कटारी , रामदास  : (८ ऑक्टोबर १९११ — ). भारताचे माजी नौदल प्रमुख. जन्म तमिळनाडूमधील चिंगलपुट येथे. वडिलांचे नाव एस्. व्ही. नायडू. सिकंदराबाद व हैदराबाद येथे शिक्षण. प्रशिक्षणनौका ⇨ डफरिनवर नौकानयनाचे प्रशिक्षण. काही वर्षे हुगळी नदीवर सर्वेक्षण-कामावर होते. नंतर भारतीय नौसेनेत कमिशन. दुसऱ्या जागतिक महायुध्दात अटलांटिक व हिंदी महासागरांवर युध्दानुभव. १९४९ — ५१ या दरम्यान भारतीय नौसेनेचे प्रमुख आस्थापना अधिकारी. १९५१ ते १९५२ मध्ये विनाशक दलाचे कप्तान व ‘राजपूत’ नौकेचे कमांडिंग ऑफिसर. १९५३ मध्ये लंडन येथील शाही संरक्षण विद्यालयात उच्च शिक्षणक्रमासाठी नियुक्ती. १९५४ — ५६ मध्ये भारतीय नौदलाचे दुय्यम प्रमुख. ऑक्टोबर १९५६ ते एप्रिल १९५८ या काळात भारतीय नौदलाचे प्रमुख ध्वजाधिकारी. १९५८ ते ६२ पर्यंत भारतीय नौदल प्रमुख. नोव्हेंबर १९६२ ते जून १९६४ पर्यंत आंध्र प्रदेश परिवहन मंडळाचे प्रमुख. जून १९६४ ते नोव्हेंबर १९६९ या काळात ते ब्रह्मदेशातील भारताचे राजदूत. जानेवारी १९७० ते फेब्रुवारी १९७१ या काळात माझगाव डॉक लिमिटेड व गोवा शिपयार्ड लिमिटेड यांचे ते मानसेवी अध्यक्ष होते.

रामदास कटारी

टिपणीस, य. रा.