरीनने सागरी मार्गाने धेरीया ऊर्फ सुवर्णदुर्गावर चढाई करून आंग्र्यांचा पराभव केला. या लढाईत ब्रिटिशांचे रॉबर्ट क्लाइव्ह व वॉटसन हे अधिकारी होते. पेशव्यांनी अदूरदर्शीपणाने ब्रिटिशांना पश्चिम किनाऱ्यावर सत्ता स्थापण्यास आणि मराठा साम्राज्याचा ऱ्हास करण्यात मदत केली. १७६१ च्या सुमारास बाँबे मरीनला नाविक गणवेष देण्यात आला. त्यातील अधिकारी इंग्रज असत. नौसैनिकांपैकी ७५% सैनिक कोकणी असत. मराठा आरमाराचा निकाल लावल्यावर हैदर अलीची बंदरे बाँबे मरीनने जिंकली. एकोणिसाव्या शतकारंभी जावा, सुमात्रा यांवर हल्ले करण्यात मरीन यशस्वी झाले. १७९८ मध्ये मुंबई येथे मरीन बोर्ड स्थापण्यात आले. बोर्डाच्या आज्ञेप्रमाणे सागरी वाहतुकीचे संरक्षण, मुंबई बंदरात जलमार्ग दर्शन, सागरी सर्वेक्षण व जलालेखन इ. कामे मरीनला देण्यात आली. काठेवाड, सिंध, मकरान किनारा व इराणी आखाताचे जलालेखन मरीनने केले. १८२४ मध्ये मरीनने ब्रह्मदेशावरील आक्रमणात भाग घेतला. १८२९ साली लष्करी कायदा लागू करून ‘बाँबे मरीन’ ला ‘मरीन कोअर’ नाव देण्यात आले. अमेरिकेत झालेल्या राज्यक्रांतीमुळे ब्रिटिशांना तेथील उत्तम प्रकारचे लाकूड मिळणे अशक्य झाले. जहाज बांधणीस मलबारी सागवान लाकूड उत्कृष्ट गणले जाते. परिणामतः मुंबई बंदरात जहाजबांधणीस चालना मिळाली. मुंबईच्या याट (खेळाच्या बोटींच्या) क्लबपाशी सुक्या गोदीत जहाजबांधणीसाठी तीन घसरमार्ग बांधण्यात आले. येथेच २,५९१ टनभाराची मिआनी युद्धनौका बांधण्यात आली. १८३० साली ‘मरीन कोअर’ हे नाव बदलून ‘इंडियन नेव्ही’ (हिंदी नौसेना) हे नाव देण्यात आले. २० मार्च १८३० रोजी मुंबई गोदीत बांधलेल्या व वाफेवर चालणाऱ्या ह्यू लिंडसे नौकेला समुद्रात सोडण्यात आले. शीडयुक्त जहाजांना समुद्रात ओढून नेऊन वाऱ्यात सोडण्यासाठी वाफेवर चालणाऱ्या जहाजांचा उपयोग होत असे. शिडाच्या जहाजांच्या अस्तास सुरुवात होऊन वाफेची जहाजे हिंदी नौसेनेत भरती होऊ लागली. नौकांचा टनभार (६००–७०० टनभार) वाढीस लागून सु. २०·३२ सेंमी. च्या (८ इंची) भारी तोफा प्रचारात येऊ लागल्या. १८३९ मध्ये एडन बंदर ईस्ट इंडिया कंपनीने काबीज केले. १८४३ च्या सुमारास हिंदुस्थानी नौसेनेत वाफेची ११ फ्रिगेट व इतर १५ युद्धनौका होत्या. १८४५ साली मुंबईपाशी बुचर बेटावर नाविक तोफखाना शाळा सुरू झाली. शीख-इंग्रज युद्धात नौसेनेने मुलतान मोहिमेत भाग घेतला. १८५२–५६ मध्ये ब्रह्मदेश व इराण-मोहिमांत कामगिरी केली. १८५७ च्या उठावात नौसैनिकांचा पायदळासारखा उपयोग झाला. एका हिंदी सैनिकाला व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. उठावाचा विलक्षण परिणाम म्हणजे हिंदी नौसेनेचे विघटन होऊन मुंबई व कलकत्ता मरीन अशी दोन बिनलढाऊ नौकादले संघटित झाली. तारायंत्राच्या तारा समुद्रात सोडणे व जलालेखन करणे ही कामे त्यांस देण्यात आली. १८७७ मध्ये महाराणीचे ‘इंडियन मरीन’ उभारले गेले. हेदेखील बिनलढाऊच होते. काही पाणतीर नौका मरीनला मिळाल्या. ईजिप्त व ब्रह्मदेश यांवरील आक्रमणात मरीनने वाहतुकीचे काम सांभाळले. १८९० मध्ये मुंबईत एक पाणतीर गोदी बांधण्यात आली. १८९२ मध्ये इंडियन मरीन नाव जाऊन ‘शाही हिंदी मरीन’ हे नाव मिळाले. १८९६ ते १९०४ या काळात पूर्व आफ्रिकेत व बोअर युद्धात या मरीनने बिनलढाऊ कामे केली. पहिल्या महायुद्धात मरीनच्या बिनलढाऊ नौकांचे हत्यारी नौकात रूपांतर झाले. या युद्धाच्या अखेरीस ५०० ब्रिटिश अधिकारी व १३,००० सैनिक मरीनच्या सेवेत होते. १९१८ साली लढाऊ कारवाया करण्यास मरीनला समर्थ करावे व त्यासाठी मरीनला युद्धनौका पुरवाव्या अशी ब्रिटिश शाही नौसेनेच्या कार्यालयाला ॲड्‌मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड जेलिकोने शिफारस केली परंतु ॲड्‌मिरल मॉवबी याच्या नेमणुकीशिवाय दुसरी भरीव कामे पुढे ढकलण्यात आली. पुन्हा १९२५ मध्ये जनरल रॉलिन्सन, ॲड्‌मिरल सर रिचमंड व कॅप्टन हेडलम या तिघांच्या समितीने पुढीलप्रमाणे शिफारसी केल्या : मरीनऐवजी शाही हिंदी नौसेना नाव द्यावे. ४ स्लूप युद्धनौका, २ गस्ती, ४ ट्रॉलर, २ सर्वेक्षण व १ भांडार अशा १३ नौका नौसेनेत असाव्या इत्यादी. ११ नोव्हेंबर १९२८ रोजी शाही हिंदी नौसेना कार्यान्वित झाली. ध्वज ब्रिटिशांच्याच सेनेसारखा होता व त्यात एकही हिंदी अधिकारी नव्हता. सैनिक मात्र कोकणी व बंगाली होते. १९२८ साली केंद्रीय विधानसभेत हिंदी नौसेना-शिस्त कायदा विचारासाठी आला पण तो एकमताने फेटाळला गेला. शेवटी ८ सप्टेंबर १९३४ रोजी कायदा संमत झाला व २ ऑक्टोबर १९३४ रोजी मुंबईत हिंदी नौसेना कायदेशीरपणे प्रस्थापित झाली आणि २,००० वर्षांच्या भारतीय सागरी परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. १९३४ पासून आगामी यूरोपीय महायुद्धाची चाहूल लागली. ॲड्‌मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड चॅटफील्ड याच्या नौसेनासुधारणा शिफारशी तत्काळ मंजूर झाल्या. नौसेनेच्या वाढीस व आधुनिकीकरणास गती मिळाली. ॲड्‌मिरल सर हरबर्ट फिट्‌सहरबर्ट हे नौसेनापती झाले. राखीव व स्वयंसेवक दले उभारण्यात आली. उमेदवारांकरिता नाविक प्रशिक्षणाची सोय झाली. १९४५ अखेर हिंदी नौसेनेत १५ युद्धनौका (स्लूप, फ्रिगेट व कॉर्व्हेट) आणि ४५७ इतर पूरक नौका, ३,०४४ नाविकाधिकारी व २७,४३४ नौसैनिक होते. मुंबई, कलकत्ता, विशाखापटनम्, कोचीन व मद्रास येथे मुख्य नाविक तळ होते. विविध प्रकारच्या नाविक प्रशिक्षणाच्या संस्था पुढील ठिकाणी होत्या. पाणबुडी विरोधी अधिकारीप्रशिक्षण व संदेश दळणवळण संस्था, मुंबई तोफखाना, कराची अभियांत्रिकी, ठाणे व तुर्भे आणि लोणावळा प्रशिक्षणव्यवस्था, मुंबई व कराची रडार, कराची. दुसऱ्या महायुद्धात हिंदी नौसेनेच्या पठाण, पार्वती व सिंधू या तीन युद्धनौका कामास आल्या. १९४१ मध्ये मुंबईहून प्रमुख नौसेना कार्यालय दिल्लीला हलविण्यात आले. १८ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबई येथे नौसेनेने बंड पुकारले. युद्धानंतर नौसेनेत झालेली व होणारी सैनिककपात व भविष्यकाळाची काळजी ही बंडाची कारणे होती. हिंदुस्थानातील राजकीय असंतोषाची छायाही बंडवाल्यांवर पडली होती. शेवटी राजकीय पुढाऱ्यांनी सैनिकांची मने वळविली.

हिंदुस्थानची फाळणी १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाली. फाळणीमुळे ४ विमानविरोधी आणि २ पाणबूडीविरोधी फ्रिगेट, १ कॉर्व्हेट, १२ सुरुंग संमार्जक व १ सर्वेक्षण अशा २० नौका भारताकडे आल्या. दुसऱ्या महायुद्धात पंजाबी मुसलमानांची बहुसंख्येने भरती झाली होती. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले. ४ नाविक प्रशिक्षणसंस्था पाकिस्तानातच होत्या. त्यामुळे भारतीय नौसेनेला कठीण परिस्थितीशी तोंड द्यावे लागले. कमोडोर नॉट भारतीय नौसेनेचे चीफ ऑफ स्टाफ होते. त्यांनी या विपरीत परिस्थितीवर मात करून नौसेनेचा गाडा पुढे चालू ठेवला. दुर्दैवाने नॉट एका विमान-अपघातात मरण पावले. स्वतंत्र भारताच्या घटना व नौसेना कायद्याप्रमाणे भारतीय नौसेनेस संरक्षणसेनांत स्थान मिळाले. भारतीय नौसेनेला पुढीलप्रमाणे कामे करावी लागतात : भारताच्या सीमांचे रक्षण, व्यापारी वाहतुकीचे रक्षण, सागरी सर्वेक्षण व जलालेखन, नौका व नाविक तळ बांधणे, सागरीक्षेत्राची टेहळणी व गस्त, भारताच्या सार्वभौमत्वाखाली असलेल्या सागरीक्षेत्राचे संरक्षण, लष्करी कारवायांत इतर सेनादलांना साहाय्य करणे, अधिकारी व सैनिक यांचे प्रशिक्षण, व्यापारी नौदलाशी संपर्क राखणे व सागरी किनारासंरक्षक दलास साहाय्य करणे इत्यादी. २७ मे १९५१ रोजी तत्कालीन राष्ट्रपतींनी नौसेनेला राष्ट्रपतिध्वज बहाल केला. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना २ क्रूझर, ६ विनाशिका, १ विमानवाहक, १ तेलपुरवठा, ६ सुरुंग संमार्जक, ८ विमान व पाणबुडीविरोधी आणि ५ जलालेखन नौकांची नौसेनेत भरती होऊन नौसेनेचे बळ वाढू लागले. मुंबईच्या माझगाव गोदीत फ्रिगेट बांधण्यास सुरुवात होऊन आजपर्यंत ३ फ्रिगेट बांधण्यात आल्या. २२ एप्रिल १९५८ या दिवशी व्हाइस ॲड्‌‌मिरल स्टीव्हेन कार्लिल यांच्याकडून ॲड्‌मिरल ⇨ रामदास कटारी यांनी नौसेनाध्यक्षपद घेतले. कटारी हे पहिले भारतीय नौसेनाध्यक्ष आहेत (१९५८– ६२). त्यांच्यानंतर ॲड्‌मिरल ⇨ भास्कर सोमण (१९६२–६६), ॲड्‌मिरल ⇨ अधरकुमार चतर्जी (१९६६–७०), ॲड्‌मिरल ⇨ सरदारीलाल मथरादास नंदा (१९७०– ७३),  ॲड्‌मिरल सुरेंद्रनाथ कोहली (१९७३–७६) यांनी नौसेनाध्यक्षपद सांभाळले. ॲड्‌मिरल जाल कर्सेटजी मार्च १९७६ पासून नौसेनाध्यक्ष आहेत.

भारतीय नौसेनेची संरचना पुढीलप्रमाणे आहे :

राष्ट्रीय संरक्षणनीतीला अनुसरून, संरक्षणमंत्री सेनाध्यक्षाकरवी नौसेनेची कामे पार पाडतो. नौसेनाध्यक्षाच्या मदतीला कर्मचारी असून त्यांची कामे पुढीलप्रमाणे असतात : उपनौसेनाध्यक्ष–हा व्हाइस ॲड्‌मिरलच्या हुद्याचा असतो. नाविक युद्धनीती व कारवायांची योजना आखणे, शस्त्रास्त्रे, गुप्तवार्तासंकलन, संदेश–दळणवळण, जलालेखन इ. गोष्टी त्याच्या अधिकारात येतात. प्रतिनियुक्त नौसेनाध्यक्ष–नाविक वायुदल, पाणबुड्या व त्यांच्याविषयींच्या योजना, पाणबुडीविरोधी युद्धतंत्र इ. कामे याच्या अखत्यारात असतात. याचा हुद्दा व्हाइस ॲड्‌मिरल हा आहे. कार्मिक प्रमुख – हा रिअर ॲड्‌मिरल असतो. सैनिक भरती, प्रशिक्षण, वैद्यकीय सेवा, न्यायव्यवहार, शिस्त व सैनिकी कल्याण इ. विषय याच्या कक्षेत येतात. सांग्रामिकी प्रमुख – हा रिअर ॲड्‌मिरल असतो. स्थापत्य व वास्तुरचना, वेतन, शस्त्रास्त्रे व रसद, तपासणी इ. विषय याच्या कक्षेत येतात. साधनसामग्री प्रमुख – हा व्हाइस ॲड्‌मिरल असतो. युद्धनौका, नाविक तळ, गोदी इत्यादींची शिल्पस्थापत्य–रचना, शस्त्रास्त्रदुरुस्ती ही कामे याच्या अधिकाराखाली असतात. ध्वजाधिपती प्रमुख, पश्चिम कक्ष  –  याचे कार्यालय मुंबई येथे आहे. नौसेनाध्यक्षाच्या आज्ञेप्रमाणे नाविक युद्ध व आनुषंगिक कामे याला करावी लागतात. याच्या हाताखाली पश्चिम आरमार असते. हा व्हाइस ॲड्‌मिरल असतो. ध्वजाधिपती प्रमुख, पूर्व कक्ष–पश्चिम कक्षेप्रमाणे पूर्व कक्षेत हा काम करतो. विशाखापटनम् येथे त्याचे कार्यालय आहे. ध्वजाधिपती, दक्षिण क्षेत्र–कोचीन येथे याचे कार्यालय आहे. कोचीन क्षेत्रातील आरमार, नाविक विमानदल यांचा तो प्रमुख असतो व तो नौसेनाध्यक्षाच्या आज्ञेप्रमाणे काम करतो.

प्रशिक्षण व्यवस्था : नौसैनिकी प्रशिक्षणाची व्यवस्था भारतात पुढील प्रमाणे आहे :  (१) कोचीन तळ – वेंदुर्थी व गरुडनौका यांवर तोफखाना, नौकानयन, संदेश – दळणवळण, पाणतीर व पाणबुडीविरोधी, नाविक विमान इत्यादी; (२) दाबोलीं (गोवा) तळ–हंस नौकेवर नाविक विमान उड्डाण इत्यादी; (३) विशाखापटनम् – सरकार नौकेवर उमेदवारांचे प्रशिक्षण; (४) लोणावळा – शिवाजी नौकेवर यांत्रिक अभियांत्रिकी; (५) जामनगर – वलसुरा नौकेवर विद्युत् व रडार;  (६)  मुंबई (मालाड) –  हमला नौकेवर पुरवठा व चिटणीसी तसेच इतर आर्थिक व्यवहार; (७) माझगाव (मुंबई) – माझगाव गोदीत बिगरसैनिकांना यांत्रिक शिक्षण दिले जाते. यांखेरीज मुंबई येथे अश्विनी व कोचीन येथे संजीवनी नौका यांवर वैद्यकीय उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाकिस्तानने १९४७ नंतर भारतावर चार वेळा आक्रमणे केली. १९४८ व १९६५ मध्ये झालेल्या युद्धात भारतीय नौसेनेला सागरावर पाकिस्तानच्या आरमाराशी लढण्याची संधी मिळाली नाही. टेहळणी, गस्त व वाहतुकीचे रक्षण ऐवढीच कामगिरी नौसेनेने बजावली. १९७१ सालच्या युद्धात भारतीय नौसेनेने बांगला देश व पाकिस्तान यांच्यातील सागरी दळणवळण बंद पाडले कराची व चितगाँग बंदरांवर हल्ले करून पाकिस्तानी आरमाराची नाकेबंदी केली. चितगाँगच्या किनाऱ्यापाशी भारतीय सैन्याला हल्ला करण्यास साहाय्य केले आणि पाकिस्तानी आरमाराची नासधूस केली.

भारतीय नौसेनाबळ पुढीलप्रमाणे आहे : अधिकारी व सैनिक : ३०,००० युद्धनौका : लढाऊ विमान वाहक १ क्रूझर २ विनाशिका ९ फ्रिगेट १० गस्ती नौका १७ सुरुंग संमार्जक ८ अवतरण ४ लहान किनारासंरक्षक १० लढाऊ विमाने ३५ हेलिकॉप्टर ४३. युद्धनौका प्रक्षेपणास्त्रयुक्त आहेत. नाविक वायुदलात १,५०० वायुसैनिक व अधिकारी आहेत. लिंडर वर्गीय फ्रिगेटवर प्रक्षेपणास्त्रे व तोफा असतात. या माझगाव गोदीत बांधल्या आहेत. विमाने:  ‘सी-हॉक’, हेलिकॉप्टर आणि दीर्घ टेहळणीसाठी स्वतंत्र विमाने असतात. ब्रीदवाक्ये व शीर्षप्रतीके : ‘शं नो वरुणः।’ हे नौसेनेचे, तर, ‘जयेम सं युधिस्पृहाः।’ हे विक्रांत (विमानवाहक) चे व ‘न विभति कदाचन्।’ हे विनाशिका म्हैसूरचे अशी ही ब्रीदवाक्ये असून ती वेद व उपनिषदे यांतून घेतली आहेत. प्रत्येक नौकेचे स्वतंत्र ब्रीदवाक्य असते. नौकांवर शीर्षचिन्हेही लावली जातात.

पाहा : जहाजबांधणी; नाविक युद्धतंत्र; युद्ध व युद्धप्रक्रिया; संयुक्त सेनाकारवाई; सांग्रामिकी.

संदर्भ : 1. Apte, B. K. A History of the Maratha Navy and Merchant Ships, Pune, 1973.

2. Ballard, G. A. Rulers of Indian Ocean, London, 1927.

3. Brodie, B. Sea Power in Machine Age, Princeton, 1944.

4. Mordal, J. Twenty Five Centuries of Sea Warfare, London, 1965.

5. Sridharan, K. A Maritime History of India, Delhi, 1965.

इनामदार, य. न.; दीक्षित, हे. वि.